top of page

टोपीवादावर साक्ष

By Amey Sachin Joag



हो! हो, मीच हे सगळं रचलं. मीच केस दाखल केली, लढलो, ह्या कोर्टाचा अमूल्य वेळ मी विनाकारण खर्ची घातला, मीच ही सगळी गर्दी इथे, ह्या खटल्याकडे खेचली आणि मीच ह्या देशातल्या लोकांना मूर्ख बनवून इतके दिवस त्यांच्या विचारांशी आणि भावनांशी खेळलो. मला कल्पना आहे, की ह्या साक्षीनंतर, माझ्या ह्या फायनल स्टेटमेंट नंतर माझं हे रचलेलं कुभांड फारसं कोणालाही आवडणार नाही. मी माननीय कोर्टाचा इतका अमूल्य वेळ वाया घालवल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. माननीय कोर्ट मला जी शिक्षा देईल ती भोगायला मी तयार आहेच; पण तत्पूर्वी…. माझ्या मित्र वकिलांचा एकप्रकारे जय झालाय, त्याप्रित्यर्थ, मी त्यांचे आभार मानतो. मी माननीय कोर्टाला विनंती करू इच्छितो, की कोणताही निकाल जाहीर करण्यापूर्वी त्यांनी माझं ऐकून घ्यावं. खरंतर, आता, ह्या क्षणी ही मागणी करण्याच्या परिस्थितीत मी नाही, किंबहुना ही अवस्था माझी मीच ओढावून घेतली आहे, हे मला खात्रीशीररित्या माहीत आहे. पण तरीही; हे सगळं बोलण्याची संधी मिळावी म्हणून केलेला हा खटाटोप होता, तेव्हा मला माझं सविस्तर म्हणणं मांडता यावं, हीच एक विनंती आहे. धन्यवाद!

मी आता जे काही सांगेन, जे काही बोलेन, जो काही व्यक्त होईन, त्यातला शब्दनशब्द खरा आहे. ह्यामध्ये कोणतही खोटं दडलेलं नाही, तसंच कोणत्याही प्रकारचं अर्धसत्यही नाही. आज सबंध देश माझं बोलणं ऐकतो आहे. इथे जमलेली ही मीडिया माझं संपूर्ण म्हणणं, कोणताही पक्षपात न करता या देशातल्या जनतेपर्यंत पोचवेल, अशी आशा बाळगून मी माझं म्हणणं मांडतोय.


माय लॉर्ड, आज हा काळी टोपी विरुद्ध पांढरी टोपी हा खटला चालू होऊन तीन महिने झाले. काळ्या टोपीस, त्यांनी स्वातंत्र्यसंग्रामात दिलेल्या अमूल्य योगदानाचे योग्य तेवढे महत्त्व न मिळाल्याने, किंबहुना त्यांच्या ह्या दिव्य कार्याची अवहेलनाच पांढऱ्या टोपीच्या समर्थकांकडून जास्त झाल्याने, हा खटला मी दाखल केला होता. मुद्दामच हा खटला पांढऱ्या टोपीच्या विरुद्ध दाखल केला आणि असं म्हणणं मांडलं होतं, की त्यांच्या फूस असण्यामुळेच आज काळ्या टोपीची ही शोकांतिका झाली आहे. माझ्या अपेक्षेप्रमाणेच पांढऱ्या टोपीच्या समर्थकांनी माझ्यावर टीकेची झोड उठवली तर काळ्या टोपीच्या समर्थकांनी माझी बाजू माहीत नसतानाही उचलून धरत मला शक्य तेवढे समर्थन दिले.

