बाभूळप्रेम-एक प्रेमकहाणी
- Hashtag Kalakar
- Apr 27, 2023
- 3 min read
By Sameer Shashikant Vengurlekar
त्या बाभळीच्या जीर्ण झाडाखाली एका जीर्ण बुंध्यावर ओढ्याचे खळाळणारे पाणी पाहत संजा व शारदा बसले होते. जंगलाकडुन पहाटेचा येणारा गार वारा शारदेला सुखावत होता. संजा त्या बुंध्यावरुन उतरुन त्या बाभळीच्या झाडाखालचे छोटे छोटे दगड ओढ्याच्या पाण्यात फेकत उठणारे तरंग पाहत होता. आकाशात पहाटेच्या समयी पक्षी चारा आणण्यासाठी लयबध्दरित्या उडत होते. शारदेची भिरभिरणारी नजर तिकडे वळली.
"काय रं संजा ते आकाशातले पक्षी बघितले का? किती उंचावरनं जातायेत. त्यांना आपल्या घरची दिशा कशी कळतं असलं रं?"
हातातले छोटे दगड भिरकावत संजा बोलतो.
"आता ते मला काय माहित? मी काय पक्षीतज्ज्ञ हाय होय?"
तशी त्या बुंध्यावरुन अलगद खाली उतरत बाभळीच्या झाडाकडे उभी राहून संजाला निरखत शारदा बोलते.
"तसं न्हाय रं. आपल्या दोघांच्या प्रेमाची बात पण अशीच हाय, त्या पक्ष्यांवानी स्वच्छंद."
मागे वळुन पाहत तरातरा शारदेकडे येत तिच्या नजरेत नजर मिळवून संजा बोलतो.
"अस्स मग अशी प्रीत अखेरपर्यंत सुटायची नाय बग."
संजा हळुवार शारदेचा हात हातात घेतो, पण त्याचा हात बाजुला करत खाली मान घालुन उदास स्वरात शारदा बोलते.
"होय रं संजा. पण मला जावं लागेल रे. बाबांनी शहरात माझं पुढचं शिक्षण ठरवलय बघ."
काहीसा उदास होत ओढ्याकडे पाहत संजा बोलतो.
"म्हणजे आता तु मला इसरशील, व्हय ना?"
शारदा दु:खावेगाने संजाला मिठी मारते.
"नाय र संजा. अरं आपलं प्रेम अळवावरचं पाणी हाय होय, ते खर हाय. एकदम खरं. या बाभळीच्या झाडाखालीच आपलं प्रेम बहरलं, आणि ते पुर्ण बी व्हणारं. म्या शहरातुन आल्यावर आपण लगीन करायचं संजा. "
भावनावेगाने दोघेही एकमेकांना मिठी मारतात व बराच काळ त्यात बध्द राहतात. उगवतीचा सुर्य माथ्यावर आला होता.
ऋतु बहरत चालले होते. पावसाचे थेंब तहानलेल्या धरतीला त्रुप्त करत होते. बीज अंकुरत होते, त्याला नवीन धुमारे फुटत होते. वैराण जमिनीवर हिरवा गालिचा अंथरुन आला होता. ते बाभळीचे जीर्ण झाड अजुनही उभे असते, जणु ते कोणाची तरी वाट पाहत असते. पण आता ते बरेच कललेले असते.
पहाटेच्या कोसळणाऱ्या पावसातुन एसटीचा लाल डबा येऊन उभा राहतो. कंडक्टर ओरडतो,'घाटकरगांव'. तशी डोळे किलकिले करत आपल्या सिटवरुन उठत शारदा बसमधुन बाहेर पाहते. या सहा महिन्यांत गावात काय काय बदल झाले, त्याचा अंदाज घेत छत्री सरसावुन ती खाली उतरते. पावसाचा जोर ऐरणीवर असतो, पण तशीच खालच्या रपरप चिखलातुन वाट काढत ती चालत असते. जाताना तिचे लक्ष दुरवरच्या त्या बाभळीकडे जाते.संजाच्या आठवणीने तिच्या मनात खळबळ माजते. एवढ्या दिवसात तिला त्याला भेटताही आलेलं नसतं. आपली छत्री सावरत तिची पावले त्या झाडाकडे वळतात. त्या झाडाला टेकुनच हुबेहुब शारदेसारखी वाटावी अशी गवताची छोटीशी बाहुली ठेवलेली असते. तशीच छञी बाजुला टाकत कोळणार्या पावसाची तमा न बाळगता ती त्या बाहुलीला उचलते. हास्याचे तरंग तिच्या चेहऱ्यावर उमलतात. "संजा"म्हणत तिचे आतुर डोळे संजाला शोधत जातात.
