विनू
By Amey Sachin Joag
"हा रेडा रस्त्याच्या मधून कसा चालवतोय बघ गाडी!" गिऱ्हाईकने एखादी वस्तू मागितल्यावर एखादा कसलेला मराठी वाणी ज्या गतीने त्याला ती आणून देतो, त्या गतीने दुचाकी चालवत असलेल्या एका माणसाला उद्देशून भर रस्त्यात वैतागून विनू जोराने ओरडला. माणसं रस्त्याच्या बरोबर मधून निवांत जात होती आणि त्यामुळे आमची कोंडी होत होती, हे जरी वास्तव असले तरी हे वाक्य भर रस्त्यात थेट त्या रेड्यालाच ऐकू जाईल एवढ्या आवाजात बोलणे जरा जास्तच धाडसाचे होते. ते धाडस आमच्या लागलीच अंगाशी आले होते. त्या रेड्याने स्वतःची दुचाकी आणि आम्हाला दोघांना बाजूला घेत प्रसाद वाटप केले आणि तो पुन्हा त्याच गतीने निघून गेला.
ह्या सगळ्या प्रकारात मी फक्त ह्या विन्यासोबत होतो, हीच माझी चूक. त्या गाढवामुळे (इथे गाढव विनू. तो माणूस रेडा. तो गेला केव्हाचाच!) मला मात्र माझे सर्व दात विनाकारण मोजून घ्यावे लागले होते. विनू उरलेल्या दातांची थकबाकी रस्त्याच्या कडेने गोळा करत होता बहुदा. "फार लागलंय का रे विनू?" मी आपला आपुलकीने विचारायला गेलो. तर विनूने सरळ "हट्!" म्हणून मला धुडकावून लावले. ह्याला एवढं रागवायला काय झाले होते, मला कळेना. "मी नाही घाबरत कोणाला! बेसावध म्हणून बसला एक ठोसा. पण, मी सावध झाल्यावर बघ कसा पळून गेला तो उंदीर!" विनू फुशारकीने म्हणाला. आता त्या रेड्याचा अचानक उंदीर झाला होता. पण, मला मात्र त्याची गंमत वाटत होती. त्या माणसाला जोराने रेडा म्हणणारा विनू, मग मार खाताना आणि खाऊन झाल्यावरचा विनू ह्यामध्ये एवढा झपाट्याने बदल झाला होता, की त्याचा तो बदल पाहून तमाम सरड्यांनीही अचंब्याने आपापली शेपटी तोंडात घातली असती.
ह्या विनूची ही नेहमीची खोड आहे. विचार न करता कुठेही काहीही पचकायचे आणि मग, त्याचे परिणाम भोगत बसायचे. वाईट म्हणजे ह्याचे परिणाम कधीकधी त्याची निव्वळ सोबत करणाऱ्यालाही भोगावे लागतात. माझ्या तोंडावर बसलेला ठोसा हे त्यातीलच एक उदाहरण. नको त्या ठिकाणी तोंड उघडणे, बरोब्बर चुकीच्या वेळी चुकीचा विषय काढणे, भलत्याच माणसाला भलताच कोणीतरी समजून त्याच्याशी गप्पा मारणे, आयत्या वेळी काहीतरी भलतेच बोलून घोळ घालून ठेवणे अशी ह्या विनूची अगदी आवडीची कामे आहेत. थांब थांब म्हणेपर्यंत विनू त्याचे तोंड सोडून मोकळा झालेला असतो. आपल्या बोलण्यामुळे मंडळींचे चेहरे (न) बघण्यासारखे झाले आहेत हे त्याच्या गावीच नसते. जिथे जमलेले लोक नको त्या ठिकाणी पँट उसावल्यासारखा चेहरा घेऊन उभे असतील, तिथेच कुठेतरी आजूबाजूला हे विनूशेठ आहेत असे खुशाल समजावे.
विनू आणि मी बऱ्याच वर्षांपासूनचे मित्र. आमची ओळख झाली ती आमच्या कॉलेजच्या नाटकांदारम्यान. मी कॉलेजात आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमध्ये मोठ्या हिरीरीने भाग घ्यायचो. एका वर्षी मी एक एकांकिका लिहिली आणि बसवलीही होती. पहिल्यानेच हे सारं करत असल्यामुळे उत्साह खूप होता. त्या एकांकिकेपेक्षा ती सादर करायचा केलेला प्रयत्नच काहीसा वाखाणण्याजोगा होता हा भाग निराळा; पण, निदान असं कोणी थेट तोंडावर बोलून दाखवणाऱ्यातील नव्हते. एकांकिका सादर करून पुढच्या एकांकिका पाहण्यासाठी मी प्रेक्षागृहात येऊन बसलो.
