वाटेत भेटणारी माणसं
- Hashtag Kalakar
- Mar 12, 2023
- 2 min read
By Pranali Deshmukh
वाटेत भेटणारी माणसं कोशिंबीर , लोणच्यासारखी
कळत , नकळत भेटणारी माणसं पानात वाढलेल्या कोशिंबीर आणि लोणच्यासारखी ....
खरं तर वरण भात भाजी पोळी हा घाट हक्काच्या नात्याचा ....
पण मिठाच्या बाजूला कोपऱ्यात कमी जागेत असणारी हि माणसं कोणत्याच नात्यात बसत नाही .
वर्षानुवर्षे जसं लोणचं वाढल्या जातं जितकं मुरलेलं तितकी चव वाढते ...
असेच सोबत नसतांना सोबत चालणारी मुरलेली माणसं सवयीची होतात ...
पानात किंवा जीवनात समोरची किंवा मधली
जागा माझीच असा कधी अट्टाहास करत नाही ..
एक कोपरा बस पुरेसा ,
कोशिंबीर आरोग्याला पौष्टिकच आंबटगोड चव
दही असो नसो कुठेही ऍडजेस्ट व्हायचं , काकडी , मुळा , कांदा , गाजर ,टमाटर कोणालाच रोखत नाही .
अशीच असतात काही माणसं आपल्यासाठी पौष्टिक जशी पानातल्या साग्रसंगीत पदार्थांची चव कोशिंबीर वाढवते ...
तसलीच पौष्टिकता अशा माणसांच्या असण्याने जीवनात येते ...
मनोबल वाढवतात ,धीर देतात , आपल्याला पॉझिटिव्ह राहण्यासाठी कितीतरी व्हिटॅमिन्स देतात कोशिंबीर रुपी माणसं ...
अगदी कमी वेळेसाठी येऊन निघून जातात .
छोटीशी भेट ....हृदयात थेट ....
उद्या पानात जरी कोशिंबीर नसली तरी तुमच्या शरीराला गुणकारी ऊर्जा दिलेली असते ...
सणावाराला वेगळ्या वाटी किंवा प्लेटमध्ये
विराजमान होणारी गोड माणसं ...
आपल्याही आजूबाजूला गोडातच दिसणारी
गोड मिठू असतात ....वेगळी खुर्ची घेऊन ..
एकदा कडवट वल्ली आरोग्यास घातक नाही पण शुगर वाढवणारी माणसं आपल्याला आजारी पाडू शकतात .
गोडाच्या सोबतीला येतात पापड कुरडई सारखी माणसं , यांना थोडं इग्नोर केलं कि लगेच वातड येतात , कधी मुड बदलेल याचा नेम नसतो शिवाय तेलकट पचायला जड असणाऱ्या व्यक्ती असाव्या किंवा नसावा ते आपापल्या कोलेस्टेरॉल वर अवलंबून आहे ...
मिठासारखी गरजेची असतात काही माणसं ....
प्रत्येक पदार्थात मीठ टाकल्यावरही पानात आधी मीठच वाढल्या जातं ....
काही माणसांना असा मान मनापासून द्यावा वाटतो ...
गोडातही चिमूटभर मीठ टाकलं तर स्वाद वाढतो ...
अळणी जीवनाला किंवा जेवणाला स्वादीष्ट , रुचकर बनवतात हि मिठासारखी माणसं ...
त्यांचं अस्तित्व बेरंग जीवनात रंग भरून ...
आयुष्याची गोडी वाढवतात ...
परंतु मिठासारखी माणसं चिमूटभरच असावी फक्त स्वादापुरती , रुचीपूर्ततेसाठी ....चिमूटभरच ....
बघा तुमच्याही आजूबाजूला असतील कोशिंबीर , लोणच्यासारखी माणसं स्त्री , किंवा पुरुष , वयानी मोठे किंवा सान चिमुकली ....कोणीही
ओळखा त्यांना ,जाणीव करून द्या तुमचं
असणं किती मोलाचं आहे आमच्या आयुष्यात
माहिती आहे आयुष्यभर कोणीच कोणाला पुरत नाही ....जितके क्षण आहेत तेच महत्वाचे
उद्याच्या सूर्याची शाश्वती मी का द्यावी ....
आजच्या रात्रीवर माझा भरवसा नाही .....
By Pranali Deshmukh

Comments