द्रौपदी
- Hashtag Kalakar
- Apr 26, 2023
- 6 min read
By Minal Satav
भाग १
"भावनेला किती रूपं
पण हतबलतेला असतो एकच खरा चेहरा
आणि तो म्हणजे
एकांतात दाटून येणारा हुंदका
खरं ह्या मनाच्या गहन वेदनेला कुठे विसावा मिळेल का कधी ?
की त्याचा शोध घेतच हे आयुष्य संपेल ?
आज शेवटचा दिवस अर्जुना जवळचा....
इतकी वर्षे सरली ह्या सगळ्यात पण ही वेदना ,हे प्रश्न ,हे अगदी तसंच आहे ,काल पर्वा आपली वाटणी केल्या सारखं .
काल रात्री अर्जुनाच्या हाताला बाजूला सारले
बाहेर आले ,भरलेला चन्द्र होता आभाळी
मी डोळ्याची पापणी न लावता ते पण्यातले कमळ पाहत होते.जोराचा वारा सुटला, डोळ्यात काही तरी गेल्या सारखं झालं .मी डोळे मिटले आणि उघडले ,दचकून किंचाळले
अर्जुनाने मान माझ्याकडे करत पाहिलं अन् पुन्हा मान टेकवत झोपी गेला.
मी किंचाळले कारण माझ्या हातावर मला राख लागल्याचा भास झाला . काळी कुट्ट राख हो .
हा भास आहे हे कळल्यावर मी शांत झाले.अर्जुनाच्या उशाशी जाऊन बसले.माझ्या केसांवर अर्जुनाची पडलेली बोटं निहाळत असताना पुन्हा तीच काळी कुट्ट राख दिसली?
हा भास मला आता असह्य झालाय.पुन्हा पुन्हा केस धुवून ही अत्तर लावून ही गुलाबात न्हाऊन ही अंगाला राख असल्याचं वाटत राहतं.
कशाची राख ही , तुझं तेज जळले का? पांचाली की तू द्रौपदी ला अग्नी दिलीस?
ही राख कशाची?
अर्जुनाने माझा वियोग पत्करला गेली बारा वर्षे,
युधिष्ठीरांच्या एवढ्या समजवण्यावर ही तो गेला 12 वर्षे दूर ?
त्याला ही कारण काय असावं तर माझी धर्मराज युधिष्ठीर सोबतचा सहवासात पडलेला खंड.
सहवास म्हणावा की कैद म्हणावं ?
पाहिलं तर कैद च पाच तुरुंगात कैद असलेलं माझं देह
या देहाला मत्सर वाटावा तो त्या वृषालीचा,
सुतपत्र कर्णाच्या धर्मपत्नीचा
माझं मीच माझ्यावर हसावं तरी किती
पुरुषांने दिलेल्या जखमांचे उत्तर मी शोधावं ते ही दुसऱ्या पुरुषाच्या मोठेपणात ?
द्रौपदी अग अग्नितून जन्मलीस ना गं ?
कुठं हरवलं तेज, तो दाह, कुठल्या उंबरठ्यावर हरवलास ? "
पाण्यातल्या प्रतिबिंबात स्वतःला निहाळत तिनं केसातली फुलं मोकळी केली..खांद्यावर अडकून पडलेलं एक फुल तिनं हातात घेतला आणि हाताची मुठ बंद करून घेतली "
तीच्या डोळ्यांच्या कडा भिजल्या,पदराचं टोकं पाण्यात पडून भिजत होतं..ती मात्र डोळे झाकून मुठीत ते फुल बंद करून उभी होती..
जणू फुलाला जीवेच मारत होती ती .
शुन्यात गेलेली ती स्तब्ध,काही काळ असाच गेला.
मग तिनं डोळे उघडले, जणू फुलाचा शेवटचा श्वास उरला होता , तीनं हातातलं फुल पाण्यात सोडलं आणि तशीच आत महालात गेली संथ पावलांनी .एव्हाना सूर्य मावळतीला आला .तिने दासीला आवाज दिला अन केसात पुन्हा फुलं माळायला सांगितली अगदी रोजच्या सारखीच.
