माझा काय गुन्हा - By Ashok Walvekar
Written By: Ashok Walvekar
Category: Story
Competition: Poetry and Creative Writing Competition 2026
Dive into the heart-wrenching world of "माझा काय गुन्हा," a story by Ashok Walvekar, featured in the esteemed Poetry and Creative Writing Competition 2026 by Hashtag Kalakar. This narrative, set in the realm of family drama, explores the intricacies of relationships and the impact of suspicion and misunderstanding. Ashok Walvekar, through his poignant storytelling, invites readers to reflect deeply on themes of love, betrayal, and redemption.
About the Work
"माझा काय गुन्हा" is a powerful piece that delves into the tumultuous life of Suraj and Maya, whose relationship deteriorates under the weight of suspicion. The story’s atmosphere is charged with emotional tension and vivid imagery, capturing the essence of familial discord and the innocent suffering of a child caught in the crossfire. Walvekar's evocative narrative style paints a poignant picture of human frailty and resilience.
माझा काय गुन्हा
Original Submission by Ashok Walvekar
Hashtag Kalakar
माझा काय गुन्हा
रोहन
(काल्पनिक कथा – ह्या कथेतील सर्व पात्र, प्रसंग, स्थळ पूर्णपणे काल्पनिक आहेत, कोणत्याही प्रकारच्या घटनेशी अथवा जिवंत अथवा मृत पात्राशी कसलंही साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)
शहराच्या मध्यवस्तीमध्ये असलेल्या त्या जुन्या इमारतीमध्ये त्या रात्री अभद्र शांतता नव्हती, तर एक भयानक वादळ घोंघावत होतं. ओरडण्याचे आवाज, भांडणाची कटुता, शिवीगाळ आणि हुंदक्यांचा आवाज संपूर्ण इमारतीमध्ये प्रतिध्वनित होत होता. लग्नाला अवघे वर्ष झालेले सुरेश आणि माया पुन्हा एकदा संशयाच्या आणि क्रोधाच्या विळख्यात एकमेकांसमोर उभे ठाकले होते.
लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने त्यांच्या संसारात एक गोडवा होता. मायाचं ते हसरं रूप आणि सुरेशचं तिच्यावर असणारं जिवापाड प्रेम... सगळं काही एखाद्या स्वप्नासारखं होतं. पण दिवस सरत गेले तसा सुरेशच्या मनातील संशयाचा किडा जागा झाला. छोट्या-छोट्या, क्षुल्लक कारणांवरून तो मायाच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. तिचं हसणं, तिचं बोलणं, सगळंच त्याला खटकू लागलं.
काळाचे चक्र फिरले आणि मायाने एका निष्पाप मुलाला जन्म दिला. पण त्या चिमुरड्याच्या आगमनाने घरात आनंदाची कारंजी फुलण्याऐवजी दुःखाचा डोंगर कोसळला.
“हे मूल माझं नाही!” सुरेशने संतापाने लाल होऊन, संपूर्ण ताकदीनिशी ओरडत मायाकडे बोट दाखवलं.
त्या एका वाक्याने, त्या एका संशयाच्या बाणाने मायाचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं. सासू-सासरे मध्ये पडले, बहिणीची अब्रू वाचवण्यासाठी मायाचा भाऊ धावत आला. पण वाद शांत होण्याऐवजी हातघाईवर आला. माया जगाचे टोमणे आणि नवऱ्याचा संशय झेलत, रडत-रडत आपल्या काळजाच्या तुकड्याला छातीशी घट्ट कवटाळून बसायची. अखेर, स्वाभिमान पायदळी तुडवला गेल्यावर, ती एका रात्री आपल्या बाळाला घेऊन माहेरी निघून गेली.
माया माहेरी गेल्यानंतर सुरेशच्या मनातील पोकळी संतापाने आणि अहंकाराने भरली. त्याने स्वतःला दारूच्या हवाली केलं. तो रोज रात्री दारू पिऊन यायचा आणि घरात, गल्लीत गोंधळ घालायचा. हसताखेळता संसार डोळ्यांदेखत उध्वस्त झाला होता. एकाकीपणा आणि दारूच्या व्यसनामुळे हळूहळू सर्व नातेवाईकांनी त्याच्याकडे पाठ फिरवली. संसार फक्त नावापुरता उरला होता आणि सुरेश त्यात जळत होता.