"आत्ता आला का?" माझ्या डाव्या बाजूने आवाज आला. मी नुसताच हुंकार भरला. "बरं झालं!"
"म्हणजे?" मला काहीच न कळून मी विचारलं.
"आधीचं नाटक एकदम भंsगार होतं. वाचलास, नाही पाहिलंस", डाव्या बाजूने त्या 'भंगार' शब्दाचा नुसता उच्चारसुद्धा असा झाला होता, की 'भंगार' या शब्दाचा अर्थसुद्धा त्याच्या उच्चारपेक्षा वरचढ असेल, असे मला क्षणभर वाटून गेले. "कोण लेखक-दिग्दर्शक होता काय माहिती! बालवाडीतला घेऊन आले होते बहुतेक", त्या बाजूने आपले चालूच होते.
"अरे, मीच आहे त्यांचा लेखक-दिग्दर्शक", मी पटकन् कबुली देऊन टाकली. पुढची सबंध एकांकिका संपेपर्यंत माझी डावी बाजू एकदम चिडीचूप होती. एकांकिका संपून प्रेक्षागृहात दिवे लागले. 'हा कोण बरे चिकित्सक, जाणून घ्यावे एकदा' म्हणत मी डावीकडे पाहिले. तिथे विनू थेट पडलेल्या पडद्याकडे एकटक बघत बसलेला. अशी आमची झालेली पहिली ओळख. माझ्याआधी बहुदा त्याने अजून एकदोघांना असेच कानकोंडे करून ठेवले असावे. तेही त्याच्याकडे जळजळीत नजरेने पाहत होते.
ह्या घटनेनंतर वास्तविक मला त्याचा राग यायला हवा होता, किंवा तिरस्कार तरी वाटायला हवा होता. परंतु, ह्यातले काहीच न घडता, उलट मला त्याच्याबद्दल कुतूहलच वाटू लागलं. इथून मग आम्ही भेटायला लागलो, ओळख वाढायला लागली. पण, कुठल्याही भेटीत पहिल्या भेटीच्या आठवणी निघाल्या, तरी विनूला त्याबद्दल बिलकुल खजील झाल्यासारखे वाटायचे नाही. त्यावरून हा गडी भलताच निर्ढावलेला असावा, अशी मी मनाशी खूणगाठ बांधत होतो. आणि ते बहुतांशी खरेही ठरत होते. कारण, असे कितीही प्रसंग आले, तरी विनूला त्याची शरम वाटली नाही, खजील व्हायला झाले नाही, कानकोंडेपण तर मुळीच आले नाही.
"ए, तुलाच त्या प्रियानी कॉलेजात असताना कानाखाली मारली होती ना रे, तू तिला प्रेमाची कबूली दिली होतीस म्हणून? एव्हाना शंभरेक जणींचा तरी मार खाल्ला असशील तू"- हे बोलणे वास्तविक अत्यंत खाजगीत करण्यासारखे. पण, हा विनू त्याचे हे वाक्य भर लग्नमंडपात मोठ्याने आमच्या एका मित्राला- ज्याचे लग्न होते- त्यालाच म्हणाला होता. आणि वर जोरजोरात हसून आमच्या अजून दोन मित्रांना टाळ्या द्यायला वळला होता. असला आचरटपणा करणे, एखादा नापास होणार आहे हे ठाऊक असूनही त्याच्या घरी फोन करून त्याच्या वडिलांना त्याचा निकाल विचारणे, एखाद्या मुलाने निकाल घरी कळवला नसेल तर 'आम्हाला सांगितलं आणि तुम्हाला कसं नाही सांगितलं'सारखे अप्रशस्त प्रश्न विचारून त्या मुलाला अडचणीत आणणे, रस्त्यातून जाताना भलत्याच एखाद्या माणसाला उत्साहाने हात हलवून ओळख दाखवून, नंतर त्याची आणि आपली ओळख नाही हे कळल्यावर 'तुम्ही नाही ते. लांबून नुसतं भलंमोठं पोटच दिसलं, मला वाटलं आमचे काकाच आहेत' असलं काहीतरी बोलणे- हे असले प्रकार विनूने असंख्य वेळा केले आहेत. पण, तरीही आमची मैत्री कशी काय टिकली किंवा विनू आमच्या टोळक्याचा अगदी कायमस्वरूपी मेम्बर कसा काय झाला, हे एक कोडेच आहे! ह्याचे उत्तर बहुदा त्याच्या मनाच्या निर्मळपणात दडलेले असावे. विनू स्थळ-काळ-वेळ ह्या साऱ्याचे भान सोडून बोलत असला, तरी त्याच्या बोलण्याला कधीही कुजकटपणा, कुत्सित भाव, दुसऱ्याबद्दल आसुया वगैरेची भावनिक कोळीष्टके लागलेली नसायची. म्हणूनच, त्याच्या बोलण्याने लोक आणि तो कितीही अडचणीत येत असले, तरी कोणी त्याचा रागराग करत नसत.
