नदी
- Hashtag Kalakar
- Oct 3
- 2 min read
By Prasad Shankar Gurav
नदीला समुद्राला भेटण्याची ओढ लागलेली... एरवी तिचा धर्म तो त्याला जाऊन मिळणें.. खूप बोल ऐकवले तरी ती काही येत नव्हती... जाण्याचा मार्ग ठाऊक होता..पण प्रवाहात खोट होती..जाण्याची वाट असंख्य कारणांनी अडलेली होती... नदी वाट पाहात होती कधी तरी पूर येईल आणि वाटेतले अडसर दूर होतील... पर्जन्य साथ देत नव्हता... तिकडे समुद्र तर खूप खारट झालेला होता... उष्म्याने त्याची लाही लाही होत होती... समुद्राचे आरोपांवर आरोप सहन करत आपल्याकडून न होणाऱ्या गोष्टींची खंत करत नदी फक्त निर्दयी लोकांचे पाप धूत बसली होती... स्वतःला ही मलीन केलेलं होतं... तिच्याकडे त्याशिवाय गत्यंतरच नव्हतं... समुद्र आपल्याकडून होतो तेवढा जोर लावत होता...लाटांना किनाऱ्यावर आपटून आपटून आपला राग, त्रागा करत होता... कदाचित त्याला माहीत नसावं त्यामुळे होणारी हानी चीरकाल असणार आहे...
आज मात्र नदी कां कुणास ठाऊक खूपच भावनावश झालेली होती..येणाऱ्या अश्रूंमुळे पुराच स्वरूप आलेलं होतं..हे कां होतंय याची पुसट देखील कल्पना करणं अशक्य होतं.. कारण तिच्या आयुष्यात पूर्वी असं कधीच घडलेलं नव्हतं... पूर्णपणे मोहरून गेली होती तिच्या त्या मोहरण्यानं तळातील जमिनी मध्ये देखील बदल व्हायला लागले... नदीच्या इच्छा पूर्तीसाठी आता सर्व दिशा अनुकूल होत्या... नदी बेभान झालेली होती...ती इतकी बेभान झाली होती की इकडचा तिकडचा सर्व परीसर धुतला जात होता.... तिचं अक्राळ स्वरूप कदाचित परीस्थितीने तिचं दमन केलं म्हणून झालं असावं...आज कांहीं ती थांबण्याचं नांव घेत नव्हती...जे कांहीं वाटेत येईल त्याला ध्वस्त करत, जमीन दोस्त करत ती निघाली....तिचा वेग अत्यंत तिव्र होता... शांतता ढळली होती...आज पर्यंतच्या लाचारीचा मिंधेपणा तीनं झुगारून दिला होता...तिला मिलनांसाठी व्याकूळ आणि अधीर बघून वृक्ष,पशू, पक्षी आतंकीत व भयभीत झाले होते...आजवर असं दृश्य कुणालाच दिसलं नव्हतं... नदीला आता फक्त मिलापच शांत करू शकत होता....
पावसानं आता मात्र जोर धरलेला... नदीचं उफाळण आता भाग होतं... सर्व बाजूंनी तिला खुणा मिळत होत्या... समुद्राला देखील कंप सुटला होता...नदीची कंपन
1.
त्याला मिळत होती..पण त्याचा खारट पणा काही केल्या कमी व्हायचं नाव घेत नव्हता... पूर्ण तप्त अशी अवस्था झाली होती..इतका तहानला होता की त्याची तहान आता फक्त नदीच भागवू शकणार होती..
