व्यावसायिक क्षेत्र- एक मार्गदर्शिका
- Hashtag Kalakar
- Mar 23, 2023
- 20 min read
By Amey Sachin Joag
विषय सूची
लेखकाचे मनोगत व प्र(प)स्तावना
सध्या पालकांना आणि त्यांच्या पाल्यांना आपापल्या भविष्याची, पोटा-पाण्याची चिंता लागून राहिली आहे. अर्थार्जनाचे साधन भक्कम असावे; म्हणून लोक आयुष्यभर शिक्षण घेतात. बऱ्याच लोकांना आपल्याला काय करायचे आहे, हे अगदी लहानपणापासून ठाऊक असते. किंबहुना, त्या बाल्यावर तसे संस्कार मुद्दाम केले जातात. म्हणजे, त्या अर्भकाच्या अगदी पहिल्या ट्याहांचा स्वर अचूक लागला, की पालक लगेच त्याला संगीताच्या क्लासला घालतात. हे असे संस्कार करणारे पालक अन् ते करून घेणारे मुले आजकाल पाहावी तिथे दिसू लागली आहेत. परंतु, मुलातील हे गुण एवढ्या उशिरा ओळखणे अत्यंत चुकीचे आहे. संस्कार हे खरे तर मूल गर्भात असताना त्याला कुठले तरी महान क्षेत्र निवडता यावे म्हणून करायला हवेत. उदाहरणार्थ- पहिल्या महिन्यात गायनविद्या, मग पुढल्या महिन्यात आतल्या आत बसून योगसाधना, त्याच्या पुढल्या महिन्यात अक्षरओळख. एव्हाना त्या अर्भकाची बुद्धी अगदी तीक्ष्ण झालेली असते. मग, चौथ्या महिन्यात त्याला आयआयटीचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली तरी चालते. परंतु, आजकाल असे संस्कार करणारे पालक फार विरळा. खरे तर देश प्रगत व्हायला हवा असेल, तर आपल्या पाल्यावर गर्भधारणेच्याही आधीपासूनच संस्कार करायला हवेत; पण, आपला देश अजून एवढा पुढारलेल्या विचारांचा न झाल्यामुळे, तूर्तास तरी मूल गर्भात असल्यापासूनच त्याच्यावर संस्कार करायला सुरुवात केली पाहिजे. 'पावले धिटुकली परि सातत्ये, नेतील शिखरावरी सारी स्वप्ने' असे म्हणलेच आहे (आम्ही), ते काही उगाच नाही.
आपल्या देशात कुठले क्षेत्र निवडावे ह्याविषयी अजूनही कमालीचे अज्ञान असल्याचे आढळून येते. काही काही मुलांना तर पाचवी इयत्ता पार केली, तरी काय व्हायचे आहे हे ठाऊक नसते! वास्तविक पाहता, उल्लेखनीय क्षेत्रे अगदी मोजकीच. बाकी क्षेत्रांमध्ये फारसा काही दम नसतो. पण, तरीही लोक ती निवडतात. ह्यावरूनच आपल्या 'स्व'च्या उज्ज्वल कारकीर्दीविषयी किती कमालीचे औदासिन्य आहे, हे दिसून येते. परंतु, संपूर्ण दोष जनतेचाच आहे असे नाही. ह्या निवड करण्यामागेदेखील एक प्रकारचे शास्त्र आहे. ते शास्त्र ठाऊकच नसेल, तर अशी उदासीनता असणे स्वाभिवकच आहे. हे अज्ञान दूर करण्यासाठीच आम्ही एक अनोखी मार्गदर्शिका घेऊन आलो आहोत. ह्यामध्ये विविध क्षेत्रे निवडण्यासाठी अंगी असावे लागणारे गुण, कला इ. व एखादे क्षेत्र निवडल्यानंतर त्यातून मिळणारा मोबदला ह्याचे यथाशक्ती वर्णन केलेले आहे. प्रस्तुत मार्गदर्शिका ही संपूर्ण व सखोल अभ्यास करूनच तयार केली गेलेली आहे. ह्यामधील काही क्षेत्रे ही वर्तमान काळात अस्तित्त्वात नसली, तरी काही काळानंतर अगदी 'फुल्ल टाईम' अस्तित्त्वात येणार असल्याची आम्हाला खात्री आहे.
ह्या मार्गदर्शिकेत काही निवडक क्षेत्रे खास वाचक मित्रांसाठी निवडलेली आहेत. सर्व क्षेत्रे ज्या प्रधान्यानुसार निवडावी असे आम्हाला वाटते, अथवा ज्या श्रेणीने आम्ही ह्या क्षेत्रांना मानांकित केले आहे, त्याच क्रमवारीने ही क्षेत्रे पुढे वाचनात येतील. म्हणजेच, क्रमांक एकच्या क्षेत्राला आम्ही प्रथम श्रेणीचा दर्जा दिला आहे. क्रमांक दोनचे क्षेत्र हे पहिल्या क्षेत्रापेक्षा कनिष्ठ दर्जाचे असल्यामुळे त्याला दुसऱ्या श्रेणीचा दर्जा दिला आहे. अगदी ह्याच क्रमाने शेवटच्या क्षेत्रापर्यंतची माहिती येथे दिलेली आहे. तेव्हा आपापल्या कुवतीनुसार कोणते क्षेत्र निवडता येईल, ह्याचा आमच्या प्रिय वाचक मंडळींनी सखोल अभ्यास करावा.
टीप: प्रस्तुत मार्गदर्शिका ही भविष्याचा वेध घेऊन लिहिली गेलेली असल्याने, सदर मार्गदर्शिका वाचताना पुढील शंभरेक वर्षांचा कालावधी डोळ्यांपुढे ठेवूनच वाचावी, ही प्रिय वाचकांना नम्र विनंती.
१. अवमानित/अपमानित:-
हे क्षेत्र तूर्तास जरी प्रकाशझोतात आलेले नसले, तरी नजीकच्या भविष्यकाळामध्ये ह्या क्षेत्राला तुडुंब मागणी असणार आहे हे निश्चित. जी लोकं हे ताडून हे क्षेत्र निवडतील, त्यांची पुढील भविष्यकाळात नक्की भरभराट होणार आहे.