विनूला त्याच्या संपूर्ण नावाने कधीच कोणी हाक मारली नसावी. जो भेटायचा तो त्याला विनू म्हणूनच संबोधायचा. कोणत्याही वयाचा, कोणत्याही स्तरावरचा माणूस त्याला 'ए विनू' अशीच हाक मारायचा. दोन वर्षांच्या चिमुरड्यापासून ते ऐंशीपल्याडच्या टिकाऊ म्हाताऱ्यापर्यंत- जो तो त्याला 'विनू' अशा त्याच्या लाडीक नावानेच हाक मारायचा. अधूनमधून परीक्षा देताना पेपरावर सबंध नाव लिहायला लागायचं, म्हणून विनूलाही त्याचे स्वतःचे सबंध नाव लक्षात राहीले असेल. नाहीतर, तोसुद्धा ते विसरायचाच होता. विनायक हरिहर जोशी असे निराकार, निर्गुण, सात्विक सरळमार्गी अन् संकटमोचन नाव लेवून हा प्राणी स्वतःसोबत इतरांनाही विघ्नमुखी ढकलणार आहे, हे त्या विघ्नेश्वराला तरी काय ठाऊक?
बाकी ह्या विनूची बुद्धी अगदी तैलबुद्धी म्हणावी अशी होती. सवयीने आलेला गुण म्हणा किंवा अंगभूत हुशारीने म्हणा- विनू 'आली वेळ कशी मारून न्यावी' हे सांगणारी मनुष्यरूपी एक जंत्रीच होता. आता कधीकधी वेळ मारून नेताना तो जे बोलायचा, ते ऐकल्यावर 'वेळेसोबत आम्हालाही मारून नेले असतेस, तर बरे झाले असते' असे म्हणायची पाळी यायची; पण, अंगावर शेकू द्यायचे नाही असे ठरवून तो जे काही बोलायचा, तसे बोलणे मात्र खुद्द सरस्वतीदेवीचा वरदहस्त असल्याशिवाय शक्यच नव्हते, हेही तेवढेच खरे होते. त्यावरून एक घटना आठवते. हे आठवले, की आम्ही अजूनही हसता हसता पोट धरून गडबडा लोळायला लागतो.
कॉलेजमध्ये केशव भोईर नावाचा एक मुलगा होता. त्याचे वडील- श्रीरंग भोईर हे आमच्या कॉलेजचे मुख्याध्यापक. भोईर सर तसे मुलांचे लाडके होते. फारसे रागवाय-बिगवायचे नाहीत. घरी बहुदा त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या सौंमध्ये भांडणे होत नसावीत, कारण इतर शिक्षकांप्रमाणे ते त्यांचा घरगुती राग आमच्यावर विनाकारण काढत नसत. त्यामुळे, मुलं त्यांच्यावर अगदी लट्टू नसली तरी समाधानी होती. हा केशव एखाद्या सिनेमातला हिरो वाटावा असा होता. मानेपर्यंत रुळणारे केस, मानेला हलकासा झटका देत डोळ्यापर्यंत आलेले केस मागे करायची आकर्षक लकब, एकसारखे मोत्यासम दात, मध्यम उंची गहुवर्ण आणि सरळसोट बांधा यामुळे तो जसा मुलींमध्ये प्रसिद्ध होता, तसाच मुलांमध्येही होता. सबंध कॉलेजात त्याच्या घनदाट केसांविषयी बरीच चर्चा असायची. पार मानेपासून डोळ्यांपर्यंत त्याच्या डोक्यावर भरगच्च जंगल पसरलेले होते. केशव हा भोईर सरांचा मुलगा आहे, हे ज्या अगदी मोजक्या पहिल्या वर्षाच्या मुलांना ठाऊक होते, त्यातील मी एक होतो. आमच्या कंपूमधून तर मला एकट्यालाच हे माहिती होते. त्यात केशव दुसऱ्या शाखेचा विद्यार्थी असल्यामुळे नमस्कार-चमत्कारापलीकडे त्याच्याशी कोणाची फारशी ओळख नव्हती. केशवनेही कधी स्वतःच्या तोंडून आढ्यताखोरपणे ह्या गोष्टीची वाच्यता केली नव्हती, आम्हाला सांगावे असे काही कारणही नव्हते. त्यामुळे, हे गुपित अगदी आवर्जून फोडलेच गेले नव्हते. तात्पर्य, आम्ही सर्व केशवला एका सामान्य मुलाप्रमाणेच समजयचो.
