top of page

मंतरलेला धागा

By Sameer Shashikant Vengurlekar


गुढ काळोखी रात्र. भयाण शांतता. सुनसान असा रस्ता. त्या रस्त्यावरुन संपूर्ण काळ्या ओव्हरकोटातील एक मनुष्य चालत जात आहे. त्या माणसाच्या डोक्यावर फेल्ट हैट आहे आणि चेहरा काळ्या बुरख्याने झाकलेला आहे. हातात कापलेले शिर घेऊन मंद पावलांनी तो चालत आहे. भयाण गुढ रात्र अजुनच भयाण होत आहे. गर्द झाडीतुन घुबडांच्या चित्कारण्याचा आवाज घुमतो आहे, आणि एकाएकी तो वाढत चालला आहे. रस्त्यावरून सळसळत साप जात आहेत. त्या भयाण गर्द रात्रीत झाडांच्या चित्रविचित्र सावल्या वातावरणात अधिकच गुढ निर्माण करत आहेत. तसाच चालता चालता तो स्मशानाजवळून जात आहे. काळोखातुन भुतांच्या रडण्याचा भेसूर आवाज येतो आहे. गर्द झाडांवरील पानांची सळसळ वाढत आहे. दूरवरून कोल्हयांची कोल्हेकुई त्यात भर घालत आहे. आता तो मनुष्य एका विशाल झाडाच्या बुंध्यापाशी येऊन थांबला आहे, आणि त्याने ते शिर खाली ठेवलेले आहे. मंद पावलांनी त्याने झाडाला तिन प्रदक्षिणा घालून कोटाच्या खिशातुन सुरा बाहेर काढलेला आहे. तो सुरा घेऊन तो आपला उजव्या हाताचा अंगठा कापतो, आणि रक्ताचा अभिषेक त्या बुंध्यावर करतो. जसा तो अभिषेक करतो, आजुबाजुच्या वातावरणात गुढरित्या बदल होतात. विजांचा कडकडाट सुरु होतो, गडगडाट सुरु होतो. भुतांच्या हसण्याचा प्रचंड आवाज वातावरणाला चिरत जात असतो. आता तो मनुष्य त्या शिराकडे पाहतो. त्या शिराचे बंद डोळे उघडलेले असतात आणि भेसुर हास्य करत ते शिर हवेत तरंगायला सुरवात होते. त्याचे डोळे पांढऱ्या प्रकाशाने चमकु लागतात. हवेत तरंगत ते शिर त्या झाडाभोवती फिरत राहते. अचानक झाडाच्या बुंध्यातुन डोळे दिपवणारा प्रकाश बाहेर पडतो, आणि एक चित्रविचित्र आक्रुती बाहेर पडत त्या उभ्या असलेल्या माणसाच्या शरीरात प्रवेश करते. भुतांच्या हसण्याचा आवाज वाढत जातो, त्यात घुबडांच्या चित्कारण्याचा आणि कोल्ह्य्यांच्या कोल्हेकुईचाही आवाज एकत्र होतो. ती गुढ रात्र खुपच गर्द बनते. सोसाट्याचा वारा सुरु होतो. तो मनुष्य त्या हवेत तरंगणाऱ्या शिरासमोर गुडघे टेकून बसतो. ते शिर हवेतच स्वतः भोवती गोल गोल फिरत दूर निघून जाते. तसा तो मनुष्य सरळ उभा राहतो, आणि आपल्या चेहऱ्यावरचा काळा बुरखा दूर करतो. त्या माणसाला चेहराच नसतो. एक अद्रुश्य असा त्याचा चेहरा असतो. विजांचा कडकडाट त्यात ते भेसुर आवाज आणि गुरगुरण्याचे आवाज बराच वेळ घुमत राहून शांत होतात, आणि त्या शांततेला चिरणारा एक असुरी आवाज घुमतो. "मी परत आलोय, मी परत आलोय" पुन्हा एकदा विजांचा कडकडाट, भेसुर गुरगुरण्याचे आवाज सुरु होतात.

त्या रात्रीचा तो विलक्षण प्रसंग अजूनही जशास तसा सौरभच्या डोळ्यांसमोर उभा राहत असतो. स्वप्नात,टिव्ही पाहताना, बाहेर फिरायला गेल्यावर, कुठलेही काम करतानाही त्याला त्याचा चेहरा दिसत असतो. भयभीत होत तो स्वप्नातुन दचकुन जागा होतो. त्याच्या चेहऱ्यावर मुर्तीमंत भिती दाटलेली असते. कपाळावर घामाचे ओघळ वाहत असतात. सौरभ पंडित एक प्रथितयश बिल्डर अगतिक होऊन कोपऱ्यात अंग चोरून बसलेला असतो. तेवढ्यात त्याची पत्नी रिया धावतच त्याच्याजवळ येते. सौरभ सारखा दूरवर बोट दाखवत तोंंडाने बडबडत असतो. "तो......तो परत आलाय. मला तो सोडणार नाही, मला तो सोडणार नाही." रिया गदागदा हलवत सौरभला भानावर आणण्याचा प्रयत्न करत असते. "अरे सौरभ काय झालं? कोण परत आलयं?काय बोलतोयस तु?" पण सौरभ तसाच पुटपुटत राहतो, आणि त्याची शुद्ध हरपते. रिया घाबरत उठते आणि डॉक्टर दामलेना फोन लावते. सौरभने काहीतरी भयानक पाहिले असेल किंवा त्याला कोणतेतरी भयानक स्वप्न पाहिले असेल असे रियाला वाटत असते. रिया खिडकीतून बाहेर पाहत असते. पहाटेची निरव शांतता पसरलेली असते. त्यांचा बंगला काहीशा सुनसान भागात असतो. दूरवर पांढरा दूर पसरलेला दिसत असतो, पण त्या धुरात एक आक्रुती त्यांच्या बंगल्यावर नजर ठेवून असल्याचा रियाला भास होतो. ती आक्रुती मोठीमोठी होत असते. घाबरुन रिया आपली मान आत वळवते. सौरभ अजूनही शुध्दीवर आलेला नसतो, ती पुन्हा खिडकीतून बाहेर पाहते तोवर ती आक्रुती गायब झालेली असते. पहाटेचे सहा वाजलेले असतात, तेवढ्यात दरवाजावर टकटक होते. डॉक्टर दामले आत प्रवेश करतात, आणि बेशुद्धावस्थेतील सौरभला तपासून त्याला इंजेक्शन देतात. "यांनी कुठल्यातरी गोष्टीचा धसका घेतला आहे त्यामुळे त्यांना मानसिक धक्का बसलेला आहे, मी इंजेक्शन दिले आहे थोड्या वेळाने त्यांना शुध्द येईल." "पण डॉक्टर तो अचानक जागा होत काहीतरी बडबडत होता की तो परत आलाय, तो मला मारणार असं काहीतरी." डॉक्टर यावर काहीच न बोलता मान खाली घालतात. थोड्या वेळाने समजावणीच्या सुरात रियाला सांगतात. "आय थिंक तुम्ही त्यांना विश्वासात घेऊन त्यांचेशी बोला, काय कारण आहे ते समजेल. चला येतो मी." डॉक्टर दामले आपली बैग ऊचलून बाहेर पडतात व रिया सौरभला पाहत बेडवर बसते.

बऱ्याच वेळाने सौरभ शुध्दीवर येतो. रिया बेडवरुन उठत त्याच्याजवळ जाते. सौरभ जागा होत आश्चर्याने तिच्याकडे पाहतो. "सौरभ ठिक आहेस ना तु? काय झालं होतं? एवढा का घाबरलास?" तरीही सौरभ तिच्याकडेच पाहत होता. "अरे सौरभ बोल काहीतरी." भानावर येत सौरभ विचारतो. "काय झालं होत रिया?कशाबद्दल बोलतेयस तु? मला तर काहीच आठवत नाहीये." "अरे तु काहीतरी बडबडत होतास की तो परत आलाय, तो मला मारणार असं. कोण परत आलाय?" सौरभ किलकिल्या नजरेने रियाला पाहत बोलतो. "रिया मला खरचं काही आठवत नाही. माझं डोकं भणभणतय." "ओके ओके. लेट्स रिलॅक्स. तु आता काही विचार करु नको. विश्रांती घे. मी तुझ्यासाठी चहा बनवून आणते." सौरभ रोमैंटिक होत रियाला हाताला धरत आपल्या बाहुपाशात ओढतो. "प्लीज जाऊ नकोस ना." रिया लाजते, तसा हसत सौरभ तिच्या ओठांचे चुंबन घेण्यासाठी आपले ओठ तिच्या ओठांजवळ नेतो, तसं त्याला बळेच दुर करत रिया उठते. "चल जाते मी. तुझं आपलं केव्हाही काहीही असतं बघ." रिया जशी वळून दरवाजातून आत जायला निघणार तेवढ्यात सौरभ मागाहून तिला बिलगतो. "आय लव्ह यु रिया, आय लव्ह यु." बेभान होत मागे वळत सौरभला कुरवाळत रियाही बोलते. "आय लव्ह यु टु सौरभ. आय लव्ह यु टु." बराच वेळ ते एकमेकांच्या मिठीत सारे जग विसरुन जातात, नंतर भानावर येत रिया बोलते. "काय मिस्टर हिरो. आज कामावर जायचं नाहीये वाटतं?" सौरभ डोक्यावर हात मारत उद्गारतो. "ओह शीट. अगं मला आज एके ठिकाणी सर्व्हे साठी जायचं आहे. चल पटापट नाश्ता कर." "अरे पण सौरभ......." रियाचे वाक्य पुर्ण व्हायच्या आधीच सौरभ तरातरा आपली तयारी करायला निघुन जातो. रिया त्याच्या पाठमोऱ्या आक्रुती कडे पाहत असता तिला पहाटे दिसलेली ती आक्रुती आठवु लागते. काय घडणार आहे, काय घडलं आहे याचा तिला अंदाज येत नसतो.

ठरलेल्या वेळेप्रमाणे सौरभ श्यामलाल नावाच्या सहकाऱ्यासोबत शहरापासून दूर अंतरावर एके ठिकाणी सर्व्हे करायला आलेला असतो. तो एक जुना पडका वाडा असतो. कारमधून उतरत सौरभ एकटक त्या वाड्याकडे पाहत राहतो. वाडा पाहून त्याला नजरेसमोर धुसर धुसर अशी माणसांची चित्रे दिसू लागतात. श्यामलाल सौरभच्या चेहऱ्याकडे पाहत असतो. काही वेळाने भानावर येत सौरभ श्यामलाल ला विचारतो. "आपल्याला इथे सर्व्हे करायचा आहे?" "होय साहेब." श्यामलाल काहीसा बावरत बोलतो. सौरभ त्या वाड्याकडे पाहत पुढे पुढे जात असतो, वाड्याच्या मुख्य दरवाजा कडे तो येतो. आता त्याला मंत्रांचा अस्पष्ट असा आवाज ऐकु येत असतो. सौरभ अशी मारलेली साद ऐकु येत असते. हसण्याखिदळण्याचे आवाज त्याच्या कानात घुमु लागतात. गतकाळात हरवल्यासारखा तो भारावून त्या वाड्याला निरखत जात असतो. अचानक समोरच्या भिंतीवर त्याची नजर जाते. भिंतीवरुन लाल पाण्याचे ओघळ टपटप असा आवाज करत खालच्या कुष्मांडात पडत असतात. सौरभ सावकाश पावलांनी कुष्मांडाजवळ जातो, आणि पाहतो. कुष्मांडात पडणारे ते थेंब रक्ताचे असतात. तो कुष्मांडात वाकुन पाहतो, तोच एकाएक असंख्य मानवी कवट्या त्या पाण्यात तरंगताना त्याला दिसू लागतात, तसा भयभीत होत तो किंचाळत मागे सरकतो. त्या कुष्मांडातुन एक अतिशय विद्रुप, भेसुर चेहरा एकदम गुरकावत त्याच्यावर झडप घेतो. सौरभ तसाच मागे वळतो, त्याची धडक श्यामलालला होते. सौरभ भुत पाहिल्यागत श्यामलाल ला पाहत राहतो, पण एवढे सगळे होऊनही श्यामलाल च्या चेहऱ्यावरची माशी सुध्दा उडालेली नसते. मठ्ठ चेहरा करत तो सौरभला विचारतो. "साहेब आवडली का जागा?सर्व्हे करायचा ना?" तरी सौरभ भानावर आलेला नसतो. तसा श्यामलाल मोठ्याने हाक मारतो. "साहेब." त्याची ती आर्त हाक ऐकुन सौरभ भानावर येत त्याच्याकडे पाहतो. "साहेब सर्व्हे करायचा ना? कशी वाटली तुम्हांला जागा?" सौरभ सभोवार नजर फिरवतो आणि शामलाल कडे पाहत सांगतो. "श्यामलाल एक काम कर. माझी कार घे आणि ऑफिसला जा, तिथे माझी वाट बघ. ही घे चावी." "पण साहेब........" "बोलण्यात वेळ नको घालवू, चल चल पटकन निघ." श्यामलाल चकित होत सौरभच्या हातुन कारची चावी घेऊन निघून जातो. वाड्यात आता फक्त सौरभ एकटाच राहतो. त्या वाड्याच्या भिंतींकडे तो एकटक पाहत असतो, आणि त्याच्या स्मृती पटलावर १५ वर्षांपुर्वीच्या आठवणी जाग्या होतात.

सौरभला आता तो वाडा स्पष्ट दिसत असतो. ते मंत्रांचे सूर, ती सौरभ अशी आईने घातलेली साद त्याला स्पष्ट ऐकू येत असते. तो वाडा जणू जिवंत होऊन बोलू लागतो. पंडितांचे घराणे त्या भागातील प्रकांड पांडित्य असलेले व अग्निहोत्र घराणे म्हणून प्रसिध्द होते. मुंबई शहरापासून दुर निसर्ग रम्य वनराई मध्ये त्यांचा प्रशस्त दुमजली वाडा उभा होता. यज्ञ, होम हवन, अनुष्ठानांसाठी दुरवरुन बरेच विद्वान येत असत. त्या दिवशीही एक मोठा अनुष्ठान यज्ञ त्या वाड्यात चालु होता. सौरभचे वडील चिंतामण पंडित व त्यांचे स्नेही विश्वास पंडित यज्ञाला बसले होते. यज्ञासाठी अजुन कोणाला आमंत्रण नव्हते फक्त त्यांना एका माणसाच्या येण्याची आतुरता होती. सुंदर फुलांनी आणि तोरणांनी वाडा सुशोभित करण्यात आला होता. यज्ञमंडपासमोर सुंदर रांगोळी रेखाटण्यात आली होती. सुगंधी धुपाचा दरवळ सर्वत्र पसरला होता. चिंतामण पंडित यज्ञासमोरील आसनावर बसून यज्ञात समिधा अर्पण करत होते. त्यांना सहाय्य विश्वास पंडित करत होते. तेवढ्यात चिंतामण पंडितांना काहीतरी आठवते, आणि ते हाक मारतात. "मधुरा, अगं जरा तांब्याच्या पात्रातुन पाणी घेऊन ये पाहू." तेव्हा वाड्याच्या एका दरवाजाआडून आपला वाऱ्यावर भुरुभुरू उडणारा रेशमी केशसंभार सांभाळत आणि मोहक हास्य करत हातात तांब्याचा कलश घेऊन सावकाश पावले टाकत मधुरा येत असते. दुरवरुन सौरभ तिला पाहून कावराबावरा झालेला असतो, अंगावर रोमांच उभे राहिल्याचा त्याला भास होतो. मधुरा अलगद आपल्या केसांच्या पुढे येणाऱ्या बटा सावरत कमरेतुन वाकत तो कलश चिंतामणरावां समोर ठेवते, आणि सरळ उभी राहते. हळूच तिचे लक्ष तिला चोरून पाहणाऱ्या सौरभकडे जाते, तसे स्त्रीसुलभ हास्य करत ती आत जायला वळते. तेव्हा चिंतामणराव आणि विश्वासरावांचे संभाषण तिच्या कानावर पडते. "खरचं मुलगी मोठी गोड आहे बरं का विश्वासराव." "हो ना चिंतामण. अरे आज वामन पंडित असायला पाहिजे होते बघ, पण काय करणार ईश्वरेच्छा बलियासी. " सौरभ बराच वेळ पाठमोऱ्या उभ्या असलेल्या मधुराला न्याहाळत असतो. वाऱ्याची एक मंद झुळूक येते आणि तिच्या कानातील कुड्या त्या वाऱ्यावर हिंदोळ्या घेतात. मधुरा सहज मागे पाहते आणि सौरभकडे पाहत एक घायाळ करणारे हास्य करते, आणि तशीच चालत वाड्याच्या आत जाते. सर्वांची नजर चुकवत सौरभही तिच्या मागुन जातो. मधुरा स्वयंपाकघरात आवराआवर करत असते, तो सहजच तिला पाहत पाठीमागे येऊन उभा राहतो. मधुराला तो आल्याचे माहितपण नसते, ती आपली आपल्या कामात मग्न असते. सौरभ चालत जात तिच्या पाठीमागे एकदम नजिक येऊन उभा राहतो. अचानक मधुरा मागे वळते, आणि तिचा धक्का सौरभला लागतो. कावरीबावरी होत नजर खाली झुकवत ती लाजते. वाऱ्याच्या झुळकीमुळे तिची ओढणी फडफडते, तो तिला पाहतच राहतो, तेवढ्यात नजर वर करत एकदम डोळे वटारत ती बोलते. "अच्छा म्हणजे इथेही पाठलाग चालला आहे वाटतं तुझा?" सौरभही थोडासा चढ्या आवाजात सांगतो. "चल पाठलाग कसला, मी तर पाणी पिण्यासाठी आलो होतो." कमरेवर हात ठेवत लटक्या रागाने सौरभकडे पाहत ती बोलते. "अच्छा पाणी पाहिजे होते होय?" सौरभ पुन्हा तिला पाहुन घायाळ होतो. कमरेवर हात घेतलेली मधुरा जणु त्याला रखुमाईच भासत असते. तो तसाच तिला पाहत राहतो, त्याची तंद्री तुटते जेव्हा मधुरा चुटकी वाजवत त्याला जागं करते. सौरभ दचकुन तिच्याकडे पाहतो. "हं हे घे पाणी." सौरभ तिच्या हातातुन पाण्याचा तांब्या हातात घेतो, तेव्हा चुकुन तिच्या मुलायम हातांचा त्याच्या हातांना स्पर्श होतो. अंगावरून कोणीतरी सहस्त्र मोरपीस फिरवल्याचा त्याला भास होतो. सौरभ तिच्या नजरेला नजर मिळवत पाणी पितो, त्याच्या तांब्यातले पाणी केव्हा संपते त्यालाच कळत नाही. मधुरा त्याच्या हातातला रिकामी तांब्या हातात घेते. "अजून पाहिजे का पाणी की भागली तहान.?" सौरभ कावराबावरा होत तिला पाहत बोलतो. "नाही, नको नको भागली माझी तहान." सौरभ तिच्या घायाळ करणाऱ्या नजरेला पाहत तसाच मागे मागे जात दरवाजातुन बाहेर पडतो. पण बाहेर पडताना तो दरवाजाला आपटतो. मधुरा त्याला पाहुन खुदकन हसते, आणि तोंडातल्या तोंडात पुटपुटते. "वेडा गं बाई वेडा." आणि स्वतः शीच लाजत म्हणते. "पण आहे मात्र चांगला." इकडे बाहेर अनुष्ठान यज्ञाची सांगता होणारी असते. चिंतामण पंडित व विश्वासराव यज्ञ थांबवुन काळजीने एकमेकांकडे पाहत असतात. कुणालाच काही समजत नसते, तेवढ्यात विश्वासराव चिंतामणरावांना विचारतात. "चिंतामणा, अरे गंगाभट्ट येणार आहेत ना सांगतेसाठी?" "हो हो विश्वासा, पण अजुन आले कसे नाहीत याची काळजी वाटते." चिंतामणरावंचे लक्ष राहून राहून प्रवेशद्वाराकडे जात असते. यज्ञाचा मुख्य विधी पुर्ण होऊन बराच वेळ झालेला असतो. शेवटी वाट पाहून कंटाळलेले विश्वासराव चिंतामण पंडितांना सांगतात. "चिंतामणा बराच वेळ झाला की रे. मला काही गंगाभट्ट येतील असं वाटत नाही, चल आपणच यज्ञाची सांगता करुया." चिंतामणरावही सहमती दर्शवत हातात सांगतेच्या समिधा घेतात आणि त्या यज्ञात अर्पण करायला हात पुढे करतात, तसा प्रवेशद्वारावर"थांबा"असा धीरगंभीर आवाज घुमतो. अवाक होत सर्वजण प्रवेशद्वाराकडे पाहतात. सहा-साडेसहा फुट उंचीचे, बलदंड शरीरयष्टीचे उंचेपुरे गंगाभट्ट वाड्यात दमदार पावलांनी प्रवेश करत असतात. भव्य कपाळ, कपाळी भव्य शिवगंध रेखाटलेले आणि दोन्ही कानात भिकबाळी घातलेले गंगाभट्ट साक्षात जमदग्नीच भासत असतात. त्यांनी जांभळ्या रंगाचे धोतर व त्यावर त्याच रंगाचे उपरणे असा पेहराव केलेला असतो. वाड्याच्या आत प्रवेश करताच आपल्या राकट चेहऱ्याने सर्वांवर नजर फिरवत, संजाबाची शेंडी मागे पाठीवर टाकून ते पायातल्या वहाणा दरवाजापाशी काढ तसेच पुढे येत चिंतामण पंडितांसमोर उभे राहतात. आपल्या भुवया वक्र करत ते चिंतामण पंडित व विश्वासरावांना पाहत असतात. वाड्यातले बाकीचे म्हणजे सौरभची आई रमाबाई, आक्का, सौरभ व मधुरा जागच्याजागी खिळलेले असतात. गंगाभट्ट आलेले पाहताच आनंदातिशयाने व आदरपुर्वक चिंतामणराव व विश्वासराव खाली वाकुन त्यांच्या पाया पडतात, तेव्हा आशिर्वादाचा हात पुढे करत आपले घारे डोळे त्यांचेवर रोखत गंगाभट्ट बोलू लागतात, त्यांचा ध्वनी गदेवर गदा आदळावी तसा टणत्कारासारखा पण शांत व गंभीर असतो. "असू दे, असु दे चिंतामणा. मी शब्द दिला तर तो पाळतोच हे ठाऊक असताही अनुष्ठानाची सांगता करणार होतास?" कावरेबावरे होत चिंतामण पंडित विश्वासरावांना पाहतात, आणि आपली मान खाली झुकवत बोलतात. "माफी असावी गंगाभट्ट. आम्हांला वाटलं की तुम्ही येणार नाहीत." आपले उपरणे सावरत धीरगंभीर आवाजात गंगाभट्ट बोलतात. "पण आता मी आलोय. चला यज्ञाची सांगता करुया." चिंतामण पंडित व विश्वास पंडितांच्या मधोमध मुख्य आसनावर गंगाभट्ट विराजमान होतात. तेवढ्यात लगबगीने एक गडी पाण्याचा तांबा त्यांच्यासमोर धरतो. गंगाभट्ट गरागरा डोळे फिरवत त्या गड्याकडे पाहतात. "माझे कार्य संपन्न झाल्याखेरीज मी पाण्याच्या थेंबालाही स्पर्श करत नाही हे माहित नाही की काय तुला?" गंगाभट्टांचा तो साक क्रोध पाहुन चिंतामण राव त्या गड्याला हातानेच आत जाण्याची खुण करतात. सौरभ व कुटुंबातील इतर सदस्य प्रेक्षक बनून सर्व पाहत असतात. नंतर कोणत्याही विघ्नाशिवाय यज्ञ संपन्न होतो. चिंतामणराव आपल्या कपाळावरील घाम पुसत सौरभला इशारा करतात, तसा सौरभ आतमध्ये जाऊन काही वेळाने लाल वस्त्रात गुंडाळलेला एक ऐवज घेऊन बाहेर येते. अलगद चिंतामणरावांनी निश्चित केलेल्या मोठ्या चौरंगावर तो ऐवज ठेवतो. नतमस्तक होत लाल वस्त्र सोडले जाते, आतमध्ये एक अतिशय दिव्य आणि भलामोठा असा ग्रंथ असतो, तो पाहताच गंगाभट्ट वगळता सर्वजण पाया पडतात. गंगाभट्ट आश्चर्य चकित होत विस्फारलेल्या नेत्रांनी ते पाहत असतात. चिंतामणरावांकडे पाहत ते विचारतात. "अरे चिंतामणा कोणता ग्रंथ आहे हा? आणि तुम्ही सर्व त्याच्या पाया पडताय?" चिंतामणराव प्रेमपुर्वक पाहत आदराने सांगतात. "गंगाभट्ट हा आमच्या पंडित घराण्याचा वारसा, एक अमुल्य ठेवा. हा ग्रंथ जनकल्याणासाठी उपयोगी पडत आहे हे माझे भाग्य आहे." संजाबाची शेंडी पाठीवर टाकत गंगाभट्ट विचारतात. "असं काय खास आहे या ग्रंथात?" "काय नाही ते विचारा. अतिशय दिव्य मंत्रांनी युक्त आहे हा ग्रंथ. संपूर्ण चराचर सामावलं आहे यात. जसं यातुन जनकल्याण साधता येतं तसाच यातील दिव्य मंत्रांच्या योगे स्वतः चा स्वार्थ ही साधला जाऊ शकतो. पण आजवर या पंडित घराण्याने सदहेतुनेच याचा वापर केला आहे, आणि हा वारसा आमच्या पुढच्या पिढीतही असाच चालु राहिल. आपल्या शुभहस्ते या ग्रंथाची पुजा करावी, ही आपणास विनंती करतो." गंगाभट्टांचे डोळे एका वेगळ्या झळाळीने चमकतात. चिंतामण पंडित हात जोडून बसलेले असतात. विश्वास राव हाताने इशारा करताच तबकातुन फुले, गंध अक्षता, हळद कुंकुम इ. घेऊन गडी गंगाभट्टांसमोर ते तबक ठेवतो. गंगाभट्ट अनिमिषपणे ग्रंथावर नजर टाकतात, आणि त्याची यथासांग पुजा करत त्याला स्पर्श करतात. जसा त्या दिव्य ग्रंथाला त्याचा स्पर्श होतो त्यांना एकदम विजेचा धक्का बसल्याची जाणीव होते. काहीच झाले नाही असा भाव दाखवत चोरट्या नजरांनी ते चिंतामणरावांना व विश्वासरावांना पाहतात. निरागस चेहऱ्याने अजाण भाव ठेवून चिंतामण पंडित व विश्वास पंडित त्यांना पाहत असतात. आदराने चिंतामण पंडित गदगद होत बोलतात. "खरचं गंगाभट्ट आपण येऊन या अनुष्ठान यज्ञाची सांगता व या दिव्य ग्रंथाची पुजा स्वहस्ते केली यातच आम्ही धन्य झालो." आशीर्वादाचा हात उंचावत गंगाभट्ट बोलतात. "माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे चिंतामणा. चल येतो मी" आशीर्वादाचा हात खाली करत एकवार कावेबाज पणे ग्रंथाकडे पाहत, आपली संजाबाची शेंडी मागे टाकत बलदंड शरीराचे गंगाभट्ट तरतरत वाड्याबाहेर निघून जातात. त्यांच्या पाठमोऱ्या आक्रुतीकडे बराच वेळ चिंतामणराव व विश्वासराव पाहत राहतात. चिंतामण पंडित उद्गागरतात. "खरचं ऐकलं होतं, त्यापेक्षाही लहरी स्वभाव आहे गंगाभट्टांचा, हो ना विश्वासराव?" "हो, पण हा लहरीपणा घातक न ठरो कोणासाठी म्हणजे झालं." चिंतामण पंडितांसह सर्व कुटुंब मनोभावे त्या ग्रंथाच्या पाया पडते.

