top of page

सुहाना सफर और ये मौसम हसीं...

By Mrs. Ritu Patil Dike


"संध्या, मला देवपुजेसाठी बागेतून जरा फुलं देतस आणून?"

," सध्या मला जरा बाहेर जायचं आहे नाश्ता करूनच जातो बनवतेस लगेच?",

" संध्या अगं ऋषी आलाय खूप दिवसांनी, आमच्या दोघांसाठी मस्तपैकी कॉफी बनवून दे ना."

"आई गं, मी पायल बरोबर डबा पार्टीला जाते, छानसा डबा बनवुन दे ना".

आई ,बाबा, अभय, प्रिया साऱ्यांनी संध्याला एकदमच कामाला लावलं. आज सुट्टीचा दिवस साऱ्यांप्रमाणेच संध्यालाही निवांतपणे घालवावा असं वाटत होतं. आज जरा उशिराच उठायचं असं तिने ठरवलं होतं पण सवयीप्रमाणे तिला साडेपाचला जाग आली आणि मग झोप लागेना शेवटी ती उठली. लवकर उठलेच तर भराभर कामावरून एखादा छानसं पुस्तक वाचावं असे तिने ठरवलं, बऱ्याच दिवसात तिने काही छानसं वाचलं नव्हतं. पण साऱ्यांचं सारं एकत्र आलं आणि संध्याचं प्लॅनिंग जरा बिचकलंच. संध्याने लगेच एका शेगडीवर कॉफी बनवायला घेतली आणि परात घेऊन थालीपीठासाठी पीठ मळू लागली . "अगं संध्या, फुलं देतेस ना आणून?", " हो आणते, पाच मिनिटं थांबा आई"

पीठ मळून झालं तोवर कॉफी तयार झाली, ती घेऊन संध्या हॉलमध्ये अभय आणि ऋषी साठी घेऊन आली,

"काय संध्या? कशी आहेस?"

"मी मस्त तू सांग, तू कसा आहेस?"




"मी पण मजेत, अगं आज सुट्टी म्हणून म्हटलं तुम्हाला सगळ्यांना भेटावं"

"छान केलंस आला ते,तुम्ही गप्पा मारा, मला जरा काम आहे." असं म्हणत संध्या लगेच बागेत गेली. बागेतून फुलं घेऊन आली तो डायनिंग वर प्रिया आणि बाबा तिची वाटच बघत होते.

"लगेच बनवते तुमचंही" म्हणत संध्याने सासूबाईंना फुलं नेऊन दिली आणि लगेच किचनकडे वळली. पटापट थालीपीठ बनवून तिने बाबांना गरमागरम नाश्ता दिला आणि प्रियासाठी डबा भरला. सारे शांत झाले तोवर संध्या दमली होती. ती डायनिंगच्या खुर्चीवर बसली, "आता कोणीतरी मस्त चहा करून दिला तर किती बरं वाटेन" असा तिच्या मनात विचार आला तोच तिच्या कानावर अभयचे शब्द पडले,

"अरे या या तुम्ही तर एकदम सरप्राईजच दिलंत". संध्या खुर्चीवरून उठणार तोवर तिची नणंद पतीराज आणि चिल्यापीलांसह आत आलेही. संध्याने सऱ्यांचं हसून स्वागत केलं.

" वहिनी अगं तुमच्या सगळ्यांची खूप आठवण येत होती पण यांना वेळच मिळेना मग आज जसा वेळ मिळाला तसे तडक निघालो. तुझ्या हातचा मस्त मसालेभात आणि अळूवडी बनव . खूप दिवस झालेत खाऊन." संध्याला त्या दिवशी जेवढ्या उत्कटतेनं निवांतपणा हवा होता तेवढी तिच्याभोवती कामं वाढत होती. नणंदेने फर्माईश केल्याप्रमाणे संध्याने साग्रसंगीत स्वयंपाक केला. मुलांना आवडतो म्हणून केक बनवला. साऱ्यांची जेवणं,आवराआवर,गप्पागोष्टी होऊन सारे जायला निघाले तेव्हा संध्याकाळचे सहा वाजले होते. पाहुणे गेले आणि आता मात्र संध्याचं डोकं भणभणू लागलं. ती बेसीनवर गेली चेहऱ्यावर पाण्याचे शिपके मारले,चेहरा पुसून काढला . गाडीची चावी काढत,

"आई मी लगेच बाहेरून येते" असं सासूबाईंना सांगून ती घराबाहेर पडली. गाडी काढली, कुठे जायचं, काय करायचं तिने काही ठरवलं नव्हतं. ती पुढे पुढे जात होती. सूर्यास्त, संध्याकाळचा गारवा सारं अंगावर घेत ती चालली होती . अंगाला लागणाऱ्या त्या वाऱ्याबरोबर तिचा थकवा हळूहळू कमी होत होता. एका आईस्क्रीमच्या शॉप वर तिने गाडी थांबवली. आपल्या आवडीचा पिस्ता फ्लेवर घेऊन तिने त्या आईस्क्रीम चा गारवा आपल्या जिभेपासून मनापर्यंत पोहोचवला. दुकानातल्या खुर्चीवर बसून दोन मिनिटं डोळे मिटून घेतले. दिवसभरात जो निवांतपणा तिला हवा होता तो तिला या पंधरा-वीस मिनिटात मिळाला.ती परत घरी जायला निघाली. गाडीवर बसली तेव्हा तिच्या ओठांवर गाणं होतं "सुहाना सफर और ये मौसम हसीं..."


By Mrs. Ritu Patil Dike





1 view0 comments

Recent Posts

See All

He Said, He Said

By Vishnu J Inspector Raghav Soliah paced briskly around the room, the subtle aroma of his Marlboro trailing behind him. The police station was buzzing with activity, with his colleagues running aroun

Jurm Aur Jurmana

By Chirag उस्मान-लंगड़े ने बिल्डिंग के बेसमेंट में गाडी पार्क की ही थी कि अचानक किसी के कराहने ने की एक आवाज़ आईI आवाज़ सुनते ही उस्मान-लंगड़े का गुनगुनाना ऐसे बंध हो गया मानो किसी ने रिमोट-कंट्रोल पर म्य

bottom of page