पेंच अन नागपूर
By Amey Kshirsagar
11 जून
मेघा शिकायला 2 वर्ष तिच्या बाबांच्या बदलीमुळे नागपुरात होती. इथे साधारणपणे 2009 साली तिला "निनाद -अमृता" भेटले. तिच्या सोबत BA करताना होते. नंतर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देताना अभ्यास करायला आणि आता तर तिघांनी एकत्र इन्स्टिट्यूट पण सुरू केलंय..
मैत्री पासून सुरु झालेला हा सिलसिला मेघा बाबत व्यवसाईक भागीदारीपर्यंत आला.. तर या दोघा पठ्यांनी अजून पुढे एक वळसा घेऊन सिलसिला असाच पुढे नेऊन प्रेम आणि लग्न इथे पर्यंत पुढे आणून ठेवला.. त्याचेच साक्षी होण्यासाठी म्हणून नागपूर यायचं ठरलं. आमच्या लग्नाच्या आधी 4 महिने हे लग्न करणार होते ते आमच्या लग्न नंतर 7 महिन्यांनी करतायत..
हा “निनाद” अवलिया आहे.. 6फूट 2इंच उंची आणि उंचीला साजेल धिप्पाड देह.. बास्केटबॉल खेळाडू आहे... भरपूर वाचतो..ग्रॅज्युएशन सायकॉलॉजीचं, भविष्य, ग्रह, राशी,पत्रिकेचा उत्तम अभ्यास आणि आयुर्वेदाची सखोल माहिती; या सगळ्यामुळे अनलिटीकेल आहे.. यामुळं त्याला माणूस चट्कन ओळखता येतो.. अगदी शांतपणे हळू आवाजात, थोडंस कोरडं वाटेल असं, मान थोडी पुढे काढून आणि वर करून बोलायची लकब.. मग सहजच तुझी रास अमुक, त्यातून अमुक ग्रह अमुक स्थानात आहे त्यामुळे तुझी सायकॉलॉजी अशी आहे.. जरा हा अवयव जपायला लागेल.. आर्युवेदात त्यावर अमुक उपाय आहे त्यामुळे थोडं पथ्य पाळत जा आणि हे एक चूर्ण आहे ते घेत जा असं काही तरी गप्पांच्या ओघात येतं..
“अमृता” पण त्याला साजेशी.. अगदी शारीरिक दृष्टीने सुद्धा… घर सगळं नागपुरातल्या अस्सल संघाशी जोडलेलं, त्यामुळं वैचारिक बैठक सगळी त्या धाटणीची.. ती सुद्धा चांगलं वाचते. तिच्या घरच्यांनी ठरवून तिला भरपूर प्रवास करवला आहे..तिनं खूप गोष्टी बघितल्या आहेत, अनुभव घेतले आहेत. खूप माहिती असते तिला..
"नाही मेघाss..ते नं.. खरं तर असं आहे की..." असं मान लटकवून थोड्या कमी वेगात प्रत्येक शब्दावर जोर देऊन शुद्ध उच्चारात बोलायला सुरुवात झाली की कमीतकमी अर्ध्या-पाऊण तासाची निश्चिनती..
तेव्हा आता सांगली मधून यायचं तर फक्त लग्नाला जायच्याऐवजी मग आजूबाजूला फिरायचं, अन आमच्या लाडक्या, एक दंगेखोरमित्र म्हणा, सिनियर म्हणा पंकज भैया; (भैय्या हे त्यांचं आडनाव आहे) सोनिया भाभीना भेटायचं असा प्लॅन ठरला..
नागपूर ला जाणारे कळल्यावर “स्वानंदनं” (माझा मोठा चुलतभाऊ) फर्मान काढलं, “पेंच” ला जायचं बाकी तिथली सोय मी बघतो.. आमचा स्वानंद खाण्यापिण्याचा आणि ट्रेकिंग सफारी याचा फार प्रेमी.. त्यातून, त्याचा माझ्यावर विशेष जीव..त्यामुळे त्याच्या “खास” मोनू दुबेला त्यानं फोन करून आमचं बुकिंग केलं..
या मोनूचं तुरीया गेट ला लागून रिसॉर्ट आहे.. नागपूर विमानतळावरुन आम्हाला गाडी थेट तिथं घेऊन आली. “राजेश कत्रे”, मॅनेजर आमची वाट बघत होता.. राजेशनी थोडी बाजूची रूम देतो तुम्हाला असं म्हणून शेजारी चालत घेऊन गेला. बघतो तर झकास AC टेंट होती.. हा एक वेगळाच अनुभव होता.. आता मात्र “जंगल सफरीचे” वेध लागले होते..