दिवाळीच्या सुट्ट्या संपवून एकेक जण कॉलेजात यायला लागला. आणि कॉलेजच्या नव्या सत्रातील पहिल्याच दिवशी केशव स्वतःचे संपूर्ण डोके भादरून आमच्यासमोर आला. आम्हाला धक्काच बसला होता. नाही म्हणले, तरी आम्हीही त्याच्या केसांच्या प्रेमात होतोच. त्यामुळे, त्याच्या टकलाबद्दल हळहळसुद्धा वाटत होती. त्याने काही दिवसांपूर्वीच हे कृष्णकृत्य केले आहे, असे त्याच्या डोक्यावर पाव पेर वाढलेले केसांचे खुंट सांगत होते. त्याचे हे असे रूप पाहून आम्हा सगळ्यांच्या मनात वेगवेगळे प्रश्न डोकावून गेले होते. पण, विनूने कसलाही विचार न करता बेधडकपणे त्याला विचारले, "अरे काय रे हे केशव? बाबा गेले तुझे?" मी चपापून विनूकडे पाहिले. त्याच्या विचारण्यात विनोदाचा लवलेशही नव्हता. विनू खरेच केशवाला गंभीरपणे विचारत होता.
"वेडाबिडा आहेस का रे? आहेत अजून. त्यांना काय झालंय धाड भरायला?" केशव भडकून म्हणाला.
"अच्छा, आहेत होय. मग बराय. मला वाटलं तुझ्या डोक्यावरचं छप्पर दोन्ही अर्थाने उडालं की काय!" विनूने त्याही नसत्या परिस्थितीत श्लेष विनोद केला. मी कपाळावर हात मारून घेतला आणि विषय अजून भडकायच्या आत विनूकडून केशवसाठी माफीनामा वदवून घेतला. केशव जरा शांत झाला.
"तुला माहितीये का, ह्याचे बाबा कोण आहेत ते? आपले भोईर सर. त्यांचा मुलगा आहे हा", मी विनूच्या डोक्यात प्रकाश पडावा म्हणून त्याला सांगितले.
"अच्छा! तरीच टक्कल केल्यावर मला तू त्यांच्यासारखा दिसत होतास लांबून. तरीच म्हणलं, दिवाळीत भोईर सर असे आखूड कसे झाले अचानक! फराळ महागात पडला की काय!" ह्याचे आपले विनोद चालूच होते. ह्या विनोदांवर त्याला सणसणीत फराळ मिळाला, हे काय वेगळे सांगायला नको!
कॉलेजच्या दिवसापासून हा विनू अस्सा आहे. नेमके नको तिथे अशा पद्धतीने तोंड उघडायची देव त्याला बुद्धी का देतो कोण जाणे! जरा म्हणून गप्प बसणे हे ह्याच्या स्वभावातच नाही. पण, गप्पा मारायला मात्र अगदी फक्कड गडी! त्याच्याशी बोलता बोलता रात्र कशी सरते काहीसुद्धा कळत नाही. एखादा पानपट्टीवरचा कसलेला पानवाला ज्या शिताफीने पान जमवतो, त्या शिताफीने हा विनू गप्पांचे फड जमवतो. पानाच्या संदर्भातच सांगायचे झाले, तर हा विनू म्हणजे गुलकंद आहे. बाकी कुठलाही घटक पानाला पानपण आणू शकत नाही. पण, एकदा तो गुलकंद पडला रे पडला, की मग पान रंगलेच म्हणून समजा. विनूदेखील स्वतःच्या उपस्थितीने गप्पांचे फड असेच रंगवतो.
