मैत्री
- Hashtag Kalakar
- May 8, 2023
- 1 min read
Updated: Aug 28
By Omkar Mohile
जन्मापासून नसते काही, कुठे भेटते ठाऊक नाही कुठल्या चहाच्या घोटावरती, बळी जातो समजत नाही दोन अक्षरं बांधू शकतील, असं मुळी ते नातंच नाही या नात्याचे हिशोब लिहील, असं कुठलं खातंच नाही यात कायम उधार असते पण, कुणालाच फरक पडत नाही मैत्री म्हणतात तिला, ती ठरवून कधीच होत नाही... तिच्यात नसतं तुझं माझं, तिच्यात सगळंच आपलं असतं, एकदा आपलं नाही ठरवलं, ते मग सगळं परकं असतं, खरेपणा, परखडपणा, तिच्यातच काय तो टिकून आहे, प्रत्येकातलं वेडं मुल, तिच्याचमुळे तर टिकून आहे, तिच्यामुळेच अजूनतरी, कुणीही एकटं जगत नाही, मैत्री म्हणतात तिला, ती ठरवून कधीच होत नाही... तिच्यापायीच आयुष्यात, तग धरून राहतो आपण, दुःख, कष्ट, त्रास, अपमान सगळं निमुट पचवतो आपण, विसरून जातो सगळ्या चिंता, काळाचेही नसते भान, फालतू विषयावरती देखील, रंगून जाते चर्चा छान, घट्ट होत जाते फक्त, ती जुनी कधीच होत नाही, मैत्री म्हणतात तिला, ती ठरवून कधीच होत नाही... सात जन्म बायको नसेल, पण मैत्री नक्कीच टिकून असते, थकून जातात गात्रं तरीही, मैत्री तशीच तरुण असते, भेटलो नाही वरचेवर तरी, ती कधीच तुटत नाही, विश्वासाची हळवी ओल, मरणानेही सुकत नाही, जिला साठवून ठेवणं बहुदा, आठवणींनाही जमत नाही... मैत्री म्हणतात तिला, ती ठरवून कधीच होत नाही... मैत्री म्हणतात तिला, ती ठरवून कधीच होत नाही...
By Omkar Mohile

Comments