ह्या सबंध तीन महिन्यात मला माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या जीवाच्या भीतीनं ग्रासलं होतं. मी पांढऱ्या टोपीवर आरोप केल्यावर वास्तविक जिवाच्या भीतीविना ह्या कोर्टाच्या पायऱ्या चढायला हव्या होत्या. कारण, पांढऱ्या टोपीने घालून दिलेल्या शांततेच्या आणि अहिंसेच्या आदर्शांवरूनच त्यांचे समर्थकही चालत असले पाहिजेत, असा सामान्यपणे कयास होऊ शकतो; परंतु अशा शांततेच्या पुजऱ्यांकडूनच मला मृत्यूसारखी भयंकर हिंसा घडवणारी धमकी यावी, हे त्या पांढऱ्या टोपीचंच दुर्दैव नव्हे काय? किंबहुना, नुसती हिंसा घडवण्याचा विचार येणं आणि तो विचार येऊन तो विचार कृतीत उतरवण्याचा विचार करणं, हीसुद्धा त्या अहिंसेच्या अन् शांततेच्या मूल्यांची पायमल्लीच नव्हे काय? पण हे सगळं मला अपेक्षित होतं. मी हा आरोप केल्यावर तो वेगानं देशभर वणवा लावून गेला नसता, तरच नवल वाटलं असतं. आरोपपत्र दाखल केलं आणि अगदी काही तासांमध्येच मला धमकीचा पहिला फोन आला - खटला मागे घे, नाहीतर परिणाम चांगले होणार नाहीत. मग मी माझं पुढचं दान खेळलं. मला आलेला हा फोनकॉल मी सोशल मीडियावरून अजून पसरवला. 'अज्ञात माणसाकडून मी न्यायासाठी मागणी केल्याबरोबर आलेला जीवे मारायच्या धमकीचा कॉल!' पुन्हा माझ्या अपेक्षेप्रमाणे काही लोकांनी सोशल मीडियावर माझी बाजू उचलून धरत मला समर्थन दिलं, तर काहींनी शिवीगाळ केली. तिथे यथेच्छ निंदानालस्ती केल्यानंतरही जेव्हा मी ऐकत नाही, असं ह्या समर्थकांच्या लक्षात आलं, तेव्हा माझ्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला गेला; अगदी मी कल्पना केली होती त्याप्रमाणेच. आणि मी ठरवल्याप्रमाणेच, तो हल्ला परतवला. वर ह्याचा उल्लेख माझ्या सोशल मीडिया अकाऊंटवर 'मी काळ्या टोपीचा समर्थक असून, माझ्यावर हात उगारत सुरू झालेला जीवाचा संघर्ष मी दुसरा गाल पुढे करून संपवत नाही', असं बढाईनं सांगितलं. पुन्हा मला वाटलं होतं त्याप्रमाणेच, काळ्या टोपीचे चाहते माझ्या समर्थनार्थ उभे राहिले. ह्या खेपेला त्यांनी माझ्यावर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात वेगळी फळी उघडून माझ्या लढाईचा काही भाग स्वतःच्या खांद्यावर घेतला. अखेर हा खटला इथे, कोर्टामध्ये उभा राहिला. ह्याकडे केवळ सामान्य लोकच अत्यंतिक उत्सुकतेनं बघत होते, असं कृपया कोणीही समजू नये. जशा सामान्य लोकांच्या नजरा ह्या खटल्याकडे होत्या, तशाच मोठाल्या राजकारण्यांच्या, मोठमोठ्या पदावरल्या लोकांच्या, तत्त्वज्ञांच्या, कायदेपंडितांच्या किंवा समाजधुरीणांच्या नजराही इकडे वळल्या होत्या. हां, आता प्रत्येकाची आपापली कारणं होती, त्याकडे मी पुढे येणारच आहे. इतक्या लोकांच्या नजरा इकडे वळल्या, अन् आपल्या लोकशाहीचा पाचवा आणि सर्वाधिक शक्तिशाली खांब म्हणजे मीडियाच्या नजरा वळल्या नाहीत, असं झालंच नसतं. मीडियाने ह्या खटल्यात उडी घेतल्याबरोबर सगळं चित्र पालटलं. निम्म्या चॅनेल्सवर मी निंद्य होतो, तर उर्वरित चॅनेल्सवर मी वंद्य होतो. दिवसाचे बहुतांश तास केवळ माझ्याविषयी आणि काळी विरुद्ध पांढरी टोपी, अशाच चर्चा चालू होत्या. कित्येक चॅनेल्सनी स्वतःची बौद्धिक कुवत नसतानादेखील त्या दोन टोप्यांपैकी एका टोपीला मूर्ख ठरवूनही टाकलं होतं. मला जे जे अपेक्षित होतं, जे जे माझ्या कल्पनेत होतं, ते ते सर्व घडत गेलं. हां, घडली नाही ती एकच गोष्ट; अन् ती म्हणजे ह्या सगळ्या प्रकरणानं पकडलेला वेग. मला माझं हे भाषण इतक्या लवकर द्यावं लागेल, असं वाटलं नव्हतं. फक्त ती एक गोष्टच मी कल्पना केल्याप्रमाणे घडली नाही. परंतु हरकत नाही. मला हे सगळं अशा एका वेळेला सांगायचं होतं, जेव्हा सर्व देश माझ्याकडे 'मी आता काय बोलतो', ह्या उत्सुकतेने कान टवकारून ऐकत असेल. प्रत्येकाच्या मनातली उत्कंठा शिगेला असतानाच मला ह्या गोष्टी सगळ्यांना सांगायच्या होत्या. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी मला अपेक्षित वेगानं घडल्या नसल्या, तरीही काहीही बिघडलेलं नाही. उलट, इतक्या लवकर हे सगळं घडल्यानं, माझ्या कल्पनेत लागत असलेले अजून दोन-तीन महिने तरी वाचतील.