'अवमानित' क्षेत्राच्या नावामुळे प्रथमदर्शनी (अथवा प्रथमश्रुणिकानंतर) जो गैरसमज होऊ शकतो, अगदी त्याविरुद्ध हे क्षेत्र आहे. हे क्षेत्र निवडणारा अवमानित किंवा अपमानित होतो; परंतु, तो उपेक्षित असत नाही. ह्या क्षेत्राची खासियत अशी, की इथे आपल्याला हवे तेव्हा अवमानित/अपमानित होता येते. एखाद्या प्रसंगी आपला फायदा होत असेल तर आपला अवमान झाला असा बोभाटा करून आपल्याला फायदा मिळवता येतो. काही प्रसंग अंगावर शेकतील असे वाटत असेल, तेव्हा लगेच पाठ फिरवून त्या संकटांमधून आपल्याला अलगद सुटता येते. विशेष म्हणजे, कोणा एका व्यक्तीशी, धर्माशी किंवा संकल्पनेशी एकनिष्ठ राहण्याची अजिबात गरज नसते. त्यामुळे, आपल्याला वाटेल तेव्हा, वाटेल त्याच्यासह हातमिळवणीही करता येते; तसेच काडीमोडही घेता येतो. थोडक्यात, स्वतःचा जीव कोणत्याही परिस्थितीत अगदी विनासायास वाचवता येतो, ही ह्या क्षेत्राची मुख्य खासियत. ह्या क्षेत्राची अजून एक विशेष बाब अशी, की ह्याचे शिक्षण कुठल्याही शाळा-कॉलेजात न बसताही घेता येते. पालक अगदी साधी उदाहरणे पाल्यांना दाखवून त्यांचे शिक्षण घडवू शकतात. उदाहरणार्थ, पलंगाच्या आपल्या बाजूकडील गादीवर आपल्या जोडीदाराने घातलेल्या चादरीवर एखादी चुणी पडली, की लगेच 'ती चुणी माझ्याकडे आठ्या घालून बघते आहे. पर्यायाने तूसुद्धा माझ्याकडे अशीच पाहतेस/असाच पाहतोस' असे म्हणून आपला भयंकर अपमान झाला आहे असे दाखवायचे व त्यानंतर आपल्या मनधरणीसाठी जोडीदाराला पायधरणी करायला लावली, की पाल्याला जे उमजायचे ते चटकन् उमजते. छोट्या गोष्टीचे भांडवल कसे करावे- हे शिक्षण प्रात्यक्षिकांमधून लाभणे अतिशय आवश्यक असते. हे ह्या क्षेत्रात अत्यंत सहजतेने उपलब्ध असल्यामुळे शिक्षण घेणे जास्तच सोयीचे होते. वर नमूद केलेल्या उदाहरणांची काठिण्य पातळी मग हळूहळू वाढवत न्यावी. कालांतराने ते मूलच राष्ट्रीय स्तरावर अवमानित होण्याची प्रात्यक्षिके करून तुम्हाला गुरुदक्षिणा देईल. मनधरणीच्या घालून दिलेल्या पहिल्या धड्याला जोडून ते मूल तन-मन-धनधरणी करून दाखवते. कायिक, आदिभौतिक व भौतिक अशी सर्व प्रकारची सुखे आपोआप पायाशी लोळण घेऊ लागतात. अजून एक विशेष बाब अशी, की ह्या क्षेत्रात प्रत्येक जण अगदी हमखास चमकू शकतो. वय, लिंग, धर्म, जात, प्रांत वगैरेची मुळीच सीमा वा बंधन नसते. 'दुखावले जाणे' हा या क्षेत्राचा स्थायीभाव असला, तरी अंतिमतः 'सुखावणे' हाच मोबदला असतो, हे ध्यानात ठेवावे. मग, हे सुखावणे वर नमूद केल्याप्रमाणे कोणत्याही पातळीवरील असू शकते.
उपेक्षित नसलो तरी आपण कायम उपेक्षितच आहो अशी भावना बाळगून जगणे हे ह्यातील सार आहे. एखाद्या कबुतराचे पीस जरी अंगावर पडले, तरी 'मी तुझ्यामुळे दुखावलो/दुखावले आहे' असे त्याला ठणकावून सांगता यायला हवे. नुसते एवढेच पुरेसे नाही, तर त्यापुढे जाऊन त्या कबुतराचा वाईटपणा सगळ्या जगाला ओरडून ओरडून, अगदी तो वाईटपणा खरा वाटेपर्यंत सांगता यायला हवा. त्यापुढे जाऊन, तमाम कबुतरे व त्यांची जमातच कशी वाईट आहे हेदेखील पटवून देता यायला हवे. इथे तुमचे काम ऐंशी टक्के पूर्ण झाले असते. एव्हाना त्या कबुतराशी निगडित सर्वजण जेरीस येणारच! आता तुम्ही मानहानीचा दावा ठोका. सर्व कबुतरांवर ह्यामुळे पुढील कैक वर्षे काळ ठरली पाहिजेत, हे ह्या साऱ्या उपक्रमाचे फलित. वेळ लागेल, परंतु यश सुनिश्चित. फक्त हे सारे करताना तुम्ही त्या कबुतराला लांबून दगड फेकून मारलात अन् त्यात ते झाडावरून गतप्राण होऊन खाली पडताना त्याचे पीस तुमच्या अंगाला चाटून गेले, ह्याबाबत वाच्यता करू नका. असे काही झाल्याचे त्या कबुतरालाही ठाऊक नसल्याची खात्री बाळगा. परंतु, ह्या सगळ्या प्रकारादरम्यान चुकून कोणी साक्षीदार उरला, तर त्याची विल्हेवाट लावणे महत्त्वाचे. बाकी यश तुमचेच आहे. ह्या सांगितलेल्या उदाहरणानंतर माणसावर प्रयोग करायला तुम्ही सिद्ध होता.
ह्या क्षेत्रात येण्यासाठी तुम्हाला काही निवडक गोष्टींची निकड भासेल. त्यापैकी काही महत्त्वाच्या म्हणजे- गेंड्याची कातडी, मगरीचे अश्रू, लांडग्याचा धूर्तपणा व कोल्ह्याची चतुराई- ह्या गुणांसोबतच कांगावा हा एक श्रेष्ठ गुण अतिशय महत्त्वाचा असतो. मग, त्यासोबत कोडगेपणा, बेफिकिरी, उन्माद इत्यादि लहानसहान गुण आलेच. हे गुण लहान असले तरी गरजेचे नाहीत असे मुळीच नाही. ह्या गुणांमुळे तुमच्या क्षेत्राला बळकटी येईल. शिव्या ह्या कायम हाताशी ठेवाव्या आणि सढळपणाने वापराव्या. कुणाचेही वय, लिंग, क्षेत्रीय दर्जा, सामाजिक पातळी वगैरेची तमा न बाळगता त्याच्या आईवडीलांना आळवणे, त्याच्या विविध अवयवांना आळवणे हे जमायला हवे. तुमच्या शिव्यांना तुमच्या समोरील माणूस फिस्सकन् हसला, तर मात्र तुम्ही हे क्षेत्र निवडण्याच्या योग्यतेचे नाही, हे ओळखून क्षेत्र बदलावे. रस्त्यातून जाताना तुमच्यावर कोणी नुसती 'अरे, मित्रा….' अशी उपहासात्मक टिप्पणी केली, तरी तो तुमच्या कुलदैवताचा अपमान आहे असे समजून रस्त्यात थांबून भांडता यायला हवे. कायद्याच्या वा नैतिकतेच्या दृष्टीने तुम्ही चूक आहात किंवा नाही, ह्याला इथे काडीचेही महत्त्व नाही. प्रश्न कायद्याचा नसून अभिमानाचा आहे. तेव्हा भर रस्त्यात उतरून दुसऱ्याच्या वाडवडिलांचा उद्धार करायला घाबरू नये. ह्यातूनच पुढे सक्षम उमेदवार लोकसभा व विधानसभा ह्या मोठ्या पातळ्यांवर निवडला जातो.
ह्या क्षेत्रामध्ये मूल्यांकन करताना महत्तम मूर्खता मूल्य म्हणजेच मूढमूल्य/मूर्खांकन आदि नावाच्या मोजपट्टीवर मूल्य दिले जाते. ज्याला हे गुण सर्वाधिक प्रमाणात मिळतात, त्याचे सामाजिक वजन अधिक असते. सिनेमातील नट-नट्या, राजकीय भूमीवरील नेते, टीव्हीवर वार्तांकन करणारे बातमीदार, विविध जमातीतील हौसेने स्वतःला 'मागे राहिलो' असे समजणारे, महापुरुषांना आपापसात वाटून घेणारे बुद्धिवादी इ. लोक ह्या क्षेत्रातील काही नामवंत, ख्यातनाम मंडळी. ह्यांचा आदर्श ठेवून वाटचाल सुरू ठेवावी. त्यामुळे फायदा होईल.
ह्या क्षेत्रात येण्याचे जसे फायदे आहेत, तसे तोटे मात्र मुळीच नाहीत. बौद्धिकदृष्ट्या कुपोषित समाज 'कूपमंडूक' वगैरे उपाधी देतात; परंतु, कसलेल्या अवमानिताने लक्ष देऊ नये. उलट असल्या लोकांवर वस्सकन् ओरडून अंगावर धावून जावे. ते आपोआप शांत होतील. तुम्ही काय बोलताय त्यापेक्षा तुमचा आविर्भाव महत्त्वाचा आहे, हे सदैव लक्षात ठेवा. मोठ्ठ्याने ओरडण्याचा सराव हा रोजच्या दिनचर्येत अंतर्भूत केला असावा. आवाजाची पट्टी भांडणाचा विजेता ठरवते हे सुभाषित भल्या थोरल्या अक्षरात भिंतीवर लावावे व रोज वाचून रंध्रारंध्रातून एकजीव करावे. असे मोजके स्वयंअध्ययन केल्यास यश तुमचेच असेल.
