खिडकी
- Hashtag Kalakar
- 18 hours ago
- 1 min read
By Prasad Shankar Gurav
जुनाट पडीक घराची खिडकी.... कित्येक वर्षांनंतर ही कशीबशी तग धरून राहीलेली.... खूप काही पाहिलेलं तीनं... आता जरी तिची दारं उघडझाप करायला समर्थ नसली तरी एकेकाळी खूप खडखडाट केलेला होता त्यांनी... सुकलेल्या लहान मोठ्या वेलीनी जखडलेली ती... दूरवर गेलेला एकाकी रस्ता... आजूबाजूला डोंगर, झाडे... क्वचित प्रसंगी वापरातील रस्ता... कधीतरी एखादा सायकल स्वार किंवा लहान मुले ये जा करत... खिडकी खूपशा घटनांची साक्षीदार होती...आतल जग व बाहेरील जग अनुभवलेली...जास्त करून बाहेरच..
आतला सदोदित आपलं अव्यवस्थित जगणं व्यवस्थीत करून जगायचा.... घरी परतल्यावर घरातल्यांच्या सुख दु:खात सहभागी व्हायचा.... पण खिडकी मात्र क्वचितच उघडायचा.... कधीतरी उघडली की खिडकीला हवा छाटून जायची... भावनिक व्हायची... मदमस्त होऊन दारांची उघडझाप करायची... तरी पण ती जास्त करून बाहेरील जगातच वावरायची... तिला आतला व्यवस्थितपणां नको होता... बाहेरील अव्यवस्थित अस्तित्वात तीचं रमण व्हायचं... झाडे पाने , पाने, फुले, वेली, पशू पक्षी यांच्या सान्निध्यात तिनं स्वतःला मिसळून टाकलं होतं जणू... दूरवर चरणारी गायी, गुरें, कुत्र्यांचं फिरणं, भुंकणे हे नित्याचच होतं... जेव्हा वारा सुसाट वेगाने यायचा तेव्हा तिची दारें तटातटा आपटायची...तरी देखील तिला ते आनंद झाला तिला ते आनंद निर्माण करणारं वाटायचं... जणू काही संगिताची मैफल...हे सगळं ती कित्येक काळापासून अनुभवत होती...खिडकीवर पसरलेल्या;तारुण्याने रसरसलेल्या वेली नवयौवनाच्या बहाराचा आनंद लुटत... लहान मोठ्या वेली होत्या पण एकमेकांसाठी त्यांच जीवन होतं जणू..
आज दिवस तसा बरा होता... उत्साह होता वातावरणात...दूर रस्त्यावरून कधी न येणारी युवती खिडकी समोरील दगडावर थोडासा आडोसा बघूनच बसली होती... बावरलेली,थोडी घाबरलेली होती ती...तिच्यात पल्लवीत झालेली आशेची किरण...तिच्यातला उत्साह आणखीन वाढवीत होती...ती थकलेली असावी बहुतेक.. तिच्या अनुभूतींच सत्य इतक भयाण व भेसूर होतं...थकणं हे ओघाने आलंच.. खरंतर तिच्यातली आस्तीकताच तिच्या वर्मावर बोट ठेवत होती...ती सुंदर होती... प्रामाणिक होती... पवित्र होती..पण तिच्यातलं पावित्र्य एका बरबटलेल्या पारंपारिकेमुळें काळवंडलेलं होतं.तिच्यात जे नवचैतन्य जागृत झालं होतं ते त्याच्यावरील आस्थेमुळे तो नवनिर्माणाच्या प्रवाहात होता...सृजनता त्याच्या नसानसात भिनलेली होती..तिच्या त्या भयाण बरबटलेल्या अनुभूतिंची त्याला पुसटशी कल्पना देखील नव्हती.ती सदैव अनीश्र्चीततेच्या काळ्या ढगां आड लपलेली असायची.....त्याला सांगायची हिम्मत मात्र तिच्यात नसावी... जेव्हा जेव्हा धाडस करून सांगायला जात असे तेंव्हा तिचे ओठ नुसते पुटपुटत... तीचं रोजचं जीवन संशयानं घेरलेलं होतं..... तिच्या सच्चेपणावर कुणी विश्वास ठेवणार नाही याची खात्री होती तिला...तो यौवनात होता...त्याचं यौवन मुसमुसलेलं...तीनं मात्र यौवनाला कृरतेच्या रूपात पाहीलं होतं...त्याअधम यौवनाचा तिटकारा होता तिला....किळसवाण होतं सगळं तिच्यासाठी...पण अमृतमय बहर त्याच्यात दिसत होता तिला....घाणेरड्या चिखलातून बाहेर निघण्याचा जणू तो एकच आशेचा किरण होता तिच्यासाठी...हवेची लहर आल्यासारखी झाली...तो आलेला होता.. आपल्याच तंद्रीत... वेगळ्याच दुनियेमध्ये असल्या सारखा...
दोघांत प्रेमालाप होतात...वातावरणाची त्यांना साथ असते...खिडकीवरील वेली, झाडे, पाने बहरल्यागत होतात... मोठ्या वेलींना हे आवडत नसावं बहुतेक...त्या लहान वेलींना करकचून लपेटतात...जरा जोराचा वारा आला असता तर त्यांच्यात काय चाललंय ते कळलं असतं.. काही वेळाने काय होते कुणास ठाऊक...ती त्याच्याकडे अविश्वासाने बघते... डोळ्यांत आसव असतात तिच्या... आणि अचानक अनपेक्षित रित्या ती तिथून निघून जाते...त्याला नेमके कळत नाही की असं काय झालं आणि तिच्या भावनांना तडा गेला...तो काही तरी बरं करायलाच गेलेला असतो... पण तिच्या अपेक्षांचा चुरा झालेला असावा बहुतेक... आता मात्र वारा वाहायला लागतो..तो तसाच बसून राहतो..वारा झेलत.. तिला दूरवर जाताना बघत... अगदी डोंगरासारखा...आता वारा बेभान होतो...त्याचा नाईलाज होतो... खिडकी काय करणार बिचारी...
तो खूपदा दिसतो.पण ती मात्र दिसत नाही.. खिडकीची दारं आता कायमची बंद आहेत... उघडझाप करण्याची ताकदच नसावी बहुतेक... मोठ्या वेली सुकलेल्या आहेत... ओला द्रव कधीच थांबलेला...पण नवीन कोंब मात्र दिसताहेत तुरळक... दूरवर धुक्याच साम्राज्य पसरलय... एक स्त्री धुकं वल्हवत...मागे सारत सारत खिडकीच्या दिशेने येत आहे... कदाचित भास असावा... स्पष्ट कांहींच दिसत नाही आहे... तीची दृष्टी क्षीण झाली असावी...पाना फुलांना थोडासा सुगावा लागल्यामुळे त्यांच्यात नवीनतेची आस तयार होत आहे... स्त्रीच्या डोळ्यांत त्याचा शोध मात्र स्पष्ट दिसतोय... आपल्या अनुभवांना कापत...त्यांचा चुरा करत...ती येण्याचा प्रयत्न करत आहे...पण काळ तिला पोहोचू देत नसावा...तिच्यातल अपेक्षांच ओझं कुठच्या कुठे नाहीसं झालेलं आहे... नजर साफ आहे... आशाही पल्लवीत झालेली दिसतेय...ती चालतेय... मध्येच वीरूनही जात आहे...जशे विरावे सूर तसे...पण तिची हालचाल मात्र धुक्यातूनही समजत आहे...
By Prasad Shankar Gurav
Comments