तळघराचे रहस्य
- Hashtag Kalakar
- Apr 27, 2023
- 4 min read
By Sameer Shashikant Vengurlekar
"शु...... सावकाश आत चल. कोणी बघितलं तर वांधे व्हायचे आपले."भयाण काळोखात दोन मानवी आकृत्या वावरत होत्या त्यातली एक बोलली. "अरे पण नक्की आहे ना आपण काय शोधतोय ते?" "म्हणजे काय? नक्कीच. मी वाचलंय." फुसफुस वाढली. दोघेही पद्मनाभ मंदिराच्या तळघरातील त्या गुप्त दरवाजा कडे आले. अतिशय अक्राळ विक्राळ दरवाजा. नागपाशात बंदिस्त. पाहताच दोघांची पाचावर धारण बसली होती, पण हिंमत करुन दोघे पुढे सरसावले. "अरे पण हा दरवाजा उघडणार कसा?" एका आक्रुतीने विचारले. दुसरी आक्रुती हलकेच हसली. कसलसं पुस्तक काढत त्याने एका ठराविक पानावरचा मंञ हळु आवाजात पुटपुटला. त्याबरोबर जोरदार वारा वाहु लागला. पहिली आक्रुती घाबरली, पण मंञ वाचणाऱ्या आक्रुतीवर काही परिणाम झाला नाही. भयानक आवाज करत तो शक्तीशाली दरवाजा उघडला. आक्रुतीने पुस्तक मिटलं. "अरे अयान. तुझ्याकडे हे पुस्तक आलं कुठुन?" "तेथुनच जेथे आपण गेलो होतो विहान. " "म्हणजे बालाजी मंदिरात?" "हो . कोणालाही माहीत नसणाऱ्या या दरवाजामागचं रहस्य मला जाणुन घ्यायचं होतं. बालाजींची मुर्ती खुप सुंदर आहेच, पण तेवढीच रहस्यांनी भारलेली आहे. कोणाचे लक्ष नसताना बालाजी च्या मुर्तीच्या एका रहस्यमयी जागेत मला हे पुस्तक मिळाले. अगदी जिर्ण शिर्ण. हे वेगळं पुस्तक आणि यातली भाषाही वेगळीच. समजायला अवघड. मग सुरु केला शोध या पुस्तकात लपलेल्या रहस्यांचा शोध घेण्याचा आणि सापडला हा मंञ." विहान पाहतच राहिला. "चल आत." डोळे दिपवणारा असा प्रकाश दरवाजातुन येत होता. काहीतरी विलक्षण दडले होते त्या जागेत. अयानने वाचल्याप्रमाणे धन- खजिना आणि ब्रह्मास्त्र सारखी प्रलयंकारी अस्ञे! दोघेही आत जाताच दरवाजा बंद झाला. दोघांचे श्वास नाकपुड्यातच अडकले. दोघेही भयाने एकमेकांना पाहु लागले, पण हिंमत करुन अयान पुढे सरसावला. तेवढ्यात शक्तीशाली वासुकी नाग त्याच्या वर झेपावला. त्याच्या कपाळावर पिवळी किरणे फेकणारा मणी होता. अयान विहानने घाबरतच एकमेकांना मिठी मारली. वासुकी नाग गायब झाला. अयानने पाहिले. त्या पुस्तकावर भगवान विष्णूंची अतिशय प्राचीन अशी आक्रुती होती. थरथरतच अयान व विहान पुढे निघाले. समोरच तप्त लाव्ह्याचा प्रपात कोसळत होता. दोघांचे डोळे विस्फारले. या तळघरात हे कसले रहस्य दडले आहे? चक्क ज्वालामुखी प्रपात! अयान व विहान हळूहळू पुढे सरकले. प्रपाताच्या खाली सोन्यासारखी चमकणारी एक भव्य पेटी होती. त्या पेटीपर्यंत पोहोचणार कसे? दोघांना ही प्रश्न पडला. अयान हुशार होता. त्याने मनातच श्री विष्णूंचा धावा केला. तेव्हा आजुबाजुची लाव्हा मय गुहा गायब झाली. समोरच नागपाशात बंदिस्त ती सुवर्ण पेटी होती.
