चिन्मयच्या जन्माआधीपासून चैतन्यच्या मनात असलेले विचार –
- Hashtag Kalakar
- May 17, 2024
- 1 min read
Updated: Oct 1, 2024
By Archika Mayur Bapat
चाहूल लागताच त्याची स्वप्ने मनात रंगू लागली
प्रश्नांच्या भडीमाराने आईची धांदल उडू लागली
कधी येणार गोंडस बाळ
भाऊ असेल का बहीण
दादा दादा म्हणत येईल का माझ्याजवळ
आतुरतेने त्याची वाट पहात होतो
चिमुकल्या बाळाला मांडीवर घेणार होतो
कधी ते येईल माझ्याशी खेळायला
का भांडेल माझ्याशी विचार करत होतो
बाळाच्या जन्मावेळी मनी खिन्न झालो होतो
आईला सोडून एकटं रहायला शिकलो होतो
आईवर चिडून रुसून बसलो होतो
मला सोडून बाळाला घेते म्हणून रागावलो होतो
बाळाच्या जवळ गेलो तेव्हा आईनं मला जवळ घेतलं
तुझा दादा आलाय सांगून तुला माझ्या मांडीवर ठेवलं
तुझ्या गोंडस गालांना हातानी जेव्हा स्पर्श केला
तुझ्या गोड हसण्याने माझा राग पळून गेला
तुझ्या हसण्यातच माझं हसणं सामावलं होतं
तू रडू लागलास की मलाही खिन्न वाटत होतं
तू पहिल्यांदा ‘दादा’ म्हणालास आणि मी खूप खूष झालो
घरातल्या सगळ्यांना ओरडून ओरडून सांगू लागलो
पहिलं पाऊल जेव्हा टाकलंस तेव्हा थोडा अडखळत होतास
माझ्याच आधाराने हळूहळू चालत होतास
शाळेत जायला लागलास तेव्हा घाबरला होतास
दप्तराचं ओझं माझ्या खांद्यावर टाकून देत होतास
अभ्यास करताना माझ्या खोड्या काढत होतास
आई ओरडेल म्हणून माझ्या मागेच लपत होतास
खेळताना अनेकदा माझ्याशी भांडत होतास
चिडून माझ्यावर गुपचूप बसत होतास
आपल्या दोघांचं भांडण हे क्षणिक असायचं
फार वेळ एकमेकांशिवाय राहू नाही द्यायचं
By Archika Mayur Bapat

Comments