कॉलेजच्या दिवसांमध्ये रात्री रात्री मित्रांच्या घरी मजामस्ती करणारे अड्डे पडले, की आम्ही सर्वजण मिळून ह्या आमच्या गप्पीष्ट मित्राची वाट पाहत असू. एखाददिवस विनूला जमत नसेल, तर मात्र ती रात्र रंगत नसे. 'विनू नसेल तर झोपायला भेटू. विनू असेल तर आपोआप जागरण होतेच'- हे ठरलेले असायचे. रुष्टाला सुष्ट बनवणे, खूप हसू पाहणाऱ्याची अचानक खेचायला सुरुवात करून त्याला जीव नको करून टाकणे, आपल्याकडील किश्श्यांची पोतडी उघडून खुली करणे वगैरे लीला चालू झाल्या, की मी मी म्हणणाऱ्यांनी कोपऱ्यात जाऊन शांत बसावे. कारण, त्यावेळी साक्षात चौसष्ट कलांपैकी वाक्चातुर्याची मुबलक शिधा घेऊन गणपती बाप्पाच त्याच्या दिमतीला हजर असल्यासारखे वाटते. खुद्द प्रथमपूज्य एखाद्याच्या पाठीशी असेल, तर सामान्यांनी त्याच्यासमोर काय बोलावे?
एकदा कुठलीशी तरुणी आपल्यावर कशी भाळली, मग आपणच तिला ज्ञानामृत देऊन कसे जीवनाकडे पाहायचा उदात्त दृष्टिकोन दिला असे किस्से तो सांगत होता. "चल, काहीतरीच काय"- कोणीतरी त्याला तेवढ्यात हटकले.
"अरे बाबा खरंच. नाकारण्यासारखं काय आहे त्यात?" विनू म्हणाला.
"काय एवढं आयुष्य बदललंस रे तिचं? स्वतःचं बदलता आलंय आयुष्य कधी तुला?"
"अरे बाळ, दुसऱ्याच्या नाकाचाच शेंबुड दिसतो आधी, स्वतःच्या नाही!" बुद्धाने बोधिवृक्षाखाली एखाद्या अज्ञानी शिष्याला ज्या तऱ्हेने समजावले असते, त्या तऱ्हेने विनू समजावत म्हणाला.
"त्याचा काय संबंध आहे पण?"
"सगळ्याचा सगळ्याशी संबंध आहे. असं बघ आता-" विनू आता सरसावून बसला होता. "-स्वतःच्या नाकाबाहेर लोंबणारा ऐवज तुला स्वतःला पट्कन जाणवतो का? नाही. दुसऱ्याच्या नाकावर जास्त लक्ष असतं आपलं!"
"त्याचं नाही रे बाबा!"
"मग?"
"त्या मुलीचं. काय तिचं नाव? शालू का काय ते", जनमानसात आता त्या अज्ञात कन्येमुळे अधीरता पसरू लागली होती.
"शालू नाही. शिलु", विनूने दुरुस्ती केली.
"हो रे. तेच ते".
"तेच ते कसं? जो पांघरतात तो शालू आणि तो जी पांघरते ती शिलु", विनू आता रंगात येत होता.
"बरं बाबा! शालू पांघरलेली शिलु. तिचं काय झालं ते सांग आधी!" आमचा सगळा संयम आता हळूहळू सुटत चालला होता.
"तिचं काय व्हायचंय? तिला मी सरळ सांगितलं. म्हणलं हे बघ बाई. प्रेमा-बिमात कशाला पडतेस?"
"मग कुठे पडायचं? शेणात?"- एक शंका.
"विनू पडला होता तसं?" आधीच्या शंकेला जोडून आलेला विनोद.
"खाण्यापेक्षा पडणं बरं! नाही का रे?" विनूने लगेच त्या शंकेला आणि ती विचारणाऱ्याला आडवा घातला. "तर मुद्दा असा, की मी म्हणलं, की बाई, हे काय आपलं वय आहे का प्रेमात पडायचं? छान करिअर वगैरे घडव, शिक्षण घे, मग बघुया!"
अशा पद्धतीने त्यापुढे अर्धा-पाऊण तास विनूने त्याची आणि त्या शिलुची कहाणी सांगितली. तिने त्याला कशी आर्जवं केली अन् तरीही हा पठ्ठ्या कसा बधला नाही आणि त्यानंतर मग ह्याने तिला तिचा जीवनमार्ग सुकर होण्यासाठी कसा गुरुमंत्र सांगितला वगैरे वगैरे.
हे असले किस्से ह्या विनोबाच्या आयुष्यात खरेच घडायचे का सगळे कपोलकल्पित असायचे, हे त्यालाच ठाऊक! खरेच घडत असतील तर असो बापडे; पण, जर सगळे स्वरचित असतील, तर मात्र विनूच्या कल्पनाशक्तीला, ते सारं रचून सांगण्याला, त्यातील ओघवतेपणाला खरोखरीच सलाम करावा लागेल. कारण, एवढ्या घटना त्यातल्या बारकाव्यांसकट सांगणे अन् त्यादरम्यान सबंध श्रोतृवर्गाला मुग्ध करून ठेवणे, ही काही सोपी गोष्टी नव्हे. आमची मात्र अगदी खात्री होती, की विनू ह्या सगळ्या घटना रचूनच सांगत असणार. त्याच्याबाबत हे सारे घडणे अगदीच दुरापास्त आहे, असेच आम्हाला वाटायचे. स्वरचित गोष्टी सांगण्याच्या त्याच्या ह्या गुणांच्या जोरावर विनू खरे तर मोठा होऊन राजकारणातच जायचा; परंतु, एका बड्या कॉर्पोरेट कंपनीत चिकटला.