गतकाळात हरवुन गेलेला सौरभ भानावर येत मोबाईल पाहतो. रियाचे सहा मिस्ड कॉल आलेले असतात. कपाळावर हात मारत तो गडबडीने रियाला रिकॉल करतो, पण फोन काही लागत नाही. मोबाईल तसाच खिशात ठेवून तो वाड्याबाहेर जातो. सहजच वाड्याबाहेरच्या कोपऱ्यात असलेल्या भंगारावर त्याची नजर जाते. तो तिथे जाऊन पाहत असतो, की सरकन त्याच्या डोक्यावर आकाशातून काहीतरी गेल्यासारखा भास होतो. दचकुन तो आजुबाजुला व वर पाहतो. चिटपाखरूही तेथे नसते. तो पुन्हा त्या भंगारावर नजर टाकतो, तेव्हा त्यात त्याला जुनाट जळालेली खुर्ची दिसते, आणि तो पुन्हा जुन्या आठवणीत हरवुन जातो. त्या दिवशी चिंतामण पंडित बाहेरच्या व्हरांड्यात आराम खुर्चीवर बसलेले होते. समोरच बसून सौरभ संस्कृत वेदांचे पठण करत होता. अंगणात आक्काबाई ज्या त्या घरात काम करायच्या आणि सौरभची दाईसारखी काळजी घ्यायच्या त्या झाडलोट करत होत्या. सौरभची आई रमाबाई स्वयंपाक ग्रुहात काम करत होत्या, आणि मधुरा व्हरांड्यातील एका खांबाला टेकून बसली होती व तांदूळ वेचत होती. सौरभची अधुनमधुन तिच्याकडे नजर जात होती, पण ती मात्र आपल्याच कामात मग्न होती. सौरभ चोरून तिला पाहत होता व वळून खाली वाकत आपण अभ्यास करत असल्याचे भासवत होता. बाहेर अंगणात प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडला होता, त्यांचा मंद सुगंध सगळीकडे दरवळत होता. मधुरा त्या सुगंधाने मोहरुन जात होती. तिचे ते मोहरणे, लडिकपणे स्वतः शीच हसणे सौरभला खुणावत होते. दुपारची साधारण १-१.१५ ची वेळ होती. चिंतामणरावांचे ग्रंथ वाचन चालुच होते. मधुरा स्वयंपाक ग्रुहात रमाबाईंच्या मदतीला गेली होती. सौरभ अजूनही अभ्यास करत होता आणि आक्काबाई दमुन ओसरीवर बसल्या होत्या, की तेवढ्यात मुख्य दरवाजा उघडत त्यातून गंगाभट्ट आत प्रवेश करतात. आपले घारे, त्रिक्ष्ण डोळे गरागरा फिरवत, भुवया वक्र करत धीरगंभीर पदक्षेप टाकत बलदंड शरीराचे गंगाभट्ट एका हाताने उपरणे सावरत व्हरांड्यात आराम खुर्चीत बसुन ग्रंथ वाचन करणाऱ्या चिंतामण पंडितांसमोर उभे राहतात. सौरभ, आक्काबाई स्वतःला सावरत उठून उभे राहतात. गंगाभट्टांना पाहून लगबगीने एक गडी त्यांच्यासमोर जात खाली झुकतो, तसा तिरस्काने हुंकार भरत ते त्याच्याकडे पाहून चिंतामण रावांवर नजर वळवतात. पण आपल्या कामात मग्न असणाऱ्या चिंतामणरावांना गंगाभट्ट समोर उभे असल्याची जाणीवही नसते. तसे कडाडत गंगाभट्ट ओरडतात. "चिंतामणा." तसे भयचकित होत चिंतामण पंडित वर पाहतात. बाकीचे थिजल्यासारखे जागच्याजागी उभे राहतात. चिंतामण पंडित धीर करत जागेवर उभे राहतात, व गंगाभट्टांकडे आ वासुन उभे राहतात. "चिंतामणा माझ्याकडून आजवर एवढे यज्ञ करवून घेतलेस, पुजा करवुन घेतल्या बदल्यात मला काय?" चिंतामण पंडित पुढे सरसावत अभिवादन करत बोलतात. "गंगाभट्ट असे का बोलता आहात? हे सर्व तुमचेच तर आहे." गंगाभट्ट क्रोधाने हुंकार भरत तुच्छतेने पाहत बोलतात. "हं चिंतामणा, तुला तुझ्या पांडित्याचा खुप गर्व आहे ना? अरे माझ्यापासुन एवढा दिव्य ग्रंथ लपवुन ठेवलास? आणि मी मागितला असता मला नकार दिलास." चिंतामण पंडित धिर करत बोलतात. "क्षमा असावी गंगाभट्ट. आपल्याला नकार देणारा मी कोण? पण हा दिव्य ग्रंथ या घराण्याचा वारसा आहे, त्यावर माझा एकट्याचा अधिकार नाही. तो कुणाला द्यावा कुणाला नाही हे पंडित सभेत ठरते." हात उंचावत गंगाभट्ट बोलतात. "बस्स चिंतामणा बस्स. पंडित सभेबद्दल मला काय सांगतोयस? अरे तुलाच ग्रंथ द्यायचा नसेल." चिंतामण पंडित हात जोडत बोलतात. "गंगाभट्ट आपण विद्वान आहात. एखाद्या दिव्य ग्रंथाचे महत्व मी काय सांगावे. पण पंडित सभेत मी जरुर प्रयत्न करेन आपल्याला ग्रंथ मिळवुन देण्यासाठी" आपल्या वक्र भुवया सरळ करत संजाबाची शेंडी पाठीमागून पुढे घेत गंगाभट्ट बोलतात. "ठिक आहे चिंतामणा. तु म्हणतोस तर ठिक आहे." गंगाभट्ट मागे वळून जायला निघणार तेवढ्यात सौरभ बोलतो. "पण तुम्ही या ग्रंथाचं काय करणार आहात, गंगाभट्ट?" आपल्या भुवया क्रोधाने वक्र करत डोळ्यांतुन अंगार फेकत ते सौरभवर कटाक्ष टाकून मागे फिरत चिंतामण रावांकडे हात दाखवून ओरडतात. "चिंतामणा." चिंतामण पंडित भितीने चळाचळा कापु लागतात, आणि रागाने सौरभकडे पाहतात. "चिंतामणा हा माझा अपमान आणि तो ही तुझ्या मुलाकडून. तुझ्या मुलाला मोठ्यांशी काय बोलावं, कसं बोलावं हे सुध्दा समजत नाही." धावत जात चिंतामणराव गंगाभट्टांचे पाय धरतात. "माफ करा गंगाभट्ट. माझ्या मुलाकडुन चुक झाली. त्याचा उद्देश तुम्हांला दुखवायचा नव्हता." गंगाभट्ट चिंतामणराव व सौरभकडे आपले घारे डोळे रोखून पाहतात, आणि आले तसे तरातरा निघून जातात. चिंतामणराव सौरभकडे पाहतात. सौरभ खाली मान घालतो आणि सहजच मधुराकडे वळुन पाहतो. दूरवरच्या कोपऱ्यात उभी राहून ती रडत असते. सौरभची आणि तिची नजरानजर होताच ती तशीच आत निघून जाते. आपली मान खालीच ठेवत मंद पावलांनी सौरभही आत जातो.

सौरभ हळुच मधुराच्या मागे जातो. मधुरा पाठमोरी उभी राहुन ओंजळीत चेहरा लपवून स्फुंदुन स्फुंदुन रडत असते. सौरभ हाताची घडी घालुन तिला पाहत उभा राहतो, आणि हळुच खाकरतो. तशी डोळे पुसत मधुरा वळुन मागे पाहते. सौरभ तिच्याजवळ जात तिची हनुवटी वर करत तिच्याकडे पाहतो. "ए वेडे, अगं अशी रडतेस का? मला काही झालं का?" मधुरा पटकन त्याच्या तोंडावर हात ठेवते व डोळे वटारुन बोलते. "तर तर. काय झालं म्हणून विचारतोस? आई तुला बोलली, मला नाही आवडलं, खरतर तुझंही चुकलचं होतं, तुला मोठ्यांच्या विषयात नाक खुपसायला कोणी सांगितलं होतं?' सौरभ कान पकडत तिच्याकडे पाहतो. "बरं बाबा, माफ कर मला. पण मधुरा खरचं तुला मला कोणी बोललेलं आवडणार नाही?' मधुरा लाजत खाली मान घालते, तिचे नेत्र आरक्त होतात. "सांग ना खरचं तुला माझा अपमान सहन नाही होणार?" मधुरा त्याच्यापासून सुटका करुन घेत जायला वळते, तसा सौरभ हळुच तिचा हात पकडतो. "माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीस तु मधुरा." आपला हात त्याच्या हातातुन सोडवत उंबरा ओलांडताना ती पुटपुटते. "मग कुठल्या मुलीला तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा अपमान सहन होईल?" सौरभ कोड्यात उभा राहतो, आणि नंतर कोड्याचा उलगडा होताच मनातल्या मनात खुश होत हसतो. तेवढ्यात बाहेरुन,"सौरभ, सौरभ"अशी आईची हाक ऐकून तो लगबगीने बाहेर जातो. सौरभची आई रमाबाई कट्ट्यावर बसलेली असते, बाजूलाच आक्का उभी असते. सौरभ हळूच मान खाली घालत तिच्यासमोर येत विचारतो. "काय झालं आई? मला हाक का मारलीस?" रमाबाई सौरभकडे रागाने पाहतात. "काय झालं म्हणुन वर तोंड करुन विचारतोयस? अरे तु यांच्यासमोर थेट गंगाभट्टांना प्रश्न विचारलास?" सौरभ आपली मान नकळत वर करतो आणि निग्रहाने बोलतो. "मग त्यात माझं काय चुकलं आई? गंगाभट्टांना तो ग्रंथ का पाहिजे हे विचारु नये का?" सौरभची आई नजर वळवत आक्का कडे पाहते. "पाहिलत आक्का. अजुन याला मिसरूडं फुटली नाहीत आणि हा गंगाभट्टासारख्यांना प्रश्न विचारायचे धाडस करतो. " सौरभ काहीच न बोलता आक्काकडे वळून पाहतो. तशी नजरेनेच ती त्याला आत जायला सांगते. सौरभ काहीसा रागाने तणतणत आत जातो. लाकडी जिन्यावरुन उठणाऱ्या त्याच्या दणकट पावलांचा आवाज खालीपर्यंत ऐकु येत राहतो. रमाबाई आक्काबाई कडे वळून बोलतात. "पाहिलसं ना आक्का हा कसा वागतो ते?" आक्काबाई रमाबाईंच्या हातावर हात ठेवत बोलतात. "बाईसाहेब किती हो त्रास करुन घेणार आहात स्वतः च्या जिवाला? अहो सौरभ अजून लहान आहे." "आक्का तो लहान आहे, म्हणुनच काळजी वाटते बघ. अगं गंगाभट्टांचा क्रोध आम्हाला माहीत आहे, पण त्याला माहित नाही. त्याने आता जबाबदार बनून वागायला नको?" "राहु द्या बाईसाहेब. मी समजावते सौरभला." आक्का जशी कट्टयावरून उठुन जाणार तेवढ्यात मधुरा तिथे येते. आक्का तिला पाहत विचारते. "काय झालं गं?" मधुरा कावरीबावरी होत बोलते. "काही नाही ते पुजेसाठी फुले न्यायला आले होते." मधुरा रमाबाईंकडे पाहत वाऱ्याच्या झुळकीसारखी प्राजक्ताच्या फुलझाडाकडे जात फुले काढते. फुले काढताना तिची ओढणी वाऱ्यावर उडत असते. आपल्या पुढे येणाऱ्या केसांच्या बटा मागे करत ती फुले काढत असते. काही फुले खुप उंचावर असल्याने हात पोहोचत नसतो. ती फुले काढण्यासाठी ती टाचा उंचावत फुले काढण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात कुठूनतरी सौरभ येत तिला अलगद आपल्या कवेत घेत वर उचलतो. मधुरा मोहरते, सौरभ तिला पाहुन हसतो. मधूरा हात उंचावत फुले तोडते. हळुहळू सौरभ तिला खाली उतरवतो, तशी मधुरा लाजुन हसत फुले घेऊन पळतच आत जाते. दुरुनच हे सर्व चुपचाप लपुन पाहणाऱ्या आक्काबाई आणि रमाबाई अवाक होतात, पण आक्का मोठ्या प्रेमाने रमाबाईंना सांगते. "खरचं किती छान जोडी दिसते ना बाईसाहेब." रमाबाईंच्या डोळ्यात अंगार फुलतात. आक्कांकडे पाहत ती डाफरते. "आक्का. अहो अजून सौरभचे अध्ययन पुर्ण व्हायचे आहे, त्याला त्याची जबाबदारी कळायची आहे, आणि तुम्ही?" आक्काला काय बोलावे सुचत नाही. निमुटपणे ती तेथून आत जाते. रमाबाई दिडःमुढ अवस्थेत कट्ट्यावर बसतात.

