विवर ….
- Hashtag Kalakar
- Sep 10
- 1 min read
By Prasad Shankar Gurav
स्वरांच्या झनकारामध्ये स्वतःला संपूर्णतः स्वाधीन केलेल्या त्याला आज प्रत्येक स्वर वेगळ्याच धुनी मध्ये ओढत होता... कंठातून उमटलेल्या स्वरांमध्ये थकावट किंचीतही नव्हती.उत्तेजीत स्वरांनी त्याला अनामिकतेसाठी तयार केल असाव.मिळणाऱ्या उर्जेला स्विकारायला तो तयार होता.जणू त्यासाठीच तो बनला असावा.
आभासाचा दृश्यबंध तयार होताना तो आभास आहे की सत्य रूप आहे हे पडताळण असंभव होत.तो त्यात पूर्णपणे रमलेला होता. रमण भागच होतं,कारण त्याच्यातूनच ती उर्जा तयार झालेली होती. म्हणूनच ती अनुभूती मध्ये परावर्तित करण स्वाभाविक बनल होत.
बहुदा काळ्या विवरात प्रवेशाची हीच वेळ असावी.आकाश , विवर सप्त रंगात नटलेलं आहे. विवरात मात्र गुदमरणारा अंधार असावा. तो या प्रवासाला निघण्यासाठी तयार आहे. वातावरणातील पक्ष्यांनी अजून किलबिलाट सुरू केलेला नाही आहे. उंच उंच फोफावलेल्या घनदाट वृक्षांमध्ये किंचीतही हालचाल नाही आहे. भयाण शांतता... हळूच एक वाऱ्याची झुळूक त्याच्या दिशेने येते. त्यासरशी फुलपाखरांचे थवेच्या थवे त्याच्या दिशेने येतात व फेर धरतात...कुत्रे देखील शांतपणे मागे मागे येत राहतात..न भुंकणे न कसलाही आवाज त्यांच्या कंठातून निघत नाही.. त्याला त्याच्या शरीरात आलेले बदल कळत आहेत... हाताच्या तळव्यांमध्ये. एक वेगळीच जाणीव होत आहे... पूर्णतः नवीन...
कांही उमगायच्या आत तो मिटलेले डोळे उघडतो... त्याला समजतं की तो आता घनदाट वृक्षांच्या वर आकाशात उडतोय... एखाद्या झंजावाता सारखा... हातात मात्र तिचा हात आहे..वेगवेगळी वळणं घेत झेपावण सुरूच आहे... तिच्यात समज आहे,पण सारं भवितव्य विवरच ठरवणार आहे... प्रवासात कधी कधी हात निसटला जातोय... परंतु विवरा नंतरच्या आनंदाची तिला कल्पना असावी...
त्याला मात्र विवरानंतरच्या प्रकाशमयतेची पूर्ण कल्पना आहे... त्याच्या साठी सुद्धा ती कल्पनाच होती.पण आता ती अनुभवायला मिळणार आहे. हा अनुभव तो तिला ही देऊ इच्छितोय, यासाठीच तिचा हात आपल्या हातातून निसटू नये याचा प्रयत्न करत आहे... तिच्या कष्टप्रद यातनांनी भरलेल्या भूतकाळाचे वीष प्राशन त्याने केलेल आहे..विवराचा प्रवास कष्टप्रद आहे.मध्येच ढग आडवे येतात..ते आपटले की तिची अवस्था बिकट होत आहे.. तिला विवर प्रवासा नंतरच्या आनंदाची कल्पना देत तो प्रवास सुखकर करायचा प्रयत्न करत आहे...
आता ते विवराच्या मुखापाशी पोहोचले आहेत ...विवरा मध्ये थोडा काळ गुदमरण मग त्यानंतर आनंदमय वातावरण.... त्यांच्या येण्याने विवरा पलीकडील आप्तजन स्वागताला तयार झालेले आहेत..प्रकाशमयता हिऱ्यातून दिप्तमान झालेली आहे... विविध रंगांचा समावेश असलेली ज्योत... अप्रतिम सुगंध दरवळतो आहे..आजवर कधी न पाहीलेली झाडे, प्राणी चराचरामध्ये फिरत
1.
आहेत... ढगांनी आसनासाठी स्वतःला तयार ठेवलेल आहे.. सुंदर नर्तिका नृत्य करत आहेत...त्यांची दमछाक बिलकुल होत नाही आहे..कारण श्वास ही कल्पनाच नाही आहे... तिथे सगळं कसं वेगळं, अमानवीय असंगत पण पूर्ण स्वरूपात..पण हे सारं विवराच्या प्रवासा नंतर प्राप्त होणार आहे...
आता मात्र तो आणि ती विवरा मध्ये जाण्यासाठी विवराच्या मुखासमोर वर्तुळाकार फिरू लागले आहेत...ही क्रिया इतक्या जलदगतीने होत आहे की ती दोघं अदृष्य स्वरूपात दाखल झालेली आहेत...वाऱ्यामध्ये ती परावर्तित झालेली आहेत..त्यांचे हात अजुनही एकमेकांत अडकलेले आहेत... पण आता कुणी कुणाला धरलय हेच कळत नाहींसं झालेल आहे..खरं तर हे सारं भयभीत करण्यांसारखं आहे.. आता त्यांच्या नशिबी विवरातील दाहकता आहे...प्रवासा नंतर जेव्हा ते दुसऱ्या टोकाला पोहोचल्यावरच आनंद प्राप्ती सिद्ध होणार आहे..आता परतीचे सगळे मार्ग बंद झालेले आहेत........
By Prasad Shankar Gurav

Comments