अचानक…..अचानक काय झाले कुणास ठाऊक...वातावरणाने कूस बदलली... नदीच्या स्वातंत्र्यात जो वेग आला होता तो कमी कमी होऊ लागला...काय होतं ते कळायच्या आत तिला थंडी वाजू लागली...मिलनाचं अंतर अगदीच थोडं उरलं होतं..असं का होतंय ते कळेना... आतील जमिनीतून जो लावा येत होता तो थंड पडला आणि दगड रूपांत त्याचं रूपांतर झालं... नदीच्या वाटेत एक भला मोठा हिमनग येऊन ठाकलेला... आजूबाजूला बर्फाचे ढीगच्या ढीग होते... नदी आता गोठायच्या मार्गावर होती... कारण तिचा स्वभाव धर्मच होता की ती जिथे जाईल तिथे त्यांचीच बनून राहायची... जेव्हा ती सुरवातीला राहायची त्यावेळी तिला वाटे की तिच्या आजूबाजूला असलेल्या अक्राळ विक्राळ झाडांमुळेच ती शाबूत आहे...छोटी मोठी झाडे तिचीच असल्यागत वागायची... पण नदिला हे माहीत नव्हतं की ह्या झाडांवर तिचेच खरे उपकार आहेत... तिच्या मुळेच त्यांनी अक्राळ विक्राळ स्वरूप धारण केलेले आहे...पण झाडं मात्र तिला आपण केलेल्या उपकारांची आठवण करून देत राहायची... नदीला हे कळत होतं की हे थोड्याच कालावधी साठी आहे... शेवटी आपल्याला समुद्रालाच जाऊन मिळायचे आहे... म्हणून तिच्यात आवेग होता...पण आता तो अक्राळ विक्राळ हिमनग तिथून हलण्याचे नावच घेत नव्हता...सूर्यही तिच्या बाजूने नसावा...
हळूहळू नदीचं थंड पडणं व गोठणं सुरू झालं... आतमध्ये दडलेल्या आप्तजनांच्या पापा सहीत ती गोठू लागली...आता ती कुजकी घाण तिच्यातच उरणार होती...नाईलाजच होता...इच्छा खूप होती पण वातावरणांन तिची साथ सोडून दिलेली होती...
समुद्र इकडे आणखीन खारट झालेला होता... स्वतःच्या आसवांना पिऊन...त्याचे अश्रू आता मात्र आटले... नुसतेच खारट पणाचे खडे उरलेले होते...त्याच्यातली 'ती'आता दूर गोठली होती...पण कां कुणास ठाऊक त्याला एक प्रकारच्या ओझ्यातून मुक्त होत असल्याचा आभास होऊ लागला... ज्या ज्या
2.
गोष्टी मीलना नंतर ठरवल्या होत्या त्यांची पूर्तता करण्याच बंधन उरलं नव्हतं... तिला आपल्या आत नेवून सुख देणं आणि पूर्ण रुपात आपल्यात सामावून घेणं आता बंधनकारक नसावं म्हणून असेल कदाचित... खरंतर नदीला अटकाव करणाऱ्या त्या हिमनगाला कायमचा ध्वस्त करण त्याला काही कठीण नव्हतं...तो खवळला असता तर सगळं नष्ट करून नदीला आपल्या स्वाधीन करायची ताकदही त्याच्यात होती...पण या भयानक विध्वंसात त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना खूप कष्ट झाले असते... किंबहुना त्यांचा अंत होणं अपरिहार्य होतं... समुद्र इतका स्वार्थी बनू शकत नव्हता...तो कलात्मक सौंदर्यात लीन होता... जबरदस्तीने केलं असतं तर ती झडप झाली असती...त्याला प्रेम मिलापाची ओढ होती...
पण कां कुणास ठाऊक आज त्याला नदीच्या गोठण्याचं इतकं दु:ख होत नव्हतं... एक स्मित सतत त्याच्या चेहऱ्यावर उमटत होतं..त्याच्यातली 'ती'धूसर झालेली होती...आता फक्त 'तो'च उरला होता... त्याला आपला शोध होताच....पण 'ती' गेल्यामुळे 'तो' त्याच्या शोधात आत आत जाऊ लागला होता... त्याला हे जाणवत होतं की 'तो'सुद्धा विरळ होईल आणि संपुष्टात येईल...या संपण्यांच स्मित त्याच्यात येत होतं... आता समुद्राला परमानंद अवस्थेची ओढ लागलेली होती...त्याच्यातला 'तो' पणा जाऊन कुठल्याही क्षणी तो परमानंदामध्ये चींब होणार होता...
By Prasad Shankar Gurav

Comments