मोबाईल च्या रिंगने सौरभची तंद्री तुटते. तो पाहतो तो रियाचा कॉल असतो. वाड्याच्या आत नेटवर्क नसल्याने तो कॉल रिसिव्ह करत बोलत बोलत बाहेर येतो. पलिकडून रिया बोलत असते. "हेलो सौरभ कुठे आहेस तु?किती वेळा ट्राय करतेय तुझा फोन पण लागतच नव्हता." सौरभ तिला समजावत काहीतरी सांगत असतो, त्याचवेळी एक काळी आक्रुती धुराच्या लोटाप्रमाणे वर आकाशात प्रकट होते, आणि आपला रक्ताळलेला भेसुर जबडा उघडत त्याला गिळंकृत करण्याचा प्रयत्न करते, पण तोपर्यंत सौरभ वाड्याच्या आत पोहोचलेला असतो. सौरभने रियाची समजुत काढुन फोन ठेवलेला असतो. तो आतून बाहेर पाहतो. बरीच दुपार झालेली असते, पण सौरभला त्या वाड्यातुन निघावेसेच वाटत नसते. मोठ्या शांततेने तो वाड्याच्या एका खांबाला टेकून बसतो, त्याच्या डोळ्यासमोर दिसत असतो पंडित सभेचा दिवस. वाड्याच्या मध्यभागी मोकळ्या जागेवर बरीच गर्दी जमलेली असते. पंडित सभा आयोजित केलेली असते. दाटीवाटीने पंडित सभेसाठी ठराविक निमंत्रित विद्वान येत असतात. मध्यभागातुन सरळ दिशेने सभाध्यक्षांचे आसन ठेवलेले असते. चिंतामण पंडित प्रवेशद्वारावर सर्वांच्या स्वागतासाठी उभे असतात. दुरवर एका कट्ट्यावर सौरभ बसुन सर्व पाहत असतो, तिथून त्याचे लक्ष पलीकडे खांबाला टेकून उभ्या असलेल्या मधुरा कडे लागलेले असते. आक्का आणि रमाबाई ओसरीवर येऊन बसतात. सर्व जमल्यामुळे कुजबुजण्याचा मोठा आवाज होत असतो. चिंतामण पंडित आत येत हात उंचावत सर्वांना शांत राहण्याची खुण करत बोलतात. "तुम्ही सर्व जण या सभेच्या निमित्ताने इथे आलात, त्याबद्दल तुमचे शतशः आभार. आता थोड्याच वेळात माझे गुरूस्थानी असलेले पुज्य श्रीमान एकदंत पंडित सभाध्यक्ष आल्यावर सभेला सुरवात होईल." तेवढ्यात प्रवेशद्वारावर लगबग होते. काही मंडळी उठुन उभी राहतात. तोच प्रवेशद्वारातुन भरभक्कम पावलांनी वाऱ्यासारखे गतिमान होत गंगाभट्ट प्रवेश करतात. सोबतीला त्यांचा खास सहकारी जयराज असतो. काही अनुयायीही त्यांच्या दोन्ही बाजूने येत असतात. भव्य कपाळ, धारदार सरळ नाक, संजाबाची शेंडी मागे पाठीवर टाकत त्रिक्ष्ण नजरेने ते जमलेल्या गर्दीकडे पाहतात. गंगाभट्टांना पाहून मंडळी उभी राहत त्यांना वंदन करतात. तसेच आपल्या भुवया वक्र करत गंगाभट्ट चिंतामण पंडितांसमोर उभे राहुन त्यांच्यावर नजर रोखून पाहतात. त्यांच्या नजरेत एक विलक्षण जरब आणि आत्मविश्वास असतो. बाजूला वळून पाहत ते त्यांच्यासाठी राखुन ठेवलेल्या आसनावर बसतात. त्यांचा सहकारी जयराज त्यांच्या पायापाशी तर अनुयायी मिळेल त्या जागी बसतात. बसल्या जागेवरुनही गंगाभट्टांची नजर चिंतामण पंडितांना न्याहाळत असते. तेवढ्यात जमलेल्या सर्व मंडळींना मधुरा ग्लासातुन पाणी देत असते. सौरभ दुरुनच तिला पाहत असतो. अचानक त्या दोघांची नजरानजर होते, आणि दोघेही गालातल्या गालात हसतात. पलिकडे त्यांना रमाबाई पाहतायेत याच्याकडे त्यांचे लक्ष नसते. रमाबाई तेवढ्याशा खुश दिसत नसतात. आक्का समोर बसलेल्या काही ओळखीच्या मंडळींशी बोलण्यात मग्न असते, की तेवढ्यात प्रवेशद्वारावरुन पुकार येतात. "महापंडित, सभाध्यक्ष श्रीमान एकदंत पंडित येत आहेत हो...." सर्वत्र सामसुम शांतता होते. सर्वांच्या नजरा प्रवेशद्वाराकडे वळतात. आणि तेवढ्यात धीरगंभीर पदक्षेप टाकत, क्रुश अंगलट, गोरा वर्ण, कपाळी शिवगंध, कानांत भिकबाळी घातलेले एकदंत पंडित प्रवेश करत असतात. त्यांच्या मागोमाग त्यांचे काही अनुयायीही असतात. सभाध्यक्ष स्थानी येउन ते उभे राहुन सर्वांवरुन नजर फिरवतात. त्यांचा चेहरा तेजस्वी असतो. शांत पण करारी नजर असते. चेहऱ्यावर प्रसन्न भाव असतात, हे सर्व त्यांच्या प्रकांड विद्वतेची ग्वाही देत असतात. एकदंत पंडित आपला जपाची रुद्राक्ष माळ घेतलेला हात उंचावत सर्वांना आशीर्वाद देतात, आणि अध्यक्षस्थानी विराजमान होतात. त्यांचा एक अनुयायी सिंहमुखमंडित दंड घेऊन समोर उभा राहतो. तेवढ्यात दोन सेवक लाल वस्त्रात गुंडाळलेला तो दिव्य ग्रंथ घेऊन येतात, आणि एकदंत पंडितांच्या परवानगीने समोरच्या चबुतऱ्यावर ठेवून निघून जातात. आसनावरून उठत एकदंत पंडित त्या ग्रंथाला वंदन करतात. जमलेले लोकही त्या ग्रंथाला वंदन करतात. खाली आसनावर बसत करारी नजर चिंतामण पंडितांवर रोखत ते बोलतात. "या चिंतामणराव, सभेचा विषय सर्वांसमोर स्पष्ट करा." आदराने हात जोडत चिंतामण पंडित आपल्या जागेवरून उठत समोर येतात आणि बोलायला सुरवात करतात. "श्रीमान. या दिव्य ग्रंथाबद्दल सर्वांनाच माहित आहे. कित्येक पिढ्यांपासून हा अमुल्य वारसा आमच्या घराण्याने जपुन ठेवला आहे. या दिव्य ग्रंथात बऱ्याच दिव्य शक्ती आहेत, असे पुर्वजांकडुन ऐकत आलो आहे. हा दिव्य ठेवा कोणाही विद्वानाला, व्यक्तीला देताना या सभेची सहमती घेणे गरजेचे आहे. यापूर्वी अशी वेळ आली नव्हती, पण आज हा ग्रंथ गंगाभट्टांना सुपुर्द करायचा निर्णय घ्यायचा आहे. तसं पाहायला गेलं तर हा ग्रंथ या वाड्यात समक्ष पाहण्याची, अभ्यासण्याची मुभा आहे. तरी आपण काय तो योग्य निर्णय घ्यावा. आम्हांला आपला निर्णय सर्वतोपरी मान्य असेल." आपले संभाषण संपताच चिंतामण पंडित विश्वासरावांकडे पाहत आपल्या जागेवर येऊन बसतात. तसे एकदंत पंडित गंगाभट्टांकडे पाहतात. सभेत सर्वत्र शांतता पसरलेली असते. गंगाभट्ट आपल्या आसनावरून उठतात, आणि निग्रहाने खंबीरपणे पदक्षेप टाकत समोर येत एकदंत पंडितांना वंदन करतात. मनात एक योजना बनवत ते काहीही भाव न दाखवता एकदंतांना पाहत असतात. हाताने इशारा करत एकदंत पंडित विचारतात. "बोला गंगाभट्ट. कशाला पाहिजे आहे तुम्हांला हा दिव्य ग्रंथ?अहो ग्रंथ पाहायचा, अभ्यासायचा असेल तर वाड्यात समक्ष येत पाहण्याची मुभा आहे, मग असं असता चिंतामणरावांनी तो ग्रंथ तुम्हांला सुपुर्द का करावा?" कारुण्याचे भाव चेहऱ्यावर आणत अतिशय समर्पक भाषेत गंगाभट्ट उत्तरतात. "श्रीमान एकदंत पंडित सादर प्रणाम. श्रीमान आपल्याला तर माहितच आहे, जनकल्याणाच्या कार्यासाठी माझे बऱ्याच ठिकाणी येणे-जाणे असते. अशात नवनवीन ग्रंथ संपत्ती चा अभ्यास उपयोगाचा असतो. अद्यापपर्यंत कोणतेही अनुचित कार्य माझ्या हातुन घडले नाही व घडणारही नाही. जनकल्याणाच्या प्रयोजनार्थ जर मला तो ग्रंथ पाहिजे असल्यास त्यात गैर काय?" सगळीकडे कुजबुज सुरु होते. एकदंत पंडित हात उंचावत सर्वांना शांत करत बोलतात. "पण आपण या वाड्यावर येऊनही ग्रंथाभ्यास करू शकता." मानेनेच नकार देत गंगाभट्ट पुढचे पान उघडतात. "श्रीमान. माझा स्वतंत्र कक्ष ज्ञानप्राप्ती साठी मला उपयोगाचा वाटतो. नित्य नेमाने अशा बऱ्याच ग्रंथाचा तिथे उहापोह केला जातो. तो माझा कक्ष कक्ष नव्हे ध्यानधारणेचीच जागा आहे. तरी श्रीमानांनी विश्वास ठेवावा हीच विनंती." काय करावे हे एकदंतांना समजत नसते. ते वळून चिंतामणरावांकडे पाहतात. चिंतामण पंडित जागेवरुन उठत एकदंत पंडितांना वंदन करून बोलतात. "श्रीमान, तसं पाहायला गेलं तर गंगाभट्टांना ग्रंथ देण्यात मला कोणतीच अडचण नाही. फक्त आपण निर्णय करावा." गहन विचार करत जपाची माळ ओढत ते शांत मुद्रेने जमलेल्या मंडळींकडे पाहत विचारतात. "येथे जमलेल्या माझ्या विद्वान मित्रांनो, आपलं याबाबत काय मत आहे?" पुन्हा कुजबुज सुरू होते. मंडळींमधले अर्ध्या हुन अधिक गंगाभट्टांच्या बाजूने असतात, फक्त एक-दोघे त्यांच्या बाजुने नसतात. ते सोडून बाकीचे उभे राहत बोलतात. "गंगाभट्ट प्रकां पंडित आहेत. वेदमूर्ती, साक्षात जमदग्नी अशी त्यांची ओळख आहे. जनकल्याणासाठी त्यांना हा ग्रंथ देण्यास आडकाठी नसावी." तेवढ्यात ते शिल्लक राहिलेले दोघेजण उठून उभे राहत विरोध दर्शवत बोलतात. "पण जनकल्याणाचे कार्य पंडित वाड्याच्या पिढ्यांनी आणि आता चिंतामण पंडितांनी निर्व्याज पणे पार पाडलेले आहे, आणि पाडणारही आहेत, मग?" त्या दोघांचे मध्येच असे विरोधी बोलणे गंगाभट्टांचा क्रोध वाढवत असते, पण स्वतः ला सावरत ते एकदंताशी बोलतात. "श्रीमान आपण योगी, प्रकांड विद्वान आहात. माझी तुलना या चिंतामण पंडितांशी केलेली मला चालणार नाही. आपणही मला व या चिंतामण पंडिताला एकाच तराजुत मापत तर नाही ना?" एकदंत अवाक होत गंगाभट्टांना पाहतात, त्यांची मान त्यांनी वरवर दाखवण्यासाठी विनयाने खाली केलेली असते. अखेर सर्वांचे म्हणणे ऐकुन घेत एकदंत उठून उभे राहत आपला निर्णय सांगतात. "दोन्ही पक्षाचे बोलणे आम्ही ऐकुन घेतले आहे. सभास्थानी उपस्थित निम्म्या हुन अधिक सदस्यांनी गंगाभट्टांच्या बाजुने कौल दिला आहे. खुद्द चिंतामण पंडितांचीही ना नाही आहे. त्यामुळे तो दिव्य ग्रंथ मी गंगाभट्टांना सुपुर्द करण्याची संमती देत आहे. गंगाभट्टांनी ग्रंथ संहितेचे पालन करत जनकल्याणाचे कार्य संपन्न होताच ग्रंथ परत करायचा आहे." एकदंत सेवकाकरवी गंगाभट्टांसमोर बेलपत्राचे तबक धरत बोलतात. "गंगाभट्ट बेलपत्र उचला व शपथ घ्या की या दिव्य ग्रंथाचा केवळ आणि केवळ जनकल्याणार्थ उपयोग केला जाईल. याचा कोणत्याही अनुचित कार्यासाठी वापर होणार नाही आणि वेळ येताच तो ग्रंथ रितसर चिंतामण पंडितांना परतही केला जाईल." गंगाभट्ट संजाबाची शेंडी पाठीवर टाकत डोळे गरगर फिरवत जमलेल्या लोकांकडे पाहतात, व काहीसा विचार करुन तबकातले बेलपत्र उचलुन खंबीर आवाजात शपथ घेतात. "श्रीमान मी या बेलपत्राची शपथ घेऊन सांगतो, की या दिव्य ग्रंथाचा जनकल्याणार्थच वापर केला जाईल आणि वेळ येताच तो रितसर परतही केला जाईल." गंगाभट्टांच्या चेहऱ्यावर कुटिल हास्य उमटते, पण ते न दाखवता नजरेत कारुण्य आणि विनय आणत ते हात जोडुन उभे राहतात. चिंतामण पंडित सभेसमक्ष तो ग्रंथ गंगाभट्टांकडे सुपुर्द करतात, ही येणाऱ्या वादळाची नांदी असते. दूरवर एक कावळा बराच वेळ ओरडत असतो. ते अशुभ ओरडणे आक्काला सहन होत नसते. ओसरीवरून उठुन ती त्या कावळ्याला हाकलते. सभा बरखास्त होते. सर्वांना आशीर्वाद देत तरातरा पावले टाकत एकदंत पंडित वाड्याबाहेर पडतात. त्यांच्या मागोमाग गंगाभट्ट वगळता बाकीची सर्व मंडळी बाहेर पडतात. वाड्यात आता चिंतामण पंडित, कुटुंब आणि गंगाभट्ट एवढेच शिल्लक राहतात. गंगाभट्ट करड्या नजरेने चिंतामण पंडितांना पाहतात, व हात जोडतात. आपले जोडलेले हात खाली करत ते तसेच मागे वळत तरातरा वाड्याबाहेर पडतात. त्यांच्या चेहऱ्यावर एक कुटिल, विजयी हास्य असते. वाड्याच्या प्रवेशद्वारावरील उंबरठ्यावर त्यांची पावले थबकतात, तिथुनच गरकन मागे त्यांची नजर वाड्याच्या कमानींकडे व कळसाकडे जाते. पुन्हा सरळ होत ते उंबरठा ओलांडत वाड्याबाहेर पडत मार्गस्थ होतात. दूरवर एक टिटवी कर्णकर्कश ओरडत अशुभाची जाणीव करुन देत असते. वाड्याच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या मोकळ्या फटीत एक काळा नाग वेटोळे घालुन फणा काढुन बसलेला असतो.

अचानक मोबाईल च्या रिंगने सौरभची तंद्री तुटते. श्यामलाल चा कॉल असतो. सौरभ कॉल रिसिव्ह करतो. "हां बोल श्यामलाल." "साहेब ती मुलुंडची पार्टी सारखा फोन करतेय." "अरे हो, श्यामलाल त्यांना सांग आज शक्य होणार नाही आपण परवा पाहू." "पण साहेब...." "ऐकतील ते. काळजी नको करुस. बरं कोणालातरी कार पाठवुन द्यायला सांग." "पण साहेब तुम्ही तर......." "आय नो. आय नो. मीच तुला कार घेऊन जायला सांगितले होतं, पण कामही तसचं होतं." "ठिक आहे साहेब." श्यामलाल फोन कट करतो. संध्याकाळ होत आलेली असते. सौरभ संध्यासमयीचे आकाशातील विहंगम द्रुश्य पाहत असतो. दूरवर संधिप्रकाशात त्याला आपल्या आईचा चेहरा दिसू लागतो. वाड्याच्या बाहेरच्या ओसरीवर चिंतामग्न रमाबाई खांबाला टेकून बसलेल्या असतात. घरात त्या दिवसानंतर काही अपशकुन घडत असतात, त्यामुळे तिची चिंता वाढलेली असते. एवढ्यात सौरभ तिच्याजवळ येत तिच्या मांडीवर डोके ठेवून झोपतो. रमाबाई अलगद त्याच्या केसांवरून हात फिरवतात. सौरभ बोलत असतो. "आई मी लहान असताना तु अशीच मला जवळ घेऊन कुरवाळायचीस. मी पावसातुन भिजुन आलो की अंग पुसायचीस, माझी किती काळजी करायचीस तु." रमाबाई शांतपणे सौरभचे बोलणे ऐकत असतात, पण त्या काही बोलत नाहीत. सौरभ वर नजर करुन पाहतो, रमाबाईंच्या डोळ्यात पाणी दाटलेले असते. "काय झालयं आई, का रडतेयस?" रमाबाई डोळे पुसत उठतात व बाजुला होत सौरभकडे पाहत बोलतात. "सौरभ तु आता लहान नाहीस. तुझ्यावर या पंडित घराण्याचा भार आहे. धिराने तुला येणाऱ्या परिस्थितीला तोंड देऊन घराण्याला जपायला हवं." सौरभ आश्चर्य चकित होत रमाबाईंना पाहतो. "असं का बोलतेयस तु आई?" रमाबाई गंभीर होत बोलायला सुरवात करतात. "सौरभ तो दिव्य ग्रंथ या घराण्याचा वारसा होता. गंगाभट्टांच्या हट्टापायी यांनी तो त्यांचेकडे सुपुर्द केला, पण त्यात यांची काही चुक तर झाली नाही ना? असचं वाटतयं बघ." "कसली चुक आई?" रमाबाई काहीशा गुढ स्वरात बोलतात. "सौरभ हा दिव्य ग्रंथ आमच्या पुर्वजांकरवी या घराण्याला बहाल केला गेला होता, तेव्हापासून या ग्रंथाचे नियम पाळून जनकल्याणाचे काम होत आहे. परंतु या नियमांच्या विरुध्द गेलं तर....? "तर काय आई?" रमाबाई गंभीर होत दुसरीकडे पाहत बोलतात. "तर.....तर काय होईल हे मलाही सांगता येणार नाही. अरे ज्या दिवशी तो ग्रंथ या वाड्याबाहेर गेला, तेव्हापासून काहीना काही अपशकुन घडतच आहेत. सकाळी हे कामासाठी बाहेर पडले तेव्हा आरशासमोर मी कुंकु लावत असताना अचानक कुंकवाचा करंडा निसटुन खाली पडला, त्याआधी हे कामासाठी जाताना नेहमी मी यांच्या हातावर दही घालायचे, ते ही घातले नाही. असं यापुर्वी कधीही घडलं नव्हतं." सौरभ आईच्या चेहऱ्याकडे पाहत हळुच तिची नजर आपल्याकडे वळवतो. "आई काळजी करु नकोस. अगं कदाचित हे आपल्या मनाचे खेळ असतील. तु जास्त विचार करतेयस या गोष्टींचा. माझा बाबांवर पुर्ण विश्वास आहे, आणि गंगाभट्ट ही प्रचंड विद्वान आहेत, ते या ग्रंथाचा जनकल्याणासाठीच वापर करतील." एक दीर्घ उसासा सोडत रमाबाई बोलतात. "देव करो आणि तसचं असु दे. पण तरीही मला एकदा एकदंत पंडितांना भेटायचं आहे." त्या दोघांचे हे संभाषण चालु असताना अचानक बाहेरुन आक्काच्या किंकाळी चा आवाज येतो. "हे शंभो, शिव शिव शिव शिव. अरे सौरभ, मधुरा, बाईसाहेब बाहेर या पहा हे काय आहे ते?" सौरभ, मधुरा व रमाबाई बाहेर येऊन पाहतात. सोसाट्याचा वारा सुटलेला असतो, विजांचा कडकडाट सुरु असतो. संध्याकाळची ती भयाण वेळ आणि आक्काचे भयग्रस्त ओरडणे हे सर्व वातावरणात गुढता निर्माण करत असते. आक्का प्राजक्ताच्या झाडाच्या मुळापाशी बोट दाखवतात. कोणीतरी करणी केल्यासारखे सुया टोचलेले व कुंकु वाहिलेले लिंबु आणि काळी बाहुली तिथे असते. सौरभ, रमाबाई दोघांचेही तोंडावर हात जातात. सौरभ डोळे विस्फारुन ते पाहत असतो. काय करावे हे कोणालाच समजत नसते. आक्का तशीच घाबरत तोंडाने 'शिव शिव शिव शिव' म्हणत आत जाते. मागोमाग सौरभही तिच्यामागे आत जातो. रमाबाई निश्चलपणे समोरच्या द्रुश्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करत असतात, अशातच त्यांचा एकदंत पंडितांकडे जायचा निर्धार ठाम होतो. मधुरा अघटित घडल्यासारखी मुकपणे मान खाली करुन उभी राहते. तेवढ्यात अंधारातुन वाड्याचे प्रवेशद्वार ओलांडून चिंतामण पंडित आत प्रवेश करत असतात. त्यांना पाहताच झपाटल्यागत पुढे येत रमाबाई चिंतामण पंडितांना थांबवतात. काही माहिती नसलेले चिंतामण पंडित आश्चर्याने रमाबाईंकडे व मधुरा कडे पाहत असतात. "काय झालं रमा तुम्ही यावेळी बाहेर काय करत आहात?" उग्र नजरेने चिंतामण पंडितांचा हात पकडुन ती त्यांना प्राजक्ताच्या झाडाकडे नेऊन ते द्रुश्य दाखवते. भयचकित होत विस्फारलेल्या नजरेने चिंतामण पंडित ते पाहतात, त्यांच्या सर्वांगातुन भितीची लहर सरसरत जाते. आकाशाकडे पाहत ते हात जोडतात, आणि धीर करत विचारतात. "रमा हे काय आहे?" रमाबाई गर्भगळीत झालेल्या असतात, पण चिंतामण पंडितांकडे पाहत कठोर आवाजात त्या बोलु लागतात, त्यांचे डोळे भरुन आलेले असतात. "काय आहे म्हणुन विचारता आहात. एवढी वर्षे या वाड्यात असं अशुभ काही घडलं नव्हतं. तो दिव्य ग्रंथ गंगाभट्टांना दिल्यापासुन वारंवार घडणाऱ्या अपशकुनांबद्दल मी तुम्हांला सांगुनही तुम्ही तिकडे दुर्लक्ष केलत." चिंतामण पंडित नजर वळवत बोलतात. "रमे हा प्रकार खरंच अघटित आहे, पण यात तो ग्रंथ गंगाभट्टांना देण्याचा संबंध आहे, असे मला तरी नाही वाटत. अगं तो ग्रंथ दिव्य मंत्रांनी भरलेला आहे, त्यातील मंत्रांच्या पारायणाचा कोणाच्याही भल्यासाठीच वापर होऊ शकतो. आणि जरी तसं काही असेल तरी गंगाभट्टांना याचा काय फायदा?" "फायदा शोधणाऱ्यांना बरोबर फायदा दिसतो. तुम्ही असेच स्तब्ध राहा पण मला मात्र एकदंत पंडितांना याबाबत भेटलचं पाहिजे." अवाक होत भारलेल्या आवाजात चिंतामण पंडित उद्गागरतात. "रमे...." निग्रही स्वरात रमाबाई बोलतात. "आता मला थांबवु नका. ही अशुभाची सावली माझ्या कुटुंबावर पडायच्या आधी मला त्याचा बिमोड केला पाहिजे." "रमा मग मीही येतो तुझ्यासोबत आपण दोघे जाऊ तिकडे." "नाही नको या कामासाठी मी एकटीच जाणार आहे. क्रुपा करुन नकार देऊ नका." रमाबाईंचे ते रुप, तो ठाम निर्धार आणि घडलेला हा प्रकार यामुळे दिडःमुढ होत चिंतामण पंडित बोलतात. "ठिक आहे रमा. जा तु. मी सौरभला टांग्याची व्यवस्था करायला सांगतो." आकाशात विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट चालुच असतो. चिंतामण पंडित आत जातात. आतल्या खोलीत सौरभ आक्कांची समजुत काढत असतो.



