पाऊस
By Dr Snehal Gorde
पाऊस आला की मन कसं वेड होतं
पिसारा फुलवून नाचणारा मोर होतं
तुषार त्याचे अंगावर येताच, आठवण होते तुझ्या स्पर्शाची
मोहरून जाणाऱ्या देहाला, आस लागते तुझ्या मिठीची
खट्याळपणे छेडणारा पाऊस, तुझंच रूप वाटतं
तूच खरा सखा, हे माझ्या मनाला पटतं
आनंदाने बेहोष झालेलं मन, मग तुला शोधू लागतं
तू कुठेच दिसत नाही, म्हणून सैरभैर होऊ लागतं
रिमझिम बरसणाऱ्या कल्पनांच्या जलधारा रौद्र रूप घेतात
तू कधी येणारच नाही याची जाणीव करून देतात
मग समोर उभी राहून मूकपणे पावसाला बघते
भिजायची इच्छा असूनही जरा लांबच थांबते
त्याच्या प्रेमात पडणारच याची मला खात्री असते
पण ओलेचिंब करून तो निघून जाईन याची भिती वाटते
वाटतं भरल्या ढगांनी तुझ्यावर बरसावं
माझ्या प्रेमाच्या पावसात तू चिंब भिजावं
सांगेल मग तो भारलेला ढग तुला -
की जसा मी अखंड बरसतो आहे
तसा एक जीव तुझ्याविना कोसळतो आहे
या विचारात बाहेरचा पाऊस कधी थांबतो ,कळतच नाही
डोळ्यांतल्या सरींना मात्र जराही उसंत मिळत नाही
कोण म्हणतं पाऊस फक्त चार महिने पडतो
झुरणाऱ्या मनात तुझ्यासाठी प्रेमाचा पाऊस अविरत बरसतो
By Dr Snehal Gorde

Comments