कॉलेज संपून बराच काळ लोटला. आमच्यासोबतचे जवळपास सगळेच डोक्यावरचे केस जाऊन 'नाही रे' वर्गात जाऊन बसले होते. विनूही वय आणि जबाबदारी वाढल्याच्या खुणा डोळ्यांच्या खाली व कडेला बाळगून आताशा फिरू लागला होता. बऱ्याच दिवसांनी रस्त्यात त्याला अचानक भेटायचा योग आला होता. नमस्कार-चमत्कार झाल्यावर मी नको-नको म्हणत असताना त्याने मला त्याच्या गाडीवर मागे घातले होते आणि आमची वरात निघाली होती. विनू कालानुरूप बदलला, असे मी माझे मत करणार तोच ही 'रेड्या'ची घटना घडली आणि मी माझे ते मत ओठांवरून पुन्हा पोटात ढकलून दिले होते. आम्ही दोघेही सावरल्यावर विनू पुन्हा मला त्याच्या मागे बसवू लागला. "ए, थांब थांब थांब!" मी त्याला थांबवला.
"काय झालं?"
"हे घे. हेल्मेट घाल आधी. आणि त्याची काच लाव", मी त्याच्यापेक्षा माझ्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर ठेवत त्याला हेल्मेट दिले. उद्देश हाच, की तो जरी काही बोलला तरी त्याचा आवाज बाहेर जायला नको. त्यानेही मग ते माझ्याकडून घेऊन घातलं. आम्ही इतरत्र कुठेही न जाता मग टेकडीकडे निघालो.
टेकडीमाथ्याला आम्ही पोहोचलो, तेव्हा उन्हं उतरणीला होती. सूर्यदेव आपापला बाडबिस्तरा गुंडाळून ठेवत रात्रीच्या चौक्या चंद्राकडे सुपूर्त करायची तयारी करायला लागले होते. पुढच्या ड्युटीचा गुरखा आल्यावर, तो ज्याप्रमाणे त्याच्या आधीचा गुरखा जायची वाट पाहतो, अगदी तशीच वाट चंद्र सूर्य जाण्याची पाहत होता. दोघेही आकाशाच्या विविध छटांखाली अगदी गुण्यागोविंदाने नांदत होते. सोबतीला अगदी मंदपणे येणारी आल्हाददायक झुळूक होती. थोडक्यात वातावरण अगदी रोमँटिक म्हणावं असं होतं. पण, माझ्या सोबतीला विनू होता. मला उगीच हसू फुटले. "का रे? हसतोस का?" विन्याने लगेच विचारले.
"काही नाही रे! बघ ना! किती सुंदर हवा आहे ना?" मी माझ्या वाटण्यातला फक्त निम्माच भाग त्याला सांगितला.
"हो! खरंय अगदी!" त्यानेही छातीत मोठ्ठा श्वास भरून घेत माझ्या म्हणण्याला दुजोरा दिला. मावळतीचा सूर्य पाहण्यात असाच बराच वेळ गेला. विनू त्या सूर्याकडे एकटक पाहत होता. जणू काही ते सारे दृश्य तो आधाशासारखा पिऊन घेत होता, डोळ्यात साठवत होता. काहीच क्षणात ते साठवलेले दृश्य त्याच्या डोळ्यांच्या कडांमधून हलकेच ओघळले आणि गालावर येऊन स्थिरावले. त्याची अचानक बदललेली ही अवस्था पाहून मला उगीचंच बेचैन व्हायला झालं.
"का रे, विनू? काय झालं अचानक? रडतोयस की काय?" मी न राहावून विचारलेच.
"नाही रे! वेडायस का? रडतोय कुठला मी?" विनूने डोळ्यांच्या कडा पुसत म्हणले.
"मग, आत्ता डोळे पुसलेस ते?"
"हां, अरे ते होय! कित्ती दिवसात मी असा सूर्यास्त कधी बघितलाच नव्हता रे".
"का? त्यात काय एवढं?"