"आक्का, अगं हे अघटित आहे ते मान्य आहे मला. पण तु शांत राहा, सगळं ठिक होईल." "शिव शिव शिव शिव. अरे माझ्या उभ्या ह्यातीत असा प्रकार पाहिला नव्हता, आणि तु म्हणतोस काळजी नको करुस? काय घडणार आहे हे त्या ईश्वरालाच ठाऊक." आक्का पदर डोळ्याला लावतात. तेवढ्यात चिंतामण पंडित येत बोलतात. "खरं आहे आक्का. प्रारब्ध काय आहे हे त्या विधात्यालाच माहित. त्याच्या मर्जी शिवाय कुठलीही गोष्ट होत नाही. तुम्ही नका काळजी करु." चिंतामण पंडित सौरभकडे वळतात. "बाळ सौरभ आईला एकदंत पंडितांना भेटायचं आहे, सत्वर टांग्याची व्यवस्था कर." काहीच न बोलता त्या भयाण वातावरणात सौरभ टांग्याची व्यवस्था करायला बाहेर पडतो. जाताना नकळत त्याची नजर वाड्यातील एका भिंतीला टेकून उभ्या असलेल्या पाठमोऱ्या मधुरा कडे जाते. सौरभ तिच्यासमोर येऊन उभा राहतो. मधुरा पाठमोरी उभी राहुन रडत असते. सौरभ येताच ती त्याच्याकडे मान वर करुन पाहते. सौरभ अलगदपणे तिचे डोळे पुसतो. "ए वेडाबाई. असं रडायला काय झालं? अगं अशा प्रसंगांना सामोरं जायला शिकायला पाहिजे." मधुरा भावुक होत सौरभला बिलगते. सौरभ तिला कवेत घट्ट धरतो, अचानक मधुराच्या हातातून काही खाली पडते. सौरभ तिकडे पाहतो, वाळलेले प्राजक्ताचे फुल असते ते. सौरभ पुन्हा मधुरा कडे पाहतो. मधुरा त्याही स्थितीत लाजत बोलते. "ते तु मला एकदा दिलेले फुल होते...." सौरभ मिश्कील हसत तिच्याकडे पाहत बोलतो. "आणि ते अजुन जपुन ठेवलं आहेस? अगं फुलाचा आनंद ते ताजे असतानाच घ्यायचा असतो." मधुरा काही बोलत नाही. सौरभ तिच्याकडे पाहत टांग्याची व्यवस्था करण्यासाठी बाहेर पडतो. बराच वेळ मधुरा तो वाड्याबाहेर पडेपर्यंत त्याला पाहत राहते, नंतर ती वळून आत जाते.

भर पावसातुन एक टांगा वेगाने शेजारच्या ब्राह्मणपुर गावाची वाट दौडु लागतो. रमाबाईंच्या हट्टापुढे कोणाचे काहीच चालत नाही. झालेल्या अशुभ घटनेने सर्वांचीच मने कुशंकांनी भरली जातात. बरीच मजल मारत रमाबाई अखेर एकदंतांच्या मठासमोर पोहोचतात. टांग्यातुन उतरत त्या मठाकडे पाहतात. अतिशय प्रशस्त व प्रसन्न वास्तू असते ती. रमाबाई भारावल्यागत मठात प्रवेश करतात. मठात सर्वत्र सुगंधी धुपाचा दरवळ पसरलेला असतो. अनेक शिष्यगण धार्मिक कार्यक्रमात मग्न असतात. रमाबाई ते पाहत तसेच पुढे येतात. एक सेवक त्यांना एकदंत पंडित बसलेल्या खोलीत सोडतो. रमाबाई समोर पाहतात. ध्यानस्थ बसलेले एकदंत तिला दिसतात. चेहऱ्यावर प्रसन्नतेचे आणि विद्वत्तेचे भाव असतात. जपाची माळ एका हातात धरुन ते शांतचित्ताने ध्यान करत असतात, पण त्यांना रमाबाई आल्याची जाणीव झालेली असते. आपले ध्यान सोडत डोळे उघडून ते समोर पाहतात. रमाबाई उभ्या असतात, तसे आसनावरुन उठुन उभे राहत ते बोलतात. "रमाबाई तुम्ही?" रमाबाई हात जोडून त्यांना प्रणाम करतात, आणि पुढे येत बोलतात. "श्रीमान देवानेच अखेर हा योग जुळवला असं वाटतं. मला यावचं लागलं." एकदंत बोटाने खुण करत त्यांना आसनावर बसायला सांगतात. रमाबाई बसताच एकदंत बोलायला सुरवात करतात. "हां रमाबाई. आता सांगा काय झालं आहे?" रमाबाई एकदंतांकडे पाहत गहिवरल्या स्वरात बोलतात. "श्रीमान, काय सांगु तुम्हांला. माझ्या उभ्या हयातीत या वाड्याने काही सुखाचे तर काही दुःखाचे क्षण अनुभवले. यज्ञ, अनुष्ठानांसाठी येणाऱ्या विद्वानांची वर्दळ बघितली. परमेश्वर क्रुपेने यांच्या व माझ्या हातुन त्यांना काही कमी पडु दिले नाही. जनकल्याणाचे अविरत व्रत कोणत्याही फळाची अपेक्षा न करता पार पाडले. पण या घडीला जे काही अघटित घडते आहे वाड्यात ते पाहून......" रमाबाई भयचकित होत मध्येच बोलणे थांबवतात. कुठलातरी धसका घेतल्यागत त्या काही काळ गप्प राहतात. एकदंत अजीजीने रमाबाईंना पाहत विचारतात. "बोला रमाबाई. काय अघटित घडतं आहे त्या वाड्यात?" रमाबाई नजर वर करत गंभीर आवाजात वाड्यात घडलेल्या त्या घटनांविषयी एकदंतांना सांगतात, एकदंत पंडित आपला उजवा हात छातीवर ठेवत उद्गागरतात. "हरी ओम. रमाबाई खरचं असं काही घडेल, याची मी कल्पनाच केली नव्हती. बरं झालं तुम्ही या गोष्टी मला सांगितल्या." रमाबाई अपेक्षेने एकदंतांकडे पाहून हात जोडत विचारते. "मी काय करु श्रीमान? हे सगळे काय आहे? कसे दूर होईल ते? प्रारब्धात काय वाढुन ठेवले आहे श्रीमान? तुम्हांला तर माहीत आहे यांचा स्वभाव. भोळे सांब आहेत हे, आणि सौरभ तर अजुन लहान आहे." एकदंत पंडितांना येणाऱ्या धोक्याची जाणीव झालेली असते, पण ते विचलित होत नाहीत. प्रारब्ध पूर्वनियोजित असल्याने त्यात बदल करण्याचा त्यांना अधिकार नव्हता, पण प्रयत्न करणं हा त्यांच्या स्वभावाचा बाणा होता. काहीसा विचार करुन ते मठाच्या आतल्या खोलीत जातात, आणि थोड्या वेळाने लाल धाग्यांचा जुडा आणि एक पुरचुंडी घेऊन बाहेर येतात. त्या दोन्ही गोष्टी रमाबाई समोर ठेवून ते बोलू लागतात. "रमाबाई हा धागा सामान्य नाही, मंत्रभारीत आहे. ज्या कोणाच्या हातात हा बांधलेला असेल त्याला कोणतीही वाईट शक्ती अपाय करु शकणार नाही. आणि हे भस्म वाड्याच्या सभोवार रिंगण तयार करा, काही अघटित त्या वाड्यात होऊ धजणार नाही." हे सर्व सांगताना पुढे होणारे प्रारब्ध त्यांना मनःचक्षुसमोर स्पष्ट दिसत असते. रमाबाई त्या दोन्ही वस्तुंना पाहतात, आणि नजर फिरवत एकदंताशी बोलु लागतात. "श्रीमान काही मोठे अघटित तर घडणार नाही ना?" एकदंत दूरवर पाहत बोलतात. "रमाबाई प्रारब्ध बदलणे माझ्या हातात नाही, पण संकटातून वाचवण्यासाठी जे करता येईल ते मी करु शकतो." रमाबाई काही वेळ शांत राहतात आणि नंतर विचारतात. "श्रीमान त्या दिव्य ग्रंथाचे काही रहस्य आहे का? अद्याप ते कोणालाच समजलेले नाही." एकदंत पंडित हसतात, पण नंतर गंभीर चेहरा करुन ते खुणेनेच रमाबाईंना जवळ बोलावत त्यांच्या कानात ते रहस्य पुटपुटतात. कुठल्यातरी गुढ कोड्याचा उलगडा झाल्यागत रमाबाई एकदंतांना वंदन करुन त्या दोन्ही वस्तु घेऊन झपझप पावले टाकत मठातुन बाहेर पडतात, बाहेर टांगा उभाच असतो, त्या आत बसतात, आणि पुन्हा तो वाड्याकडे जायला दौडु लागतो. बराच वेळ निश्चल बसलेले एकदंत पंडित आपले नेत्र मिटतात, खळकन दोन अश्रू घरंगळत खाली जमिनीवर पडतात. भर पावसातुन टांगा धावत असतो. विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट चालुच असतो. किर्र काळोख, रातकिड्यांचा आवाज वातावरणातील भयानकता वाढवत असतो. काही मोठे अनपेक्षित अघटित घडणार असल्याचे रमाबाई चे मन सांगत असते, त्यामुळे त्या टांगेवाल्याला जोरात टांगा दौडवायला सांगत असतात. पावसाच्या पाण्याचा व चिखलाचा आवाज त्यात दूरवर घुबडांच्या चित्कारण्याचा आवाज घुमत असतो. घामाघूम झालेल्या रमाबाई आतुरतेने वाडा येण्याची वाट पाहत असतात. अखेरीस टांगा वाड्यासमोर येतो, रमाबाई त्यातुन उतरतात. टांगा निघुन जातो. रमाबाई झपाझप वाड्याकडे जाऊ लागतात, तेवढ्यात भयानक किंकाळ्यांचा आवाज आसमंत भेदून जातो. रमाबाईंचे हातपाय भयंकेने कापु लागतात, तशाच त्या पावसाची पर्वा न करता वाड्याचे प्रवेशद्वार ढकलतात, आणि समोर जे पाहतात त्यामुळे त्यांचे अवसानच गळुन पडते. समोर एक काळी आक्रुती पाठमोरी उभी असते. सोसाट्याचा वारा वाहत असतो. आपल्या हातातुन शक्तीपाश सोडत त्याने चिंतामण पंडित व मधुराला जखडुन ठेवलेले असते. रमाबाई ते पाहत किंचाळत त्वेषाने त्या आक्रुतीवर हल्ला करतात, पण ती आक्रुती भयानक गुरगुरत रमाबाईंना जोरदार धक्का देते, त्या धक्क्याने रमाबाई दुर फेकल्या जातात. भयानक आवाज करीत आपले लाल निखाऱ्यासारखे डोळे गरागरा फिरवत ती आक्रुती वावटळासारखी फिरत असते. अचानक भयानक चित्कार करत रेंगाळणारे हिडीस आत्मे तयार होतात. आपल्या जिभल्या चाटत ते पिशाच्च जीव रेंगाळत चिंतामण पंडित व मधुराला पकडतात, आणि त्यांना सुटकेची संधी न देता त्यांचा प्राण घेतात. काय होते ते कळायच्या आत एक आर्त किंकाळी फोडत चिंतामण पंडित व मधुरा खाली कोसळतात. पावसाचा जोर वाढतच असतो. मुसळधार पडणाऱ्या पावसात वाड्याच्या अंगणात चिंतामण पंडित व मधुरा यांची कलेवरे पडलेली असतात. चिंतामण पंडित उताणे पडलेले असतात, व त्यांच्या तोंडातुन रक्त ओकत असते. मधुराच्या डोळ्यांच्या बाहुल्या जीव वाचवण्याची तडफड करताना तशाच उघड्या राहिलेल्या असतात. रमाबाई सावध होत आपल्या पतीचे म्रुत कलेवर पाहुन हंबरडा फोडते. दुरुनच सौरभही लपुन ते पाहत असतो, त्याच्याही तोंडातुन मोठ्याने हंबरडा फुटणार असतो की आक्का त्याच्या तोंडावर हात ठेवत आत ओढून घेते. सौरभ धडपड करत राहतो, पण आक्का त्याला धरुन ठेवते. सौरभच्या डोळ्यांसमोरुन मधुरा सोबत घालवलेले प्रेमाचे क्षण आणि वडिलांसोबतचे आदराचे क्षण एकदमच तरळून जातात. तो मुकपणे आक्रंदू लागतो. आक्काचाही पदर तोंडावर जातो. आता ती आक्रुती भेसुर हास्य करत गोल गोल फिरत राहते. त्यातुन गंगाभट्टांची छबी झळकत असते. ते पाहुन रमाबाईंचे डोळे विस्फारतात. तेवढ्यात खालच्या चिखलातुन ते रेंगाळणारे हिडिस आत्मे जिभल्या वळवळवत रमाबाईंवर हल्ला करतात. ती आक्रुती निखाऱ्यासारखे डोळे फिरवत कोणालातरी शोधत असते. रमाबाई त्वेषाने त्या हिडिस जिवांचा प्रतिकार करते, पण ते भयानक केकाटत अजुन जोरदार हल्ला करत असतात. रमाबाई ओरडत जमिनीवर पडतात, आणि त्यांचे लक्ष अंगणात निपचित पडलेल्या आपल्या पतीच्या कलेवराकडे जाते. डोळे मिटत त्या एकदंत व महादेवाचे स्मरण करतात, आणि डोळे उघडत पाहतात. समोरच देवघराच्या दरवाजावर भव्य त्रिशुल आडवा ठेवलेला असतो, ज्याची त्या घराने भक्तीभावे पुजा केलेली असते. जखमी वाघिणीसारखी ओरडत रक्ताळलेल्या अवस्थेत ती त्या हिडिस आत्म्यांना दुर लोटते, आणि धावत जात तो भव्य त्रिशुल हातात घेते. ती काळी आक्रुती गडगडाटी आवाज करत वावटळासारखा शोध घेत सौरभ व आक्का जवळ पोहोचते. सौरभ व आक्का जागच्या जागी थिजुन राहतात. भेसुर हास्य करत व लाल निखाऱ्यासारखे डोळे फिरवत ती आक्रुती त्यांना पाहते. दोन काळे हात धुरासारखे त्यांच्या गळ्यापर्यंत पोहोचतात, आणि एवढ्यात मोठ्याने ओरडत रमाबाई तो त्रिशुल त्या आक्रुती च्या छातीत खुपसते. त्रिशुल आरपार 🎂 जातो. तसा प्रचंड गडगडाट होतो आणि एक प्रखर प्रकाश त्या आक्रुती ला भेदुन बाहेर पडतो. त्याबरोबर रेंगाळणारे ते हिडिस जीव भयानक किंकाळ्या फोडत नाहीसे होतात. ती आक्रुती वाड्याबाहेर जात दुरवरच्या एका पिंपळ व्रूक्षाच्या बुंध्यात शिरते, व त्या बुंध्याभोवती दिव्य अशा धाग्यांचे आवरण गुंडाळले जाते. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट कमी झालेला असतो. वाड्यातील ते भयावह वातावरण हळुहळु निवळायला सुरवात होते. सौरभ व आक्का धावतच म्रुत्युघटका मोजत असलेल्या रमाबाईंजवळ जातात. शक्तीपात झाल्यासारखा सौरभ तिच्या समोर खाली बसतो, आणि अवसान गळाल्यागत रमाबाईंना पाहत राहतो. आक्काही हमसुन हमसुन रडत असते. हसत्या खेळत्या वाड्याचे स्मशानात रूपांतर झालेले असते. रमाबाई समोर बसलेल्या आपल्या लेकराच्या केसांवरून हात फिरवत त्याला पाहत राहतात. कोणीच काही बोलत नसते, रमाबाईंना त्या मरणासन्न अवस्थेत एकदंतांचे शब्द आठवु लागतात. "सौरभला सुरक्षित ठेव" हे शब्द कानात घुमु लागतात. सौरभ ढसाढसा रडत तिच्याकडे पाहत असतो, तसा आपल्याजवळचा तो धागा ती सौरभच्या दंडात बांधते, व ती पुरचुंडी आक्का जवळ देत हातानेच वाड्याभोवती रिंगण करायला सांगते. रमाबाईंचा श्वास वर खाली होत असतो, तिला बोलायचं असतं, पण तिच्या तोंडातुन शब्दच फुटत नसतात. सौरभ आणि आक्का हाका मारत आहेत याचीही तिला जाणीव राहत नाही, आणि एकाएकी तिची मान लवंडते. एकच आकांत उसळतो. सौरभ सैराभरा धावत चिंतामण पंडित व मधुराच्या कलेवरांकडे येतो. पावसाचा जोर थोडा कमी झालेला असतो. आक्का काळजावर दगड ठेवत सौरभला सावरते, तसा मधुराला पाहत तो तसाच मटकन गुडघ्यावर बसतो. मधुरासोबतचे प्रेम आठवून तो खाली मान घालत ढसाढसा रडू लागतो, आपल्या हातांनी तो तिच्या अर्धवट पापण्या मिटतो, आणि वर उभे राहत आक्का ला मिठी मारतो. दोघांच्याही अश्रूंचा बांध काठ फोडून वाहू लागतो. वाडा आता एकाकी झालेला असतो, पोरका बनलेला असतो. रमाबाईंनी त्या आक्रुतीला कैद केलेले असते, पण नियतीचा डाव अजुन संपलेला नसतो.

