नवरा, कॉफी आणि डोकेदुखी
- Hashtag Kalakar
- Aug 17, 2023
- 2 min read
Updated: Aug 28
By Mrs. Ritu Patil Dike
सायंकाळचे साडेचार वाजले होते . मनीषाने नुकतंच काम आटपून लॅपटॉप बाजूला केला होता. गौरवचं काम अजूनही सुरूच होतं. सकाळपासून धो धो पाऊस पडत होता. वातावरणात गारठा होता. गार वारा खिडकीतून सतत आत येत होता. इतका वेळ कामाच्या नादात मनीषाचं त्याकडे लक्ष राहिलं नव्हतं, आणि त्यामुळे तिचं डोकं भयंकर दुखू लागलं होतं.
" गौरव , मी पडते. फार डोकं दुखतंय. तेवढा फॅन बंद कर आणि खिडकी लावून घे ना. प्लीज."
"हम्" गौरव . तो कामात गर्क झाला होता. मनीषा ने तोंडावर पांघरुन घेतलं आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागली. पण डोकं एवढं भणभणत होतं का तिला झोप लागेना. खिडकी अजूनही उघडीच होती, पंखा अजूनही सुरूच होता. पांघरूणातही बोचणाऱ्या थंडीला ती वैतागली होती. बराच वेळ प्रयत्न करूनही झोप लागेना तेव्हा तिने तोंडावरचं पांघरून काढलं आणि तावातावात उठुन खिडकी आणि फॅन बंद केला. आता ड्रॉवर उघडून ती बामची बाटली शोधू लागली. बाटली सापडत नव्हती तसतशी मनीषाची डोकेदुखी आणि चिडचिड वाढत होती. ड्रॉवरचा जोरजोरात होणारा आवाज ऐकून गौरव म्हणाला,
" जरा हळू कर ना काय करतेस ते, मला डिस्टर्ब होतंय."
त्यावर चिडून मनीषा म्हणाली, "आधी माझी बामची बाटली शोधून दे. कधीच कुठली वस्तू जागेवर ठेवत नाहीस. आता मला सापडत नाहीये ."
"अरे माझा काय संबंध?" म्हणत गौरवने मान पुन्हा लॅपटॉप कडे वळवली.
शोध शोध शोधूनही बाटली सापडली नाही . शेवटी मनीषा तशीच बेडवर पडली. थोडा वेळ उजव्या कडावर आणि थोडावेळ डाव्या कडावर असा तिचा किती वेळ कार्यक्रम सुरू होता. गौरव ने एकदा तिच्याजवळ यावं असं तिला मनापासून वाटत होतं म्हणून ती मध्ये मध्ये पांघरून काढून त्याच्याकडे बघत होती पण तो कामात गुंग झाला होता. शेवटी तिने पुन्हा कड पलटला. काय करावं तिला सुचत नव्हतं. आज काम जरा जास्त वेळ चालल्याने तिची घरातली कामही राहिली होती. तिने पुन्हा कड पलटला तेव्हा गौरव खुर्चीवर नव्हता. "कुठे गेला हा ? जाऊ दे..." , ती स्वतःशीच म्हणाली. उठून आवाज देण्याची किंवा बघण्याची तसदी तिने घेतली नाही. एवढा वेळ तिला त्रास होऊन त्याने तिची जराही दखल घेतली नव्हती. मनातून तिला गौरवचा जरा रागच आला होता. आता डोक्यापेक्षा जास्त त्या गोष्टीचा तिला त्रास होत होता. तेवढ्यात "मनीषा" गौरवने हाक मारली.
" काय?" म्हणत मनीषा उठली.
बघते तर गौरवच्या हाती ट्रे आणि त्यात कॉफीचे दोन कप होते. एव्हाना मनीषाने काय विचार केला असेल याचा अंदाज घेऊन गौरव तिच्याकडे बघून मिश्किल हसला. मनीषालाही ते लक्षात येऊन तिने जीभ चावली, डोळे मीचकावीत कॉफीचा मग पटकन उचलून घेतला आणि तीही हसू लागली .
By Mrs. Ritu Patil Dike

Comments