भाग२
"या भिंतींनि ही कान झाकलेत..माझं विव्हळण ते ऐकू शकत नाहीत त्यांचे शब्द ही कोंडलेले आहेत माझं दुःख ते सांगू शकत नाहीत .
इथल्या डोळयांना दिसणारं मना पर्यंत पोहचवता येत नाहीये .
इथे स्तब्ध झालेत सारे या भिंतीही ,
हे खांबही आणि माझ्या वाटणी करणारे हे पाच थोर योद्धे मानले जाणारे पांडव ही .
इथे स्तब्ध झालाय तो केसात मोरपीस लावलेला कृष्ण ही!
त्याच्या बोटात फिरणार ते सुदर्शन चक्र ही बोथट झालंय !
इथं बंद आहेत बाण म्यानात
अन शब्द लाजेत कैद ,
आवाज घुमतोय तो फक्त त्या कर्कश हसणार्या दुर्योधनाचा.
मला शस्त्र दे कृष्णा
मला वाचवायचे मी खूप प्रयत्न केले पण आता माझा धीर सुटलाय .
त्या नभां न रिकामं व्हावं चन्द्र ताऱ्या शिवाय पोरकं व्हावं
तसं आज पोरकं केलंत तुम्ही मला..
सहचरणी असण्याची ही कसली शिक्षा दिलीत...
.
.
माझी लाज राखणारा भाऊ म्हणून पुरे आता.
माझ्या हाती कृष्णा तू आता शस्त्र द्यायला हवं
तू आता शस्त्र द्यायला हवं नाही
तर तू ही या अधर्मा चा साक्षी होशील
तू आधी देव आहेस आणि नंतर एक पुरुष .हे तुला सिद्ध करायला हवं नाही तर मला आणि माझ्या सारख्या अश्या अनेकांना तू तुझ्या देवपणातून मुक्त करायला
हवं ..
दावे करायचेच असतील तर हाडा मांसाचे होतील.
चरित्र्याचे नाहीत
अवहेलनाच्या उशाशी माझी रात्र झोपी जायची...
पंचाली होते ना मी.
पाच पांडवांची धर्मापत्नी...
यात धर्म होता तो प्रेमात असणाऱ्या अधर्मा इतकाच....
बाकी सारं असायला हवं तसंच होतं..
पाच घरं आणि पाच आयुष्य जगणारी ही पांचाली......
मी न विरोध का केला नसावा??? विरोध हा शब्द अन ती भावनाच अस्तित्वात न्हवती बाईच्या जातीसाठी तेव्हा
तशी ती आज तरी कुठं स्पष्ट आहे तुम्हाला
त्या दारापासून अर्जुनाचा हात सोडून मी मागे फिरली असती तर ..
पण मला मागे फिरायला घर कुठे होतं????
हो पण माझ्या आयुष्याची शोकांतिका ही अशी लिहली होती।
मालमत्ता म्हणून दावे लावलेली पांचाली....
भर सभेत वस्तू म्हणून मांडलेली पांचाली
जीच्या चारित्र्यपुढे , स्वाभिमान पुढे धर्म ठरला तो एक खेळ ..जुगराचा खेळ.
इतकं शून्य आणि हीन अस्तिवात असेलेली पांचाली
मी कुणाला समजली का???
माझं दुःख माझी शोकांतिका कुणाला समजली का???
एक कृष्ण हवा ,रणांगण उभं करणारा आणि त्याच्यासारखे इतर पुरुष हवेत स्वतःचं पराक्रम इतिहासात नोंदवणारे आणि ह्या सगळया साठी हवी ती एक द्रौपदी , माझ्यासारखी!