अयानने त्या पेटीला हात लावला, तसा धक्का बसुन तो दुर जाऊन पडला. "अयान........" विहान ओरडला. तेवढ्यात सगळ्या गुहेत लख्ख प्रकाश पसरला. एक अतिशय अक्राळ विक्राळ आऱ्यांचे सुर्यासम भासणारे चक्र हवेत गरगर फिरत होते. ते सुदर्शन चक्र पाहुन तर दोघांची दातखिळच बसली. दोघे घाबरुन मागे पळण्याच्या बेतात होते. पण मागचा रस्ताच बंद होता. अयानने हात जोडत श्री विष्णूंची माफी मागितली. विहानने ही त्याचे अनुसरण केले. काही वेळाने चक्र शांत झाले. एवढी मेहनत करुन त्या तळघरातील पर्यायाने पेटीतील रहस्य जाणून घेतल्याशिवाय त्यांना मागे फिरायचे नव्हते. काहीही होवो. अयान ते मंञांचे पुस्तक चाळत होता. त्याला तर काहीच समजत नव्हते. विहान भाबडा बनुन अयान कडे पाहत होता. अचानक अयानला एका पानावर काही अस्ञांच्या आक्रुत्या काढलेल्या दिसल्या. बाजुलाच एक अतिशय क्लिष्ट, कठिण असा मंञ होता. अयानने ततपप करत तो मंञ उच्चारला. एक दोन मिनीटे काहीच झालं नाही. तसा अयानने अगदी मोठ्याने तो मंञ परत वाचला . गुहा हादरु लागली, मोठमोठे दगड खाली कोसळु लागले आणि नागपाशात बंदिस्त ती पेटी करकरत उघडली. दोघेही चमकुन पाहु लागले. अयान पेटीजवळ गेला. पेटीत डोकावुन बघितले आणि त्याच्या अंगावर शहारे आले. सहस्ञ नागांच्या गराड्यात लकाकणारा पांढरा मोती होता त्यात. "स्यमंतक मणी?........." आश्चर्याने डोळे फाडत तो पाहु लागला. "काय?" विहान ओरडला. "होय विहान. स्यमंतक मणी. महाभारत युद्धानंतर भगवान क्रुष्णांनी अश्वत्थामा कडुन हा मणी मागुन घेतला होता आणि त्याला शाप दिला होता. या मण्याला धारण करणारा माणुस कधीही आजारी पडु शकत नाही, मरु शकत नाही." अयान ने जरा बारकाईने पाहिले. त्या मण्याच्या खाली काही भयानक अस्ञे लाल धाग्यांच्या गुंडाळ्यात बांधुन ठेवली होती. ते लाल धागे अभिमंत्रित होते. "कदाचित त्या मण्याखाली अभिमंत्रित धाग्यांच्या विळख्यात असलेली ही तीच दिव्यास्ञे असतील जी महाभारत युध्दावेळी वापरण्यात आली होती." "बापरे! पण मग ती त्या लाल धाग्यात का बांधली आहेत?" "भगवान क्रुष्णांना हे माहित होतं की कलियुग येणार आहे. त्यावेळी लालसेपोटी अनेकजण या तळघरात जाण्याचा प्रयत्न करतील. येन केन प्रकारे या रहस्यमयी जागेपर्यंत कोणी पोहोचला तरी ही विनाशकारी अस्ञे त्यांच्या हातात पडू नये म्हणून ही व्यवस्था केली असावी." विहान डोकावुन पाहतो. त्या अस्ञांच्याही खाली लख्ख चमकणारे दागिने असतात आणि एक लाल रंगाची किरणे फेकणारा मणीही असतो. "अयान ते पहा त्याखाली ही काही आहे." अयान पाहतो. "हे दागिने ही श्री विष्णूंचे असणार यात शंका नाही. एवढ्या वर्षात त्यांची चमक काही कमी झाली नाही. तो लाल रंगाचा मणी कौस्तुभ मणी असावा." विहान माञ लालसेपोटी त्या पेटीच्या आत हात घालतो. "आह.......अयान........" विहान बेंबीच्या देठापासून ओरडतो. "विहान......" अयान त्याला वाचवायला जाणार तेवढ्यात सहस्त्र सर्प त्याच्या अंगाभोवती लपेटले जातात आणि तडफडत तो खाली कोसळतो. "विहान........." अयान भयाने ओरडतो. क्षणापुर्वी चालता बोलता तो मोहापायी खाक झालेला असतो. सहस्त्र नाग गायब होतात. अयानला ती अस्ञे स्पष्ट दिसु लागतात. मोठमोठ्या तिन चकत्या असणारे पांढरी किरणे फेकणारे ते अस्ञ खुपच दिव्य भासत असते. सोबतीला नागास्ञ, पाशुपत अस्ञासारखी भयानक अस्ञे ही असतात. "ब्रह्मास्त्र........?" अयान पुटपुटतो. त्याच्या डोळ्यातुन दोन आसवे खाली कोसळतात. ब्रह्मास्त्र व त्या पेटीला मनोभावे वंदन करत तो धपकन गुडघ्यावर बसतो. समोरच विहानचे छिन्नविछिन्न कलेवर पडलेले असते. तो मनातल्या मनात वासुकी नागाचे आव्हान करतो, आणि मंञांचे पुस्तक दुर फेकतो. भयानक आवाज करत वासुकी नाग आपला जबडा उघडते आणि अयान कायमचा त्यात गडप होतो.
By Sameer Shashikant Vengurlekar

Comments