तिकडे माहेरी मायाला तिच्या आई-वडिलांनी आणि भावाने मायेचा आधार दिला. काळ बदलला आणि बाळाच्या बारशाचा दिवस उजाडला. मुलाचं नाव ठेवलं गेलं — “रोहन”.
निसर्गाचा नियम म्हणून सुरेशलाही बोलावणे धाडले होते. सुरेश आला, पण तोही दारूच्या नशेत धुंद होऊन. त्या मंगल कार्यात, सर्वांसमोर तो पुन्हा तेच विष ओकू लागला, “हे माझं मूल नाहीच!” त्याच्या या बरळण्याने मायाच्या भावाचा संयम सुटला. वाद वाढला आणि भावाने सुरेशला दोन दणके घातले. प्रसंग आणखी गंभीर होऊ नये म्हणून मायाच्या वडिलांनी मध्यस्थी केली आणि सुरेशला गाडीत बसवून त्याच्या घरी सोडून आले. त्या रात्रीनंतर दोन्ही कुटुंबांतील उरलेसुरले संबंधही कायमचे संपले.
रोहन अजून खूप लहान होता, पण त्याच्या निरागस आयुष्याला जन्मतःच दुःखाची आणि उपहासाची एक गडद किनार मिळाली होती.
काही काळानंतर सुरेश एका दुसऱ्या स्त्रीसोबत राहू लागला. मित्र, नातेवाईक यांच्यामध्ये कुजबुज सुरू झाली. काही वर्षांनी मायानेही तिच्या एका जुन्या मित्रासोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि ती त्याच्यासोबत निघून गेली. दोघांच्याही आयुष्यात नवीन माणसं आली, नवीन स्वप्न आली. पण या सगळ्या गदारोळात रोहनच्या आयुष्यात मात्र कोणीच कायमचं राहिलं नाही.
माया आणि सुरेश यांनी जेव्हा आपापले स्वतंत्र मार्ग निवडले, तेव्हा मायाच्या आई-वडिलांचा आणि भावाचाही संयम सुटला. संतापाच्या भरात त्यांनी त्या दोघांशीही असलेले सर्व नातेसंबंध तोडून टाकले. पण या सगळ्यात त्या निष्पाप लहान जीवाचा काय दोष? ज्या आई-बापाने त्याला जन्म दिला, तेच आता स्वतःच्या सुखाचा विचार करत होते आणि त्याची जबाबदारी घ्यायला कोणीच तयार नव्हते. अखेर, रक्ताच्या नात्याने नाकारलेल्या रोहनला त्याच्या वृद्ध आजी-आजोबांनी आपल्या पंखाखाली घेतलं.
रोहनचे आजोबा पोलीस खात्यात हवालदार होते, त्यांची अजून ७ वर्षांची नोकरी बाकी होती. आजी घर सांभाळायची, तर मामा एका कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करत होता. रोहन जोपर्यंत अगदी लहान होता, तोपर्यंत तो सर्वांचा लाडका होता. पण जसा काळ गेला आणि तिघांनाही जाणीव झाली की या मुलाची संपूर्ण जबाबदारी आता आपल्याच गळ्यात पडली आहे, तशी त्यांची वागणूक बदलली.
रोहनला घरात एखाद्या आश्रितासारखी, उपऱ्यासारखी वागणूक मिळू लागली. घरातले लोक त्याच्याकडे एका वेगळ्याच नजरेने पाहू लागले.
“हा कोणाचा मुलगा आहे कोणास ठाऊक…”
“ज्या आई-बापाने जन्म दिला, त्यांनीच याला स्वीकारलं नाही…”
असे विषारी शब्द रोहनच्या कानावर लहानपणापासून सतत पडत राहायचे. शाळेतही काही मुलं त्याच्या याच परिस्थितीवरून त्याला चिडवायची. रोहन काहीच बोलत नसे, तो फक्त शांत राहायचा... कारण त्याच्याकडे जगाच्या या क्रूर प्रश्नांची कोणतीच उत्तरं नव्हती.
त्याने अनेकदा रडवेला होऊन आजीला विचारलं होतं, “आई बाबा मला का नको म्हणाले गं? मी वाईट आहे का?”
पण त्या प्रश्नाचं उत्तर आजी कधीच देऊ शकली नाही; ते उत्तर नेहमी तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंमध्ये हरवून जायचं.