भाग३
कैद केलेल्या आठवणीतून एक एक धागा आज निखळतोय ,
अन तसाच उरलेला एक एक श्वास संपतोय
एक एक वेदना जीवंत होत आहे
आणि राहिलेली एकएक स्वप्न संपत चाललंय
सुख बोथट होतंय आणि दुःख शरीरातून रक्तासारखं वाहतंय
अंगावर चमकणारी रत्न आणि महागडी वस्त्र ,उतरवली तशी हरताच बायको ही उतरवून ठेवली वाटतं धर्मराजानी? "
.
मातीला निपुत्राचा शाप देणार्या आभाळा ला दोश तो काय द्यावा?
पावसाचं दान नसलेल्या त्या अभाळाचीच कूस उजाड असते ,
पण आपल्या ला दिसतो तो फक्त आभाळ क्रूर काळया ढगांनी भरलेला.. मातीला वाटतं आपल्या जळणाऱ्या गर्भाला बघून तो हसतोय तो.
कुरुक्षेत्राची जमीन स्वकीयांच्या रक्ताने न्हाली ह्या कूस उजडलेल्या जमिनीला मी ही अशीच क्रूर वाटते....
जगाला वाटतं माझ्या मुळे झाला हा नरसंहार ही
एक भावला दुसऱ्या भावा चा जीव घेतला तो माझ्यामुळे
हो मी म्हटलं होतं दुशासनाने ज्या केसांना धरून तो मला खेचत ह्या दरबारात आणलं त्याचं केसानं ह्या दुर्योधनांच रक्त लागे पर्यंत ही अशीच मोकळी राहतील या अंधारलेल्या रात्री सारखी ....
ही काळी भयानक रात्र माझ्या याच मोकळ्या केसांसारखी वाटेतेय.....
हीच रात्र माझं मुकुट वाटतंय
हसू येतं मला यांच्या अज्ञानाचं.
हे मुकुट माझं नाहीच ,हे मुकुट ते त्या निळ्या इशवराचं.
ह्या धर्माच्या गप्पा रक्ताच्या शाई मध्ये लिहल्या त्या त्यानंच
असं नसतं तर कृष्ण शापित झाला नसता,इतिहास घडावा म्हणून त्याने केलेलं हे प्रयोजन ,तो सारथी झाला आता कायमचाच आणि आम्ही सगळे झालो ते प्रवासी तो नेईल त्या दिशेने जाणारे प्रवासी
ह्यानंतर जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीव त्याला सारथी मानेल.
मग मला सांगा माझ्या अस्तित्वच्या अमरत्वसाठी हे घडलं की त्या सारथी च्या देवपणासाठी.
हो माहित आहे मला माझा द्वेष बोलतोय हे सारं .ह्यात काय तथ्य आणि काय माझी फक्त बडबड.
खरं सांगू मला लोभ वाटतो या साऱ्यांचा,ताकदीचा माज ठेऊन भर दरबारात स्वतःची मांडी उघडी करून दाखवणाऱ्या त्या नीच दुर्योधनाचा सुधा मला लोभ वाटतो .आणि का नाही वाटावा ?पाच बलवान पांडवांची मी पंचाली ,राजा धृपदाची मी मुलगी,अग्नितून जन्मलेली हो अग्नितून जन्मलेली ,,मोह आवरता न यावं असं सौंदर्य असलेली ,शब्दांचं सुराचं ज्ञान असलेली मी त्या दरबारात उघडी पडू नये म्हणून विणवण्या करत होते
हे द्यूतामध्ये हरलेले माझे पती हेही माझ्याहून श्रेष्ठ च ,ला वाचवणारा ही कृष्णच आणि माझ्यासाठी अधर्मला संपवणारा ही कृष्णच आणि ह्या सगळ्यात मी मात्र उरली दीन
किती ही आयुष्य इथं या कुरुक्षेत्राच्या मातीला बिलगत संपली तरी द्रौपदीला तिचं सरलेलं आयुष्य पुन्हा मिळवता येणार नाही.
भाग ४
महाभारत धर्म आणि अधर्माची लढाई होती असं म्हणणाऱ्यां साठी माझा तुम्हा सर्वांना एक प्रश्न आहे...