ती घरी येते. पण तिची ओढ मात्र संजाकडे असते. कुठं आहे तो? मला काभेटला नाही? मध्यान्हीचा सुर्य माथ्यावर आलेला असतो, शारदा घरातुन तशीच बाहेर पडते, व पळत पळत बाभळीच्या झाडाकडे येऊन उभी राहते. तिचा संजा तिथे तिची वाट पाहत असेल, असेच तिला वाटते. पण तिथे कुणीच नाही असे पाहून ती "संजा,संजा"हाका मारायला सुरवात करते.
बराच वेळ होतो, आणि औत खांद्यावर टाकून गुरांना घेऊन घराकडे परतणाऱ्या पंढरीची नजर शारदेवर पडते. संजासाठी व्याकुळ झालेल्या त्या शारदेच्या पाठीमागुन येत तो खांद्यावर हात ठेवतो.
"पोरी संजाला शोधतेस व्हय?"
"व्हयं कुठं कुठं हाय तो?त्याला म्हणाव बघ त्याची शारदा परत आलीया."
आपले म्हातारे मिचमिचे डोळे पालथ्या मनगटाने पुसत पंढरी खाली मान करून बोलायला सुरवात करतो.
"पोरी बराच उशीर केलास बघ तु. आपला संजा कायमचा हे जग सोडून गेला."
पंढरीच्या अश्रूंचा बांध वाहू लागतो. मस्तकावर घणाघात व्हावा तशी किंचाळत शारदा बोलु लागते.
"नाय नाय असं व्हणार नाय. माझा....माझा संजा मला भेटल्याबिगर असा कसा जाणार?"
"हे खरं हाय पोरी, हे खरं हायं. आज बराबर चार दिवस झाले बघ त्याला जाऊन. सारखा शारदा, शारदा करत व्हता. आम्ही शहरात तुला सांगावा धाडायचा बराच प्रयत्न करुन पाहिला, पण तु काय आम्हांला गावली न्हाय."
हे ऐकणारी शारदा गर्भगळीत होत धपकन गुडघ्यावर खाली बसते. "संजा"म्हणून काळीज पिळवटुन टाकणारी तिची किंकाळी सारा आसमंत भेदून जाते. त्या आवाजाने आकाशातील पाखरेही सैरभैर उडु लागतात. दूर डोंगरमाथ्यावर सूर्य अस्ताला आलेला असतो. पंढरी केव्हाच निघुन गेलेला असतो. त्या बाभळीच्या झाडाकडे फक्त शारदा आणि ती बाहुली शिल्लक असते.
शारदा निष्प्राण असल्यागत ती गवताची बाहुली उचलते, व तिला निरखुन पाहत असताना उभ्या उभ्या खाली कोसळते. अर्धवट ग्लानीत तिच्या तोंडातुन"संजा"च्या नावाचा जप चालु असतो. तेवढ्यात सोसाट्याचा वारा वाहु लागतो आणि कललेले ते बाभळीचे झाड मुळातुन उपटुन तिच्यावर कोसळते. शारदेच्या हातातील बाहुली बाजुला पडते. बाभळीचे जीर्ण खोड लाल रंगाने माखते. तो रंग फक्त रक्ताचा नसतो. तो रंग असतो एका खऱ्या प्रेमाचा, खऱ्या विश्वासाचा.
.................................समाप्त...................................
By Sameer Shashikant Vengurlekar

Comments