२. राजकारणी:-
ह्या क्षेत्रासाठी अवमानित/अपमानित क्षेत्राचा थोडाफार अभ्यासक्रम सारखाच आहे. तूर्त, हे क्षेत्र प्रकाशझोतात व प्रसिद्धीझोतात आहे. परंतु, ह्या क्षेत्राला कधीही मरण यायचे नाही हे पक्के लक्षात ठेवावे. ह्या जगात अजर, अमर, चिरतरुण, चिरंजीव असे काही असेल तर ते 'राजकारण' हे क्षेत्र अन् 'राजकारणी' हा पेशा. तरीदेखील ह्या क्षेत्रात येण्यासाठी बारीक अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे.
'अवमानित/अपमानित' क्षेत्राबाबत सांगितल्याप्रमाणे ह्याही क्षेत्राला काही अंगभूत गुणांची अपेक्षा आहे. सर्वात अग्रणी कोडगेपणा असला पाहिजे. त्यासोबतच महत्त्वाचा गुण म्हणजे निर्लज्जपणा. धूर्तपणा, कावेबाज असणे, कपटी असणे, स्वार्थचातुर्य, लोभ, हाव, खोटारडेपणा, कांगावा आदि गुणही अत्यंत महत्त्वाचे आहेत. ह्याशिवाय तुम्हाला ह्या क्षेत्रात यायला संपूर्णतः बंदी आहे. त्याखेरीज स्वतःचे सदैव कौतुक करून घेता येत नसेल तर तुम्ही ह्या क्षेत्राच्या पासंगासही पुरणार नाही. तेव्हा ह्याचे संस्कार अगदी लहानपणापासूनच व्हायला हवे. तुम्ही तुमच्या नातेसंबंधांना फार महत्त्व देत असाल, तर सावधान! तुम्ही स्वतःखेरीज इतर कोणालाही महत्त्व देता कामा नये. 'डोईवरि या बर्फ जिव्हेवरि या साखर, पानी असे एक पोळी वर ढापतो भाकर' अशी वर्तणूक लीलया करता यायला हवी. बर्फाच्या थंडपणाने, साखरेमध्ये घोळल्यासारखे गोड गोड बोलून, स्वतःच्या ताटलीत एक पोळी असतानाही दुसऱ्याकडून त्याची भाकरी ओढून घेता येत नसेल, तर मात्र ह्या क्षेत्रात तुमचा टिकाव लागणे जवळपास अशक्य आहे. अजून एक महत्त्वाचा गुण तुमच्याजवळ असला पाहिजे. स्वतःला हवा तोच इतिहास सांगता आला पाहिजे. मुळात इतिहास हा स्वतःला हवा तेवढाच लोकांच्या गळी उतरवता यायला हवा. बाकीचे तपशील स्वतःलादेखील माहीत नसतील, तरी हरकत नाही. 'जे बोलाल ते विकेल' ह्या उक्तीप्रमाणे 'जे पटवाल ते पटेल' अशी एक समांतर उक्ती ह्या क्षेत्राचा पाया आहे. तेव्हा, जे पटवायचे आहे ते पटेपर्यंत चिवटपणे कार्यरत राहणे, हा गुण अंगी असायला हवा. चेहरा शक्य तेवढा साधा, भोळा असेल तर उत्तमच. खरे बोलता येत असेल तर पहिली सवय बदला. ह्या क्षेत्रात खरे बोलणाऱ्याला स्थान नाही.
एखाद्या माणसाचा आपण द्वेष करतो हे जाहीर करायची घाई असावी. इथे खऱ्याखोट्याचा संबंध येत नाही. आदल्या दिवशी एखाद्याकडे खाल्लेली कोंबडी अजून जिरलीही नाही असे असले, तरीही त्या माणसाच्या उखाळ्या-पाखाळ्या काढायला सुरू कराव्यात. आणि पुन्हा रात्रीच्या जेवणासाठी त्याच्या पंगतीला बसण्याचा धीरोदात्तपणा दाखवावा. लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी, की समोरचाही ह्याच खेळातील मुरब्बी असतो. तेव्हा रात्रीच्या खाण्याचा आणि सकाळच्या बोलण्याचा काहीही संबंध नसतो, हे तोही जाणून असतो. त्यामुळे, तुम्ही सकाळी त्याला व्यासपीठावरून शिव्या घालून खाली उतरलात अन् लागलीच त्याचा तुम्हाला रात्रीच्या जेवणाचे निमंत्रण द्यायला फोन आला, तर ते निमंत्रण बेलाशक स्वीकारावे. 'ह्यात काही दगाफटका असेल का' असला निरुपयोगी विचार अजिबात करू नये. फक्त त्या इसमापासून मात्र राजकीय भूमीवर जरा जपून असणे भाग आहे. कारण, इथे सगळेच लोक कसलेले असतात. तेव्हा तुमचा कस दाखवण्यासाठी तुम्हाला जपून राहणे भाग असते.
नीती, मूल्ये, भावभावना वगैरे सर्व भंपक कल्पना आहेत. पुस्तकांना काहीतरी छापायला हवे असते आणि वाचकांना असले काहीबाही वाचायला हवे असते, वास्तवाशी ह्याचा काडीमात्र संबंध नाही, अशी धारणा एकदा का पक्की करून घेतली, की तुमचा राजकीय प्रवास फार पुढपर्यंत जाऊ शकतो. तसेच, निष्ठा ही फक्त 'स्व'शी बाळगावी. उगाच मी अमक्या पक्षाशी एकनिष्ठ आहे किंवा माझ्या मातीशी अगर देशाशी एकनिष्ठ आहे वगैरे बाष्कळ तत्त्वे कवटाळून बसू नये. हे सारे केवळ बोलण्यापुरतेच मर्यादित ठेवावे. देशाला महत्त्व देऊ गेलात, तर ह्या क्षेत्रात अजिबात प्रस्थापित होता यायचे नाही. तेव्हा स्वतःला असल्या भ्रमापासून शक्य तेवढे दूर ठेवता यायला हवे.
सर्वाधिक महत्त्वाचे अंगीकारायचे कसब म्हणजे भाषा. व्याकरणदृष्ट्या भाषा जशी अस्खलित असायला हवी, तशीच ती राजकीयदृष्ट्यादेखील निर्दोष असायला हवी. राजकीय भाषेचे धडे गिरवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वहावत जाऊन काही शब्द चुकून तोंडून निसटून गेले तर काय होऊ शकते, ह्याचे चालते-बोलते उदाहरण आज महाराष्ट्रातील तमाम जनतेवर अधिराज्य गाजवते आहे. त्या उदाहरणातून आलेल्या अनुभवातून ताज्या दमाच्या इच्छुकांनी शहाणपण घ्यावे. राजकारणेतर वापरण्याची भाषा आणि राजकारणात वापरण्याची भाषा ह्यामधील फरक वाघ आणि मांजर ह्यांच्यामधील फरकासारखाच आहे. घराणे एकच, परंतु वागण्याची तऱ्हा संपूर्णपणे निराळी. व्याकरणाचे नियम जरी तंतोतंत तसेच राहिले असले, तरी सामान्य भाषेतून म्हणलेले वाक्य राजकीय भाषेत संपूर्णपणे निराळे ऐकू येते. उदाहरणार्थ, 'वाघ डरकाळी फोडत होता'. ह्या वाक्याचा सामान्य भाषेत सरळ अर्थबोध होतो; पण, तेच वाक्य जर राजकीय भूमिकेतून म्हणायचे झाले, तर 'होता'वर पडणारे हलके वजन भलताच अर्थ सांगून जाते! अगदी हीच गत 'कमळाला काटे बोचले' ह्या वाक्याची. सरळ वाक्यांची जी तऱ्हा, तीच म्हणींचीदेखील. उदाहरणार्थ, 'हात दाखवून अवलक्षण'. तात्पर्य, राजकीय भूमिकेतून बोलले गेलेले अक्षरन् अक्षर निराळे वजन निर्माण करते. त्याखेरीज, स्थळ-काळानुसारही भाषेचेदेखील अंग बदलत जाते. व्यासपीठावरून बोललेली भाषा अन् मुलाखतींदरम्यान बोलली गेलेली भाषा- ह्यामध्येही फार फरक पडतो. व्यासपीठावरून ज्यांना 'विद्वत्ताप्रचुर' म्हणून संबोधले जाते, त्यांनाच मुलाखतीतून 'विद्वत्तामचूळ' म्हणले जाऊ शकते.