जंगल सफारी हे एक वेगळंच प्रकरण आहे.. ते शब्दातीत आहे.. ज्याला त्याची चटक लागली त्यालाच ते कळू जाणे.. ही माझी दुसरी वेळ..पहिलं जिम कॉर्बेट आणि आता पेंच..
दुपारी 1वाजता खूपच रुचकर शाकाहारी जेवण तयार होतं.. जेवून आम्ही बाहेर आलो तर मोनूच्या जर्मन शेफर्डची 3 4 छोटी पिल्लं बागडत होती.. माझ्या अनेक फसलेल्या प्रयोगातला एक प्रयोग "साया" ची प्रकर्षानं आठवण झाली.. स्वतःशीच काहीतरी पुटपुटत-ठरवत मी जिप्सीमध्ये बसलो ते थेट 7 8किमी खुरसापार गेट जवळ गाडी तिकीट चेकिंग आणि गाईडसाठी थांबली तेव्हा भोवतालची जाणीव झाली..
खुरसापारचं गेट ओलांडलं आणि एक वेगळ्याच निसर्गसमृद्ध जगात निघालो.. इथं सगळंच रांगडं.. कुठलीच गोष्ट आखीवरेखीव नाही तरीही सगळं इतकं देखणं.. आत गेल्यावर 10 15मिनिटात अचानक सगळीकडं गडबड जाणवली.. एकामागून एक जिप्सी आल्या अन गाईड सावधपणे झाडात शोधू लागले.. आणि ते बघतायत तिकडे आम्ही पण बघू लागलो. थोड्यावेळानं आम्हाला ती निद्रिस्त वाघीण दिसली.. उठून तिनं अळोखे पिळोखे दिले आणि एक सणसणीत “डरकाळी” फोडली आणि आम्ही शब्दशः सटपटलो..
तिथून पुढे गेलो फिरताना थोड्यावेळाने परत चाहूल लागली.. आणि इथे मात्र समोर एका मोठ्या शिळेवर B2 पहुडली होती.
"बारस" नावाची एक प्रसिद्ध वाघीण पेंचमध्ये आहे.. तिच्या दोन मुली B1 आणि B2.. त्यातली ही B2..
वेळ वामकुक्षीची होती त्यामुळे असेल कदाचित, 3.30वाजेपर्यंत ती तशीच झोपून होती..आता मात्र तिची हालचाल सुरू झाली आणि इथं आमची हालचाल गारठली.. आपल्या दृष्टीनं मोठी असलेली ही वाघीण गाईडने, "सर अभी बच्ची है वो.. sub adult है" असं सांगितलं..पण आमच्या दृष्टीने अर्धा पाऊण तास ती कधी उठेल, ही वाट बघत थांबल्याचं चीज झालं..
इथं एक विलक्षण घटना घडली. एकाचवेळी 3 गव्यांनी त्या वाघिणीवर हल्ला चढवला.. त्यातला एक गवा महाकाय होता. गाईडने सांगितलं की साधारण तो आठशे ते हजार किलोचा असावा.. थोडा वेळ तरीही ही तशी लहान असलेली वाघीण बराच वेळ खंबीर बसून होती.. गव्यांचे “फुररर फुररर” आवाज तिला चिथावत होते पण ही सावधपणे तीनही गव्यांवर लक्ष ठेवत उत्तरादाखल डरकाळी फोडत होती.. काही वेळ हे सुरू असताना चौथा एक मोठाला गवा तिथे आला आणि तो चाल करून वाघिणीवर गेला.. आता मात्र वाघिणीनं माघार घेतली आणि तिथून उठुन रस्ताच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या एका पाण्याच्या तळ्यात मुक्काम ठोकला..तिथं ती अजून अर्धा एक तास खेळून आम्हाला छान फोटोसाठी पोज देऊन ती तिच्या वाटेला घनदाट जंगलात निघून गेली..
तीच ते सर्वांग सुंदर तिचं ते रूप डोळ्यात साठवून तिथून परतीच्या वाटेला लागलो..
रिसॉर्टमध्ये आलो तर अंधार पडला होता.. जवळपास असलेले काही रिसॉर्ट सोडले तर मानवी वस्ती अगदी तुरळक.. त्यामुळे रहदारी नाही का दिवे नाहीत..त्यातून थोडं आभाळ, त्यामुळं किर्रर्र अंधारात ती निरव शांतता जास्तीच शांत वाटत होती.. या अशा वातावरणात एक छोटासा फेरफटका मारला आणि रम्य आठवणी काढत त्या टेंटचा अनुभव घ्यायला गेलो..
By Amey Kshirsagar

Comments