रोहन जसा जसा मोठा होत गेला, तशी त्याच्या मनात एक खोल, कधीही न भरणारी पोकळी तयार होत गेली. प्रेम, आपुलकी, कौटुंबिक सुरक्षितता या शब्दांचे अर्थ त्याला कधी समजलेच नाहीत. त्याच्या संपूर्ण आयुष्यात जर कोणी एकमेव आधार असेल, तर ते त्याचे आजी-आजोबा होते.
पण काळ क्रूर असतो, तो कोणासाठीच थांबत नाही. रोहन जेव्हा बी.कॉम.च्या शेवटच्या वर्षाला होता, तेव्हा एकाच वर्षाच्या अंतराने त्याचे आजी आणि आजोबा दोघेही जग सोडून गेले.
त्या दिवशी रोहन खऱ्या अर्थाने पूर्णपणे अनाथ आणि एकटा पडला. त्या जुन्या घरातील एका खोलीत तो तासनतास एकटाच शून्यात नजर लावून बसून राहायचा. भिंतींवर अजूनही आजीच्या हाताने लावलेल्या देवांच्या जुन्या, कोमेजलेल्या तसबिरी होत्या. कोपऱ्यात आजोबांची ती लाकडी काठी तशीच उभी होती. घर आठवणींनी गच्च भरलेलं होतं... पण त्या आठवणींना उब देणारं माणूस मात्र तिथे कोणीच नव्हतं.
मामाने आजी-आजोबांच्या निधनानंतर लगेचच आपले हात झटकले. त्याने रोहनला स्पष्ट शब्दांत बजावले, “आता स्वतःच्या पायावर उभा राहा. नोकरी कर आणि शिक्षण पूर्ण कर.” याचा अर्थ साफ होता की, मामाकडून त्याला आता कवडीचीही मदत मिळणार नव्हती.
आजी-आजोबा गेले त्या दिवशी रोहनची आई — माया — आली होती. रोहनने आशेने तिच्याकडे पाहिले, पण तिच्या नजरेत मुलाबद्दल कोणतीही माया, प्रेम किंवा ओलावा नव्हता. ती एका अनोळखी स्त्रीसारखी आली आणि निघून गेली. इतक्या वर्षांत तिने कधी एकदाही रोहनची साधी विचारपूसही केली नव्हती.
पोटाची खळगी भरण्यासाठी रोहन शहरात नोकरीसाठी वणवण फिरला. सुरुवातीला एका छोट्या ऑफिसमध्ये काम मिळालं, पण त्या पगारात आणि कामात त्याचं समाधान नव्हतं. अखेर, त्याच्या मामाने मध्यस्थी करून त्याला एका मोठ्या सराफाच्या दुकानात कामाला लावले. तिथे प्रामाणिकपणे काम केल्यामुळे त्याला आता पुरेसा पगार मिळू लागला होता.
आता रोहनचे लग्नाचे वय झाले होते. ज्यांचे आई-बाप पाठीशी असतात, त्यांच्या लग्नाची काळजी घरची माणसं करतात; पण इथे रोहनला स्वतःच्या लग्नासाठी स्वतःलाच पुढाकार घ्यावा लागत होता, स्वतःच सुचवावे लागत होते.
लग्नासाठी अनेक ठिकाणी बोलणी सुरू झाली. मुलीकडचे लोक यायचे, बोलायचे. पण प्रत्येक वेळी, सर्व काही व्यवस्थित झाल्यावर एकच प्रश्न हिमनगासारखा समोर उभा राहायचा —
“तुमच्या घरचं वातावरण कसं आहे?”
“वडील काय करतात? ते कुठे असतात?”
“आई कुठे राहते? तुमचे त्यांच्याशी संबंध का नाहीत?”
या प्रश्नांवर रोहनकडे फक्त शांतता असायची. आणि मग, समोरच्यांच्या चेहऱ्यावर हळूहळू नकाराचे भाव उमटायचे. लोक नातं नाकारून निघून जायचे. रोहन प्रत्येक वेळी जगासमोर हसण्याचा, स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करायचा, पण आतून तो पुरता तुटत चालला होता. त्याच्या चारित्र्यावर किंवा कर्तृत्वावर कोणाचा आक्षेप नव्हता, आक्षेप होता त्याच्या भूतकाळावर, ज्याच्याशी त्याचा काहीच संबध नव्हता.
