साऱ्यांची एकच कथा
- Hashtag Kalakar
- Aug 31, 2023
- 2 min read
Updated: Aug 30
By Mrs. Ritu Patil Dike
" सगळे पेंडिंग केवायसी आजच्या आज कम्प्लीट झाले पाहिजेत" म्हणत मॅनेजरने तावातावात केबिनचं दार ओढून घेतलं . धाडकन आवाज आला आणि सगळ्यांच्या धडकन चा स्पीड जरा वाढलाच. आज जर काम पूर्ण झालं नाही तर कुणाची गय केली जाणार नाही हे उघड होतं.
"अमोल दादा तू भराभर फाईली काढून दे साऱ्या, म्हणजे लवकर लवकर काम पूर्ण करता येईल." , दीपा म्हणाली.
"मी एकट्याने काय काय करू मॅडम? तुमच्या साहेबांना चहा हवा आहे तो त्यांना दहा मिनिटात आणून दिला नाही तर मला खातील. तिकडून आलो का मग देतो काढून फाईली." असं बोलता बोलताच अमोल चहा आणायला पळाला .
दीपा सुस्कारा टाकत स्वतःच उठून कपाटात फाईली शोधू लागली. कपाटातल्या अस्ताव्यस्त फाइल्स बघून तिचं डोकं जरा ठणकलंच, पण ते काम करणं तिला भाग होतं. तेवढ्यात "दीपा, मी जरा इन्स्पेक्शनला जाऊन येतो", असं म्हणत मॅनेजर बाहेर निघून गेले.
मॅनेजर बाहेर पडल्याबरोबर ब्रांचचं वातावरण एकदम बदललं. सारे दीपाजवळ गोळा झाले. श्वेता म्हणाली " ए ह्याचं काय असतं ग नेहमी नेहमी? आजच्या आज हे करा अन् आजच्या आज ते करा . एक तर अर्धा वेळ हे नेटवर्क साथ देत नाही अन् त्यात याची भर."
"अहो मॅडम त्याला कशाचं काही नाही परवा माझ्या प्रेग्नेंट बायकोला दवाखान्यात न्यायचं होतं तर या माणसाने अर्धा तास उशिरा यायची परवानगी नाकारली. माणूसकी नावाची गोष्टच नाही."
तेवढ्यात अमोल चहा घेऊन आला. " मला अर्जंट चहा सांगून साहेब स्वतः गायब झालेत! जा म्हणावं आता मी पण फाईली देत नाही काढून."
"अरे अमोल याने त्यांचं काय बिघडणार , आम्हालाच बोलणी खावी लागणार. त्यापेक्षा तू दे बाबा त्या काढून." सोहम म्हणाला.
“ हो आता मला बसु द्या थोडावेळ मग देतो" अमोल.
"एक मॅनेजर आणि हा अमोल त्याहून मोठा मॅनेजर, डोक्याला ताप आहे सगळा . अरे काल साहेबांना म्हटलं एवढ्या एका डॉक्युमेंट वर सही द्या तर हा माणूस अर्धा तास फोनवर बोलत बसला सही करून दिली तोवर तो कस्टमर माझा जीव घ्यायचा तेवढा बाकी होता." दीपा.
"यांना एक झाले की एक टार्गेट्स अचीव करायचे असतात आणि त्यासाठी आपल्या मागे चिवचिव करतात." सोहम म्हणाला. "नाहीतर काय?" श्वेताने लगेच दुजोरा दिला.
हे सगळं संभाषण खुर्चीत बसुन एक ग्राहक ऐकत होता. साठीच्या वयातले ते काका मॅनेजरला भेटण्यासाठी थांबले होते. मॅनेजर बाहेर गेल्यामुळे आणि सतत फोन बघण्याची सवय नसल्यामुळे त्यांचे लक्ष साऱ्यांच्या बोलण्यावर होतं. ते संभाषण ऐकून काकांना त्या साऱ्यांची कीव वाटली आणि आपल्याला तात्कळत ठेवणाऱ्या मॅनेजरचा जरा रागही आला. पंधरा-वीस मिनिटांनी मॅनेजर बँकेत आले, मॅनेजर आल्याबरोबर सगळे एकदम सावधान झाले . खुर्चीत बसल्याबरोबर मॅनेजरने त्या वाट पाहणाऱ्या काकांना केबिनमध्ये बोलावून घेतलं. "अमोल चहा आणलास ना? दोन कप भर एक माझ्यासाठी आणि काकांसाठी." आपल्यासाठी मॅनेजरने चहा सांगितला म्हटल्यावर काकांचा राग जरा निवळला.
"बोला काका, मी जरा महत्त्वाच्या कामात होतो त्यामुळे तुम्हाला वाट पहावी लागली. काय म्हणता?" काका काही बोलणार तेवढ्यात अमोल चहा घेऊन केबिनमध्ये आला आणि साहेबांचा फोन वाजला.
"काका तुम्ही चहा घ्या तोवर मी हा फोन आटोपतो" म्हणत मॅनेजर ने फोन उचलला.
"हॅलो, हा बोल महेश. हो यार आज नवीन टार्गेट. काल रात्री नऊ वाजता रिजनल मॅनेजर चा तेवढ्यासाठी कॉल आला, म्हणजे ऑफिसआवर्स नंतरही यांचा सासुरवास काही संपत नाही. लग्नाला दोन महिने झालेत या ऑफिसच्या कामाच्या नादात बायकोला घेऊन साधी कुल्फी खायला गेलो नाही. त्यात भर दोन दिवसांआधी ओरडलो तिच्यावर. बोलणं पण बंदआहे तेव्हापासून. काय जिंदगी झाली यार...." हे साहेबांचं बोलणं काका चहा पीत ऐकत होते आणि आता ते गालातल्या गालात हसत ही होते.
By Mrs. Ritu Patil Dike

Comments