'सभाधीट' ही या अभ्यासक्रमातील एक उप-पदविका आहे. ही मिळवणे तशी कठीणच. ह्यामध्ये जाहीर सभांमध्ये बोलण्याचे तंत्रशुद्ध शिक्षण मिळते. फक्त सभा भरवणे हे कसब ज्यांना अंगीकारायचे आहे, त्यांनी ही पदविका जरूर मिळवावी. ह्या पदविकेमुळे तुमची लोकप्रियता एकदम वाढेल, परंतु त्यायोगे राजकीय कारकीर्द यशस्वी होईलच, ह्याची शाश्वती मात्र अजिबात देता येत नाही. अर्वाच्य भाषा, शिवराळ भाषा, मवाळ भाषा, रांगडी भाषा, अशुद्ध भाषा, काव्यमय भाषा, शालजोडीतील भाषा अशा विविध भाषांमध्ये विशेषज्ञता (स्पेशलायझेशन) प्राप्त करता येते. अशा विविधांगी भाषांमध्ये नैपुण्य मिळवता आल्यास त्याचा राजकीय कारकिर्दीला हातभार जरूर लागतो.
ह्या क्षेत्रात येण्यापूर्वी राजकारणाचा अभ्यास नीट करावा लागेल. मुख्यतः राजकारणातील जुन्या व्यक्तींच्या (ज्यांना तुम्ही आदर्श मानता, त्यांच्या-) चुकांकडे डोळेझाक करणे, जी जनता एखाद्या महान नेत्याविरुद्ध बोलल्यास फारसा प्रतिकार वा निषेध करत नाही, केवळ त्याच नेत्याविषयी हवे ते बोलता येणे, देशहिताच्या नावाखाली अतिशय हुशारीने आपल्या तुंबड्या भरणे अशा बरीक-सारिक गोष्टींचे अध्ययन करणे अतिशय महत्त्वाचे आहे. शिवाय सर्व सुधारणा आपल्याच काळात घडल्या असे दाखवता यायला हवे. त्याखेरीज विरोधक ह्या आपल्या शत्रूच्या फक्त चुकाच दाखवता येऊ लागल्या, की ह्या अभ्यासक्रमाची इतिसांगता होते. वास्तविक 'राजकारणी' अन् 'अवमानित/अपमानित' ही दोन्ही क्षेत्रे एकमेकांवर काहीशी अवलंबून व आधारलेली आहेत. तरीही दोन्ही क्षेत्रांचा अभ्यास वेगवेगळा करावा लागतो.
३. चाहता:-
वर नमूद केलेल्या दोन्ही क्षेत्रांपेक्षा हे क्षेत्र काहीसे निराळे आहे. वरील दोन्ही क्षेत्रांच्या अवतीभवती एक प्रकारचे वलय आहे; पण, हे क्षेत्र सामान्य जनतेच्या जास्त जवळचे असल्यामुळे ह्या क्षेत्राच्या भवतीने तेवढे वलय नाही. तरीदेखील हे क्षेत्र जोमाने वर येऊ घातलेल्या ह्या क्षेत्रांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकाचे आपले स्थान राखून आहे.
ह्या क्षेत्रात उतरण्यासाठी फारसा अभ्यास असावा लागतो अशातला भाग नाही. कुठलाही प्रचलित अभ्यास, सखोल ज्ञान वगैरे नसले तरीही चालण्यासारखे असते. 'चाहता' कोणाचाही होता येते. ती आसामी फार लोकप्रिय किंवा प्रसिद्ध असावी, असा मापदंड अजिबात नाही. माणसांमध्ये गल्लीतील पथारीवरील भिकाऱ्यापासून ते देशाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यापर्यंत अन् इतर प्राणी, पक्षी, सजीव, निर्जीव वस्तूंमध्ये कोणाचाही आणि कशाचाही चाहता म्हणून स्वतःला घोषित करता येते. इथे हवा असतो तो म्हणजे अभिमान. नुसता अभिमानच नव्हे, तर जाज्ज्वल्य अभिमान. अभिमानासोबत लागते चाहत्याचे त्याच्या प्रेरकावर असलेले निस्सीम, टोकाचे प्रेम. आपण मानत असलेली आसामी अगर घटक इतरांना माहिती नसेल, तर खट्टू न होता हिरीरीने त्यांचे महात्म्य पटवून देता येणारेच ह्या क्षेत्रात तग धरू शकतात. पूर्वी ह्या क्षेत्रात सर्वसामान्य लोकांना माहीत असलेलीच प्रेरके निवडली जायची. परंतु, सद्यस्थितीत मात्र सर्वसामान्यांना ठाऊक नसलेले आदर्श ठरवले जातात. नजीकच्या भविष्यकाळातसुद्धा सामान्यतः ठाऊक नसलेले आदर्शच निवडले जाण्याचा कयास बांधला जातो आहे. आमचा अभ्यासदेखील अगदी ह्याच अनुमानापर्यंत येऊन ठेपला आहे. तेव्हा इच्छुकांनी कोणालाही प्रमाण मानून त्या वस्तूला, माणसाला किंवा इतर कुठल्याही नैसर्गिक वा अनैसर्गिक घटकाला प्रमाण मानून चालावे. फक्त तो आदर्श एक-दोघे सोडल्यास इतरांना माहीत असू नये ही दक्षता घेणे महत्त्वाचे.
अंगी असाव्या लागणाऱ्या महत्त्वाच्या गुणांपैकी एक म्हणजे निर्बुद्ध असणे. एकदा हा गुण जोपासता आला, की बाकी सारे अडथळे पार करत ह्या क्षेत्रात उच्च पदापर्यंत सहज पोहोचता येते. वर्तमान पाहता, हा गुण जोपासणे फारसे अवघड जाणार नसल्याचे जाणवते. आपला आदर्श केवळ त्याच्या अंगच्या गुणांमुळे कसा महान आहे हे कधीही पटवून द्यायला जाऊ नये. वरपांगी विरोधाभासी वाटणारी ही सूचना खोलात जाऊन पडताळल्यास लगेच पटते. स्वतःचा आदर्श मोठा ठरवण्याच्या प्रयत्नात जेव्हा त्या आदर्शाची महती पटवून दिली जाते, तेव्हा कधीकधी दुसऱ्याच्या आदर्शाला मान्यता द्यावी लागते. समोरच्या व्यक्तीच्या आदर्शाचे महात्म्य चुकून मान्य करावे लागू शकते. असे जर घडले, तर ते तुमचे सपशेल अपयश समजावे. म्हणूनच, फक्त स्वतःच्या आदर्शाचे चांगले गुण पटवून देऊन भागत नाही. त्याबरोबरच समोरच्या व्यक्तीच्या आदर्शाचे दुर्गुण दाखवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वेळप्रसंगी समोरच्या व्यक्तीच्या आदर्शाच्या कासोट्याला जरी हात घालावा लागला, तरीही तो बेलाशकपणे घालावा. तसे करताना आपण कोणाचे चारित्र्यहनन करतो आहोत वगैरे भंपक कल्पनांना मुळीच थारा देऊ नये. तुम्हाला केवळ तुमचाच आदर्श मोठा ठरवायचा आहे, ह्या एका विचारावरच संपूर्ण संभाषणाची गाडी असेल तर असले विचार मनात अजिबात येत नाहीत. परंतु, त्यासाठी मोठी साधना करावी लागते. ही साधना म्हणजेच निर्बुद्ध होणे.
