top of page

पेंच अन नागपूर 2

Sep 30, 2022
3 min read

By Amey Kshirsagar




12 जून 2022

दुसऱ्यादिवशी पहाटे पाचला आम्ही परत सफारीसाठी "तुरीया गेटवर" आलो.. परत एकदा जंगलात निघालो..हे जंगल खुरसापार पेक्षासुद्धा जास्ती नयनरम्य आहे..वाघ-गवे या व्यतिरिक्त खूप सारी हरणं, सांबर,जंगली कुत्री,मोर, नाना तऱ्हेचे पक्षी इथं बघायला मिळतात...

या जंगलाशी संबंधित आपल्या सर्वांची जवळची असणारी आठवण म्हणजे, "चड्डी पेहनके फुल खिलवनेवाला मोगली".



कोण्याएका "लेफ्टनंट जॉन मूर"ने एका मुलाला पकडलं. हा मुलगा "सिवनी" प्रातांतल्या कोल्ह्यांच्या कळपात राहायचा..तसच "रॉबर्ट स्ट्रेन्डल" वगैरेनी, "सातपुडा" बद्दल जे लिहीलं, त्यावरून प्रेरणा घेऊन कधीही या भागात न फिरकता "रुडीयार्ड किपलिंग"नी जन्माला घातलेलं "जंगल बुक" याच जंगलावरून.

यावेळी जंगलानं आम्हाला भरभरून द्यायचं ठरवलं होतं..

पिसारा फुललेला मोर, हळद्या, जंगल चर्पलर, खंड्या, लांडगे, जंगली कुत्रे,हत्ती आणि एकसे एक देखणे चार वाघ निरनिराळ्या ठिकाणी आम्हाला दिसले.. एकूणचं नशीबवान होतो यावेळी आम्ही..


हे सगळं बघत "उन्हं डोक्यावर येणं" म्हणजे काय हे खऱ्या अर्थाने कळू लागलं.. वाघ जेवढा जवळ आला त्यापेक्षा जास्त जवळ सुर्य आला असावा असं वाटायला लागलं.. सफरीची वेळीसुद्धा संपायला लागली. आम्ही परत फिरून तुरीया गेटच्या पलीकडेच आमच्या रिसॉर्ट ला पोचलो..


नागपूरकडे

दुपारीच मोनू भाई चं हॉटेल सोडलं आणि नागपुरला पोचलो.. नुकतंच भरपेट झालेलं जेवण, त्यावरून मस्त मलई ताक आणि AC गाडी यामुळं अंमळ झोप लागली.. नागपुरात केव्हा प्रवेशलो कळलंसुद्धा नाही.

मेघाला बऱ्यापैकी नागपुरची माहिती आहे आणि रमानं आधीच, "मला काही नाही आठवत आता!" म्हणून तलवार म्यान केलेली.. इकडे मी नागपुरात पहिल्यांदा आलेलो.. मी मौन धारण केल्यानं, मेघानं नाईलाजानं, माझ्याऐवजी google मॅप्सशी वाद घालत-घालत अंततः इच्छित स्थळी, म्हणजेच सीताबर्डी मधल्या एका हॉटेलमध्ये पोचवलं..


"हॉटेल टाऊन-हाऊस"चा अनुभव एकूणच मजेशीर होता.. चेक-इन करताना अजूनही मेघाची कागदपत्रे "देशमुख"च का यावर, आणि त्यानंतर तुमची म्हेवणी तुम्हा दोघांच्या खोलीत का यावर वाद घालून झाला.. शेवटी कुठल्या कायद्याच्या कुठल्या कलमान्वये तुम्ही अडवताय वगैरे "वकिलीणबाई" बोलल्या आणि बिचाऱ्या रिसेपशनिस्टनी घाबरून मॅनेजरला पाचारण केलं..

शेवटी त्यांनी "हॉटेल-पोलिसी" या भंपक नावाखाली लग्नाची पत्रिका लग्न झाल्याची पावती म्हणून घेतली.. "पत्रिका दिलीच आहे तर आहेराची ओटी तरी भरा लेको", असं मी म्हणणार तेवढ्यात आता फार वेळ ही ब्याद नको सोबत, असा विचार करत, त्यानं स्वतःची आणि आमची सुटका केली आणि खोल्या दाखवायला घेऊन गेला.