हे सगळं काय झालं, ते मी सांगितलं. आता हे सगळं का? त्याचं कारण सांगतो. मूळ वाद माझ्या मतांवर, माझ्या मनातल्या रूढ असलेल्या कल्पनांवर आधारलेला होता. ह्या सगळ्याचं रूप पुढे पुढे काळी टोपी विरुद्ध पांढरी टोपी असं झालं. वास्तविक पाहता, ह्या दोन्ही स्वातंत्र्ययोद्ध्यांची आपापली अशी मते होती, विचारसरणी होत्या. काळी टोपी आक्रमकतेच्या मार्गावरून जाणारी होती, तर पांढरी टोपी शांततेच्या मार्गाने जाणारी होती. देशाला तेव्हासुद्धा आणि आत्तासुद्धा ह्या दोन्ही विचारसरणींची तेवढीच गरज आहे. हे दोन्ही विचार जर दोहोंचा समतोल साधून अंमलात आणले गेले, तरच फायदेशीर ठरणारे आहेत. ह्या दोन्हीपैकी एक जरी विचार मनावर हावी झाला, तर साऱ्याचा बट्ट्याबोळ होऊ शकतो. अति आक्रमकता जशी घातक आहे तशी अति शांतताही घातकच. असे हे दोन्ही विचार एकाच वेळी कार्यरत असल्या कारणानेच देशास स्वातंत्र्य मिळाले. पण पुढे पुढे केवळ त्यांच्या समर्थकांमुळे ह्या दोन्ही टोप्यांचे जनतेच्या डोळ्यांमधले स्थान बदलले. आपण ज्याला पूज्य मानतो, त्याला प्रत्येकानं पूज्य मानलंच पाहिजे, ह्या भावनेनं जोर धरला आणि तिथूनच सगळा घोळ वाढायला सुरुवात झाली. सुरुवातीला आमचीच टोपी कशी श्रेष्ठ, हे दाखवून भागायचं. इतिहासातले छोटेछोटे दाखले देऊन त्यांचं श्रेष्ठत्व दाखवलं जायचं. पुढेपुढे तत्कालीन जागतिक राजकारणाची स्थिती दाखवून त्यावेळी आपल्या टोपीने कोणतं पाऊल कसं उचललं, आणि त्यामुळे सबंध जगतावर प्रभाव पडून चित्र कसं बदललं, अशा रंजकतेमधून श्रेष्ठत्व दाखवलं जाऊ लागलं. आणि तरीही समोरचा आपली टोपी घालण्यास नकार देतो म्हणल्यावर, समोरच्याची टोपी कशी वाईट आहे, अन् म्हणून माझी टोपी कशी श्रेष्ठ, हे दाखवलं जायला लागलं. ज्यांच्या हातात ताकद, त्यांनी जरा जोर देऊन आपली टोपी महान, असं म्हणलं, की सहाजिकच कमजोर माणसानं ते मान्य करायलाच पाहिजे. अनेक वर्ष सगळ्या देशामध्ये आपल्या टोपीचं महात्म्य सिद्ध करण्यासाठी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत फक्त त्या एकाच टोपीचे किस्से सांगितले जाऊ लागले. पांढऱ्या टोपीशिवाय देशात काय, सबंध जगात कशी दुसरी टोपीच उपयोगी नाही, हेच पालुपद ऐकवलं जाऊ लागलं. एवढ्याने भागलं नाही म्हणून की काय, लहान लहान मुलांच्या पाठयपुस्तकांमध्ये फक्त आणि फक्त पांढऱ्या टोपीच्या कर्तृत्त्वाचा उल्लेख. बाकी कोणतीही टोपी वासालादेखील नाही.