अचानक कारच्या हॉर्न चा आवाज ऐकुन सौरभ आठवणीतुन जागा होत तिकडे पाहतो. श्यामलाल ने कार पाठवलेली असते, सौरभ बाहेर येतो आणि कार मध्ये बसतो. पण ती काळी आक्रूती त्याचा पाठलाग करायला सुरवात करते. कारमध्ये बसल्यावर त्याची विचारचक्रे पुन्हा सुरु होतात. तो ड्रायव्हर ला a/c चालू करायला सांगतो. a/c चा गार वारा लागताच आपसुकच त्याचे डोळे मिटतात, आणि त्याला आठवु लागतो आक्का चा अखेरचा दिवस. त्या रात्री घडलेला तो भयंकर प्रसंग काही केल्या सौरभला विसरता येत नसतो. रात्री-अपरात्री ही त्याला दौरे पडत असतात. आक्काला सौरभची ही अवस्था पाहवत नसते. तो प्रसंग घडल्यापासुन ते तो वाडा सोडुन मुंबई ला आलेले असतात. तरीही रमाबाईंच्या आठवणीने आक्काचाही जीव व्याकुळ होत असे, आणि अशातच आक्काला टी.बी चे निदान झाले. दिवसेंदिवस ती खंगत चालली होती. सौरभने तिच्यासाठी बरेच डॉक्टर केले, पण काहीच गुण येत नव्हता. टी.बी आपल्या लास्ट स्टेजला पोहोचला होता. सौरभ हतबल झाला होता, त्याला आक्काला गमवायचे नव्हते. आणि एके रात्री आक्काला बराच त्रास होऊ लागला, तसा घाबरत सौरभ धावत येऊन तिच्या उशाशेजारी बसुन बोलु लागला. "आक्का काही काळजी करु नकोस. मी आहे, मी तुला काही होऊ देणार नाही." ग्लानीत असणारी आक्का अर्धवट पापण्या उघडत सौरभला पाहते, व त्याच्या गालावरुन हळुवारपणे हात फिरवत बोलते. "सौरभ, बाळा आता माझी जाण्याची वेळ आली. बाईसाहेबांच्या पश्चात मी माझी जबाबदारी पार पाडण्याचा पुर्ण प्रयत्न केला, पण अजुनही मनात सल आहे ती या गोष्टीची की तुझ्या मनातील त्या आठवणी मी पुसु शकले नाही. बाळा मला माफ कर.......माफ कर." आक्काच्या डोळ्यांतुन अश्रूंची धार वाहायला सुरवात होते. अचानक तिला खोकल्याची जोरदार उबळ येते. तसा सौरभ कावराबावरा होत बोलतो. "आक्का प्लीज तु शांत झोप पाहु आधी, कसलीच काळजी नको करुस." आपला वरखाली होणारा श्वास सांभाळत सौरभच्या हातावर आपला हात गच्च दाबत आक्का बोलते. "सौरभ आता तुला सावरायला हवं. तुला नव्याने सुरवात करायला हवी. माझ्या मावसबहिणीची मुलगी आहे रिया. खुप गोड मुलगी आहे ती, खुप सुखात ठेवेल तुला." "आक्का आक्का तु आधी बरी हो पाहु नंतर बघुया काय ते." "नाही नाही सौरभ मला ... मला वचन दे. तु रियाशी संसार कर, त्या तिथे ड्रॉवरमध्ये तुला तिचा पत्ता मिळेल. तु......तु भेट तिला." सौरभ काही क्षण काहीच बोलत नाही, मधुराची आठवण वाऱ्याच्या झुळकीसारखी त्याच्या मनाला स्पर्शून जाते. "आक्का मधूरा माझ्या मनात होती, हे कसं विसरतेस तु? आणि असं असता मी दुसऱ्या मुलीचा विचार कसा करु शकेन?" आक्काचा श्वास जोरजोरात वर खाली होत जातो, त्याही अवस्थेत ती जोर करत बोलते. "सौ.... सौरभ तु.....तुला शब्द आहे माझा. म......मधुराला विसर......विसर. आणि न.....नव्याने सुरवात........ सुरवात कर." आक्काचे शब्द तसेच राहतात. सौरभच्या हाताची पकड तशीच राहते. निष्प्राण आक्काला पाहुन सौरभला हुंदका अनावर होतो. त्याच्या आयुष्यातील अखेरची व्यक्तीही काळाने हिरावुन नेलेली असते. सौरभ काही काळ दिडःमुढ अवस्थेत तसाच बसुन राहतो, पण नंतर आपले डोळे पुसत एक निर्धार करत तो उठतो आणि ड्रॉवरमध्ये असलेला रियाचा पत्ता घेतो. अचानक हॉर्न चा आवाज ऐकुन सौरभ झोपेतून जागा होतो. तो बाहेर डोकावतो, घर आलेले असते. कारचा दरवाजा उघडुन तो बाहेर येतो. रिया दरवाजावरच त्याची वाट पाहत असते. सौरभ येताच रागाने पाहत ती त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार करते. सौरभ हातानेच तिला शांत करत प्रेमाने ओढत आपल्या बाहुपाशात घेतो. रियाचा राग निवळतो. सौरभ आणि रिया घरात प्रवेश करतात, पण त्या दोघांबरोबरच अजुनही कोणीतरी त्या वास्तुत प्रवेश केलेला असतो. त्या घराला सैतानी स्पर्श झालेला असतो.

सौरभ व रिया घरात प्रवेश करतात. घरात येताच सौरभ सोफ्यावर आपले अंग झोकून देतो. रिया आत जाऊन त्याच्यासाठी चहा बनवून आणते. सौरभच्या समोरच्या टी पॉयवर चहाचा कप ठेवत ती सोफ्यावर त्याच्या शेजारी बसते. "ओ हेलो मिस्टर सौरभ. अरे फ्रेश हो. हा चहा घे. असा काय सोफ्यावर पडुन राहलायस?" सौरभ गालातच हसत रियाकडे पाहतो. "नाही रिया . थोडसं दमायला झालं होतं एका महत्वाच्या जागी गेलो होतो." रिया त्याला अजुन काही विचारत नाही. ती आत किचनमध्ये जाते. सोफ्यावरुन उठत सौरभ फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये जातो. वॉशबेसिनचा नळ चालु करुन तो चेहऱ्यावर थंड पाण्याचा शिडकावा घेतो. त्याला थोडे बरे वाटु लागते. तो समोरच्या आरशात स्वतः ला निरखुन पाहत असतो, की तेवढ्यात त्याच्या मागे कुणीतरी उभे असल्याचा त्याला भास होतो. झटकन तो मागे वळुन पाहतो, पण मागे कुणीच नसते. तसाच तो बाथरुममधून बाहेर येत सोफ्यावर बसतो, आणि रियाने त्याला दिलेला चहा पिऊ लागतो. कुठलातरी गहन विचार तो त्यावेळी करत असतो. तेवढ्यात रिया किचनमधून बाहेर येते, आणि सौरभजवळ जात त्याच्या हातात एक यादी देते. सौरभ प्रश्नार्थक नजरेने वर पाहतो, तशी रिया बोलते. "अरे किराणा संपलाय, प्लीज जरा आणुन देशील का?" सौरभ हातातील यादी पाहतो. चहा पावडर, साखर, कडधान्ये, तेल बापरे जवळजवळ २२-२३ आयटम असतात. सौरभ ती यादी खिशात ठेवतो, व पुन्हा विचारात गुंततो. सौरभ बराच वेळ चहाचा कप हातात घेऊन राहतो. तशी रियाला त्याची बैचेनी जाणवते, ती हळुच सौरभच्या कपात डोकावत बोलते. "सौरभ अरे चहा केव्हाच संपलाय, एवढा कसला विचार करतोयस?" रियाच्या बोलण्याने भानावर येत सौरभ हातातील कप टिपॉयवर ठेवतो, आणि रियाकडे पाहत बोलतो. "मधुरा, आत्ता मी फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेलो असता माझ्या मागे कुणीतरी उभं असल्याचा भास झाला." "काय? कोण होतं मागे?" "मला नाही माहित, पण ते खुपच भयानक होतं" रियाही ते ऐकुन गंभीर होते, पण नंतर हसत बोलते. "अरे तुला भास झाला असेल. त्या रात्रीही तु असचं काही बोलत होतास, की कोणीतरी परत आलयं." सौरभ चकित होत रियाला पाहतो, तशी जवळ जात रिया सौरभच्या छातीवर आपले डोके ठेवत त्याचा हात पकडत बोलते. "सौरभ मी आहे ना तुझ्यासोबत. मग असा का घाबरतोस?" सौरभ भावनिक होत रियाकडे पाहत असतो. रिया आपल्याच बोलण्यात मग्न असते. "माहित आहे सौरभ, माझ्यासाठी कुठली गोष्ट सर्वात जास्त महत्वाची असेल, तर ती तु आहेस. तुला असं राहिलेलं मला नाही आवडणार. " सौरभ अलगद रियाला कुरवाळत तिच्या कपाळाचे चुंबन घेतो. रिया वर नजर करत त्याला पाहते. "आय लव्ह यु रिया. कदाचित मला भास झाला असेल." रियाच्या गालांना हाताने कुरवाळत तो उठतो,आणि रियाने दिलेली सामानाची यादी घेऊन बाहेर पडतो. सौरभ बाहेर जातो, तशी रिया आवराआवर करायला घेते. आवराआवर करताना नकळत तिच्या मनात विचार येतो, की पाहुया तरी बाथरुममध्ये काय आहे ते? शेवटी ती आजच्या काळातील एक मॉर्डन मुलगी असते, तिचा भलत्यासलत्या गोष्टींवर विश्वास नसतो. ती जाते, आणि हळुवारपणे बाथरुमचा दरवाजा उघडुन आत पाहते. सगळं काही ठिकठाक असतं, तिला तेथे कुणीच दिसत नाही. ती हसत दरवाजा बंद करणार तेवढ्यात वॉश बेसिनकडे तिला सौरभचा मोबाईल दिसतो, तशी ती आत जाते व दरवाजा बंद होतो. सौरभचा मोबाईल हातात घेत ती बोलते. "ओफ हो हा सौरभ मोबाईल पण येथेच विसरुन गेलाय." तिची नजर समोरच्या आरशामध्ये जाते, तशी ती स्वतः ला न्याहाळत उभी राहते. अचानक वॉशबेसिनच्या जाळीतुन दोन काळे धुरासारखे हात बाहेर येत तिचा गळा पकडण्याचा प्रयत्न करतात, तशी एकदम किंचाळत ती मागे जाते, पण तिचा तोल जाऊन ती खाली पडते. तिची नजर वर मागच्या भिंतीवर जाते. रक्ताचे ओघळ वाहत असतात, आणि भिंतीवर अचानक शब्द उमटायला सुरवात होते. रिया डोळे विस्फारत तिकडे पाहते. "मी परत आलोय" असे ते वाक्य असते. रिया घाबरुन उठत दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते, पण तो उघडतच नाही. दरवाजा लॉक झालेला असतो. एकाएकी गुरगुरत एक काळी धुराच्या लोटासारखी आक्रुती जिभल्या चाटत आपले लाल तप्त डोळे फिरवत रियाकडे येत असते. तशी मोठ्याने ओरडत, आदळ आपट करत रिया दरवाजा उघडण्याची धडपड करते. ती आक्रुती आपला विक्राळ जबडा उघडते, तेवढ्यात दरवाजा उघडला जातो, आणि रिया बाहेर पडते. हे कायं होतं सत्य की आभास? रियाला काहीच समजत नसते. तिचा श्वास वरखाली होत असतो, नजर वळवुन ती बाथरूमच्या दरवाजाकडे पाहते. तिच्या कपाळावर घाम डवरलेला असतो. भयभीत होत ती किचनमध्ये जाऊन गटागटा पाणी पिते, तसा तिचा जीव शांत होतो. रिया बाहेर येत विचार करत सोफ्यावर बसते. सौरभ म्हणतो ते खरं असेल का? कोण परत आलयं? कोणाची होती ती काळी आक्रुती? तिचे डोके भणभणायला सुरवात होते. ती टिव्ही चालु करते, की तेवढ्यात सौरभ आत येतो. सौरभला पाहुन रिया आपल्या चेहऱ्यावरचे भाव लपवते. तिचे त्याच्यावर जिवापेक्षा जास्त प्रेम असते, त्यामुळे घडलेला प्रसंग सांगुन तिला त्याचे टेन्शन वाढवायचे नसते. रिया सोरभच्या हातातुन पिशव्या घेते, आणि हसुन त्याला पाहते. "व्हाटस अप माय डियर? काय करत होतीस?" "कुठे काय सौरभ, हे काय आत्ता सगळी आवराआवर करुन टिव्ही पाहत बसले होते, तेवढ्यात तु आलास?" सौरभ तिच्या नजरेत पाहत तिचे दोन्ही गाल अलगद हातात धरत बोलतो. "खरचं......?" रिया कावरीबावरी होत चाचरत बोलते. "म्हणजे?" सौरभ रियाची गंमत पाहत असतो, थोड्यावेळाने तो खळाळुन हसु लागतो. "ए वेडाबाई. घाबरलीस काय? अगं मी गंमत करत होतो." रियाही बळेबळे हसायला सुरवात करते, तसा तिच्यापासून दूर होत सौरभ बोलतो. "अच्छा ऐक ना रिया, मला एक महत्वाची मिटिंग आहे आज, तेव्हा मला जायला हवं" रिया काहीच न बोलता मान डोलावते, तसा सौरभ हसुन हाताने तिला बायबाय करत बाहेर पडतो. रिया बराच वेळ त्याच्या पाठमोऱ्या आक्रुती कडे पाहत राहते, आणि नंतर तशीच सोफ्यावर बसते.

बराच वेळ होतो तशी रिया आपल्या कामात व्यस्त होते. पण कोणाचीतरी नजर तिच्यावर असते. दिवसभर काम करुन रिया दमुन जाते. संध्याकाळी नेहमीच्या वेळी सौरभ घरात येतो. रिया फ्रेश होते, एव्हाना सकाळचा प्रकार तिच्या डोक्यातही राहत नाही. ती सौरभ साठी त्याच्या आवडीचा लेमन राईस बनवते, आणि गरमागरम त्याच्यासमोर ठेवते. सौरभ आणि रिया मजेत आपले डिनर करत असतात, पण त्याचवेळी ती काळी आक्रुती धुराच्या लोटासारखी दरवाजाआड राहुन त्यांना पाहत असते. रात्रीची वेळ. सौरभ व रिया दिवसभराचा तणाव विसरुन शांत झोपलेले असतात. वातावरणात थंडावा असतो, कुठेतरी दूरवर कुत्र्यांच्या रडण्याचा आवाज येत असतो. सौरभ रियाला आपल्या कवेत घेतो, तेवढ्यात त्या खोलीतले वातावरण अधिकच थंड होते. पानांची सळसळ होते, आणि वारा वाहु लागतो. दरवाजाची जोरजोरात खडखड होत असते. रिया डोळे उघडुन पाहते, तोच खडखडाट बंद होतो, तशी पुन्हा डोळे मिटुन ती झोपी जाते. तेव्हा काही वेळाने घुं घुं असा आवाज येत जमिनीतुन ती काळी आक्रुती बाहेर येत समोर उभी राहते. आपले लाल निखाऱ्यासारखे डोळे फिरवत ती रियाजवळ पोहोचते, अचानक तिचे डोळे उघडतात, आणि ती जोरात किंचाळते. तसा बाजुला झोपलेला सौरभ खडबडून जागा होत रियाला पाहतो. रियाचा श्वास वरखाली होत असतो. भितीने तिच्या कपाळावर घाम डवरलेला असतो. सौरभ अलगद तिच्या हातांवर आपले हात ठेवून तिला विचारतो. "काय झालं रिया, अशी किंचाळलीस का?" रिया घाबरतच बोलत असते. "सौरभ, सौरभ अरे आत्ता माझ्या समोर एक भयानक काळी आक्रुती उभी होती, मी पाहिलय तिला." "काय?" "हो .....हो सौरभ. तु बाजारात गेल्यावर मी सहज माझ्या मनाची खात्री करण्यासाठी बाथरुममध्ये गेले होते, तेव्हा.... तेव्हा याच आक्रुतीने माझ्यावर हल्ला केला होता." सौरभ कावराबावरा होत तिच्या हातांवरील आपली पकड घट्ट करत बोलतो. "रिया काय बोलतेस तु हे?" "हो सौरभ, मी खरं बोलतेय." "अगं मग मला सकाळीच का सांगितलं नाहीस?" रिया काळजीने आपली नजर सौरभकडे करत बोलते. "आय एम सॉरी सौरभ. तु उगाच टेन्शन घेशील म्हणुन नाही सांगितलं तुला." रिया नजर खाली करते, तसा सौरभ आपल्या हातांच्या तळव्यात तिचे दोन्ही गाल धरत तिची मान वर करत तिच्या नजरेत डोकावत बोलतो. "इटस ओके रिया, पण आता तुला मी जी गोष्ट सांगणार आहे ती काळजीपूर्वक व मन घट्ट करुन ऐक." रिया आश्चर्याने त्याच्याकडे पाहते. सौरभ बोलत असतो. "रिया तुला मी आक्का माझी आई आहे हे सांगितलं होतं आठवतं?" "हं हो. आणि ती टी.बी ने गेली हे पण सांगितलं होतं, मग?" "रिया आक्का माझी खरी आई नव्हती." धक्का बसल्यागत रिया बोलते. "काय?" "हो रिया ही २० वर्षांपूर्वी ची गोष्ट आहे." सौरभ रियाला २० वर्षांपुर्वीच्या त्या घटना सांगतो, हे सांगताना त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत असतात. रियाच्या डोळ्यात पाणी आलेले असते, तशीच भावनिक होत ती बोलते. "सौरभ एवढे मोठे सत्य तु एवढी वर्षे का लपवलेस माझ्या पासुन? अरे मी का कुणी परकी आहे का?" सौरभ रियाला शांत करत बोलतो. "रिया अगं तशी वेळच आली नव्हती बघ, आणि या गोष्टी सांगुन मला तुला तो त्रास द्यायचा नव्हता." रिया रडवेल्या चेहऱ्याने सौरभकडे पाहत त्याच्या छातीवर डोके ठेवते, की अचानक सोसाट्याचा वारा वाहु लागतो, आणि दरवाजा- खिडक्यांचा जोरजोरात खडखडाट होऊ लागतो. सौरभ व रिया घाबरत उठतात, व तिकडे पाहतात. तेवढ्यात खोलीतले वातावरण भारावल्यागत होते, भयंकर मंत्रांचे सुर घुमु लागतात. संपूर्ण घर हलत असते, वस्तुंची आदळ आपट होत असते. सौरभ व रिया घाबरुन एकमेकांना मिठी मारतात, तितक्यात काचेच्या खिडक्यांची तावदाने फुटतात आणि घराच्या आजुबाजुने भयानक गुरगुरत जमिनीतुन पिशाच्च, आत्मे बाहेर पडतात, व त्या घराला घेरा घालतात. त्यांच्या भयंकर गुरगुरण्याचे व किंचाळण्याचे आवाज घुमत असतात. रिया समोर काळ्या धुराच्या लोटासारखी ती आक्रुती प्रकटते, आणि काही कळायच्या आत रिया दुर फेकली जाते. सौरभ "रिया, रिया" अशा हाका मारत तिच्याकडे धावतो. ती आक्रुती गुरगुरत सौरभवर हल्ला करते, पण सौरभला काही होत नाही. मंत्रांचा व आत्म्यांच्या गुरगुरण्याचा आवाज वाढत असतो. तोच अचानक सरसरत मागे जात हॉलचा दरवाजा उघडला जात रिया मागच्या भिंतीवर जाऊन आदळते, व खाली पडते. ती काळी शक्ती वेगाने धुराच्या लोटासारखी तिच्यावर झेप घेते, पण तेवढ्यात समोर सौरभ उभा राहतो, तशी ती शक्ती तिथेच रेंगाळत राहते, सौरभ ओरडतो. "कोण आहेस तु?का आमच्या जिवावर उठलायस?" ती भयानक शक्ती तशीच गुरगुरत राहते, आजुबाजुला अधिकच अंधार दाटलेला असतो. चित्रविचित्र आवाज वाढत असतात, घर अजुनही हलत असते. सौरभ तसाच खाली गुडघ्यावर बसुन हात जोडत देवाची प्रार्थना करतो, त्याच्या डोळ्यातुन अश्रू बाहेर पडतात. रिया अर्धवट बेशुद्ध असते, सौरभ हतबल होऊन खाली बसलेला असतो, ती संधी पाहुन ती काळी शक्ती वेगाने रियाकडे येते, ते भयानक पिशाच्च आत्मेही भयंकर आवाज करत घरात शिरत रियावर हल्ला करतात, तेवढ्यात उभा राहत सौरभ आर्त हाक मारतो. "आई, वाचव." अचानकपणे त्या खोलीत पांढरा प्रकाश पसरतो. आजुबाजुचा अंधार कमी कमी होत जातो. ते भयानक आत्मे किंकाळ्या फोडत नाहीसे होतात. ती काळी शक्तीही गुरगुरत अद्रुश्य होते. सर्व स्थिरस्थावर होते. सौरभ पटकन रियाला आपल्या मिठीत धरतो. घडलेल्या भयानक प्रकाराने दोघांच्याही कपाळावर घाम डवरलेला असतो. ते दोघे उठून उभे राहतात, तसे त्या निवळत जाणाऱ्या पांढऱ्या प्रकाशात सोनेरी अक्षरे उमटु लागतात, सौरभ व रिया तिकडे पाहतात. "त्या ग्रंथाचा शोध घे, वाड्याच्या पुर्वेकडे." सौरभ व रिया ते वाचुन एकमेकांकडे पाहतात.

