परतणं
- Hashtag Kalakar
- Oct 11
- 1 min read
By Prasad Shankar Gurav
एखादी व्यक्ती आपल्या सान्निध्यात येते किंवा आपण कुणाच्या तरी सान्निध्यात जातो. त्यावेळी त्या व्यक्ती संदर्भात आपल्या मनात खूपशे भाव उमटतात.त्याच्या दिसण्यामुळे असो अथवा वर्तना मुळें. हे भाव नेहमी तसेच राहतात असं नाही.. मात्र आपल्याला त्याना तसंच पहायची सवय लागते.. कधीतरी ते वेगळे वागले किंवा त्यांच्या स्वभावाच्या विपरीत वागले की आपल्याला खटकल्या सारखे होते.. कांहीं व्यक्ती धाडसी तर कांहीं भित्रे असतात..त्या त्या व्यक्तींनी जसे ते असतील तसंच वागावं अशी आपली अपेक्षा असते..पण ज्या वेळी ते स्वतःच्या स्वभावा विपरीत वागतात तेव्हा आपल्याला आश्चर्य तर होतच पण कधी कधी ते न पटल्या जोगं वाटू लागतं.
माझे संगिताचे गुरू माझे वडीलही याला याला अपवाद नाहीत.. ज्या ज्या वेळी ते घरी येत तेव्हां त्यांची वाघासारखी दहाड ऐकू येई. त्यांनी आजपर्यंत कले संदर्भात कार्य केले त्याचा मी एकमेव साक्षीदार आहे. त्यांना कधी हरताना वा रडताना मला कधी पाहील्याचं आठवत नाही. मग ते कॅरम खेळणं असो वा पत्त्यांमध्ये रमीचा डाव असो. माझ्या संगीत साधनें पासून ते नाट्यप्रवासा मध्ये ते नेहमी माझ्या सोबत असायचे..त्यांचा वडील पणा मला तेवढा आठवत नाही.पण त्यांनीं गुरू म्हणून जे जे संस्कार केले ते मी आजतागायत पाळत आलो आहे.संगीताच्या क्षेत्रात सुद्धा त्यांचे विचार धाडसी होते. काही गोष्टी त्यांनी कधीच मान्य केल्या नाहीत, किंबहुना त्यांच्याकडे न मान्य झालेल्या बाबींवर संयुक्तीक उत्तर ही असायचं. उदाहरणार्थ राग भूप शांत स्वभावाचा आहे,पण त्यांच म्हणणं असं होतं की प्रत्येक रागांमध्ये विविध रस आणि भाव निहीत आहेत.स्वरांच उच्चारण किंवा गायन करताना जे भाव गायक द्यायचा प्रयत्न करतील तसे ते
उमटत जातील. एखाद्या रागाला एकाच भाव विश्वात ठेवणं योग्य नाही. दूसरं त्यांच म्हणणं असायचं ते राग गायनाच्या वेळे संबंधित. सकाळचे राग संध्याकाळी अथवा संध्याकाळचे राग सकाळी गायल्यानें कांहीं विपरीत परिणाम होतात असं नाही; कारण राग शास्त्रांमध्ये सुद्धा यांची कारण मिमांसा झालेली नाही फक्त कयासच आहेत.आणि मला अजूनही वाटतं की ते सांगत त्यांत तथ्य आहे
माझ्या संगीत रियाजामध्ये त्यांचा सहभाग मला परम आनंदच देत असे. दरबारी कानडा राग शिकताना त्याचं संपूर्ण रूप दाखवत आपण कसे कोणीच नाही आहोत, स्वतःचं अस्तित्व कसं शून्य आहे याचा साक्षात्कार त्यांनीच मला दिलेला आहे जो अविस्मरणीय आहे.
