आठवण
- Hashtag Kalakar
- Sep 30, 2022
- 1 min read
By Dr Snehal Gorde
खिडकीतून अचानक आलेल्या वाऱ्याच्या झोताने टेबल वरचे सगळे कागद खोलीत इतस्ततः विखुरलेले गेले. महत्त्वाचे कागदपत्र असे जमिनीवर पडलेले पाहून तो जरासा चिडलाच. भराभरा कागद गोळा करून टेबल वर paper weight खाली ठेऊन तो लगबगीने खिडकी बंद करायला गेला. तेवढ्यात त्याचं लक्ष आभाळात जमा झालेल्या काळया ढगांकडे गेलं.
हा हा म्हणता पावसाने जोर धरला.भरलेल्या ढगांनी धुवांधार बरसायला सुरुवात केली..काही तुषार त्याच्या अंगावर येऊन आदळले.त्या बरसणाऱ्या पर्जन्य धारांनी त्याला तिची आठवण करून दिली.भेटली की अशीच अविरत बडबडत असे.खूप काही सांगायचं असायचं तिला.. सगळं एकदम एका दमात सांगायची घाई असायची. सगळं सांगून झाली की त्याच्या प्रतिसादाची वाट पाहायची..नक्की कोणत्या गोष्टीला उत्तर देऊ याचा विचार तो करत असे. तिला वाटे की त्याला बोलायचं नाही..मग काय! बसली स्वारी फुगून.."अहो, राणी सरकार" अशी हाक ऐकली, की खुलली कळी..मग पुन्हा तिच्या शब्दांच्या सरी बरसत राहायच्या..
खूप वर्ष झाली तिचा आवाज ऐकला नाही..तिला पाहिलंही नाही..कशी असेन? काय करत असेन? अशा पावसात अचानक भेटेन का कधी? आणि भेटली तरी बोलेन का? पाऊस अजून आवडत असेन का तिला? मी शोधायला हवे का तिला?
नको..
ऋतू बदलले.वेळ बदलली. नाती बदलली..समाजाची खिडकी दोघांच्या मध्ये होती.खूप सारी नवी नाती मध्ये उभी होती.कर्तव्यं होती. जबाबदाऱ्या होत्या. आठवणींशिवाय दुसरा पर्याय नव्हता.
एव्हाना बाहेरचा पाऊस थांबला होता.सगळं शांत झालं होतं.पण त्याच्या मनातला आठवणींचा पाऊस, कसा थांबणार?
By Dr Snehal Gorde

Comments