सौरभ व रिया ती रात्र जागुन काढतात. त्यांच्या मनात विचारांचे काहुर माजलेले असते. सर्वत्र निशब्द शांतता असते. पहाट होते, रिया किचनमध्ये जाऊन दोघांसाठी चहा बनवून आणते. सौरभ च्या शेजारी सोफ्यावर बसुन ती व सौरभ चहा पितात. चहाचे दोन घोट पोटात जाताच त्यांना तरतरी वाटु लागते. रिया सौरभकडे पाहत बोलते. "सौरभ, आता काय करायचं रे आपण? त्या ग्रंथाचा शोध कसा घ्यायचा?" सौरभ शांतपणे रियाला पाहतो. "रिया त्याआधी आपल्याला त्या काळ्या शक्ती बददल जाणुन घ्यायला हवं. तिचा बंदोबस्त करायला हवा." रिया सोफ्यावरुन उठत बोलते. "बरोबर आहे सौरभ, पण मला एक समजत नाही, त्या आक्रुती ने माझ्यावर हल्ला का केला? "ते मला नाही माहित रिया. कदाचित त्या शक्ति ला माझ्यावर हल्ला करायचा होता, पण तो होऊ शकला नाही." अचानक काहीतरी आठवल्यासारखे करत सौरभ आपल्या दंडात बांधलेल्या धाग्याकडे पाहतो. "या धाग्यामुळे तर......." रिया त्याच्याकडे पाहत मंद हास्य करत बोलते. "होय सौरभ या धाग्यामुळेच तु सुरक्षित राहिलास." सौरभचे डोळे आसवांनी भरुन येतात, तो हात जोडत वर पाहतो. "आई.....माझी आई, आज तिच्यामुळेच माझ्यावरचं संकट टळु शकलं, खरचं तु धन्य आहेस आई, तु धन्य आहेस." नकळत रियाचेही डोळे पाणावतात. ती सौरभच्या केसांवरून हात फिरवत बोलते. "माझ्या राजा. अरे आता असा उदास होऊ नकोस. तु एका वाघिणीचा मुलगा आहेस. आपल्याला या संकटाशी दोन हात केलेच पाहिजेत." सौरभ डोळे पुसत उठतो. "तु बरोबर बोलतेयस रिया. आपल्याला त्या शक्तीशी मुकाबला करुन तिचा आणि त्याच्यामागे जो कोणी आहे त्याचा बंदोबस्त करायलाच हवा." रिया त्याच्या खांद्यावर हात ठेवत बोलते. "होय सौरभ. मी तुझ्या पाठीशी आहे." "पण रिया यासाठी कोणाची मदत घेणार आपण?" रियाचे डोळे एका वेगळ्याच तेजाने चमकतात. ती पटकन बोलते. "एकदंत पंडित." सौरभ चकित होत उद्गारतो. "काय? एकदंत पंडित." "होय सौरभ." "पण आता एवढ्या वर्षानंतर......" "सौरभ स्वतः च्या मनात डोकावून पाहा, एकदंत पंडित तिथेच दिसतील." सौरभ आत्मविश्वासाने रियाकडे पाहतो. एका नव्या उमेदीने तो व रिया एकदंतांकडे जाण्यासाठी बाहेर पडतात.

सौरभ व रिया कारमधून जात असतात, ती काळी आक्रुती ही त्यांचा पाठलाग करत असते. सौरभने रियाच्या सुरक्षेसाठी देव्हाऱ्यातला अंगारा लावलेला असतो, पण खरतर रमाबाईंच्या हस्तक्षेपामुळे त्या शक्ति ची ताकद क्षीण झालेली असते. सौरभ व रिया मजल दरमजल करत वाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोहचतात. रियाला तो वाडा पाहण्याची अतीव इच्छा होत असते, पण त्याआधी त्यांना एकदंत पंडितांना भेटायचं असतं. सौरभ सरळ कार पुढे चालवत जातो, आणि शोध घेत घेत शेवटी ते एकदंत पंडितांच्या मठाकडे येऊन पोहोचतात. कारमधुन उतरत सौरभ व रिया मठामध्ये जात असतात. मागील २० वर्षात त्याचे रुप पुर्ण पालटलेले असते. सौरभ व रिया मठात प्रवेश करताच ती पाठलाग करणारी काळी शक्ती दूर निघून जाते. मठातील काही माणसे त्यांच्या समोर येतात, व त्यांची विचारणा करायला सुरवात करतात. "थांबा, कोण आपण? कोणाला भेटायचं आहे?" सौरभ व रिया एकमेकांना पाहतात. सौरभ बोलतो. "एकदंत पंडित आहेत का?" ती माणसे एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहत राहतात. तेवढ्यात एक उंच, सौम्य चेहऱ्याची, कपाळी भस्माचे पट्टे रेखाटलेली व भगवी वस्त्रे परिधान केलेली व्यक्ती तेथे येते. तिला पाहताच ती माणसे वंदन करतात, व निघून जातात. ती व्यक्ती आपादमस्तक सौरभ व रियाला न्याहाळते. "कोण आपण? काय काम आहे?" सौरभ त्यांना विचारतो. "आपणच एकदंत पंडित आहात का?" ती व्यक्ती सौरभकडे चमकुन पाहते, नंतर आपली नजर उजव्या हाताच्या भिंतीकडे वळवते. सौरभ व रियाही तिकडे पाहतात, तिथे एका तपस्वीप्रमाणे शांत मुद्रा असणाऱ्या व्यक्तीचा फोटो असतो, त्याखाली लिहलेले असते. एकदंत पंडित स्वर्गवास- २० जुन २००५. सौरभ व रिया अवाक होत समोर पाहतात. ती व्यक्ती त्यांना आपल्यासोबत आतल्या खोलीत घेऊन जाते. एका आसनावर ती व्यक्ती बसते, समोरच सौरभ व रिया बसतात. शांतचित्ताने सौरभ व रियाकडे पाहत ती व्यक्ती बोलते. "एकदंत पंडित पोटशुळीमुळे वारले, मरताना सारखे त्यांच्या डोळयातुन अश्रू वाहत होते. मी रमाबाईंना नाही वाचवू शकलो असेच ते सारखे म्हणत होते." सौरभ व रिया ऐकत असतात. "त्यावेळेपासून मीच या मठाचा मुख्य म्हणून कारभार पाहतो. माझं नाव दत्तराज. एकदंतांच्या आशीर्वादाने या मठाचा कारभार सुरक्षित चालु आहे, त्यांच्याच क्रुपेने मी काही मंत्रशक्ती आत्मसात केल्या आहेत,ज्यायोगे कोणाची काही मदत होऊ शकेल. पण तुम्ही कोण? हे मला नाही सांगितले." सौरभ भावुक होत उठतो, आणि बोलतो. "दत्तराज मी त्याच रमाबाईंचा दुर्दैवी मुला आहे, सौरभ आणि ही माझी पत्नी रिया." दत्तराज आश्चर्याने सौरभकडे पाहतात. "सौरभ. रमाबाईंचा मुलगा?" "होय दत्तराज." सौरभ ढसाढसा रडु लागतो. रिया त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याचे सांत्वन करत असते. तेवढ्यात आसनावरुन उठत दत्तराज सौरभच्या जवळ जात त्याच्या डोक्यावर हात ठेवतात. "सौरभ ज्याच्याकडे रमाबाईंसारखी आई होती, तो दुर्दैवी कसा असेल? अरे तिने तुझ्यासाठी स्वतः चा जीव खर्ची घालुन त्या काळ्या शक्तीला बंदिस्त केलं होतं." सौरभ मान वर करत उद्वेगाने बोलतो. "तीच काळी शक्ती आता परत आलीये दत्तराज. " दत्तराज स्तंभित होत बोलतात. "काय? ती शक्ती पुन्हा परत आलीये, पण कशी?" "तेच जाणून घ्यायचं आहे दत्तराज. काल रात्री त्या शक्तीने रियावर हल्ला केला, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने मला काही केलं नाही." "आणि करुही शकणार नाही. कारण तुझ्या दंडात तो अभिमंत्रित धागा आहे. जो खुद्द एकदंत पंडितांनी रमाबाईंना दिला होता." "पण मग रिया? त्या काळ्या शक्ती ची तिच्याशी काय शत्रुता आहे?" दत्तराज गुढ हसत बोलतात. "त्या शक्तीची रियाशी शत्रुता नाही, पण तुझ्याशी जरुर आहे, आणि रिया तुझी पत्नी आहे." सौरभ व रिया काहीतरी समजल्यासारखे चेहरा करत एकमेकांना पाहतात. सौरभ पुढे बोलतो. "पण दत्तराज. ती काळी शक्ती कुणाची आहे, तिचा हेतु काय आहे?" दत्तराज हताश होत खाली पाहत बोलतात. "दुर्दैवाने त्या वेळी एकदंतांना व मला त्या शक्तीबद्दल काही समजु शकले नाही. पण यावेळी कदाचित मी तुमची मदत नक्की करु शकेन." सौरभ व रिया हसत उठतात व हात जोडत बोलतात. "खरचं तुम्ही मदत केली तर त्या शक्तीचा नायनाट नक्कीच होईल दत्तराज." दत्तराज मोठ्याने हाक मारतात. "केशव" तशी एक क्रुश पण तरतरीत व्यक्ती आत येत दत्तराजांना वंदन करते. दत्तराज केशवला काही महत्त्वाच्या सुचना देतात, आणि सौरभ व रियासोबत त्यांच्या घरी मुंबई ला जायला निघतात.

सौरभ व रियासह दत्तराज मुंबईला त्यांच्या घरी पोहोचतात. कारमधून उतरताच त्यांना त्या सैतानी शक्ती ची जाणीव होते. आजुबाजुचे वातावरण भारल्यागत होते. दत्तराज डोळे मिटुन त्या शक्तीला जाणुन घेण्याचा प्रयत्न करत असतात. थोड्या वेळाने डोळे उघडून ते घरात प्रवेश करतात, त्यांच्या मागोमाग सौरभ व रियाही प्रवेश करतात. दत्तराज मधल्या हॉलमध्ये येतात. तिथे एक जागा पाहुन होमाचे साहित्य मांडतात. बाजुलाच उभ्या असणाऱ्या सौरभ व रियाभोवती अभिमंत्रित रक्षेचे रिंगण आखतात, ज्यामुळे ती शक्ती त्यांना अपाय करु शकणार नाही. दत्तराज होम पेटवतात, हातात समिधा घेऊन ते मंत्र पुटपुटायला सुरवात करतात. सौरभ व रियाच्या कपाळावर घामाचे थारोळे दाटलेले असतात. काही वेळाने खिडक्यांवरचे पडदे हालतात, वाऱ्याची एक झुळूक येते. आजुबाजुला अंधार दाटायला सुरवात होते. दत्तराज आपले मंत्रपठण सोडत नाहीत. सौरभ व रिया घाबरुन एकमेकांना मिठी मारुन उभे असतात. दत्तराज डोळे उघडत हातातल्या समिधा होमात टाकत ओरडतात. "हे काळ्या शक्ती समोर ये, समोर ये आणि तुझी ओळख दाखव." एवढ्यात विजेच्या दिव्यांची उघडझाप सुरु होते. त्या खोलीतले वातावरण भिरलेले होते. ती काळी शक्ती सौरभ, रिया व दत्तराज च्या समोर येते, पण काळ्या धुराच्या लोटासारखी ती भिरभिरत राहते. दत्तराजांचे डोळे सताड उघडे राहतात, त्यांच्या तोंडातुन मंत्रोच्चार अस्पष्ट येऊ लागतात. त्या काळ्या शक्तीचा गुरगुरण्याचा आवाज येत असतो, पण दत्तराज पुतळ्यासारखे स्तब्ध राहतात. त्या शक्तीने त्यांना संमोहित केलेले असते. दिव्यांची उघडझाप चालुच असते. आजुबाजुला अंधार अधिकच गडद होत असतो. ती शक्ती आपले लाल डोळे सौरभ व रियावर रोकते, तसे दोघे ओरडत दत्तराजांना पाहतात. दत्तराज निश्चल बसलेले असतात. सौरभ व रियाच्या डोळ्यांत मुर्तीमंत भिती दाटते, पण तेवढ्यात काचेच्या खिडक्या फुटतात, आणि वाऱ्याच्या झुळकीसारखी ती शक्ती नाहीशी होते. दत्तराज भानावर येतात, त्यांच्याही चेहऱ्यावर भितीचे लवलेश पसरलेले असतात, पण स्वतः च्या मनावर संयम ठेवत ते सौरभ व रियाला पाहत बोलतात. "माझ्या कल्पनेपेक्षाही खुप ताकतवर आहे ती शक्ती. ती आपले अस्तित्व दाखवु पाहत नाहीये. पण मला एवढं समजलं की यात दोन शक्ती एकत्र आहेत." सौरभ व रिया कपाळावरचा घाम पुसतात. सौरभ बोलतो. "मग दत्तराज, त्या कोण शक्ती आहेत, ते कसं समजणार?" दत्तराज चिंतन करत बोलतात. "या कामी रमाबाईंची मदत आपल्याला होऊ शकते." सौरभ दचकत बोलतो. "काय ?आईची मदत?" "होय सौरभ. रमाबाई ,तुझ्या आई. काल रात्री त्यांनीच तुला वाचवलं होतं, आणि ग्रंथाचा शोध घ्यायचे संकेत दिले होते. त्यांच्याकडून आपल्याला अजुन काही माहिती मिळू शकेल." सौरभ व रिया माना डोलवतात. सौरभ आईला पाहण्यासाठी उतावीळ झालेला असतो. दत्तराज डोळे मिटुन चिंतन करतात, आणि मंत्र पुटपुटत समोरच्या होमात समिधा अर्पण करतात. त्याबरोबर सोसाट्याचा वारा वाहु लागतो. दिव्यांची उघडझाप सुरु होते, आणि पाहता पाहता समोरच्या यज्ञकुंडात एक पांढरा प्रकाश पसरतो. रमाबाईंचा आत्मा समोर प्रकट होतो. सौरभ भावुक होत रमाबाईंना पाहत असतो, रियाच्याही डोळ्यात पाणी तरळते. उद्वेगाने सौरभ हाक मारतो. "आई......" पण दत्तराज त्याला हातानेच शांत करतात. रमाबाईंना पाहत ते मंदहास्य करत हात जोडत बोलतात. "प्रणाम रमाबाई. मी दत्तराज. एकदंत पंडितांचा विश्वासु सेवक. मला आपली मदत हवी यासाठीच तुम्हांला बोलवावं लागलं मला." रमाबाई भावुक होत सौरभला पाहतात, व नंतर दत्तराजांकडे वळून बोलतात. "मला माहित आहे दत्तराज. त्या काळ्या शक्ती बद्दल जाणुन घ्यायचं आहे तुम्हांला. पण मला माफ करा त्या शक्ती बद्दल जेवढी तुम्हांला माहिती आहे तेवढीच मला आहे. मी फक्त एवढचं सांगु शकते, की लवकरात लवकर सौरभने तो ग्रंथ शोधुन काढला पाहिजे. तरच या रहस्यांचा उलगडा होईल." सौरभ रमाबाईंना पाहत असतो, भावनाविवश होत तो बोलतो. "आई......कुठे गेलीस गं तु मला सोडुन? तुझ्याशिवाय कशी पेलु मी आव्हाने? कसा शोधु तो ग्रंथ?" सौरभ ढसाढसा रडु लागतो, ते पाहुन रमाबाई खंबीर आवाजात मन घट्ट करुन बोलतात. "सौरभ परिस्थिती ला सामोरं जायला हवं. असं रडुन चालणार नाही. आठव त्या काळ्या शक्तीने काय काय केलं? तुझे बाबा, मधुरा, मला -तुझ्यापासून दुर केलं. आणि आता परत येऊन तुझ्या व या मुलीच्या जिवावर उठली आहे. नाही सौरभ यामागे कोण आहे त्या रहस्याचा छडा लावलाच पाहिजे. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे." सौरभ डोळे पुसतो. तेवढ्यात रिया बोलते. "पण आई. एक विचारु?गंगाभट्ट तो ग्रंथ घेऊन गेल्यानंतर पुन्हा आलेच नाहीत का?" रमाबाई गुढपणे पाहत बोलतात. "नाही. गंगाभट्ट कुठे गेले, त्या ग्रंथाचं काय झालं ही सर्व रहस्ये बनली आहेत. या काळ्या शक्तीमागे कोण आहे? गंगाभट्ट की इतर कुणी? हे त्या ग्रंथाचा शोध घेतल्याशिवाय समजणार नाही. तो ग्रंथ एवढा प्रभावशाली आहे, की त्या काळ्या शक्तीचे अस्तित्व तुम्हांला दाखवु देणार नाही. पण सौरभ व रियाच्या इच्छा शक्तीवर ते त्याच्या अस्तित्वाला ओळखुही शकतील, आणि त्याचा बिमोडही करतील." तेवढ्यात दत्तराज बोलतात. "धन्यवाद रमाबाई. सौरभ व रियाच्या सुरक्षेची मी तजवीज करतो, पण त्यांनी तो ग्रंथ शोधायचा कुठे?" रमाबाई विचार करत बोलतात. "वाड्याच्या पुर्वेकडच्या जंगलात कुठेतरी गंगाभट्टांचा वाडा आहे, तिथेच कदाचित त्या ग्रंथाचा माग मिळू शकेल." दत्तराज रमाबाईंना वंदन करतात, तशी सौरभ व रियाला प्रेमाने आशीर्वाद देत ती आत्मा गायब होते. रिया सौरभच्या खांद्यावर हात ठेवते, तसा सौरभ विश्वासाने तिच्याकडे पाहतो. दोघेही एका नवीन आव्हानासाठी तयार होतात. दत्तराज त्यांच्या सुरक्षेसाठी मंत्रभारीत पाणी व अंगारा देतात. त्यांचा आशीर्वाद घेऊन दोघेही बाहेर पडतात.