खरं तर त्यांच वडीलत्व मला आज देखील आठवत नाही.म्हणजे त्यांच रागावण शाळेचा अभ्यास कर म्हणणं वगैरे वाक्य सुद्धा मला त्यांनी कधीतरी म्हटलेलं लक्षात येत नाही. पण का कुणास ठाऊक एक प्रकारचा दरारा मात्र भासत असे. त्यांच ते रात्री अपरात्री येणं, आणि ज्यावेळी ते येत तेव्हा जसा दाराचा आवाज येई तो अजूनही माझ्या स्मरणात आहे. अजूनही ते दार आहे, कित्येक लोक ये जा करतात पण तसा आवाज मात्र येत नाही. तसं पाहायला गेलं तर त्यांच बेशीस्त राहाणं,कळकट मळकट कपडे, डोक्यावरील लांबलचक केस, तोंडांत नेहमी पान व दारूचं व्यसन. ह्या सर्व गोष्टी मला बिलकुल आवडत नसायच्या. परंतु या व्यतिरिक्त त्यांचे बरेच गुण वाखाणण्याजोगे होते. खूप लोक त्या गुणांची नेहमी प्रशंसा करत. एका भजनाच्या कार्यक्रमामध्ये जिथे मी देखील उपस्थित होतो. भजन संपल्यावर कलाकारांना बोलताना मी स्वतः ऐकलेलं आहे. " आज बुवांनी अक्षरशः देवीचं दर्शन आम्हाला दिलं" त्यांनी गायलेला अभंग ' अंबे तुझ्या भेटीसाठी धरवेना धीर पोटी, तुज पाहता रुपाला जीव माझा वेडावला' त्यांनी घेतलेले ते आर्त आलाप.आणि अंबे या शब्दाच्या उच्चारणा वेळी मी ही तेच अनुभवलं जे जे इतरांनी अनुभवलं. असे अनेक किस्से आठवणीं मी सांगू शकतो. जीथें त्यांचं वर्तन किती स्वच्छ आणि निर्मळ होतं ते. एका भजनाच्या कार्यक्रमानंतर सर्वांची जेवणे आटोपल्यावर त्याघरचे मालक त्यांच्याकडे आले होते. त्यांना खूप ओशाळल्यागत झालं होतं. आणि कारणही तसंच होतं.जेवणांमधील भाजी खराब होती.बाकिच्यांनी ती तशीच ताटात ठेवली पण बुवांनी मात्र ती पुसून खाल्लेली होती.मालक त्यांना विचारत होते ' बुवा तुम्ही कां खाल्लीत ती भाजी. चुकून वाढली ती सगळ्यांना आम्ही '.त्यावर ते म्हणाले की ताटात वाढल्यावर ते पुसून खायचं हे संस्कार आहेत माझ्यावर. आणि तुम्ही जास्त वाईट वाटून हीं घेऊ नका,तुमचा दोष नाही आहे तो....
फक्त संगीता मध्येच नव्हे पण जीवनातही त्यांनी असामान्य वर्तणुकीची अनुभूती दिलेली मी पाहिली आहे माझ्या नाट्य कलेतही त्यांनी कितीदा तरी मला साथ दिलेली आहे.नाटकाला संगीत करायचं असो अथवा नाट्यप्रयोगाला हजर राहायचं असो त्यांचा उत्साह नेहमी शिगेलाच असायचा. माझ्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या रेपरटरी कंपनीत नोकरी मुळे कांहीं काळ मला त्यांच सानिध्य मिळालं नाही.त्या वेळी मी नाट्य प्रयोगांच्या प्रवासात होतो.हैद्राबाद, बेंगलोर, पुणे या ठिकाणी प्रयोग होते. पुण्याला प्रयोग असताना गोव्यातून फोन आला की वडील हॉस्पिटलमध्ये आहेत.त्यांच्यावर उपचार चालू आहेत.मला बोलावण्यात आलं.घरी आल्यावर कळल की त्यांचा मृत्यू झालेला आहे.त्यांचा मृतदेह घरी आणण्यात आला.एरवी ते दहाडत येत. पण आज त्यांच परतण मला खूपच शल्य देत होतं.त्यांची चाल मी बघीतलेली होती. कुणाची फिकीर नाही.आपल्याच तंद्रीत, विश्वात दंग असलेला माणूस मात्र आज त्याचं ते दुसऱ्याच्या मदतीने घरी येणं हेलावून टाकत होतं.त्यांच परतणं मला हवं होतं.पण तीच सिंहगर्जना,दहाड,दाराचा विशीष्ठ आवाज याची मला अपेक्षा होती कारण मी त्यांना तसंच पाहीलं होतं.त्यांच्या मृत्यू पेक्षा सुद्धा त्यांच असं परतणं मला चटका लावून गेलं....
By Prasad Shankar Gurav



Very good
A powerful literary expression delivered with great clarity.
Excellent