अजून एक महत्त्वाचा गुण म्हणजे दुसऱ्यावर केव्हाही आगपाखड करता यायला हवी. आदर्शाची चूक असो अथवा नसो, शिव्या घालून मोकळे होता यायला हवे. विविध प्रसंगांचा परस्परांमध्ये कोणताही संबंध नसतानाही ज्याला तो ओढून-ताणून जोडता येतो अन् मग संबंधित परादर्शावर आगपाखड करता येते व त्यायोगे स्वादर्शाचे महात्म्य सिद्ध करता येते, त्यालाच ह्या क्षेत्रात मुसंडी मारता येते. हे करण्यासाठी विशेषतः दुसऱ्याचे शील वापरावे. त्यावर आघात केल्यावर निम्मी लढाई जिंकता येते. ह्यासाठी प्रसारमाध्यमांचा, समाजमाध्यमांचा वापर केल्यास अत्युत्तम. याखेरीज समोरच्या व्यक्तीच्या आदर्शाच्या चुका शोधणे, त्या लक्षात ठेवणे अन् योग्य वेळी वापरणे असे काही मूलभूत गुण आहेत. ह्यावर मात्र जरा जास्त मेहेनत घ्यावी लागते. कारण, नुसत्या समोरच्याच्या चुका शोधून भागत नाही, स्वतःच्या आदर्शाच्या चुकाही शिताफीने दडवाव्या लागतात. तुम्ही जी नीती आखून विरोधी गटावर वार करणार आहात, अगदी तीच नीती वापरून समोरचाही तुमच्यावर वार करणार आहे, हे ध्यानात ठेवावे. मुळात, स्वादर्शांकडून घडलेली चूक मान्यच करू नये. चूक मान्य करणे हेच प्रथमतः कमकुवतपणाचे लक्षण आहे. तरीदेखील दुर्दैवाने असा प्रसंग आलाच, तर स्वादर्शाच्या घडून गेलेल्या चुकांवर स्वतःच समाधान शोधून त्यावर सखोल अभ्यास करणे आवश्यक असते. मोठ्या स्तरावर कार्यरत असण्यासाठी हे अत्यावश्यक आहे. सामान्य पातळीवर मात्र अशा अभ्यासाची गरज नाही. तुम्हाला स्वादर्शांच्या घडलेल्या चुकांवर अत्यंत समर्पक उत्तर मिळाले नाही, तर तेवढाच तिखट पलटवार करणे महत्त्वाचे आहे.
सामान्य लोकांपर्यंत, सामान्यांच्या घराघरापर्यंत जर स्वतःचा आदर्श पोहोचवायचा असेल, तर मात्र अतिशय कठोर तपश्चर्या करावी लागेल. त्यासाठी बराच काळ जाऊ द्यावा लागतो. देशाची गादी जर मिळाली तर हे प्रयत्न काहीसे सोपे होतात; परंतु, संयम बाळगणे फार आवश्यक असते. भारतीय इतिहासात स्वातंत्र्योत्तर काळात राजगादीच्या मदतीने आजवर केवळ एकाच आदर्शाला सामान्यांच्या घराघरात पोहोचवले गेले आहे. हा आदर्श आज हयात नसला तरीही लहान लहान मुलांपर्यंत फक्त एकच नाव पोहोचवले गेले आहे. ह्या क्षेत्रातील हे एक अतिशय सफल उदाहरण म्हणता येईल. ह्याचा आदर्श इच्छुक उमेदवारांनी डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल करावी. देशाची गादी मिळवणे सर्वांनाच शक्य नसले, तरी तो आदर्श डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल केल्यास यशप्राप्तीची शाश्वती देता येईल.
४. मराठी भाषिक:-
ह्या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी तुम्हाला मराठी येत असण्याची अजिबात आवश्यकता नाही. कारण, ह्या क्षेत्राची मुळात 'मराठी आले पाहिजे' अशी मागणीच नाही. हे क्षेत्र तुमच्याकडे तशी कसलीही मागणी करत नाही. वर सांगितलेली क्षेत्रे निदान तुम्हाला थोडा तरी मोबदला देऊ शकतील. परंतु, हे क्षेत्र निर्गुण निराकार आहे. ह्या क्षेत्रातून काहीही मोबदला मिळायचा नाही, हे ध्यानात घ्यावे लागेल. ह्या क्षेत्रात मूळ भांडवल लागते- भाषा. ह्यामध्ये दोन उपप्रकार येतात. पहिला म्हणजे बोली भाषा आणि दुसरा म्हणजे लेखी भाषा. त्यावरील यथोचित विवेचन पुढे येईलच.
सर्वप्रथम हे लक्षात घ्यायला हवे, की मराठी भाषिक व्हायचे असेल तर मराठी उत्तम येऊन चालत नाही. मराठी ही दुबळी भाषा आहे असे समजावे लागेल आणि तिला जागोजागी इंग्रजी, हिंदी इ. पर व आप्त भाषांच्या कुबड्या देऊन, तिला मोडकळीला आलेल्या खटाऱ्याप्रमाणे चालवता यायला हवे. 'मराठी भाषा ही दर बारा कोसांवर बदलते' ही उक्ती स्मरणात ठेवावी. ह्या उक्तीप्रमाणे ते बारा कोस थेट युरोपात वा अमेरिकेतही पूर्ण होऊ शकतात हे लक्षात ठेवून तेथील भाषा बिनदिक्कतपणे स्वीकाराव्या. ह्यामुळे मनाचे औदार्य तर प्रकट होतेच; शिवाय भाषेची शब्दसंपदाही वाढीस लागते. दर बारा कोसावर बदलणाऱ्या भाषेचे व्याकरण कसे एकसमान असेल? तसेच कर्ता, कर्म, क्रियापद ह्यांचे नियम तरी कसे एकसमान असू शकतील? तेव्हा असले नियम, अशी बंधने भाषेला पाडून घ्यायच्या फंदात अजिबात पडू नये. भेटणे, मिळणे, सापडणे, शोधणे वगैरे क्रियापदे कशालाही लावावी. त्याने फरक पडत नाही. एकदा हे तुम्हाला उत्तमरित्या जमले, की मग तुम्ही 'मराठी भाषेवरील प्रभुत्त्व' अशासारख्या विषयांवर भाषणे द्यायला सिद्ध होता. ह्या क्रियापदांचा सोस बाळगणाऱ्यांना मात्र वेड्यात काढायला विसरू नका. वर नमूद केलेली क्रियापदे योग्य प्रकारे कशी वापरावी ते खाली सांगितले आहे-
मला दादा मिळले/मिळाले/गावले होते- हे बरोबर आहे.
मला दादांचा सल्ला भेटला- हे बरोबर आहे.
वरील उदाहरणांमध्ये सल्ला 'भेटतो' व तो सल्ला देणारा 'मिळतो' हे मनावर पक्के कोरणे आवश्यक आहे. ज्यांचे मत ह्याच्या विरुद्ध असेल त्यांना आयुष्यात पुन्हा अजिबात 'मिळू' नये.
भाषेचा लहेजा बदलला तरी व्याकरण बदलत नाही असा एक प्रतिगामी कूपमंडूक विचार आहे. असले विचार व तो विचार बाळगणारे ह्या दोहोंकडे साफ दुर्लक्ष करावे. 'न' आणि 'ण' ह्या दोन अक्षरांमध्ये फरक असल्याचे काही लोकांचे म्हणणे असते. परंतु, आपण मात्र ह्या दोन अक्षरांची अदलाबदल करून आपले पुरोगामीत्व सिद्ध करत रहावे. काही प्रसंगी मात्र ही अदलाबदल जरा जपून करणे आवश्यक असते. 'तिथे एक खाण आहे' अशासारख्या वाक्यांमध्ये ही केलेली गल्लत जरा अंगलट येऊ शकते. किंवा 'माझ्या हृदयावर मणामणाचे ओझे आहे' ह्या वाक्याच्या जागी 'माझ्या हृदयावर मनामनाचे ओझे आहे' असे उच्चारले गेल्यास विवाहित व विवाहोत्सुक घरांमध्ये रणकंदन होऊ शकते. तसेच एखाद्या निसर्गप्रेमी मान्यवराची ओळख 'वृक्षवल्ली'च्या ऐवजी उच्चारचुकीमुळे 'रूक्ष वल्ली' अशी केली गेली, तर व्यासपीठावरून हशा, संकोच, टाळ्या, शिव्या असा आगळाच मिलाफही ऐकू येऊ शकतो. अथवा शेन, बेन आदि परप्रांतीय नावे उच्चारतानाही घोळ निर्माण होऊ शकत असल्या कारणाने ही अदलाबदल जपून करावी. बाकी वेळेस 'ठिकानी', 'प्रतिष्ठाण' असे माफक प्रयत्न करणे चालू ठेवावेत.