सौरभ व रिया पुर्ण तयारीनिशी त्या वाड्याकडे जायला निघतात. रियाला औत्सुक्य असते तो वाडा पाहण्याचे. देवाच्या पाया पडुन ते दोघेही कारमध्ये बसतात, आणि वाड्याच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरु होतो, त्याचवेळी अद्रुश्य रुपात ती काळी आक्रुती त्यांचा पाठलाग करत असते. दोघेही वाड्यासमोर कार थांबवतात. कारमधुन उतरताच रियाचे मन उचंबळून येते. कौतुकाने ती तो जुना, जीर्ण वाडा पाहत असते. सौरभचे ही डोळे भरुन आलेले असतात. ते दोघे वाड्याचे मुख्य द्वार ओलांडून आत येतात. वाऱ्याची एक झुळुक येते, आणि अंगणातला पाचोळा दुर उडतो. सौरभच्या कानात मात्र रमाबाईंनी त्याला घातलेली हाक, चिंतामण पंडितांचे शब्द, आक्काचे प्रेमळ बोलणे यांचे संमिश्र स्वर घुमत असतात. तेवढ्यात रियाला आपल्यासमोरुन काहीतरी भरकन निघून गेल्याचा भास होतो. रिया दचकुन सौरभकडे पाहते, सौरभ तिचा हात घट्ट पकडतो. रिया तो वाडा, त्या वाड्याच्या भिंती, ते जीर्ण खांब डोळे भरुन पाहत असते. सौरभकडे पाहताच तिच्या डोळ्यांतुन खळकन अश्रू निखळतात. "सौरभ खरचं आज खऱ्या अर्थाने मी माझ्या घरात आले. आय लव्ह यु सौरभ, आय लव्ह यु." रिया हसतच त्याला मिठी मारते, पण तेवढ्यात पुन्हा तिला हवेतुन काहीतरी भरकन निघुन गेल्याचा भास होतो, तशी ती ओरडते. सौरभ प्रश्नार्थक चेहऱ्याने तिच्याकडे पाहतो. "सौरभ ज्या वेळी आपण या वाड्यात प्रवेश केला तेव्हा आणि आताही मला कोणीतरी असल्याचा भास झाला." सौरभ घाबरतो, अन इकडे तिकडे पाहू लागतो, पण त्याला कुणीच दिसत नाही. सौरभ रियाचा चेहरा ओंजळीत घेत बोलतो. "घाबरु नकोस रिया. आपल्यासोबत आईचा आशिर्वाद आहे. विश्वास ठेव, काळजी करु नकोस." रियाला धीर येतो, आणि हसतच ती सौरभला पाहते. वाड्याच्या पुर्वेकडेच ते भलेमोठे जंगल असते आणि तेथेच त्यांना शोध घ्यायचा असतो, पण सौरभ व रियाची पावले त्या वाड्यातच रेंगाळतात, त्यामुळे काही वेळ ते तिथेच घालवतात. दुपारची वेळ असते. सौरभ गाढ झोपलेला असतो. रिया ओसरीवर बसलेली असते. रमाबाई असत्या तर त्यांनी आपल्यावर किती माया केली असती, या कल्पनाविश्वात ती रममाण झालेली असते. एवढ्यात पुन्हा कोणीतरी सरकन निघून गेल्याचा भास होतो. रिया उठते, सौरभकडे पाहते. तो गाढ झोपेत आहे हे पाहून ती सावकाश पावलांनी माग काढत व्हरांड्यात पोहोचते. व्हरांड्यात खांबाला टेकून कोणीतरी मुलगी उभी असते. रिया मागाहुन जात हाक मारते. "कोण आहे? कोण उभं आहे तिकडे?" त्याबरोबर ती मुलगी मागे वळून पाहते. रिया घाबरुन मागे सरते, तशी ती मुलगी पुढे येत बोलायला सुरवात करते. "ताई घाबरु नका. मी तुम्हांला काही करणार नाही." रिया कावरीबावरी होत बोलते. "पण तु......तु कोण आहेस?" "ताई नियतीने जिची, जिच्या प्रेमाची क्रुर चेष्टा केली तीच मी दुर्दैवी मुलगी मधुरा....." रिया चकित होत उद्गारते. "काय? मधुरा." "होय ताई. ती मीच मधुरा. जिच्यावर सौरभचं प्रेम होतं, आणि माझं त्याच्यावर. पण उमलणारी ही प्रेमकहाणी मात्र पुर्ण होऊ शकली नाही, ताई. नियतीला आमचे सुख नाही पाहवले." मधुरा रडत असते, रियालाही तिची दया येते. कोणे एके काळी सौरभ का हिच्यावर जिव ओवाळायचा हे आठवुन तिला मधुराचा हेवा वाटायचा. रिया तिला शांत करत बोलते. "मधुरा शांत हो. मला समजु शकतात गं, तुझ्या भावना. प्रेमविरह काय असतो ते जाणते मी. खरतर माझ्यापेक्षा तुझा जास्त अधिकार आहे सौरभवर." "नाही, नाही ताई. मधुरासाठी सौरभ भुतकाळ होता, तो यापुढे तसाच राहणार आहे. कदाचित नशीब म्हणतात ते यालाच. पण ताई एका गोष्टीचा आनंद झाला बघ मला, की माझा सौरभ आता तुमच्या हाती सुरक्षित आहे, आणि तो असाच सुरक्षित राहणार आहे." "तु काळजी करु नकोस मधुरा. मी तुझ्या सौरभला काही होऊ देणार नाही." पाहता पाहता मधुरा गायब होते, रिया तिला हाका मारते. तेवढ्यात सौरभ तेथे पोहोचतो. बराच वेळ झाला, रिया कुठे दिसत नाही म्हणुन तिला शोधत तो तिथे आलेला असतो. रिया सौरभकडे वळते, सौरभ तिला काही विचारणार त्याआधीच ढसाढसा रडत ती त्याला मिठी मारते. सौरभला काहीच समजत नाही, तो तिला विचारतो. "काय झालं रिया? का रडतेयसं?" तरी रिया त्याला बिलगुन रडतच असते. सौरभ तिला समोर करत तिचा चेहरा प्रेमाने ओंजळीत घेत विचारतो. "काय झालं, आईबाबांची आठवण आली का?" रिया निशब्द होते, तसा सौरभ पुढे बोलत राहतो. "माझचं चुकलं रिया. तुला पहिल्यांदाच खर काय ते सांगायला पाहिजे होतं. माझ्यामुळे आज तुझ्यावर ही वेळ आली आहे." रिया स्वतः ला आवरत डोळे पुसत बोलते. "नाही सौरभ, असं बोलु नकोस. अरे नियतीनेच तुझी आणि माझी भेट घडवुन आणली आहे. माझ्यासाठी तर तु माझं आयुष्य आहेस, माझं सर्वस्व आहेस. आता येणारी कुठलीही वादळे समर्थपणे झेलायला मी तयार आहे. सौरभ मला आठवण आली, पण ती माझ्या आईबाबांची नव्हे तर माझ्या सासुबाईंची." सौरभ आश्चर्याने विचारतो. "काय? आईची आठवण?" "हो सौरभ. आज माझ्या सासुबाई रमाबाई आणि माझे सासरे जिवंत असते, तर त्यांनी मला भरभरुन आशीर्वाद दिले असते. एका मुलीसारखी मी त्यांची सेवा केली असती. कदाचित त्यावेळी मी तुझ्या आयुष्यात नसतेही, दुसरं कोणीतरी तुझी जोडीदार असते." "दुसरी?.......दुसरी कोण?" "मधुरा. तुझ्या सहवासात तिच्या जिवनाचं सोनं झालं असतं, पण नियतीच्या फेऱ्यासमोर सगळे डाव कसे एका झटक्यात उधळले जातात." सौरभला मधुराची आठवण येते, मरतानाचे मधुराचे सताड उघडे डोळे त्याला दिसत असतात. बराच वेळ मधुराच्या गोड हसण्याचा आणि तिच्या पैंजणांचा आवाज कानात रुंजी घालु लागतो, हळुहळु तो दुर जात कुठल्याकुठे विरुन जातो.

रिया व सौरभ त्या वाड्यात येऊन खुश झालेले असतात, तेथुन निघावेसेच त्यांना वाटत नसते. रिया मधुराशी झालेली भेट सौरभला सांगत नाही. संध्याकाळ होते, धुसर छाया त्या वाड्यावर पसरते. सौरभ टेरेसवर उभा असतो, आणि टेरेसवरुन खाली पाहत असतो. तेवढ्यात रिया तेथे येते. "सौरभ अरे इथे काय करतो आहेस?" "काही नाही रिया, संध्याकाळी पसरलेली आकाशातील उधळण पाहत होतो. या संधिप्रकाशात वाडा किती सुंदर दिसतोय नाही?" रिया गालातच हसते आणि सौरभच्या अजुन जवळ जात बोलते. "सौरभ एक गोष्ट सांगायची होती तुला." सौरभ नजर वळवत बोलतो. "हं बोल की." "सौरभ आजचा पुर्ण दिवस या वाड्यात गेला, पण या दरम्यान त्या काळ्या शक्तीने आपल्याला काही केले नाही." सौरभ हसतो, व बोलतो. "रिया. आईचा आशिर्वाद असताना आणि दत्तराजांनी दिलेला अंगारा असताना ती काळी शक्ती हिंमत तरी करणार आहे का येथे येण्याची? आणि माझ्या दंडात हा धागाही आहेच." रिया अगदी सौम्य आवाजात त्याच्याशी बोलते. "म्हणुनच सौरभ आपण त्या काळ्या शक्तीला ओळखु शकत नाही आहोत, अरे ते समजायचे असेल तर हे सुरक्षेचे उपाय काही काळ दूर ठेवायला नकोत?" सौरभ आश्चर्याने तिच्याकडे पाहत विचारतो. "म्हणजे नेमकं काय म्हणायचय तुला रिया?" रिया सौरभचा चेहरा आपल्या ओंजळीत धरते, व नजरेत नजर मिळवुन प्रेमाने बोलते. "सौरभ काही वेळासाठी तुझ्या दंडात बांधलेला तो धागा बाजुला ठेव, प्लीज." सौरभ काहीशा संशयाने तिच्याकडे पाहतो, तशी ती पुढे बोलते. "बिलिव्ह मी सौरभ. अरे मला तुझी काळजी आहे. फक्त थोडा वेळ?" रियाच्या लाघवी बोलण्याला सौरभ फसतो आणि दंडातला धागा महतप्रयासाने बाजुला काढून ठेवतो, आणि रियाकडे पाहतो. पण रिया तेथे नसतेच. काही कळायच्या आतच सौरभच्या नाकपुड्यांतुन ती शक्ती शरीरात प्रवेश करते आणि मंतरल्यागत सौरभ त्या टेरेसच्या कठड्यावर चढतो. सोसाट्याचा वारा वाहायला सुरवात होते. सौरभ त्या कठड्यावरुन उडी मारणारच असतो की खरी रिया तेथे पोहोचते. सौरभला पाहताच ती ओरडतच त्याच्या जवळ पोहोचते, आणि त्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करते. पण सौरभ तिला दुर फेकुन देतो. तिरमिरत रिया खाली पडते. तिला काय करावे हे समजत नसते, तेवढ्यात तिची नजर त्या धाग्यावर पडते. रिया समजायचे ते समजते. झडप घालत ती तो धागा उचलत वेगाने जात सौरभच्या दंडात बांधते. वाऱ्याचा वेग वाढत असतो, अचानक झटका बसल्यागत सौरभच्या शरीरातुन ती काळी आक्रुती बाहेर पडते, आणि घूं घूं असा आवाज करत जंगलाच्या दिशेला गायब होते. वाऱ्याचा वेग मंदावतो. रिया धावत जाऊन सौरभला मिठी मारते, व ढसाढसा रडू लागते. सौरभला काय घडलं त्याची काहीच जाणीव नसते. रियाला सोबत घेऊन तो टेरेसवरुन खाली येतो. रिया व तो ओसरीवर बसतात. सौरभ रियाच्या चेहऱ्याकडे पाहत असतो, तेवढ्यात रिया रडवेल्या स्वरातच त्याच्याशी बोलायला सुरवात करते. "थैंक गॉड सौरभ. त्या आक्रुतीने तुला काही केलं नाही ते. देवा माझी लाज राखलीस तु." सौरभला अजुनही काही समजत नसते, तो रियाला पाहत बोलतो. "काय झालयं रिया?अशी का बोलतेयस तु?" रिया सौरभला कुरवाळत बोलते. "सौरभ तुला काहीच आठवत नाही?अरे ती काळी शक्ती आली होती तुझा जीव घ्यायला." रिया पुन्हा ढसाढसा रडु लागते. सौरभ तिला शांत करत विचारतो. "पण कशी? केव्हा?" "माझ्या रुपात. मघाशी जेव्हा तु टेरेसवर उभा होतास. तुला आपल्या बोलण्यात फसवुन तिने तुझ्या दंडातला धागा दुर केला, आणि....... माझ नशीब बलवत्तर म्हणुन वेळीच तिथे मी पोहोचले नाहीतर काय झालं असतं?" रिया भयभीत होते, त्या विचारानेच तिच्या अंगावर सरसरुन काटा उभा राहतो. सौरभ प्रेमाने तिला कवेत घेऊन तिच्या कपाळाचे चुंबन घेतो. "थैंक यु रिया, आज तुझ्यामुळे माझे प्राण वाचले. पण आता आपल्याला या वाड्यात राहणे धोक्याचे आहे. लवकरात लवकर त्या जंगलात जाऊन त्या ग्रंथाचा व त्या शक्तीचा शोध घ्यायलाच हवा." रियाला त्या आक्रुतीत काहीतरी दिसलेले असते, पण ती त्यावेळी काही बोलत नाही. अलगद ती सौरभच्या मिठीत बध्द होते. रात्र चढत जाते, आकाशातील लुकलुकणारे तारे पाहत ते झोपी जातात. रात्र सरते, सकाळ होते. सुर्याची कोवळी किरणे त्या वाड्यात प्रवेश करतात. रिया सौरभच्या मिठीतुन बाजुला होत आळोखेपिळोखे देत उठते. त्याचवेळी सौरभ जागा होत तिला पाहतो. रियाचे लक्ष तिकडे जाते. "काय रे? काय पाहतो आहेस?" सौरभ स्मितहास्य करत बोलतो. "काही नाही रिया. लोक आपल्या बायकोला सोन्याच्या महालात ठेवतात, तिला सोन्याचांदीने मढवतात. आणि मी......अभागी, तुला या पडक्या जीर्ण वाड्यात घेऊन आलो." रिया त्याच्या जवळ जात गालांवरून हात फिरवत बोलते. "सौरभ अरे जिथे तु नेशील ती जागा माझ्यासाठी स्वर्ग आहे. मला सोनं- चांदी काही नको. एका स्त्रीचं सौख्य नेहमी तिच्या पतीच्या सुखात असते." सौरभ प्रेमाने तिला पाहत बोलतो. "किती गोड बोलतेयस तु रिया, अगदी मधुरासारखी......." अचानक सौरभच्या तोंडुन मधुराचे नाव बाहेर पडल्याने रिया त्याच्याकडे पाहते. सौरभला घाबरलेले पाहून रिया हसते. "काय रे घाबरलास? अरे तुझं तिच्यावर किती प्रेम होतं हे माहित नाही का मला?" सौरभ प्रश्नार्थक नजरेने तिला पाहतो. "काल दुपारच्या वेळी वाड्याच्या व्हरांड्यात मला मधुरा दिसली होती." सौरभ दचकतो. "काय? मग ही गोष्ट तु मला का नाही सांगितली?" "सौरभ मधुरानेच रोकलं होतं मला ही गोष्ट सांगण्यापासुन. पण मला राहवलं नाही, म्हणुन आता तुला हे सांगितलं" "काय बोलली ती?" रिया उभी राहत बोलते. "सौरभ अरे खरं प्रेम कधीच संपत नाही, ती खुश आहे की तुझं लग्न माझ्याशी झालं. तुला जप असं बजावुन गेलीये ती." सौरभ उठत तिच्याजवळ जातो. "आणि तु हे सिध्द केलयसं रिया. मधुरा माझ्या मनात होती, पण तो माझा भुतकाळ होता. तिच्यासाठी मला तुझ्यावर तेवढचं प्रेम केलं पाहिजे. नाहीतर तो तिच्या प्रेमाचा अपमान असेल." रिया वळते व त्याला मिठी मारते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडतात. थोड्या वेळाने सौरभ भानावर येतो. "चला, आता निघुया. आपल्याला आता माघार घेऊन चालणार नाही. काय होईल ते होईल. या रहस्यांचा पर्दाफाश करायचाच आहे." रिया आत्मविश्वासाने सौरभकडे पाहत मान डोलवते. सौरभ व रिया हिंमत बांधून, नव्या जोमाने वाड्याबाहेर पडतात. जाताना साश्रु नयनांनी ते वाड्याकडे पाहतात, आणि एकमेकांचा हात घट्ट पकडुन ते जंगलाच्या दिशेने आपली वाट चालु लागतात.

सकाळची कोवळी किरणे धरतीला स्पर्शत असतात. पक्ष्यांचा मधुर किलबिलाट ऐकु येत असतो. सौरभ व रिया झपझप पावले टाकत असतात, त्यांना जंगलात पोहोचायचे असते. अखेरीस तासाभराने ते त्या जंगलात प्रवेश करतात. जंगल खुपच घनदाट असते. दिवस असुनही सुर्याची किरणे तिथे पोहोचत नसतात, एवढा गर्द अंधार असतो. सौरभ टॉर्च पेटवतो व त्या उजेडात ते सावकाश पावले टाकत पुढची वाट चालत असतात. रिया बोलत असते. "बापरे सौरभ. किती भयानक जंगल आहे हे?" सौरभ हसतो व रियाला पाहतो. "काय रिया घाबरलीस काय?" "नाही रे . उलट माझी उत्सुकता अजुन वाढली आहे येथे येऊन." रातकिड्यांचा किर किर आवाज घुमत असतो. रिया पुढे बोलते. "सौरभ अजुन एक गोष्ट सांगायची होती तुला." "कोणती?" "सौरभ मी त्या आक्रुती ला पाहिलं आहे." सौरभ दचकत विचारतो. "काय?" "होय सौरभ. तिचा चेहरा अस्पष्ट दिसत होता, पण तिचे केस विस्फारलेले दिसत होते." सौरभ ते ऐकून विचारात पडतो. "आर यु शुअर?" "अरे हो बाबा. शुअर." सौरभच्या डोळ्यासमोर गंगाभट्टांची प्रतिमा उभी राहते. "रिया जर असेल तर ती आक्रुती गंगाभट्टांची असणार नाही असं वाटतयं. पाहुया पुढे काय होतं ते?" सौरभ व रिया टॉर्चच्या उजेडात पुढे पुढे चालत असतात. गर्द अंधार, किर किर करणाऱ्या रातकिड्यांचा आवाज यामुळे त्या भयाण जंगलाला अजुनही भयानक रुप आलेले असते. तेवढ्यात सोसाट्याचा वारा वाहु लागतो, आणि भयानक गुज करीत दोन दिप्तीमान तेजोगोल आकाशात त्यांच्यासमोर भिरभिरत राहतात. सौरभ व रिया एकमेकांचा हात हातात धरुन तेथून पळत सुटतात, पण ते तेजोगोल भयानक आवाज करत त्या दोघांवर झडप घेतात. सौरभच्या हातातला टॉर्च खाली पडतो. त्या तेजोगोलातुन शक्तीपाश तयार होतात, व त्या दोघांना जखडण्याचा प्रयत्न करतात. सौरभवर त्या शक्तीपाशाचा परिणाम होत नसतो, पण त्याला जागचे हलताही येत नसते. रिया मात्र हळुहळु त्या शक्तीपाशात अडकत जाते. सोसाट्याचा वारा अजुनही वाहतच असतो. सौरभच्या डोळ्यांत मुर्तीमंत भिती दाटलेली असते, तो आपला हात कमरेला लावलेल्या अंगाऱ्याच्या पुरचुंडी कडे नेण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याला काहीच करता येत नसते. भितीने त्याच्या कपाळावर घाम जमलेला असतो. आता काय करू या विवंचनेत तो डोळे मिटतो, आणि अचानक एक दैदीप्यमान प्रकाशपुंज त्याच्या समोर येतो. सौरभचे डोळे उघडतात, त्या तेजपुंज प्रकाशात एक अत्यंत तेजस्वी व्यक्ती उभी असते. काही कळायच्या आत आपली योगशक्ती वापरुन ती व्यक्ती रियाला शक्तीपाशातुन मुक्त करते. सौरभही मोकळा होतो, तसे सौरभ व रिया आपल्याकडील अंगारा व मंतरलेले जल त्या दोन तेजोगोलांवर फेकतात, त्यासरशी भयानक गु़ज करत ते गोल आकाशात गायब होतात. सौरभ व रिया कपाळावरचा घाम पुसत त्या व्यक्तीला निरखुन पाहतात. तेजाची वलये त्याच्या सभोवती असतात. सौरभ खाली पडलेला टॉर्च उचलतो, व त्या प्रकाशात त्यांना त्या व्यक्तीचा चेहरा दिसतो, दोघेही अचंबित होतात. कारण समोर एकदंत पंडित उभे असतात. सौरभ व रिया त्यांच्यासमोर येतात. चकित झालेला सौरभ विचारतो. "एकदंत पंडित तुम्ही?' अतिशय शांत चेहऱ्याने सौरभकडे पाहत ते बोलतात. "होय सौरभ. मीच तो एकदंत पंडित. तुम्हांला संकटात पडलेलं पाहुन मला यावं लागलं." "पण तुम्ही या जंगलात कसे?" एकदंत पंडित हसतात. "सौरभ हे जंगलच आता माझे घर आहे. मी आता जिवंत नसलो तरी माझा आत्मा या जंगलात चुकलेल्या जिवांना योग्य वाट दाखवण्यासाठी फिरतो आहे. आज तुझी भेट झाली, आता माझ्या मुक्तीची वेळही जवळ आली आहे." सौरभ व रिया हात जोडून त्यांच्या पाया पडतात. सौरभ आपल्या मनातील शंका एकदंतांसमोर व्यक्त करतो. "एकदंत आता जो हल्ला आमच्यावर झाला तो कोणी केला होता? त्या काळ्या आक्रुतीबद्दल तुम्हांला काही माहिती आहे का?" एकदंत पंडीत गंभीर होत बोलतात. "सौरभ या प्रश्नांची उत्तरे तुला अजुन काही अंतरावर गेल्यावर समजतील. मला अभिमान वाटतो तुझा व रियाचा की संकटांना न घाबरता त्या रहस्यांचा उलगडा करण्यासाठी तुम्ही येथपर्यंत आलात. माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. आता ती वेळ आली आहे की त्या काळ्या शक्तीचा खात्मा कसा होईल हे रहस्य सांगण्याची. सौरभ, रिया या असे जवळ या." सौरभ व रिया जवळ जातात, तसे एकदंत त्यांच्या डोक्यावर हात ठेवत मंत्र पुटपुटतात. त्या शक्तीचा खात्मा करण्याचे त्या ग्रंथामधील रहस्य दोघांना समजते. सौरभ व रिया हात जोडून उभे असतात. एकदंत पंडित त्यांना आशीर्वाद देत बोलतात. "सौरभ, रिया. परमेश्वराने तुमची योजना केली आहे, त्या द्रूष्ट शक्तीचा खात्मा करण्यासाठी. घाबरू नका. आता सौरभच्या दंडात असलेल्या धाग्यामुळे तुम्ही दोघेही सुरक्षित आहात, पण कुठल्याही परिस्थितीत तो धागा दंडातुन काढू नका." सौरभ व रियाला पुढचा रस्ता दाखवुन एकदंत पंडित गायब होतात. सौरभ व रिया नव्या उत्साहाने पुढची वाट चालतात. चालता चालता त्यांना काही अंतरावर एक अग्निकुंड दिसत असतो, त्याच्या समोर बसुन कोणीतरी मंत्रपठण करत असते. समोरच आकाशात शक्तीपाशात कोणीतरी कैद असते. सौरभ व रिया सावकाश पावलांनी झाडीतुन लपुन पाहतात, आणि त्या व्यक्तीचा चेहरा पाहुन सौरभला मोठा धक्का बसतो.