मुळात जी टोपी आपलं सबंध आयुष्य एकाच ध्येयासाठी वेचून गेली, तिचं महात्म्य सिद्ध करण्यासाठी इतकी धडपड का? आणि तिचंच महात्म्य सिद्ध करायची धडपड का? जी टोपी स्वतः हे महात्म्य जपायला, सिद्ध करायला किंवा मी किती मोठी, हे सांगायला सुद्धा लोकांच्या पुढे आली नाही, तिचं महात्म्य लोकांनी का सिद्ध करावं? आणि ज्याचं महात्म्य वारंवार सिद्ध करायची गरज पडावी, त्याला महात्मा का म्हणावे? नाही, त्या टोपीचा मोठेपणा ठरवणारा, मी कोणीच नाही. तिच्या शिवणीचीदेखील सर मला नाही, अन् माझं कर्तृत्त्वही तेवढं नाही. म्हणायचा मुद्दा इतकाच, की ह्या सततच्या कृत्यांमुळे, इतर टोप्यांच्या अनुयायांच्या भावना न दुखवत्या, तरच नवल. परंतु, इतर टोप्यांचे अनुयायीही संपूर्णतः सद्सद्विवेक बुद्धीने वागले, अशातला भाग नाही. दुसरा मोठा होतोय, आणि आपण ज्या टोपीस पूज्य मानतो, तिला तेवढं महत्त्व मिळत नाही, हे बघून प्रत्येकाच्या मनात अढी निर्माण झाली. ही अढी थेट त्या टोपीबद्दलच होती, हे विशेष सांगायची आवश्यकता नसावी. ह्या निर्माण झालेल्या अढीमुळे, पांढऱ्या टोपीच्या झालेल्या चुका शोधून शोधून, त्या जीवावर आपापल्या पूज्य टोप्यांचं महात्म्य सिद्ध करायची धडपड त्यांचीही चालूच होती. ह्या पूज्यापूज्यतेच्या खेळामध्ये भरडल्या गेल्या, त्या मात्र ह्या साऱ्या टोप्याच. त्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी केल्या गेलेल्या सगळ्या प्रयत्नांवर हे एका प्रकारे पाणी फेरणेच झाले, नव्हे का? त्यांची योग्यायोग्यता ठरवणारे आपण कोण, हा विचार मात्र एकाच्याही मनाला शिवला देखील नाही. गरज नसताना टोप्यांना देव्हाऱ्यात बसवणं, त्यांचं अधिष्ठान मांडणं, त्यांच्या पुज्यतेसाठी दहशत निर्माण करणं म्हणजे त्यांनी केलेल्या कार्याचा विसर पडून त्यांच्या पाठी स्वतःचं पोट भरण्यासाठी मांडलेला हा सगळा एक किळसवाणा आणि ओंगळवाणा बाजार आहे.


