सुचेल... नक्की सुचेल
- Hashtag Kalakar
- May 8, 2023
- 1 min read
By Omkar Mohile
आधी विचार येतील
मग एखाद दोन पक्के होतील
त्यातील एक नक्की होईल
मग त्याच्यावर पुन्हा विचार होईल...
पण....
सुचेल... नक्की सुचेल...!!!
विचारातून फायनल झालेल्या
विचाराला फाटे फुटतील...
एकेक गोष्टी मग
शब्द शोधू लागतील
तेही स्वत:ला हवे ते...
मन म्हणेल हाच शब्द
बुध्दी म्हणेल दुसरा बरा...
अर्थ नीटसा लागत नाही
पुन्हा सारं कडवं खोडा
पुन्हा खोडलेल्या चार शब्दांआड
विचारांचं तळं सुकेल...
पण...
सुचेल... नक्की सुचेल....!!!
आता मात्र चार-सहा
पक्क्या ओळी लिहील्या जातील...
मन, बुद्धी, व्याकरण
या साऱ्यांचा मेळ जुळुन येईल...
त्यांची मिळून एखाद दोन
कडवी सुद्धा होऊन जातील
अन् तेव्हाच नेमकं
सुरूवातीकडून शेवटाकडं जाणारी
वाट भरकटेल...
मग काय पुन्हा थोडीशी का होईना
खाडाखोड होईलच...
पण...
सुचेल... नक्की सुचेल...!!!
शेवटी
सगळे खोडून चुरगळलेले
आसपास सांडलेले कागद गोळा करेन...
उघडेन एकेक.. वाचेन...
विचार तर मगाशीच पक्का केलाय..
तेव्हा प्रत्येकातला बरा शब्द..
बरी ओळ... हेच वापरून काही बनवेन..
मनात म्हणेन.. "च्या मारी..
हे ही मलाच सुचलंय की..
मग काय हरकत आहे...
यातूनच काहीतरी लिहीलंतर.."
चार कडवी पुरी होतील.. कविता संपेल..
शीर्षक ठरेल...
एव्हाना विचारांचं वादळ मनात
दूर कुठेतरी निवळलं असेल.. तात्पुरतं...
आधीचा रिकामा कागद आता भरला असेल...
नेमकं तेव्हाच शांताबाईंचं एखादं पुस्तक हाती लागेल...
त्यातली पहिलीच कविता वाचून.. "आपण कधी असं लिहू ?" वाटेल...
अन् तेव्हा आपल्या नकळत
आपली कविता वाचणारी " ती " म्हणेल...
"सुचेल... नक्की सुचेल...!!! "
By Omkar Mohile

Comments