अग्निकुंड धगधगत असतो, त्याच्यासमोर बसलेली व्यक्ती पाहुन सौरभचे डोळे विस्फारतात, तो रियाकडे पाहत पुटपुटतो, "जयराज?" रियाचेही डोळे आश्चर्याने विस्फारतात. सौरभ व रिया पाहत असतात, जयराज उभा राहुन त्या शक्तीपाशातील व्यक्ती कडे पाहुन मोठमोठ्याने हसुन बोलत असतो. "गंगाभट्ट अखेर माझी तपस्या सफल झाली, आता त्या सौरभला मी एका क्षणात नष्ट करेन. त्यासाठी आता तुमच्या मदतीची गरज भासणार नाही." गंगाभट्टांचा बंदिस्त आत्मा ओरडत बोलतो. "जयराजा, निचा. अरे अजुन किती बळी घेणार आहेस? या पापाच्या वाटेवर अखेर भयानक अंतच मिळतो." जयराज मोठ्याने ओरडत बोलतो. "गंगाभट्ट. आपली जिव्हा आवरा. माझा अंत. कोण करणार माझा अंत?" तेवढ्यात हिमतीने झाडीतुन पुढे येत सौरभ व रिया बोलतात. "आम्ही करणार आहोत तुझा अंत." जयराज डोळे गरागरा फिरवत त्यांच्याकडे पाहतो. "कोण? सौरभ तु?" "होय नीचा. मीच सौरभ पंडित. राक्षसा माझ्या आईबाबांना ठार मारलस? माझ्या मधुराला माझ्यापासुन हिरावलस? काय दोष होता त्यांचा, बोल काय दोष होता?". जयराज गडगडाटी हास्य करत बोलतो. "दोष? त्यांचा दोष एवढाच होता की ते पंडितांचे वारस होते, या ग्रंथाचे रक्षक होते. बाकी तुझ्या मधुराला मात्र मारावं लागलं मला. मला ....मला माफ कर. आता फक्त तुला व तुझ्या बायकोला संपवु दे. मला.....मला त्याची परवानगी दे. देशील ना?" रिया ओरडत बोलते. "नीच माणसा, पाप्या. तु वेडा आहेस. तुझ्यासारख्या राक्षसाला जिवंत राहण्याचा काहीच अधिकार नाहीये." जयराज भयंकर गुरगुरत रियावर शक्ती सोडतो, पण तिला काही होत नाही. "तुमची मंतरलेली धाग्याची ताकद मला रोकु शकणार नाही. मी सैतान आहे, सैतान. बस थोड्या वेळातच तुला तुझा अंत दिसेल सौरभ. त्याआधी माझी कहाणी सांगायला नको?" सौरभ त्वेषाने मुठी आवळत बोलतो. "बोल सैताना, काय काय केलयसं तु?" जयराज प्रचंड मोठ्याने हसत बोलतो. "त्या दिवशी गंगाभट्ट तो ग्रंथ घेऊन मठामध्ये आले, तेव्हा मी समोर होतो." "जयराज बघ शेवटी चिंतामण पंडितांकडून तो ग्रंथ मी मिळवलाच." "होय मालक. शेवटी तुमच्या विद्वत्तेसमोर कोणाचा निभाव लागणार आहे? "बस आता माझ्या ध्यानकक्षात बसुन मी याचे वाचन करेन, तुझ्याव्यतिरिक्त तिथे कोणी आलेलं मला चालणार नाही." "होय मालक." त्या दिव्य ,शक्तीशाली ग्रंथाची चमक माझ्या डोळ्यांत होती. त्यानंतर नित्यनेमाने गंगाभट्ट तो ग्रंथ वाचत होते, अन एक दिवस...... "जयराज, जयराज. कुठे आहेस तु? हे पाहा अखेरीस ते रहस्य मला समजले, पाहा जयराज. जयराज.....जयराज." पण मला तो ग्रंथ आता हवाच होता, गंगाभट्टांना ते रहस्य समजले होते, आता........मी एक धारदार सुरा घेतला आणि त्यांच्या मागे उभा राहिलो, माझी समयीच्या उजेडातील सावली गंगाभट्टांना दिसली, मागे वळुन त्यांनी पाहिल नाही. "जयराज, मी खुप आनंदी आहे बघ. आता माझं स्वप्न पुर्ण होणार." अचानक गंगाभट्टांनी मागे वळून पाहिले आणि तो सुरा मी त्यांच्या पोटात खुपसला, गंगाभट्ट भयंकेने ओरडत होते. "जय...जय...जयराज. का....काय केलसं तु हे?" "मी तेच केलं गंगाभट्ट, जे यापुर्वी करायला पाहिजे होते. आता मी तुमचा वापर करुन पंडित घराण्याचा विंध्वस करणार. आणि....आणि त्या ग्रंथाच्या शक्तींनी अमर....अमर होणार" जयराज गडगडाटी हसतो, आणि अजुन एकदा तो सुरा गंगाभट्टांच्या पोटात खुपसतो. विव्हळत गंगाभट्ट आपला प्राण त्यागतात. तसाच तो रक्ताळलेला सुरा घेऊन मी एकदंत पंडितांच्या मठासमोर येतो. भर पावसात मला आलेले पाहुन एकदंत पंडित बाहेर येतात. माझ्या हातातील रक्ताळलेला सुरा पाहुन ते हडबडतात, व भयभीत होत विचारतात. "जयराज, काय हे? हा सुरा तुमच्या हातात कसा?" "एकदंत माझ्याकडून घोर अपराध घडला आहे, मी......मी गंगाभट्टांचा खुन केला." वीज चमकावी तसे ते शब्द एकदंतांच्या कानावर पडतात. विस्फारलेल्या डोळ्यांनी ते मला पाहतात. "जयराज, तुम्ही....तुम्ही आत या बघु. आपण शांतपणे बसुन बोलुया." कावेबाज पणे हसतच मी एकदंतांच्या मठात प्रवेश करतो. जाताना त्यांच्या छोट्या मुलीवर माझी नजर पडते, ती तिथेच खेळत असते. काही अनुयायी भयाने माझ्याकडे पाहत असतात. एकदंतांसमोरच्या खुर्चीत मी बसतो, आणि तो सुरा समोरच्या टेबलावर ठेवतो. बाजुला पाहत नजरेनेच मी माझ्या माणसाला इशारत केलेली असते, जी कोणाच्या लक्षात आलेली नसते. एकदंत पंडित बोलत असतात. "जयराज, काय झालयं? तुम्ही खरोखरच गंगाभट्टांचा खुन केलात?" "होय एकदंत. माझ्या हातुन नकळतच हा अपराध झाला." एकदंत हैराण होत पाहत असतात, जयराजची मान खाली असते, ती वर करत तो हसत बोलतो. "पण आणखी एक अपराध केला, तर माफ करणार ना मला?" एकदंताना काही न समजल्यामुळे ते विचारतात. "म्हणजे?" तेवढ्यात माझा माणुस त्या मुलीला पकडुन आणतो, तिच्या मानेवर सुरी ठेवत जयराज बोलतो. "एकदंत त्या ग्रंथातुन मला सैतानी शक्ती कशा मिळवता येतील ते सांगा, नाहीतर..... नाहीतर या मुलीचं मुंडक छाटेन मी." "जयराज काय करताय हे?" "गप्प बसा. माझ्या प्रश्नाचे उत्तर दया एकदंत." एकदंत घाबरुन खाली पाहतात, पण ठामपणे बोलतात. "नाही, ती रहस्ये मी तुला सांगणार नाही. समाजाचे रक्षण करणे हे माझं कर्तव्य आहे. क्रुपा करुन माझ्या मुलीला सोडा." जयराज मोठ्याने ओरडतो. "एकदंत पंडित......" आणि पाहताक्षणीच त्या मुलीचे मुंडके धडावेगळे करतो. एक भयंकर किंकाळी त्या मठात घुमते. विजांचा कडकडाट वाढु लागतो, पावसाचाही जोर वाढलेला असतो. कातरवेळेची छाया त्या मठावर पसरलेली असते. ढसाढसा रडत एकदंत गुडघ्यावर बसतात. बाकीचे अनुयायी थिजल्यासारखे जागीच उभे राहतात. तेवढ्यात रमाबाई येताना दिसतात. जयराज तो सुरा उगारत एकदंतांना सांगतो. "लक्षात ठेव एकदंता. येथे काय घडलं, आणि पुढे काय घडणार याबद्दल रमाबाईंना काही कळता नये, नाहीतर तुझ्या या अनुयायांचीही अशीच गत होईल." जयराज त्या माणसाकरवी त्या मुलीचे प्रेत लपवतो. पावसाच्या पाण्याने रक्ताचे डाग वाहून जातात. जयराज लपुन त्या दोघांना पाहत असतो. बाकीचे सर्वजण खिळल्यासारखे स्तब्ध राहतात. एकदंत रमाबाईंना आतल्या ध्यानकक्षात घेऊन जातात, काहीतरी दगाफटका होणार अशी शंका त्याला येते, पण नंतर कुटिल हास्य करत तो ती शंका मनातुन झटकुन टाकतो. बऱ्याच वेळानंतर रमाबाई ध्यानकक्षातुन बाहेर पडतात, व निघुन जातात. जयराज त्वरेने एकदंतांकडे येत विचारतो. "काही सांगितलं नाही ना रमाबाईंना?" "जयराज, त्या माझ्याकडे वाड्याच्या सुरक्षेच्या उपायांसाठी आल्या होत्या . तेवढं काम मी केलं." जयराज कुत्सितपणे हसत उठतो. "एकदंता तु आणि रमाबाई कितीही प्रयत्न करा, प्रारब्ध बदलणार नाही." एकदंत भयचकित होत त्याच्याकडे पाहतात. "एकदंत आता पाहा मी काय करतो ते." जयराज भर पावसात भिजत मठाच्या अंगणात येतो, आणि दोन्ही हात विस्फारत मंत्र पुटपुटतो, अचानक सोसाट्याचा वारा वाहु लागतो, आणि विजेच्या वेगाने गंगाभट्टांचा आत्मा जयराजच्या सैतानी शरीरात प्रवेश करतो. भयंकर वावटळीसारखा आवाज करत जयराज त्या शक्ती चिंतामण पंडितांच्या वाड्याकडे सोडतात. रमाबाईंच्या आधी त्या शक्ती तिथे पोहोचलेल्या असतात, आणि घडते एक थरारनाट्य. परंतु ऐनवेळी भयंकर जखमी होऊनही वाघिणीसारखी डरकाळी फोडत रमाबाई त्या शक्तींना बंदिस्त करते. जयराज शक्तीहीन बनतो. तो आक्रोश करत असतो, पण अजुनही तो ग्रंथ त्याच्याकडेच असतो. दरम्यान एकदंत पंडितांचा म्रुत्यु होतो. जयराजला रोकु शकणार कुणीच उरत नाही, आता त्याला त्याच्या शक्ती पुन्हा मिळवायच्या असतात. पंडितांचा संपूर्ण नायनाट झाला असे वाटत असताना मला या सौरभची चाहुल लागते. याला संपवणं गरजेचं आहे हे मला समजतं, पण त्यावेळी शक्ती अर्जित करताना मला कुठेही जाता येणार नसते. अखेरीस माझी तपस्या फळाला येते, एका भयाण रात्री मी माझे मस्तक सैतान देवतेला अर्पण करतो, आणि सैतान देवता प्रसन्न होऊन प्रकट होते. गंगाभट्टांचे मस्तक कापुन मी त्यासाठीच ठेवलेले असते. सैतान देवता मला काही शक्ती बहाल करते, आणि तो मंत्र सांगते, ज्यायोगे त्या झाडात बंदिस्त असलेल्या काळ्या शक्तीला मी मुक्त करु शकणार होतो. आणि त्या भयाण रात्री सैतान देवतेच्या सांगण्यावरुन मी त्या झाडापाशी आलो, हातातले गंगाभट्टांचे मस्तक खाली ठेवले, व मंत्र पुटपुटत त्या झाडाभोवती फेऱ्या मारल्या. माझ्या रक्ताचा अभिषेक त्या धाग्यांवर करताच ती बंधने मोकळी झाली. गंगाभट्टांच्या मस्तकात सैतानाने प्रवेश केला, आणि या साऱ्या शक्ती माझ्यात प्रविष्ट झाल्या. तरीही मला पुर्ण सैतान बनणे बाकी होते. मी या जंगलातच माझी तपस्या चालु ठेवली, व त्या काळ्या शक्तीला वाड्यावर पाळत ठेवण्यासाठी पाठवले. मला विश्वास होता, त्या वाड्याचा शोध घेत हा सौरभ तिथे नक्की येणार. आणि त्याला संपवुन मी कायमचा अमर होणार. पण.....त्या एकदंताने घोळ घातला, आणि तो मंतरलेला धागा तुला दिला, त्यामुळेच आजवर तु वाचला आहेस. खरतर....खरतर त्या एकदंताला तेव्हाच संपवायला पाहिजे होतं" रिया त्वेषाने बोलते. "जयराज ज्याच्या मस्तकावर आईचा आणि खुद्द परमेश्वराचा हात आहे, त्याला तुच काय कुठलाही राक्षस काही करु शकणार नाही." जयराज क्रोधाने गुरगुरतो. "पाहुयाच तर मग तुम्हांला तुमचा परमेश्वर कसा वाचवतो ते?" जयराज शक्तीपाशात बध्द असलेल्या गंगाभट्टांचा आत्मा स्वतः मध्ये प्रविष्ट करतो, आणि भयंकर गर्जना करत वावटळीसारख्या काळ्या शक्तीने त्या दोघांवर हल्ला करतो. रिया त्याचा मारा चुकवत खाली पडते, पण सौरभवर ती शक्ती आदळते. अचानक ती काळी शक्ती सरसरत मागे जाते, आणि मागे उभ्या असलेल्या जयराजवरच आदळते, तसा तो खाली कोसळतो. जयराज त्वेषाने उठुन उभा राहतो, आणि आता तो सौरभवर हल्ला करणार की त्याला सौरभमध्ये एकदंत पंडित व चिंतामण पंडितांचा भास होतो. सौरभच्या शरीरात एकदंत पंडित व चिंतामण पंडितांच्या आत्म्यांनी प्रवेश केलेला असतो. जयराज गरागरा डोळे फिरवत सौरभवर हल्ला करतो, सौरभ तो हल्ला परतवुन लावतो. त्या दोघांमधील तुंबळ युध्दाला सुरवात होते. ते एकमेकांवर शक्तीकिरणे सोडत असतात. त्याच दरम्यान जयराज ची नजर चुकवुन रिया त्या ग्रंथाकडे पोहोचते. जयराज व सौरभ युध्दात मग्न असतात. एकदंतांनी सांगितल्याप्रमाणे स्मरण करत ती त्या ग्रंथाचे ३७,४५ व ५५ नंबरची प्रुष्ठे उघडत त्याच्यावर असलेल्या छोट्या त्रिशुलाशेजारचे अवघड मंत्र वाचते. त्या तिन्ही प्रुष्ठांवरील अवघड मंत्रांना स्मरण करुन एकाचवेळी डोळे मिटुन तो मंत्र पुटपुटायचा असतो. हे काम तेवढं सोपं नसतं, कारण ते मंत्र स्मरणात ठेवणे हे कोणत्याही विद्वानालाही शक्य होणारे नसते. परंतु या वेळी मात्र रियासोबत देवाची साथ असते. रिया तो मंत्र एकत्रितपणे पुटपुटते. इकडे जयराजने भयानक शक्ती सौरभवर सोडलेली असते, त्यामुळे शक्तीहीन होऊन तो खाली कोसळलेला असतो, त्याला तसं पाहुन मोठमोठ्याने हसत जयराज बोलत असतो.

"हा हा हा हा हा. सौरभ पाहिलीस माझी शक्ती? अरे माझ्यासमोर एकदंत पंडित, चिंतामण पंडित टिकु शकले नाहीत, तिथे तु काय करणार आहेस? मी आत्ताच तुला संपवतो." जयराज वेगाने त्याच्यावर हल्ला करणार तेवढ्यात सोसाट्याचा वारा सुटतो, आणि सर्वत्र डोळे दिपवणारा प्रकाश पसरतो. तो दिव्य ग्रंथ हवेत काही अंतरावर वर उचलला जातो, आणि प्रचंड गडगडाट करत भव्य डमरुमंडित त्रिशुल समोर प्रकट होते. विस्फारलेल्या डोळ्यांनी जयराज तिकडे पाहतो. सौरभ उठून उभा राहिलेला असतो. रियाच्या शरीरात रमाबाई व मधुराचे आत्मे प्रवेश करतात, तशी रणचंडिकेसारखी गर्जना करत रिया तो त्रिशुल उचलत जयराजवर फेकते. क्षणार्धात जयराजचे मस्तक धडावेगळे होते. प्रचंड स्फोट होतो, आणि त्यात कैद असलेला गंगाभट्टांचा आत्मा मुक्त होतो. आजुबाजुचे वातावरण निवळते. सौरभच्या शरीरातुन एकदंत पंडित व चिंतामण पंडितांचे आत्मे बाहेर येतात, तर रियाच्या शरीरातुन रमाबाई व मधुराचे आत्मे बाहेर येतात. चौघांचे आत्मे प्रेमाने त्यांच्याकडे पाहत मागे जातात. सौरभ व रियाचे डोळे पाणावलेले असतात. आपल्या दोन्ही हातांनी त्या दोघांना ते आशीर्वाद देत असतात. एक दिव्य प्रकाश शलाका येते, आणि पाहत पाहता ते गायब होतात. सौरभला हुंदका अनावर होतो, रिया त्याच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवते. तेवढ्यात हात जोडत गंगाभट्ट सौरभकडे येतात. आपल्या डोळ्यांतुन ओघळणारे अश्रू आवरत ते रडवेल्या स्वरात सौरभच्या पाया पडत बोलतात. "मला माफ कर सौरभ, मी तुझा अपराधी आहे. माझ्या लालसेमुळेच हे सर्व घडले आहे." सौरभ व रिया हातानेच त्यांना वर उठवत बोलतात. "गंगाभट्ट जे झालं ते झालं. आता फक्त तुमचा शुभार्शिवाद द्या. हेच तुमचं प्रायाश्चित आहे." गंगाभट्ट ढसाढसा रडत प्रेमाने त्यांना आशीर्वाद देतात. आणि मागे मागे जात गायब होतात. सौरभ व रिया आपले अश्रू आवरतात, आणि तो ग्रंथ घेऊन बऱ्याच आठवणी मनात साठवुन वाड्याकडे परतात. त्यानंतर सौरभ त्या वाड्याची डागडुजी करतो, आता तो वाडा पुन्हा हसणार खेळणार असतो. वास्तुप्रवेश करुन ते वाड्यात प्रवेश करतात. तो दिव्य ग्रंथ कपाटात सुरक्षित ठेवतात. आता खऱ्या अर्थाने त्यांच्या नवीन आयुष्याला सुरवात झालेली असते.


By Sameer Shashikant Vengurlekar





Recent Posts

See All
Warden's Rite

By Jazzanae Warmsley Set in Tiremoore, a parallel 21 st  century realm where magic governs justice and resurrection is never without consequence. Warden’s Rite (Chapter 1) In the twilight-bound city o

 
 
 
Abyssal Light Part 1: Still

By Drishti Dattatreya Rao Nina:   I opened my eyes. Another day. Tiring – I couldn’t even get out of my bed. I rolled over and fell off the bed. Somehow, it broke. Ugh, every day is such a pain. I hav

 
 
 
The Girl At The Well

By Vishakha Choudhary Phooli was unhappy. She had already been to the well twice today. And the first time around, she had to carry an extra bucket of water at top of her two matkas. The second round

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
  • White Instagram Icon
  • White Facebook Icon
  • Youtube

Reach Us

100 Feet Rd, opposite New Horizon Public School, HAL 2nd Stage, Indiranagar, Bengaluru, Karnataka 560008100 Feet Rd, opposite New Horizon Public School, HAL 2nd Stage, Indiranagar, Bengaluru, Karnataka 560008

Say Hello To #Kalakar

© 2021-2025 by Hashtag Kalakar

bottom of page