आज मी जिंकतो का हारतो, ह्याकडे लोकांचं लक्ष लागलं आहे, कारण त्यावर कोणत्या टोपीचा जय होणार, ते अवलंबून आहे. निकाल ज्या टोपीच्या बाजूने लागेल, ती टोपी जिंकेल, आणि अर्थातच ती टोपी सर्वश्रेष्ठ ठरेल. ह्या सगळ्या विवादावरून हिंदुस्थानातले लोक उपयुक्त माहिती मिळवून आपल्या माहितीत भर घालणार नाहीत, तर आपण ज्याला समर्थन देतो, ती टोपी जिंकणार का नाही, हेच बघत रहाणार. त्याचं कारण एकच; इतक्या वर्षांपासून लागलेली घाणेरडी सवय. दुसरा हरतोय ना? त्यातच त्यांचा आनंद. आपण ज्याला पूज्य मानतो, त्याच्या बाजूनं बोललं गेलं, की अहंभाव सुखावणारी आणि विरोधात बोललं, की मग विचारायची सोय नाही. मग ते विरोधातलं बोलणं कितीही कठोर सत्य का असेना. ह्या चर्चेतून स्वतःला वाटणाऱ्या निंदनीय टोप्यांविरुद्ध निघालेल्या मुद्द्यांचा वापर पुढच्या भांडणासाठी आणि त्या टोप्यांच्या चारित्र्यहननासाठी केला जाणार, ह्यात दुमत का असावे? मी मगाशी म्हणल्याप्रमाणे, ह्या खटल्याकडे सामान्य लोकांचं लक्ष मी आत्ताच नमूद केलेल्या कारणास्तव असणार आहे, ह्याबाबत माझ्या मनात कोणताही संदेह नाही. मोठ्यामोठ्या लोकांचंही ह्याकडे लक्ष असेल, ते अशासाठी, की आजच्या निर्णयावर, त्यांनी आजवर अवलंबलेल्या विविध मार्गांवर त्यामुळे बिलामत येण्याची शक्यता आहे. ह्या खटल्यात मी जिंकलो, तर पांढऱ्या टोपीचे समर्थक सहाजिकच चूक ठरवले जातील. मग अशा बड्या लोकांनी, पूर्वी पांढऱ्या टोपीचा घेतलेला आश्रय त्यांना सोडायला लागेल आणि संपूर्णतः नागवं होऊन जनतेसमोर त्यांचं खोटं उघडं पडेल. अगदी हाच तर्क, मी समजा हरलो तर काळ्या टोपीच्या समर्थकांनाही लागू होईल. हे झालं टोप्यांच्या गैरमार्गासाठी घेतलेल्या आश्रयाबाबत. पण वैध मार्गासाठी घेतलेल्या आश्रयाचीही फार वेगळी गत होईल, असं वाटत नाही. कारण डोक्यावरचं छप्परच उडाल्यावर, घेतलेला आश्रय वैध कारणांसाठी होता का अवैध, हा प्रश्नच मुळात निरुपयोगी ठरतो. तेव्हा मी जिंकतो का हरतो, ह्यावर अनेकांचं नशीब ठरलेलं असू शकतं, हे निश्चित.


मला ह्या माध्यमातून अजून एक गोष्ट लोकांसमोर आणून द्यायची आहे, ती ही, की हिंदुस्थानातील लोकांना, मीडियामुळे असेल, किंवा त्यांच्या स्वतःतच दोष असेल, काहीही असो, पण कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यावं, हे कळत नाही. आज मी हा टोप्यांचा मूर्ख खटला घेऊन कोर्टात उभा राहिलो, तेव्हा मला सरसकट मूर्ख ठरवण्यापेक्षा लोक आपपल्यातच विभागले जाऊन भांडू लागले. नेहमीप्रमाणे मीडियाने ह्या साऱ्याला खतपाणी घालत आपापले खिसे गरम करून घेतले. वास्तविक हा खटला दखल घ्यावा, इतक्याही दर्जाचा नव्हता. एका यःकश्चित इसमाने एक आत्यंतिक क्षुल्लक वाद उकरून काढायचा निष्फळ प्रयत्न केला, हे दाखवून देऊन आपण लोकशाहीचा एक खंबीर आणि योग्य खांब आहोत, हे दाखवून देण्याची एक उत्तम संधी मीडियाला होती. जगामध्ये….जगाचं आपण एकवेळ सोडून देऊया, परंतु आपल्या मायभूमीमध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. त्यामध्ये अनेक घटना खरोखरीच वाखाणण्याजोग्या आहेत. परंतु त्यांची दखल न घेता जास्तीतजास्त पैशामागे, प्रसिद्धीमागे धावणाऱ्या मीडियाला ह्या खटल्यात जास्त स्वारस्य वाटलं, हे केवढं मोठं दुर्दैव!