लेखी भाषा चालवताना प्रथमतः जे म्हणायचे आहे ते इंग्रजी अथवा हिंदीमध्ये लिहावे. मग, त्याचे शब्दशः भाषांतर करून मग ते मराठीमध्ये लिहावे. भावार्थ पोहोचवणे हा हेतू नसून हिंदी वा इंग्रजीप्रमाणेच वाक्य पोहोचायला हवे हे ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ- सिवाँए उसके, मैं यह काम नहीं कर सकता- ह्या वाक्याचे भाषांतर 'शिवाय त्याच्या, मी हे काम नाही करू शकत' असेच करावे. भावार्थ पोहोचला नाही तरी हरकत नाही, शब्दशः भाषांतर करणे महत्त्वाचे आहे. ह्यामध्ये नैपुण्य मिळवणाऱ्या व्यक्तीस टीव्हीवरील बातम्या आणि इतर वाहिन्यांवर अन् वर्तमानपत्रात मथळे लिहून देण्याच्या जागेवर भरगच्च पगाराची नोकरी मिळते. क्वचित प्रसंगी शिक्षण मंत्री व विद्यापीठातील मान्यवरदेखील होता येते. याशिवाय, उकार वा वेलांटीसाठी वापरल्या जाणाऱ्या ऱ्हस्व व दीर्घ अशा प्रतिगामी शब्दांची विल्हेवाट अनुक्रमे 'पहिला/पहिली' व 'दुसरा/दुसरी' अशी लावून टाकावी. ऱ्हस्व, दीर्घ म्हणणे हे संपूर्णतः अयोग्य असल्याचे आमचा ताजा अहवाल सांगतोच. संदर्भ: मराठी बदलल्याची १०८ कारणे- संपादक: भा. शा. बदले. लेखी भाषेवर सातत्याने परिश्रम घेणे अत्यंत आवश्यक असते. तिथे पुस्तकी लिहून अजिबात उपयोग नसतो. अधूनमधून 'पी.एल-बी.एल, वपु-बिपुंसरखी सुंदर पद्धतीणे भाशा वापरनारे लोक उरलेच नाय हो! कसले अशुध ल्हितात'सारखी वाक्ये उच्चारून मराठी भाषेबद्दल हळहळ व्यक्त केलीत, की तुमचे प्रशिक्षण पूर्ण व्हायच्या मार्गावर आहे असे समजावे.
बोली भाषेबाबतदेखील हे तत्त्व फारसे निराळे नाही. वर नमूद केल्याप्रमाणेच 'न' व 'ण', 'स', 'श' व 'ष' ह्यामध्ये फरक न मानणे हा इथे स्थायी गुण आहे. या उच्चशिक्षणात विभक्ती प्रत्ययांबद्दल शिकवले जाते.
उदाहरणार्थ- माझी मदत करा हे योग्य आहे, कारण हे हिंदीनुसार भाषांतरित केलेले आहे.
मला मदत करा हे अयोग्य आहे, कारण हे मराठीच्या विभक्ती प्रत्ययांनुसार तयार झालेले वाक्य आहे.
ही व अशीच अनेक बारीकसारीक उदाहरणे बोली भाषेत उच्चशिक्षण घ्यायचे झाल्यास बारकाईने शिकवली जातात. ह्यासाठी मात्र काही लोकांचा आदर्श डोळ्यासमोर असेल तर अधिक सोयीचे जाईल. त्यांना शोधणे फारसे अवघड नाही. एखाद्या घोळक्यात उभा राहून कोणी एखाद्याची भाषा सुधारताना त्याला 'बान नाही रे बाण' अशा अर्थाचे काहीतरी, किंवा 'आशीर्वाद मिळतात, आशीर्वाद देणारा भेटतो' अशा आशयाचे काही बोलताना आढळला व त्याला त्याच्या तोंडावर सरळ 'तुम्हा पुनेरी लोकांची भाशा…' वगैरे छापाची वाक्ये फेकलेली आढळली अन् त्यावर सबंध घोळक्यात हेटाळणीच्या स्वरातील हशा पिकला, की त्या घोळक्यातील तो 'पुनेरी'वाला वगळता बाकी घोळका तुमचा आदर्श आहे हे ताबडतोब समजावे. ह्याखेरीज मराठीचा व्यावहारिक, घरगुती, व्यावसायिक, सामुदायिक अशा विविध स्तरांवर अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी मात्र अनेक वर्ष मेहनत करावी लागते.
मराठी भाषिक होण्यासाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठी मुळाक्षरे व बाराखडी सलग येता कामा नये. मुळाक्षरे म्हणताना सुरुवात 'अ आ इ ई'पासून केलीत, तर तुम्ही तुमच्या प्रयत्नात लागलीच असफल ठरता. मुळाक्षरांची सुरुवात 'क ख ग घ'पासून होते हे पक्के लक्षात ठेवावे. 'क ख ग घ'पासून सुरुवात करून फार तर 'त थ द ध'पर्यंत येऊन थांबावे. त्यापुढले अस्खलितपणे म्हणल्यास वीस गुण जागीच वजा केले जातात. शिवाय 'घ'च्या पुढे 'ङ' नावाचे अन् 'झ'च्या पुढे 'ञ' नावाचे काही असते, हा प्रतिगामी लोकांनी पासरवलेला गैरसमज आहे असे समजून मुळाक्षरे म्हणताना केवळ चारच अक्षरे म्हणावीत. ही मुळाक्षरे, बाराखडी, स्वरावली वगैरे काही माहीत नसणे हा मराठी होण्याचा एक पाया आहे. तसेच एका शब्दाला दोन किंवा तीनपेक्षा अधिक समनार्थ माहीत असल्यास पंधरा गुण वजा करण्यात येणार असल्याचा आदेश 'अखिल भरतील म्हराटी जणमंडळा'ने काढला आहे. विरुद्धार्थी शब्ददेखील जलद आठवू नये. प्रत्येक शब्दाला 'तुम्ही बुवा फारच हाय क्लास बोलता' असे म्हणून आपल्याला असले शब्द ठाऊक नसल्याचे दाखवून देणे आवश्यक आहे. तसेच, जास्त मराठी बोलणाऱ्यांची खिल्ली उडवायला विसरू नये. अशा किरकोळ अभ्यासाअंती व सरावाअंती तुम्ही एक हाडाचे 'मराठी भाषिक' म्हणून मिरवू शकता.
५. सरकारी शिक्षक:-
सर्वसाधारणपणे (काही मोजके अपवाद वगळता), इतर काही करायला जमत नसल्यास ह्या क्षेत्राची निवड केली जाते. ह्या क्षेत्रात आल्यामुळे 'बर' अशा प्रतिक्रियेव्यतिरिक्त काहीही मिळत नाही. म्हणजे, ह्याआधी नमूद केलेल्या सर्वच क्षेत्रांमध्ये 'काय करता' ह्या प्रश्नावर तुम्ही काय करता हे सांगितल्यावर 'बर!' असे उत्तर मिळेलही; पण, जर सरकारी शिक्षक असे उत्तर दिले तर नुसतेच 'बर' अशी उद्गारविरहित प्रतिक्रिया मिळते. ह्यावरून ह्या क्षेत्राचा यःकश्चितपणा लक्षात येईल. इथे पैसे मिळतील, ह्या भ्रमात मुळीच राहू नये; त्या आश्वासनाने भाळून मात्र जरूर जावे. त्याला कोणाचीही काहीही हरकत नाही.