धर्म आणि अधर्मा चे निष्कर्ष ठरवायचे कुणी??
कुठल्या अधर्मा साठी रणांगण रंगवायचं ?
तुम्ही महाभारत केलंत ते माझ्या भर दरबारात केलेल्या वस्त्रहरणासाठी .पण
एक निष्पाप बाळाला पोरकं करून अधर्म घडत नाही का?
मग तसं असेन तर मग कुंती मातेच्या च्या मुखाततून बाहेर पडलेल्या शब्दांसाठी तुम्ही वस्तू सारखं वाटून दिलंत पाच माणसात ..तो अधर्म न्हवता का???
स्वतःची मालमत्ता समजून जुगारच्या बाजीवर मांडून धर्मराजांनी अधर्म नाही केला का???
अरे धर्मराजने बाकीचे भाऊ ही लावलेच होते ना बाजी ला?
मग त्याच्या पैकी कुणाच्या वस्त्रहरणाचा कार्यक्रम का नाही भरवलात दरबारात .ज्यांन सारं त्या जुगारात हरलं तो धर्मराज का नाही दीन होऊन कृष्णाचं नाव घेऊ लागला
पुरुषांच्या निस्टलेल्या वस्त्रांसाठी का नाही धर्म अधर्मा चं महाभारत रचलं गेलं.
मग कुठल्या धर्मा साठी लढलात
माझं भर दरबारात मांडलेल्या पदरासाठी का??
माझ्या डोळ्यातल्या अश्रूंसाठी का???मग या पदराची किंवा. अश्रूंची किंमत कौरवांच्या साऱ्या कुळाच्या रक्ता इतकी होती असं म्हणायचं का तुम्हाला?
अंगावरचा पदर चार माणसात खाली पडला की तुमचा अधर्म होतो का ?
जो तिच्या मर्जीशिवाय बंद दारात पदर पाच माणसात वाटून दिला तो अधर्म होत नाही का??
तुम्ही शंभर विरुद्ध पाच लढले पण त्या पाच मध्ये मी न्हवते रणभूमीवर
ज्या केसांना खेचून मला भर दरबारात ओढून आणलं गेलं त्यांचीच तर अडचण वाटली नसेन ना माझ्याच साठी उभारल्या गेलेल्या रणभूमीवर?
मग ती लढण्याइतकी कमकुवत आहे मी म्हणायचं काय तुम्हाला ?
जीच्यासाठी अख्खा कौरवांचा आख्खा कूळ संपवला इतकं माझं अस्तित्व भव्य कसं झालं ??
तुमची ही अशीच सभ्यतेची पांघरूण जीव घेतायत किती तरी जणींचे..
खरा अधर्म तर मीच केला ,मला विकायला काढलेल्या लोकांची अर्धांगिनी म्हणून जगले ते जगणं हेच खरं अधर्म.
स्वतःला एक स्त्रीच्या खोटारड्या ममत्वासाठी वाटून घेतलं हा माझा अधर्म.
अरे अग्नितंतून जन्मलेली मी ????
माझ्या डोळ्यात ही आग न्हवती का उरली त्या दिवशी???
मग कुणी ठरवायचं कुठल्या अधर्मासाठी युद्ध करायचं..त्या युद्धात कुणी रक्त सांडायच हेही कुणी ठरवायचं..
देहाचं नागडेपण जपणारी माणसं,मनाचं नागडेपण कधी बघायला शिकणार ?
असो या सगळ्यात अधर्म एकच माणसाने केला ,हात असून त्या हातात धनुरबाण न घेणार्या या द्रूपदी ने, लोकांच्या डोळ्यात न बघता डोळे झाकून कृष्णा ला विनवणी करणाऱ्या या द्रौपदी ने.
सगळ्यांच्या पायाशी पदर वाचवणाच्या विणवण्या करणाऱ्या दिन अश्या या द्रौपदीने.
हो केलाय अधर्म ,जन्म घेण्याचा, एक स्त्री म्हणून,या मातीत
By Minal Satav

Comments