Mandi Aahe
By Riyaj Attar
कामगार हताश तर शेतकरी उपाशी
उच्चवर्गीय नेहमीप्रमाणेच आनंदी आहे
आणि काय तर म्हणे मंदी आहे !
पिकनीक जोरात तर पार्ट्या शराबी
पण नोकरदारांच्या पगारवाढीवर बंदी आहे
आणि काय तर म्हणे मंदी आहे !
थियटर फुल मॉल थांबला नाही जराबी
ही मोठी लोक मात्र हौशी अन छंदी आहे
आणि काय तर म्हणे मंदी आहे !
कर्जमाफी मिळत नाही की नाही वेतनवाढी
बार जोशमध्ये तर हॉटेलमध्ये गर्दी आहे
आणि काय तर म्हणे मंदी आहे !
जनता भिकारी मंत्र्यांची संपत्ती बेहिशोबी
चोरांची चंगळ अन सोनारांची चांदी आहे
आणि काय तर म्हणे मंदी आहे !
देवस्थान मालामाल देवही आज अभागी
पुजारी बनले देव भाविक नुस्ता नंदी आहे
आणि काय तर म्हणे मंदी आहे !
खेळाडुंना कोटी दुष्काळग्रस्तांची फ़क्त पाहणी
खेळणारे खेळवणारे बघणारे लय दर्दी आहे
आणि काय तर म्हणे मंदी आहे !
ही मंदी म्हणजे मोठयांसाठी खरे तर पर्वणी
दुर्बलांना आणखी दाबण्याची सुवर्ण संधी आहे
मंदी तर आहे ......... आहे ना मंदी
ही आहे गरीबांच्या घरामंदी
ही आहे शेतकऱ्यांच्या शेतामंदी
ही आहे कामगारांच्या पगारामंदी
धनवानांच्या दयामायामंदी
प्रशासनाच्या प्रयत्नामंदी
सरकारच्या विचारसरणीमंदी
By Riyaj Attar

Comments