आई.. मला पुन्हा एकदा...
By Anjali Sameer Chimurkar
खूप आठवते आई मला माझे ते बालपण..
तुच माझी सावली होतीस आणि तुच माझे दर्पण..
निरागस ते बालपण, परत फिरून जगायचंय..
आई, मला पुन्हा एकदा तुझ्या कुशीत यायचंय..
ओळख नव्हती मला तेव्हा सामावली होती मी तुझ्यातंच....
तुलाही कुठे भान जगाचे तुही तर रमायची माझ्यातंच...
हात तुझा हाती घेऊन, खूप काही बोलायचंय...
आई, मला पुन्हा एकदा तुझ्या कुशीत यायचंय..
माझे बोबडे बोल ते तुला कसे गं कळायचे..
माझ्या अंतरीचे भाव कसे तुझ्या चेहऱ्यावर वळायचे...
निष्पाप ते नातं, परत तसच अनुभवायचंय...
आई, मला पुन्हा एकदा तुझ्या कुशीत यायचंय...
माझ्याच सोबत रडायचीस तू, माझ्या सोबतच हसायची ...
गुपितही माझी सारी तुझ्याकडेच असायची..
गुपित मनातलं सगळं, परत तुलाच सांगायचंय..
आई, मला पुन्हा एकदा तुझ्या कुशीत यायचंय...
कवेत तुझ्या असताना ना चिंता होती भविष्याची...
फिकिर होती कुणाची ना पर्वा होती आयुष्याची..
मांडीवर तुझ्या डोकं ठेउन, शान्तं पडायचंय..
आई, मला पुन्हा एकदा तुझ्या कुशीत यायचंय..
स्वार्थी आहे जग सारे कुणालाही कुणाची कदर नाही...
नाती खूप मिळालीत पण तुझ्या प्रेमाची सर नाही..
बोट तुझं धरुन मला परत चालायचंय....
आई, मला पुन्हा एकदा तुझ्या कुशीत यायचंय..
परिस्थीतींशी भांडून, हरुन आता गेले मी...
स्वतःला सिद्ध करुन, थकून आता गेले मी
तुझा पदर पांघरून, परत मला नीजायचं...
आई, मला पुन्हा एकदा तुझ्या कुशीत यायचंय…
आई, मला पुन्हा एकदा तुझ्या कुशीत यायचंय...
By Anjali Sameer Chimurkar

Comments