top of page

पर्यावरण गांभीर्याने घेण्याची गोष्ट

By Vasucha Vasu


सुमारे साडेचारशे कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली असं शास्त्रज्ञ म्हणतात. त्यापैकी सुमारे दोन दशलक्ष वर्षांपूर्वी मानवाची उत्पत्ती झाली अस मानलं जातं. ही गोष्ट किती जुनी आहे हे जाणून घेण्यासाठी एक उदाहरण डोळ्यासमोर आणा. आपल्याच मातीतले संत ज्ञानेश्वर महाराज हे तेराव्या शतकातले आणि आपण वावरतोय ते एकविसावे शतक सुमारे आठ शतकांचा कालावधी म्हणजे आठशे वर्षे, यामध्ये मानवाच्या किती पिढ्या झाल्या असतील याचा अंदाज लावून बघा ? सांगायचा मुद्दा हा आहे कि मानवाची उत्पत्ती झाल्यापासून ते इ.स. १७५० पर्यंत पर्यावरणाचा समतोल अगदी व्यवस्थित होता. तिथून पुढे परिस्थिती बदलायला सुरुवात झाली ती इतकी बदलली की आता आपण जसं जगतोय तसंच जगत राहिलो तर पुढच्या काही वर्षातच संपूर्ण जगभरातील समुद्र‌किनारी असणारी मोठ-मोठी शहरे, जैवविविधता, आपल्या कोकणासारखी अनेक ठिकाणे जी समुद्रकिनारी आहेत यांचा ४०-५०% भूभाग समुद्र गिळणार आहे अशी परिस्थिती आहे. असं असेल तर काय झालं या २५०-२७५ वर्षात. या २५०-२७५ वर्षात झाली ती औद्योगीक क्रांती व त्या क्रांतीमुळे निर्माण झालेल्या संधीचा अविचारी वापर. पर्यावरणाच्या दृष्टीने डोळ्यांवर पट्टी बांधून दगडी कोळसा, खनिज तेल आणि प्लॅस्टिकचा अतिवापर. इतका वापर की या गोष्टींमुळे या २५०-२७५ वर्षामध्ये मानवाने स्वत: पुढे व सर्व सजीवसृष्टीपुढे एक खूप मोठं संकट निर्माण करून ठेवलयं, 'Global Warming' हे त्यापैकी एक आणि अशी अनेक व या साऱ्यांची कारणे. ग्लोबल वार्मिंग असेल, ओझोन ला पडणारी ठिकठीकाणची भगदाड असतील, अनेक प्राण्यांच्या पक्ष्यांच्या, जलचरांच्या इतकच काय तर वनस्पतींच्या सुद्धा प्रजाती नष्ट झाल्यात या २५०-२७५ वर्षात. माणसाने औदयोगिक क्रांती केली पण त्याला मर्यादा घालायला विसरला. औदयोगिक क्रांतीच्या सुरुवातीपासून आजपर्यंत सस्तन प्राण्यांच्या सुमारे ८३ प्रजाती, पक्ष्यांच्या ११३ प्रजाती, उभयचर व सरपटणाऱ्या प्राण्यांच्या २३ प्रजाती, माश्यांच्या २३ प्रजाती तर ३५० हून अधिक वनस्पतींच्या प्रजाती नष्ट झाल्या आहेत.

वाघ, चित्ता, हत्तींच्या काही प्रजाती, समुद्री जीवांच्या अनेक प्रजाती अजून त्या मार्गावर आहेत. असंच जर चालू राहील तर लवकरच आपल्यापुढे global warming सारखी अनेक नैसर्गिक संकट निर्माण होणार आहेत पण ती मानवनिर्मित असतील. एकीकडे दुष्काळ तर दुसरीकडे हिमनग वितळून समुद्राच्या पातळीत वाढ. अजून काही वर्षांनी देशा-देशांमध्ये पाण्याच्या प्रश्नांवरून युद्ध होतील इतकी वाईट अवस्था आहे.

