कलावंतीण
By Pranali Deshmukh
जरा ओलसर केस मोकळे गालावरती लट छळणारी
अंबाड्याला घट्ट आकडे फुले बेगडी मुसमुसणारी
डोळ्यांमधले भाव बोलके दाट पापण्या चाळा करती
काजळ भरता किनार ओली मेघ दाटले काठावरती
कुड्या पांढऱ्या खडा गुलाबी पाळीवरती बुगडी झुलते
डाळिंबी रत्नाने सजली ठुशी बिलगते गळ्यात खुलते
ओठावरती तीळ पहारा की सीमेवर राखणदारी
नाक मुरडता हसतो मोती सुबक नथीचा नखरा भारी
मणी डोरले , पोत जोंधळी , साज गळाभर कठीण कोडे
दोन पाटल्या ,चार बांगड्या ,चुडा हातभर ,बिलवर ,तोडे
मिळे वारसा आईकडुनी कळण्याआधी झाली तरणी
चुरगळलेले फूल कधीही वाहत नाही ईश्वर चरणी
सिंहकटीवर खुले मेखला मुके घुंगरू बोलत पायी
पदरामागे नाभीवरती एक चांदणी चमकत राही
निळसर शालू जरकाठीचा वेल रेशमी कुंदन भारी
पाठीवरती रुंद काठ तो घट्ट बांधली लटकण दोरी
तळपायावर रंगवलेल्या हसती भेगा रुसवा खोटा
खरा तमाशा शिट्टी टाळ्या कुणी दिवाणा उधळे नोटा
कहर लावणी मादक ठुमका रात्र रंगली बघण्यासाठी
तिला ढोलकी घास भरवते श्वास घुंगरू जगण्यासाठी
चकित होउनी भ्रमित आरसा दृष्ट काढतो उत्तर नाही
पान सुपारी विडा चावते शिंपडताना अत्तर बाई
ओठ चावुनी उडवी भुवई इशाऱ्यातुनी रिझवत असते
आंबट नजरा रुतण्याआधी गिरकीमध्ये विझवत असते
अंगाई गातांना सुद्धा बसल्या बसल्या गजरा करते
निजल्यावरती बाळ सानुले मैफिल सजते मुजरा करते
रडे लेकरू फुटतो पान्हा ऊर कितीदा भरून येतो
ओली छाती पाझरल्यावर तिचा उसासा विरून जातो
कला लावणी कलाकार ती जत्रा जत्रा सरकत राही
बहर फुलांचा ओसरल्यावर कुणी पाखरू फिरकत नाही
राया दिलबर मालक सगळे कुणी सोयरा भेटत नाही
जळतांना शृंगार चिते वर चूल फडाची पेटत राही
By Pranali Deshmukh

Comments