अजून एक मोठं दुर्दैव! हे दुर्दैव म्हणजे ह्या टोप्यांच्या अनुयायांनी केलेल्या मुर्खपणाची आणि चुकीच्या पद्धतीनं आपापल्या आदर्शांचं केलेलं अनुकरणाची परिसीमाच म्हणावं लागेल. जी पांढरी टोपी आपलं सबंध आयुष्य लोकांच्या एकजुटीसाठी झटली, आपल्या शांततेच्या मार्गावरून चालण्यासाठी लोकांना उद्युक्त करून गेली, अहिंसा परमो धर्म म्हणत लोकांना प्रेमाचं, सलोख्याचं, एकजुटीचं, शांततेचं अन् परस्पर सहकार्याचं महत्त्व कंठशोष होईपर्यंत ओरडून ओरडून सांगत राहिली, अशा व्यक्तीच्या अनुयायांनी त्यांच्या आदर्शाला धक्का पोहोचला, म्हणून शस्त्र हातात घेतलं. हा त्या महात्म्याचा पराभव नाही का? आज जर ही टोपी अस्तित्वात असती, तर तिने ह्यावर काय भाष्य केलं असतं? स्वतःवर होत असलेल्या टीकेला दडपण्यासाठी शस्त्र वापरलं असतं, कोणत्याही प्रकारची हिंसा घडवली असती, ह्या प्रकाराकडे दुर्लक्ष केलं असतं, का देशातल्या जनतेला उद्देशून सगळ्या शंकांचं बुद्धिप्रामाण्यवादाला धरून एक सडेतोड उत्तर दिलं असतं? त्यांनी काय केलं असतं, हे सांगणं जरी अवघड असलं, तरी एक सारासार विचार करूनच पाऊल उचललं असतं, एवढं निश्चित. हे एका बाजूला पांढऱ्या टोपीचं दुर्दैव, तर दुसरीकडे काळ्या टोपीची दशा फार काही वेगळी नाही. जी टोपी आयुष्यभर विज्ञानाची कास धरा म्हणून आग्रही होती, ती व्यक्ती कोण श्रेष्ठ, ह्या वादात उतरली असती? जी लोकं त्यांच्या श्रेष्ठत्वासाठी भांडत आहेत, त्यांना ह्या वीरानी काय सांगितलं असतं? अजून लढा? जहालवादी असल्यामुळे शस्त्र हाती घ्या? हे म्हणणं पडलं असतं? खचितच नाही. उलट त्यांनीसुद्धा भांडू नका, हीच भूमिका आग्रहानं घेतली असती. या वीराच्या, तेजोमय अशा विज्ञानवाद्याच्या समर्थनासाठी हे रस्तोरस्ती फिरणारे अत्यंतिक अव्यवहारी, विज्ञानाची कास सोडून वागणारे लोक पाहून, आपण ह्यांचा आदर्श आहोत, हे म्हणवणंही त्यांच्या जीवावर आलं असतं. मुळात आपल्या कार्यात ईश्वर आहे, असं परोपरीने ओरडून सांगणाऱ्या ह्या दोन टोप्यांनाच आपण ईश्वर करायला गेलो, हेच ह्या दोघांचं सर्वात मोठं दुर्दैव नव्हे काय?