अखेर, एका रात्री हा अपमान आणि मनातील ती वेदना सहन न झाल्याने रोहनने एक मोठा निर्णय घेतला. त्याला आता पळ काढायचा नव्हता. ज्या प्रश्नांनी त्याचं अख्खं आयुष्य नरक केलं होतं, त्या प्रश्नांचं उत्तर त्याला हवं होतं.
तो सरळ त्याच्या आईला — मायाला — भेटायला निघाला. त्याला तिच्याशी भांडायचे नव्हते, तिला दोषही द्यायचा नव्हता. त्याला फक्त तिच्या डोळ्यात डोळे घालून एकच गोष्ट विचारायची होती... की तिने त्याच्या बाबतीत असे का केले? स्वतःच्या रक्ताच्या बाळाला असं वाऱ्यावर सोडण्यामागे तिचं काय कारण होतं? आणि ज्या गुन्ह्याची शिक्षा तो जन्मापासून भोगतो आहे, तो गुन्हा नेमका कोणाचा होता?
माया
रोहन मायाच्या घरी पोहोचला. दारावरची बेल वाजवताना त्याचे हात थरथरत होते. आज तीस एक वर्षाने तो आईला भेटणार होता. मनातील प्रश्नांचे मोहोळ घेऊन तो आज इथे आला होता.
काही क्षणांतच दरवाजा उघडला गेला. समोर माया उभी होती. तिचे केस आता चंदेरी-पांढरे झाले होते, चेहऱ्यावर वयाची आणि बदललेल्या वादळी आयुष्याची पुटं स्पष्ट दिसत होती. तिने समोर उभ्या असलेल्या रोहनला पाहिले. काही क्षणांसाठी तिच्या डोळ्यात एक अस्वस्थता चमकून गेली, जुन्या स्मृतींनी तिच्या काळजाचा ठोका चुकवला, पण तिने कसंबसं स्वतःला सावरले.
मायाने रोहनला आत घेतले. घरात एक निरव शांतता पसरली होती. मायाचा नवीन संसार तिथे कुठेतरी स्थिरावल्यासारखा वाटत होता. तिने रोहनला पाण्याचा ग्लास दिला, पण दोघांमध्येही काय बोलावे सुचत नव्हते. संवादाची सुरुवात कमालीची औपचारिक आणि कोरडी होती.
माया: (पाण्याचा ग्लास टेबलावर ठेवत, आवाजात आव आणलेला कोरडेपणा) "तू... इथे कसा काय आलास? अचानक?"
रोहन: (घरावर नजर फिरवत, जड आवाजात) "आई... तुझे पती कुठे आहेत?"
माया: (नजर खाली झुकवत) "ते... ते आता दोन महिन्यांपूर्वीच हार्ट-अॅटॅकने गेले."
रोहन: "अरे बापरे... मला हे कळलेच नव्हते. मग आता तू इथे एकटीच राहतेस?"
माया: "हो, मी येथे एकटीच राहते."
रोहन: (वेदनादायी हसत) "आजी-आजोबा गेले, तेव्हा तू अंत्यसंस्काराला आली होतीस. पण माझ्याशी बोलायला थांबली नाहीस. पुढे मामाचीही साथ सुटली. आता माझं लग्नाचं वय झालंय..."
माया: (मधेच थांबवत, थोडी अस्वस्थ होऊन) "मला कळलं ते... सराफाच्या दुकानात कामाला आहेस ना तू? चांगलं आहे. स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे माणूस."
रोहन: (एक दीर्घ सुस्कारा सोडत) "हो, पायावर तर उभा राहिलोय, आई! पण समाज जेव्हा माझ्या पाठीशी उभे राहणारे 'हात' शोधतो, तेव्हा माझ्याकडे दाखवायला काहीच नसतं. लग्नासाठी जिथे जिथे जातो, तिथे लोक विचारतात— आई-वडील कुठे आहेत? काय करतात? माझ्याकडे उत्तर नसतं, आई!"
'आई' या दोन अक्षरी शब्दाने मायाच्या चेहऱ्यावर एकाच वेळी अपराधीपणा आणि अलिप्ततेचे भाव उमटले. ती अस्वस्थ होऊन खिडकीबाहेर पाहू लागली. रोहनच्या प्रश्नांनी तिच्या मनातील जुन्या जखमा उकरल्या गेल्या होत्या. स्वतःला अपराधी भावनेतून बाहेर काढण्यासाठी तिने स्वतःचा बचाव करण्यास सुरुवात केली.