सरकारी संस्थांमधून शिक्षक झाल्यानंतर आपण जो विषय शिकवतो त्यातील काहीतरी आपल्याला आले पाहिजे, हा समज अत्यंत चुकीचा आहे. बहुतांशी होतकरू इच्छुकांमध्ये हा गैरसमज असल्याचे लक्षात येते. तुम्ही शिक्षक आहात ह्याचा अर्थ तुम्हाला ज्ञान असले पाहिजे, असे काहीही नसते. सहसा, सन्माननीय उच्चपदस्थ होण्यासाठी जेवढे कमी ज्ञान पदरात पडलेले असेल तेवढे उत्तम असते, असा आमचा अहवाल सांगतो. थोडक्यात, माणूस जेवढा कमीत कमी शिकलेला असेल, तेवढा तो प्रगती करत जातो. ह्याच विषयावर आमचे अनेक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. (पाहा- 'व्हावे काम सू चू', लेखक: का. म. टाळे). तेव्हा तुम्ही ज्या विषयाचे शिक्षक आहात, त्या विषयाचे ज्ञान असून उपयोगाचे नाही. सहसा जो विषय शिकवतात, त्याबाबत फार माहिती असेल, तर नोकरी मिळत नाही, असेदेखील पाहणी अंती समोर आले आहे. तस्मात्, हातात असलेल्या विषयाखेरीज सर्व विषयात माहिती असेल, तरीही हरकत नाही.
गणिताच्या मास्तरांना गणितातील प्रमेये, सूत्रे आदि ठाऊक नसणे श्रेयस्कर असते. भूगोलाच्या मास्तरांचे भूप्रदेशांशी वैर असल्यास उत्तम. इतिहासाचे मास्तर केवळ शांततेच्या मार्गाने जाणारेच हवेत. तरच सर्वांना हवा तो इतिहास कळू शकेल. योग्य व संपूर्ण इतिहास सांगणारास असहिष्णु व देशद्रोही म्हणून हिणवण्यात येते. तेव्हा असला प्रमाद करण्याचे धाडस अजिबात करू नये. याखेरीज, विज्ञान शिकवणारे मास्तर देव-धर्म, प्रथा, रूढी, समज वगैरेंच्या आहारी गेलेले असावेत. पृथ्वी गोल आहे हे सांगताना गॅलिलिओ तमाम पाद्र्यांशी भांडून सर्व धर्मसंस्था कशा थोतांड आहेत हे कसा सांगू लागला, हे सांगताना मधेच गळ्यातील ताईत डोळ्यांपाशी नेऊन 'ॐ नमः शिवाय'चा वा तत्सम जप करणे, न्यूटनचे भौतिकशास्त्रातील परस्पराकर्षणाचे ('म्युच्युअल ॲट्ट्रॅक्शन'चे) नियम समजावून सांगताना 'श्रीबालाजीला उलटे चालत गेल्यावर मुलगा झाला' असे नवस बोलायला व फेडायला शिकवणे असे करणारा विज्ञानाचा शिक्षक हा खरा हाडाचा शिक्षक. व्यक्तिमत्त्व विकास अशा विषयाचा शिक्षक चालू शाळेत शिव्या देणारा असावा. तसेच समाजशास्त्राच्या मास्तरांवर मुलांना विनाकारण बेदम मारहाण केल्याचा ठपका असल्यास अत्युत्तम. भाषेच्या शिक्षकांची भाषा शुद्ध असू नये. शक्यतो मराठी चांगले असणाऱ्या शिक्षकाला इंग्रजी शिकवायला बोलवावे. संस्कृत शिकवणारे मास्तर 'देशी भाषा कसले शिकता, एखादी परदेशी भाषा शिका' असले सल्ले देणारे असावेत, तर जर्मन वा तत्सम परदेशी भाषा शिकवणाऱ्या मास्तरांचे म्हणणे 'देशी भाषांमध्ये जास्त दम आहे' असे असल्यास त्यांना ताबडतोब सेवेत रुजू करून घेतले जाते. अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांनी 'एवढे गहन आणि रुक्ष विषय इतक्या लहान वयात शिकवणे योग्य नाही' असे उद्गार इयत्ता नववीपासून ते एम.ए किंवा एम.कॉमपर्यंत सर्व वयाच्या विद्यार्थ्यांसमोर काढावेत. याशिवाय आपल्याखेरीज इतर सर्व विषयांची, एकंदर शिक्षणप्रणालीची, शिक्षण मंत्र्यांची व सत्तेवरील सरकारची आणि खुद्द विद्यार्थ्यांच्या पिढीची हेटाळणी सुरूच ठेवावी. 'कुठे चालली आहे तरुण पिढी' किंवा 'काय होणार तुमच्या भविष्याचे' असल्या विषयांवर चालू तासाला हळूच एखादे व्याख्यानही घेऊन टाकावे. अशा सांगितलेल्या पायऱ्यांगणिक सरकारी शिक्षक म्हणून तुम्ही स्वतःचे स्थान बळकट करू शकता.
शाळा वा महाविद्यालये ह्यातील कामे जेवढी कमी करता येतील तेवढी कमी करावीत. शिकवणे हे आपला मुख्य काम नसून देशातील वाढती पिल्लावळ मोजणे, निवडणूक सुयोग्य रीतीने पार पाडणे, 'झुरळांची वाढती संख्या व उपद्रव'पासून ते 'देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याचे उपाय'पर्यंत विविध विषयांवर अहवाल बनवणे, सरकारला घरगुती कामांपासून राष्ट्रीय कामांपर्यंत सर्वात हिरीरीने, न कंटाळता, न तक्रार करता मदत करणे अशी आपली आद्य कर्तव्ये आहेत असा समज नोकरीवर रुजू होण्याआधीच करून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. अशी कामे पूर्ण केली, तरच त्या माणसाला शिक्षक म्हणता येते. ह्या सर्व कामांचा चुकून एखादे वेळी राग आलाच, तर तो मुलांना जादाचा गृहपाठ देऊन काढावा. एखाद्या शिशुचे चांगले कंबरडे शेकून काढावे, अंगठे धरायला लावावेत, त्याचा कोंबडा, बकरी वगैरे काहीतरी करावे, त्याच्या वाडवडिलांचा मनोरंजक उद्धारही अधूनमधून करावा. (अशा पद्धतीने शिशुंचे पालनपोषण करणाऱ्याला 'शिशुपाल' अशी पदवीही दिली जात असल्याचे आमच्या अहवालानुसार दिसते आहे. ही पदवी काही टवाळखोर विद्यार्थ्यांनीच दिली असल्याचीही चर्चा आहे. त्यांचे अपराध यथावकाशपणे भरतीलच! असो).
सरकारी संस्थांमधून शिकवताना खाजगी शिकवणी घेणाऱ्यांविरुद्ध आपले असलेले वैर सातत्याने प्रकट करायला विसरू नये. 'साले फुकटचे पैशे हापसतात' असे आपल्या सहकर्मचाऱ्यांना फुकट मिळालेला सामोशाचा तुकडा मोडत अन् वशिल्याने मिळालेली नोकरी कुरवाळत सांगावे किंवा विद्यार्थ्यांपाशी त्यांच्याच डब्यातील 'पोशन आहार' पळवत म्हणावे. हे वैर उघडे करताना तो कलासवाला कसा कंडम आहे हे एकदा पटवता आले, की तुम्ही शंभर टक्के शिक्षक झालाच म्हणून समजा!
६. भारतीय:-
वर नमूद केलेल्या सर्व क्षेत्रांपैकी अगदीच नाईलाज झाल्यास ह्या क्षेत्रात यावे. ह्या क्षेत्राला फारसे भवितव्य नाही. त्यामुळे, ते उज्ज्वल वगैरे असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तेव्हा हे क्षेत्र निवडताना दहा नव्हे, शंभर नव्हे, तर हजार-हजार वेळा विचार करा. अगदीच खूळ लागले असेल तर मात्र तुम्हाला कोणीच अडवणार नाही. खड्ड्यात पडू पाहणाऱ्याला सावध करणे- निव्वळ हाच एक हेतू ह्या क्षेत्राबद्दल लिहिताना संपादकांनी मनात बाळगलेला आहे.
