टिकली
- Hashtag Kalakar
- Apr 22, 2023
- 3 min read
By Minal Satav
पंधरा एक वर्षांपूर्वी माझ्यकडे एक स्मार्ट फोन पाहिजे होता,
तिचा फोटो काढला असता मी .
ती म्हणजे हिना,माझी एककुलती एक जिवाभावाची मैत्रीण.
आम्ही ना सगळे ग्रुप ने मंदिरात जायचो,राधा कृष्णाचा , विठ्ठल रुक्मिणीच्या,
गावच्या देवी च्या मंदिरात, मग जिथे जाऊ तिथे सगळे पाया पडलो की छोटंसं कुंकू लावायचो.
ती लांबून हात जोडायची, मी बोटात थोडं कुंकु घेऊन तिच्या कपाळाऐवजी मानेवर लावायचे कारण तीची आई माझ्या घरी आली की आई सुधा काकुला मानेला कुंकू लावायची निघताना...
हिना ला माझ्या टिकल्या फार आवडायचा , चमकी ची टिकली तर सगळ्यात जास्त , मग सायकल स्टँड पशी ती तिच्या ड्रेस ला म्याचींग टिकली लावायची. बरोबर भुवयांच्या सेंटर शोधणं तीला भूमिती पेक्षा अवघड वाटायचं..कधी तिरकी टिकली लावणार कधी एकदम वरती लावणार आणि बऱ्याच टिकल्या मातीत पाडणार.
पण टिकली परफेक्ट लागली की खळखळून हसायची..सायकलच्या आरश्यात नीहाळत रहायची, जरा खुट्ट झालं की दचकायची, टिकली बोटांवर काढून ठेवायची,पुन्हा कोणी नाही अशी खात्री केली की कपाळावर लावायची .
दर वर्षी ईद ला मला आमंत्रण असायचंच.
दहावीत असेन आम्ही ,ईद साठी तीला बांगड्या कानातले मेहंदी घ्यायची होती ,
शिवायला टाकलेला ड्रेस घेऊन आम्ही दोघी अन् तीची मोठी बहीण (आपा) मिळून सखी मध्ये गेलो हे आमच्या गावचं सगळ्यात महागडं दुकान .
तिथं तीनी दोन डझन बांगड्या घेतल्या मेटलच्या , एक डायमंड हार आणि कानातले घेतले.
मी भिंतीवर लावलेली टीकलीची पाकिटं बघत होते. तींन एक भरपूर रंगाचा टिकल्या असलेलं पाकीट कवर मधून काढलं आणि म्हणाली मिने हे घे तुला भारी दिसल.
आहे माझ्याकडे असलं , मी म्हणाले
तरी तिने आग्रह केला..न रहावुन तीची आपा ओरडली
"उसको नहीं लेना तो क्यू बोल री"
हिना आपा पशी जाऊन बसली.
दुसऱ्या दिवशी ईद होती.
मी माझ्या तळहातावर हिरवा चमकीचा खडा घेतला (टिकली चा)
आम्ही मैत्रिणी सिंगल पंगतीत बसलो गुलगुले खाल्ले पाहुण्यांची गर्दी होती म्हणून फार गप्पा न मारता निघालो.
मैत्रिणी आप आपल्या सायकल काढत होत्या ,मी म्हटलं माझा रुमाल राहिलाय घेऊन येते .मी माघारी गेले , हिना ला बाहेरूनच आवाज दिला सगळेच गप्पात आणि कामात बुडाले होते, ती बाहेर आली मी तळहातांवरची हिरवी टिकली तीला दिली ,तिने ती लावली ,खाली मान घालून आतल्या कपाटाच्या आरश्यात बघायला गेली.
"भारी दिसते ना ग " बाहेरून आली अन् मला म्हणाली
मी चित्रकार असते ना तर मी तिला रेखाटलं असतं अन् तिचं चित्र मोनालिसा पेक्षा ही प्रसिद्ध झालं असतं.
तीनं टिकली काढून माझ्या हातात दिली..तेवढ्यात आपा ने तिला आवाज दिला म्हणून ती आत गेली आणि मी ही माझी सायकल काढून घरा कडे निघाले.
त्यानंतर आम्ही ईद ला कधी भेटलोच नाही
मी बाहेर पडले शिकायला आणि ती माझी जिवलग मैत्रिणी अचानक बाई झाली. तिचं लग्न झालं माझी डिग्री होईपर्यंत तिला दोन मुलं झाली.
माहेरी जाताना तिचं गाव लागतं या दिवाळीला तीला भेटायला म्हणून गेले.
तीच्या गोड लहान मुलीला मी छान खेळणी घेतली होती , बऱ्याच वेळ तिची मुलगी माझ्या मांडीवर बसली होती.आमचा मैत्रिणीच्या गप्पा चालूच होत्या
त्या छोटी ने माझ्या कपाळावर ची टिकली काढली अन् तीच्या कपाळावर लावली अन् गोड हसू लागली.
हिना ओरडली तीला,
अन् दुसऱ्याच क्षणी हसायला लागली मी ही हसले.
आम्हाला दोघींना आमची एकत्र केलेली शेवटची ईद आठवली
"अच्छी दिख रही हैं पर वापस कर दे अँटी को
उनका भगवान घुस्सा करेगा ,दे भला नहीं तो हमारा अल्ला तुझपे घुस्सा करेगा "
हिना तिच्या मुलीला बोलली
"अम्मी ये टिकली के लिए अल्ला क्यूँ दाटेगा.. तुम्हारी चूनरी पे इतनी टिकलिया तो हे!"
मला कौतुक वाटलं तिच्या तर्क शुद्ध बोलण्याचे
हिना तिच्या ओढणीकडे बघत हात फिरवून म्हणाली
मीने मानेला लाव ग एक टिकली मला
By Minal Satav

Comments