"वेळ!" विनूने उसासा टाकला. त्यानंतर त्याने त्या बुडत्या सूर्याला अन् उगवत्या चंद्राला साक्षीला ठेवत कॉलेजनंतरची त्याची कहाणी सांगायला सुरुवात केली.
विनू कॉलेजमध्ये आला, तेव्हा त्याची आर्थिक परिस्थिती ही आम्हा सगळ्यांसारखीच सामान्य होती. कॉलेज सुटलं. त्यानंतर वाटा वेगळ्या झाल्या. मधल्या काळात फारसे कुणी संपर्कात उरले नव्हते. त्या काळात विनू आम्हा सगळ्यांच्या पुढे फार वेगाने गेला होता. कॉर्पोरेट जगतात नाव, मान-मरातब, पैसाअडका सारे काही मिळवत होता. आज तो एका कंपनीच्या उपाध्यक्ष पदापर्यंत पोहोचला होता. त्याची ही प्रगती अन् प्रवास खरोखरीच प्रशंसनीय होती. यथावकाशपणे ह्या प्रवासादरम्यान त्याला सुयोग्य असा जोडीदारही भेटला होता. पण, तरीही ह्या साऱ्यापाठी कुठेतरी कारुण्याची झालर भासत होती. विनूचे लग्न झाले. उभयितांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम. दोघे मिळून तीन होण्याची वाट पाहत होते. पण, काही चाचण्यांनंतर असे लक्षात आले, की हा सुखावह क्षण उभयतांच्या आयुष्यात कधीच येणार नव्हता. स्वतःच्या रक्ताच्या मुलाला ही दोघे मुकणार होती. सगळ्या सुखाला काहीसे गालबोट लागल्यासारखे झाले होते. हे सारे घडल्यापासून, या घटनांमधून सावरायचे निमित्त करून दोघांनी स्वतःला कामाला इतके जुंपून घेतले होते, की इतरांची बात लांबच राहिली, ही दोघे एकमेकांनाच दुर्लभ झाली होती. एकाच घरात राहून दोघे सूर्याचंद्रासारखे उगवत-मावळत होते. त्यामुळे, ह्या सूर्यास्तासारखे अतिशय मामुली, परंतु सुखावह क्षणांनाही ते मुकले होते. दोघांनाही घडत असलेल्या घटना कळत नव्हत्या, उमजत नव्हत्या असे नव्हते. परंतु, कामाने खांद्यावर टाकलेल्या जबाबदाऱ्या आता आयुष्यापेक्षाही मौल्यवान होऊन बसल्या होत्या. दोघांचाही नाईलाज झाला होता. आज कित्येक दिवसांनी विनूने स्वतःवरील सर्व बंधने झुगारून दिली होती आणि आम्ही दोघे इथे, ह्या टेकाडावर गेला तास-सव्वा तास गप्पा मारत बसलो होतो.
"मग, सोडून का देत नाहीस नोकरी?" मी विचारलं.
"हं. तू म्हणतोस, तसं करता येईल रे! पण, मग घर खायला उठेल. हीचंसुद्धा काम जोरात सुरू आहे ना".
त्याचे त्याच्या बायकोवर असलेले प्रेम अन् वयापरत्वे आलेला समजूतदारपणा पाहून मला त्याही परिस्थितीत त्याचे कौतुक वाटल्याशिवाय राहिले नाही.
"अरे, पण मुलं दत्तक का घेता येत नाहीत! तसंच घेऊ शकता की तुम्ही", मी त्याला समजावत म्हणालो.
"खरं सांगू? नाही केला आम्ही कसलाच विचार नंतर. जाऊदे म्हणलं. त्या परमेश्वराचीच इच्छा असं म्हणालो आणि गप्प बसलो. कामात गुंतलो. गुंतलो म्हणजे काय, मुद्दामच. मग, ह्यावर विचार करायला वेळ नाही, ही सबब मिळालीच आपोआप दोघांनाही. आम्ही फक्त पळत होतो रे इतके वर्ष, फक्त पळत होतो. सत्यापासून. अरे, तुला खोटं नाही सांगत, आम्ही नवराबायको असूनही इतक्या वर्षात भांडलो नाही. त्यालाही वेळ नव्हता आमच्याकडे".
मी हसायला लागलो.
"हसतोस काय? खरंच सांगतोय. माझ्या आईकडे कित्येकांनी विचारलंही- म्हणे आम्ही लग्न केलंय का तसेच नुसते राहतोय, लिव्ह इनमध्ये. नॉनसेन्स!"
मी पुन्हा हसलो, "नाहीतर काय विन्या? नवराबायको न भांडता राहिले असते तर त्यांना एकमेकांचे नवराबायको कशाला म्हणलं असतं?"