प्रथमतः, ह्या क्षेत्रातून काहीही लाभ नाही हे लक्षात घेणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारची आर्थिक, सामाजिक, वैयक्तिक प्राप्ती इथून होण्याचा संभव नाही. काही मिळालेच, तर 'आपण खुळे आहोत' ही एकमेव भावना मिळते. अनुभवाने ज्येष्ठ असलेल्या नागरिकाला 'प्राप्ती' म्हणल्याबरोबर चटकन् त्यापुढे 'कर' लागलेले अन् जोडलेले- दोन्ही दिसते. ह्यापुढे कोणाचीही झेप जात नाही, हे अनुभवाने पिकलेले कोणीही सांगू शकेल. त्यामुळे, काही मिळेल ह्या अपेक्षेने हे क्षेत्र निवडणारांसाठी 'येथे येऊ नये' हा संदेश सूर्यप्रकाशाइतका स्वच्छ आहे. यापुढील भाग काही महाभाग वगळता अन्य लोकांनी वाचला नाही तरीही काही हरकत नाही. कारण, एव्हाना हे क्षेत्र निवडणे कसे अयोग्य आहे हे बहुतांशी लोकांना पटलेलेच असेल. ज्यांना खड्ड्यात उडी मारायचीच असेल, त्यांनी पुढे खोदकाम करणे चालू ठेवावे.
मुळात भारतीय होण्यासाठी हाताशी थोडीशी लाज बाळगावी लागेल. त्यासोबतच काहीसा देशाभिमान वगैरे प्रतिगामी विचारही कुरवाळत बसावे लागतील. मुख्यत्वे, स्वतःखेरीज इतरांचा, म्हणजेच स्वेतरांचा विचार करणे अंगीकारावे लागेल. सर्व नियमही काटेकोरपणे पाळावे लागतात. त्याशिवाय, भारत देशाच्या प्रगतीसाठी झटायला-बिटायला लागते. तसेच, आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा, भाषेचा, वैविध्याचा, समृद्धीचा; थोडक्यात म्हणजे साऱ्या साऱ्याचा अहंभाव नसला तरी अभिमान बाळगावा लागतो. गंमत म्हणजे देशसेवा करायला थेट सीमेवर जाऊन जीवच द्यावा लागतो असा एक समज रूढ होतो आहे. परंतु, तसे काही अजूनतरी सिद्ध झालेले नाही. जीव न देताही देशसेवा करता येते म्हणे! (खरे-खोटे ठाऊक नाही; कारण मुळात लोकांनी ह्या क्षेत्रात पडूच नये, अशा विचारसरणीचे आमचे आदरणीय संपादक महोदय असल्यामुळे जीव देण्याखेरीज कोणत्या मार्गांनी देशसेवा करता येते ह्यावर आम्ही संशोधनच केलेले नाही). तात्पर्य, देशसेवा करणे हे अत्यंत खडतर काम असून नुसते खायचे (व खाणाऱ्यांचे) काम नव्हे. तेव्हा ह्या मार्गावर न जाणे हे श्रेयस्कर. किंवा जायचे झाल्यास खरेखुरे भारतीय न होता केवळ आपण खरेखुरे भारतीय झाले आहोत, असे भासवता आले तरी उत्तम!
जे इच्छुक या सदराच्या दुसऱ्या परिच्छेदानंतरही ह्या क्षेत्रात येण्याबाबत आतूर होते, त्यांची ती खुमखुमी एव्हाना जिरली असावी अशी आम्हाला आशा आहे. तरीही येथे येण्याची तयारी असणाऱ्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर जरूर यावे. काही काळातच त्यांचीदेखील वास्तवाच्या भूमीवर जिरेल, अशी सर्व राज्यकर्ते व इतर पुढारी यांच्या वतीने आम्ही हमी देऊ इच्छितो.
७. माणूस:-
प्रस्तुत मार्गदर्शिकेत असलेल्या ७ क्षेत्रांपैकी सर्वात खडतर क्षेत्र. 'भारतीय' होण्यापेक्षाही अवघड असे हे क्षेत्र आहे. ह्या क्षेत्रातदेखील 'भारतीय'प्रमाणेच मिळकत शून्य असून उपेक्षाच अधिक आहे. तसेच 'भारतीय'पेक्षा अधिक कष्ट इथे उपसावे लागतात. कोणताही शहाणा 'भारतीय' व 'माणूस' ह्या क्षेत्रांकडे ढुंकूनही पाहणार नाही अन् पाहूदेखील नये. म्हणूनच, प्रस्तुत क्रमावलीत ह्या दोन क्षेत्रांना अनुक्रमे शेवटून दुसरे व शेवटचे स्थान दिले गेले आहे. ह्यावरूनच काय तो अर्थबोध घ्यावा.
माणूस होण्यासाठी मुळात संवेदना जागरूक असणे आवश्यक आहे असा एक समज असलेला दिसतो. परंतु, संवेदना, मन वगैरे अस्तित्त्वात नसलेल्या गोष्टींबाबत विचार करणे अंमळ अवघडच वाटते. तसेच दुसऱ्यांना मदत करण्याची ओढ निर्माण व्हावी लागते. काही अनुभवी 'माणूस' लोकांच्या तर दुसऱ्याच्या जखमा पाहून डोळ्यात पाणी आलेले आमच्या सूत्रांनी पाहिलेले आहे. (हे पाणी हसून हसून मग आले होते हे नंतर लक्षात आले. तेव्हा कुठे आम्ही निर्धास्त झालो). धर्म, वर्ण, जात, लिंग, देश, प्रांत ह्या सर्वांच्या पलीकडे जाऊन विचार करावा लागतो. तसेच अडल्यानडल्या वेळी हातातली कामे टाकून दुसऱ्यांच्या हाकेला धावायलाही लागू शकते. जनसेवा, लोकसेवा अशा सेवांचा वसा उचलावा लागत असल्याचेही आमचा अहवाल म्हणतो. एकदा 'माणूस' अथवा 'माणुसकी' हे क्षेत्र निवडले, की मग मनासोबतच मेंदूचाही वापर करावा लागत असल्याचे काही पुरावे सापडले आहेत. थोडक्यात, हेदेखील क्षेत्र न येण्यासारखेच आहे.
तरीदेखील, ह्या क्षेत्रात नाही म्हणले तरी थोडासा मान आहे. पण, हा मान अगदी मोजक्या लोकांनाच मिळतो. वर म्हणल्याप्रमाणे, खरोखरीचे 'माणूस' क्षेत्रात कार्यरत असावेच लागते असे काही नाही. कार्यरत आहोत एवढे दाखवता आले तरी पुष्कळ आहे. एकदा हे जमले, की मग 'माणूस' नावाखाली आपापले धंदे विनाधास्ती करता येतात. त्यासाठी आपल्याच आजूबाजूला अशी अनेक प्रसिद्ध उदाहरणे सापडतील. अगदी जागे असलेले प्राणी वा झोपलेली माणसे, ह्यापैकी काहीही मारले, तरी 'माणूस' क्षेत्राच्या ताकदीखाली सारे काही दडपून टाकता येते. तसेच प्रसिद्धीदेखील मिळवता येते. तेव्हा, ह्या क्षेत्राचे अनेक तोटे असले तरी मोजकेच; पण, आयुष्यभराची भरभराट करून देणारे फायदेदेखील आहेत. सुज्ञांना इशाराच पुष्कळ ठरावा!
समारोप
अशी काही निवडक व मोजकी सात क्षेत्रे आम्ही तुमच्यासाठी निवडली होती. इच्छुक उमेदवारांना ह्यातून यथायोग्य मदत व्हावी हाच प्रमुख हेतू. इच्छुकांनी क्रमाक्रमाने क्षेत्र निवडीत जावे. एकच क्षेत्र निवडायचेही कोणावर बंधन नसल्यामुळे अधिक क्षेत्रे निवडून, त्यामध्ये नैपुण्य प्राप्त करून स्वतःची अधिकाधिक भरभराट करून घ्यावी. त्यातच आमचे व आमच्या मार्गदर्शिकेचे यश सामावलेले आहे!
By Amey Sachin Joag

Comments