हे सर्व होण्यामागची कारणं काय आहेत? तर आपण करत असलेलं 'Carbon Emission' कार्बन उत्सर्जन. जेवढ कार्बन उत्सर्जन जास्त तेवढ ग्लोबल वॉर्मिंग जास्त, तेवढा ग्रीन हाऊस गॅस परिणाम जास्त, तेवढाच ओझोनचा थर कमी होण्याचा धोका जास्त. हे सगळ आपण कमी करू शकतो. यासाठी आपल्याला आपला एक दृष्टीकोन बाजूला ठेवून काम करायची गरज आहे. तो म्हणजे 'त्याला काय होतय, 'एवढ्यानं काय होणार', 'एकट्याने करून होणार आहे का ते' हा दृष्टीकोन. सामाजिकदृष्ट्या वेगवेगळे उपक्रम राबवणे ही गोष्ट तर आहेच, पण आपण आपल्या रोजच्या जगण्यातून अश्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या पर्यावरणासाठी, सर्व सजीव सृष्टीसाठी करू शकतो. ह्या गोष्टी आपण सर्वांनी ऐकलेल्या आहेतच पण आपण त्यांना गांभीर्याने घेत नाही. तितक्या मनापासून, तितक्या आत्मीयतेने करत नाही कारण अपल्याला अजून त्याची झळ नाही. पण लक्षात ठेवा नैसर्गिक समस्या ही कर्करोगासारखी असते. शेवटच्या टप्यात आल्यावरच लक्षणं दाखवते. त्यावेळी खूप उशिर झालेला असेल ते होऊ नये म्हणून आपण काय करावं. पहिली गोष्ट म्हणजे एकट्याने करून होणार नाही हा दृष्टीकोन बाजूला सारणे. त्यानंतर एक ते दीड किमी अंतरासाठी गाडी चालवणे बंद यामुळे दोन गोष्टी साध्य होतील. आजकाल माणसांचं चालणं खूप कमी झालं आहे, त्यामुळे अनेकांना बद्धकोष्टता, निरुत्साह, शुगर, बीपी यांसारखे आजार वाढायला लागलेत. यावर चालणे हा उत्तम उपाय आहे. म्हणून आपल्या शरीरासाठी व पर्यावरणासाठी एक ते दीड किमीच्या अंतरासाठी गाडी बंद.

दुसरी गोष्ट म्हणजे इलेक्ट्रीसिटी. वीजेचा वापर जेवढा कमी करता येईल तेवढा फायदेशीर. कारण सर्वात जास्त कोळसा हा वीजनिर्मितीसाठी वापरला जातो. आणि त्यातून निर्माण होणारे हानिकारक वायू यामुळे सजीव सृष्टीला धोका आहेच पण त्याच बरोबर global warming सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढते. वीजनिर्मितीसाठी Thermal Power Plant पेक्षा 'सोलार' चा वापर खूप चांगला आहे. पण तोपर्यंत कमी वीजेचा वापर. जसं की लिफ्ट चा वापर फक्त वृद्धांसाठी आणि अवजड सामान घेऊन जाण्यासाठी करावा. फॅन, एसी, लाईट चा वापर जेवढा कमी करता येईल तेवढा कमी करावा. 


आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्लॅस्टिक, प्लॅस्टिक बद्दल मी कुणाला काही सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही. प्लॅस्टिक चे दुष्परिणाम काय व किती हे सर्वांना माहित आहेत. फक्त एकच सांगतो आपण जे प्लॅस्टिक वापरून फेकून देतो त्यातील बहुतांश प्लॅस्टिक समुद्रात सोडलं जातं. आपण वापरलेला पहिला प्लॅस्टिक ब्रश अजून या पृथ्वीवर टिकून आहे. आणि त्यामुळे आपलं नुकसान चालू आहे. याला पर्याय आपण बांबूचे ब्रश वापरू शकतो, प्लॅस्टिकचा वापर टाळणे व त्याला पर्याय शोधणं हे आपण नक्की करू शकतो.

मित्रांनो आज उन्हाळा आला की, आपल्याला झाडांचं महत्व लक्षात येत. आपल्याला उन्हाच्या झळा लागतात, दुष्काळाची जाणिव होते. पावसाळ्यात कधी महापूर तर कधी सरासरी पेक्षा कमी पाऊस असे ऐकायला मिळते. हिवाळ्यातील थंडी सोसवत नाही. ही बदललेली नैसर्गिक परिस्थिती आपल्याला इशारा करते आहे की उशिर होण्याआधी जागे व्हा.


By Vasucha Vasu


Recent Posts

See All
खिडकी

By Prasad Shankar Gurav    जुनाट पडीक घराची खिडकी.... कित्येक वर्षांनंतर ही कशीबशी तग धरून राहीलेली.... खूप काही पाहिलेलं तीनं......

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
  • White Instagram Icon
  • White Facebook Icon
  • Youtube

Reach Us

100 Feet Rd, opposite New Horizon Public School, HAL 2nd Stage, Indiranagar, Bengaluru, Karnataka 560008100 Feet Rd, opposite New Horizon Public School, HAL 2nd Stage, Indiranagar, Bengaluru, Karnataka 560008

Say Hello To #Kalakar

© 2021-2025 by Hashtag Kalakar

bottom of page