आम्ही साधारणपणे 3 4खोल्या बघून शेवटी नक्की केलेल्या खोलीचा ताबा घेतला.. येताना झालेल्या विश्रांतीमुळे, आता आवरून लगेच फिरायला बाहेर पडू, असा विचार करत बाथरूम मध्ये आवरायला गेलो, आणि नळ हातात घेऊन बाहेर आलो..

त्याची आमची आम्हीच कामचलाऊ दुरुस्ती करून, कसतरी करून आवरून बाहेर पडलो आणि त्या हॉटेल मॅनेजरनी सुटकेचा निःश्वास टाकला..

"नागपुरात अमूकठिकाणी आम्ही खरेदीसाठी जायचो", असं 3 4वेळा सांगून झालं होतच.. नवीन असलो, तरी हळूहळू आता असे “इंडिकेशन” मला कळायला लागले आहेत.. मग ते मार्केट "फ़क्त" बघायला म्हणून जाऊन 4 5गोष्टी "घेऊन" बघितल्या.. येताना "हल्दीराम"ची कचोरी पाणीपुरी,फेमस,रसगुल्ला वगैरेवर ताव मारून आईस-क्रिम आणि मिल्कशेक पिता पिता परत हॉटेल आलो तर इथं वेगळंच वाढून ठेवलेलं..

आम्ही लिफ्टमध्ये आत जातोय तेवढ्यात मेघा आणि रमा घाबरून किंचाळल्या.. त्या दोघी घाबरून आणि मॅनेजर खजिलपणे माझ्याकडं बघत होता.. बघितलं तर स्वयंपाक घरातून आलेला एक उंदीर पळत पळत रिसेपशन च्या टेबल मागे जाऊन बसला.. या सगळ्यात चटकन,मी त्या मॅनेजरला अनपेक्षित असणारा प्रश्न विचारला ,

-"अरे वा, काय नाव ठेवल आहेस रे तुझ्या पाळीव प्राण्याचं? त्याला बांधून ठेव बरं का रात्री,नाहीतर घुसायचा आमच्या खोलीत..तुला तीन जण नाही चालत, अजून चौथ्याला पाठवून गर्दी नको.. आणि त्याचं आधारकार्ड पण नाहीये.."त्याला अगदी मेल्याहून मेल्यासारखं झालं..

3 4वेळा सांगितल्यानंतर रूममध्ये जादाची गादी घेऊन एक इसम अवतरला.. आम्ही, गादी अशी घालावी की तशी, वगैरे आपसात बोलत असताना त्या बहुबलीनं खांद्यावरून आणलेली गादी धाडकन फेकून आमचे प्रश्नच संपवले.. वरून त्यानं बेडशीट अंथरताना जड आवाजात मलाच ऑर्डर केली,"जरा दुसऱ्या बाजूनं धरा तिकडे..."

मी बेडशीट धरत त्याला,"मला अजून एक उशी लागेल असं सांगितलं होतं", वगैरे सांगायचा एक जुजबी प्रयत्न केला. "मला काही सरानी सांगितलं नाहिये, ते खाली सांगा जाऊन" असं म्हणत हा बाबा आल्या वाटेनं परत गेला....हा पूर्वी zp, सिव्हिल हॉस्पिटल किंवा तत्सम सरकारी विभागात कामाचा दांडगा अनुभव घेऊन आला असावा..

शेवटी आहे त्या परिस्तितीत एकूण दिवसभरातल्या प्रसंगांवर नजर फिरवत स्वतःवर हसत आम्ही केव्हा तरी शांत झोपी गेलो..

-अमेय क्षीरसागर

12/06/2002

क्रमशः



By Amey Kshirsagar




Recent Posts

See All
Kannikonna

By Deepa Santosh കേരളത്തിന്റെ ഔദ്യോഗിക പുഷ്പമായ കണിക്കൊന്നയുടെ ദർശനവും സ്പർശനവും സൂക്ഷ്മമായപ്പോൾ അവളിൽ അന്തർലീനമായ നിരവധി ഭാവങ്ങൾ ചിറകുവിടർത്തി... നവനീതചോരന്റെ നറുപുഷ്പവും നവരസങ്ങളും കാർമ

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page