"व्वा, शेठ! आमच्यासारखंच बोलायला लागलात की! सुधारणा दिसतीये!" विनूने माझी खुशामत केली. "बरं चला! छान वाटलं पण भेटून तुला! बऱ्याच दिवसांनी भेटलो असं मी आपल्या मित्रांपैकी कोणालातरी", विनू उठत म्हणाला.
मीही उठलो. त्याच्याशी हस्तांदोलन करत म्हणालो, "भेटत जा असाच अधूनमधून. बरं वाटतं".
"मलाही! भेटूच. बर चल. निघुया?"
त्या दिवशीची आमची भेट तेवढ्यावरच आटोपली. पुढे काही दिवस त्याच्या ह्या दुःखांबद्दल त्याची कणव वाटणे, स्वतः सुदैवी आहोत असे वाटणे वगैरे प्रकार यथासांग झाले अन् काही दिवसातच माझ्या डोक्यातून ही भेट निघून गेली. त्यानंतर काहीच महिन्यांमध्ये विनूने मला फोन केला. त्याच्या आलेल्या फोनने मी खरे तर चक्रावलोच. त्याने फोनवरूनच 'घरी ये' असा हुकूम सोडला. मी त्याने दिलेल्या पत्त्यावर जाऊन धडकलो. डोअरबेल वाजवल्याबरोबर त्याने सपत्निक दार उघडले. दोघे एकाचवेळी घरी होते! ह्या सूर्य-चंद्राला एकावेळी एकत्र आलेलं पाहून मला त्यादिवशीचा माहोल आठवला. विनूने मला आत घेऊन दार लावून घेतलं. सोफ्यावर बसवून 'थांब' अशी खूण करून आतल्या खोलीत निघून गेला. मी बुचकळ्यात पडून त्याच्या सौंकडे पाहिले. त्यांच्याही चेहऱ्यावर मिश्किल भाव होते. एक-दोन क्षणात विनूची स्वारी कुशीत एक गाठोडं घेऊन आली. मला आधी ते गाठोडंच वाटलं; पण, ते चक्क दुपट्यात गुंडाळलेले तान्हे मूल होते.
"विन्या?" मी त्याच्याकडे आश्चर्यचकित होऊन बघतच राहिलो.
"आमचं मूल", त्याने माझ्याकडे मिश्कीलपणे बघत सांगितले.
"अरे व्वा! अभिनंदन! पण काय रे? तू तर म्हणाला होतास, की…."
"हो. बरोबर आहे तुझं. She is not our biological daughter. आम्ही हिला दत्तक घेतलंय", त्याने खुलासा केला. "तुझ्याशी बोलल्यावर मला जाणवल्या बऱ्याच गोष्टी. मी लगेच हिच्याशी बोललो त्यावर. मला जे वाटत होतं, अगदी तस्संच हिलाही वाटत होतं. मग काय! आम्ही ठरवलं, मूल दत्तक घ्यायचं. इतकी वर्षे नुसती रडण्यात वाया घालवली. ह्यापुढे नाही".
"अरे, पण तुमच्या अशा नोकऱ्या…."
"आम्ही ठरवून अडकलो होतो, भावजी. ठरवून अडकता येतं, तसं ठरवून सुटताही येतंच की!" सौ. विनू म्हणाल्या.
"हिने नोकरी सोडलीये. ती आता हिच्यासाठी घरी थांबणार आहे आणि मी माझी स्वतःची एक टीम तयार करून उरलेली कामं आउटसोर्स करणार आहे. मग, पुढे काही वर्षात हीसुद्धा मला जॉईन होईल. ठरलंय आमचं सगळं! हिचं नावसुद्धा ठरवलंय आम्ही. अश्लेषा!"
विनू फार उत्साहाने बोलत होता. मी पाहिलेला विनू- ज्याच्या सहवासात मी एवढी वर्ष काढली होती- त्या विनूमध्ये एवढा फरक पडला होता, ह्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. विनू पुन्हा माणसात आला होता.
मलाही त्याचा वसा पुढे चालू ठेवायची हुक्की आली. मी म्हणालो, "तुम्ही ते काहीही ठरवा. अश्लेषाला बाकी काहीही शिकवलं नाहीस तरी चालेल, पण एक नक्की शिकव".
"काय?"
"नाही तिथे तोंड उघडून स्वतःची आणि लोकांची गोची करायची नाही ते!"
सगळे मोठ्ठ्याने हसले. अश्लेषाही आपल्या यावर हळूच हसल्यासारखी वाटली.
By Amey Sachin Joag

Comments