अशी अनेकविध प्रसंगांची दुर्दैवामाला ह्या खटल्यामधून मला लोकांसमोर मांडायची होती. एकाहून एक असे हे दुर्दैवी क्षण मला लोकांसमोर मांडायचे होते. मी वादासाठी, लोकांच्या नजरा माझ्याकडे वळवून घेण्यासाठी टोप्यांचे हे दोन रंग निवडले. पण ह्याव्यतिरिक्त असलेल्या टोप्यांची गतही हीच आहे. रंग कोणताही असो, फरक काहीच पडत नाही. निळी असो, पिवळी असो, लाल असो, भगवी असो किंवा हिरवी असो. टोपी असो, जिरेटोप असो, पगडी असो, फेटा असो नाहीतर कफनी असो. आदर्श आणि त्यांचे अनुयायी ह्यांच्यातील विरोधाभास काही बदललेला नाही. फक्त ते मांडण्यासाठीच मी ह्या दोन टोप्यांचा आधार घेतला. ह्याद्वारे मला ह्या दोन्ही टोप्यांचा कोणत्याही प्रकारे अवमान करायची इच्छा नव्हती, त्यांच्या कार्याची अवहेलना करायची मनीषा नव्हती, कधीच नाही. त्यांना छोटा अथवा मोठा ठरवणारा मी कोणीच नाही. देशासाठी जेव्हा ह्या विविध प्रकारच्या टोप्या झटल्या, तेव्हाच त्या मोठ्या होऊन गेल्या होत्या, अगदी त्यांच्याही नकळत. परंतु, ज्या पारतंत्र्यातून त्यांनी बाहेर खेचून स्वातंत्र्य मिळवताना एकीचं महत्त्व पटवून सांगितलं होतं, आज तेच स्वातंत्र्य ह्या टोप्यांचे गट पाडून पुन्हा नव्या पारतंत्र्यात ढकलेल की काय ह्याची भीती वाटते इतकच. जातीभेद, वर्णभेद, लिंगभेद इतकच काय, भाषाभेद, पोटजातभेद इत्यादीवर सगळेच बोलतात. हिंदुस्थान आगोदरच ह्या सगळ्या भेदांच्या कचाट्यात सापडलाय. ह्या कचाट्यात हा टोपीभेद न दिसणारा आहे आणि आज त्यावर ठणकावून सांगावंसं वाटलं, म्हणून हा सारा खटाटोप होता.


माझी माननीय कोर्टाला एकच विनंती आहे. मी केलेल्या प्रमादाबद्दल मला जरूर शिक्षा द्यावी. परंतु, मी जे काही बोललो, जे काही कृत्य केलं, त्यामागचा उद्देश नजरेआड होऊ न देता तो जास्तीतजास्त लोकांसमोर येऊ द्यावा. कित्येकांच्या भावनांशी मी खेळलो. त्यांची आदरस्थाने असलेल्या ह्या टोप्यांच्या चारित्र्यावर, एकंदर कर्तृत्त्वावर डाग लावायचा भयंकर अपराध माझ्या हातून घडला. त्याबद्दल मी दिलगीर आहे. मी आधीही सांगितलं, तरी पुन्हा सांगतो. ह्यामागे ह्या महापुरुषांच्या कर्तृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचा माझा कोणताही इरादा नव्हता. माननीय कोर्टानं मला इतकं बोलायची परवानगी दिली, त्याबद्दल आभार! ह्यापुढे टोपीवाद संपवण्यासाठी अजून एक खटला न चालो आणि माझ्यासारखं पाऊल कोणाला घ्यायला न लागो, एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. बाकी न्यायाधीश महोदय, आपण सुज्ञ आहातच….



By Amey Sachin Joag




Recent Posts

See All
Warden's Rite

By Jazzanae Warmsley Set in Tiremoore, a parallel 21 st  century realm where magic governs justice and resurrection is never without consequence. Warden’s Rite (Chapter 1) In the twilight-bound city o

 
 
 
Abyssal Light Part 1: Still

By Drishti Dattatreya Rao Nina:   I opened my eyes. Another day. Tiring – I couldn’t even get out of my bed. I rolled over and fell off the bed. Somehow, it broke. Ugh, every day is such a pain. I hav

 
 
 
The Girl At The Well

By Vishakha Choudhary Phooli was unhappy. She had already been to the well twice today. And the first time around, she had to carry an extra bucket of water at top of her two matkas. The second round

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
  • White Instagram Icon
  • White Facebook Icon
  • Youtube

Reach Us

100 Feet Rd, opposite New Horizon Public School, HAL 2nd Stage, Indiranagar, Bengaluru, Karnataka 560008100 Feet Rd, opposite New Horizon Public School, HAL 2nd Stage, Indiranagar, Bengaluru, Karnataka 560008

Say Hello To #Kalakar

© 2021-2025 by Hashtag Kalakar

bottom of page