न सांगता
By Vikas Rajendra Pisore
ऊन वारा पाऊस झेलत
अन् कितीतरी घाव सोसत
ओबडधोबड आणि दगडगोट्यांच्या
मातीहीन ओसाड रानात
आगंतुक पाहुण्यासारखं एक रोपटं
माणसांना न सांगताच उगवलं....
कालौघात तर एकट्यानंच रुजलं वाढलं
फुललं फळलं आणि अभिमानानं विस्तारलंही
कुणालाच न सांगता....
मग त्याकडे जशी पशुपाखरं झेपावली
तशी त्यानं त्यांची तहानभुक भागवली
तर ती उडुन गेली त्याला न सांगता.....
मग जशी जशी पशुप्राणी धावली
तशी त्यानं त्याच्या सावलीस विसाविली
तर ती ही निघुन गेली त्याला न सांगता....
मग
भरदुपारी मृगजळी उन्हात
नजरटप्प्यात दिसणारी ती माणसं
मात्र नक्कीच विसावणार......
शेवटी दोन-तीन माणसं ही आलीच
पण जाताना त्याला घेऊन गेली
कुणी घर तरण्यासाठी कुणी पोट भरण्यासाठी
कुणी कुणाच्या सरणासाठी तर कुणी कुणाच्या मरणासाठी
त्याला ही न सांगता.....
By Vikas Rajendra Pisore

Comments