चल घेऊ शपथ एकमेकांची
By Dhiraj Phadke
मी रंगवेन माझी लहर तुझ्या छटांमध्ये,
अन माझा जीव तुझ्यासंगे.
रेखाटेन तुझे ओठ स्वर-छटांमध्ये,
चितारूनी तुझे मुख माझ्या मुखाकडे.
रेखाटून माझ्या कमरेभोवती तुझे हात,
करेन सर्व शंकावर मात, आणि मग;
हळुवारपणे रंगवेन पाऊसधारा बरसणाऱ्या,
तुझ्या त्या केसांवरून, वाऱ्यासंगे झुलणाऱ्या.
मी कोरेन माझा एक हात,
पुसण्या अश्रू तुझे.
संपवुन टाकेन सर्व भीती,
तुझ्याकडे पाहात शांतपणे.
काढेन एक अपुले छायाचित्र,
नाजूक अन गडद.
विसावू आपण जेव्हा,
एकमेकांत अलगद.
उत्साह आणण्या तव हृदयी,
चितारली एक प्रतिमा सूर्याची;
नाही दूर जाणार एकमेकांपासून
चल, घेऊ शपथ एकमेकांची.
रंगवेन मी तेच सत्य,
की मजला काय वाटे;
प्रयास हाच एकला,
जो टिकवेल अस्तित्व तुझे.
घेऊनी कुंचला,
हलका अन नाजूक,
आणेन तुज मजसमीप,
एक चित्र रेखाटून.
सुवर्णाच्या ह्या अंगठीने,
होईल सुरुवात आपुल्या जीवनाची;
नाही दूर जाणार एकमेकांपासून,
चल घेऊ शपथ एकमेकांची.
मी देईन तुजला ते,
जे विकत घेता येणार नाही असे;
निस्सीम प्रेम, राहुनी एकनिष्ठ,
शेवटच्या श्वासापर्यंत……
By Dhiraj Phadke

Comments