माणूसपण
- Hashtag Kalakar
- May 8, 2023
- 1 min read
By Omkar Mohile
आटून गेलंय बघ सगळं
काहीदेखील राहिलं नाही
बघता बघता बदललं सगळं
जरादेखील कळलं नाही
नात्यांमध्ये ओल नाही
चार आपुलकीचे बोल नाही
गहिरेपण वरवरचंच
पण डोह तितका खोल नाही
त्याच्याभोवती झाडांपेक्षा
माणसांचीच गर्दी फार
पण माणसांच्या सावल्यांमध्ये
निर्व्याज प्रेम उरलं नाही
घर उरलं फक्त रिकामं
दारात भले दहा चपला
उद्यासाठी जगता जगता
हरवून गेला आज आपला
आपल्यापेक्षा तुपलेपणाच
इतका मोठा झालाय आज
की माणसांमधला माणूसच
कधी मेला कळलं नाही
आटून गेलीत आसवं आता
किनाराही सुकतो लवकर
स्वच्छंदी त्या लाटांचाही
बहुदा आता आटला वावर
भावनांचं खारं पाणी
इतक्यात किनारी शिवलं नाही
आणि कोरड्याश्या वाळूत
साधं पाऊलसुद्धा सुटलं नाही
रुक्षपणाच्या वाळवंटात
माणूसकीची सावली पाहिजे
आणि देवाचरणी फुलापेक्षा
हीच आशा वाहिली पाहिजे
आटलेलं परत भरत नाही
असं अजूनतरी ऐकलं नाही
आणि देवानेच “मी आशा सोडली”
असं अजूनतरी म्हटलं नाही
आटून गेलंय बघ सगळं
काहीसुद्धा राहिलं नाही
असं म्हणावं लागणार नाही
कारण अजून सगळं संपलं नाही
By Omkar Mohile

Comments