माया: (तीव्र आणि कातर स्वरात) "रोहन, तू मला दोष देतोयस? पण तू त्या काळातला माझा छळ पाहिला नाहीस. त्या वाड्यात त्या रात्री काय झालं, ते तुला ठाऊक नाही. तुझ्या बापाने... सुरेशने संपूर्ण इमारती समोर माझ्या चारित्र्यावर चिखलफेक केली. एका स्त्रीसाठी तिच्या चारित्र्यावर आलेला संशय हा मृत्यूपेक्षा भयंकर असतो. त्याने हसत-हसत साऱ्यांसमोर म्हटलं होतं की तू त्याचं मूल नाहीस!"
रोहन: (डोळ्यात पाणी आणत) "मला माहीत आहे ते सगळं, आई. आजीने मला सर्व सांगितले आहे. पण तो त्याचा संशय होता. तुझं सत्य काय होतं?"
माया: (तिचा आवाज थरथरू लागला) "माझं सत्य कोणाला ऐकायचं होतं, रोहन? सासर तर नरक झालंच होतं, पण ज्या माहेराकडून आशेचा किरण होता, तिथूनही फक्त छळच नशिबी आला. सुरेशच्या संशयामुळे माझ्या माहेरच्यांनीही शेवटी माझ्यावरून हात झटकले. बाबांना वाटायचं की मी त्यांच्या डोक्यावर एक ओझं आहे. त्या काळात मी नोकरी करत होते, पण स्वाभिमानाने जगू देतील तर ना! माझा सगळा पगार बाबा काढून घ्यायचे. विचारलं तर म्हणायचे, 'तुझा खर्च जास्त आहे, घरात राहतेस तर पगार द्यावाच लागेल.' मला त्या घरात एखाद्या आश्रितासारखी वागणूक दिली जात होती. समाज काय म्हणेल, या भीतीने त्यांनी मला सुरेशपासून घटस्फोटही घेऊ दिला नाही. एका बाजूला संशयी नवरा आणि दुसऱ्या बाजूला केवळ पैशांसाठी आणि जगाच्या भीतीने छळणारे आई-बाप... अशा कोंडीत मी अडकले होते."
मी माझे घर सोडून आल्यानंतर, आई-वडील आणि भाऊ मला सतत "तुझ्याच वागण्यात काहीतरी खोट असेल", "तुझ्यामुळेच आमच्या खानदानाच्या इभ्रतीवर डाग लागला" असे म्हणून हिणवायचे. घरात होणाऱ्या प्रत्येक छोट्या-मोठ्या वादाचे खापर माझ्यावरच फोडले जायचे, ज्यामुळे माझे घरात जगणे असह्य झाले होते. सर्वाना असेच वाटत होते की मी त्यांचे घर सोडून निघून जावे. फक्त आई माझ्या बाजूने होती. पण तिचेसुद्धा बाबांच्या समोर काही चालत नव्हते.
भावाला तर माझे घरात राहणे अजिबात पसंत नव्हते. तो माझ्या चारित्र्यावर संशय घेऊन माझ्यावरच हात उचलत असे. "लवकर काय तो निर्णय घे किंवा इथून चालती हो, तुझ्यामुळे माझी समाजात नाचक्की होतेय आणि माझ्या लग्नात अडथळे येत आहेत," अशी रोजची धमकी तो देत असे.
घरात कोणतीही पूजा, सण-समारंभ किंवा पाहुणे आले की वडील आणि भाऊ मला जबरदस्तीने मागच्या खोलीत कोंडून ठेवायचे किंवा घरातून बाहेर जाण्यास सांगायचे. लोकांसमोर माझे अस्तित्व लपवले जायचे, जणू काही मी कुटुंबासाठी एक जिवंत शाप होते.
माझ्याच ऑफिस मध्ये काम करणाऱ्या सचिन ने मला धीर दिला आधार दिला. आम्ही दोघे एकत्र राहू लागलो. पण सचिन ने मला तुझ्यासकट स्वीकारण्यास नकार दिला म्हणून मला, तुला आईच्याकडेच सोडावे लागले.
माया हुंदके आवरत पुढे बोलू लागली, "अशा परित्यक्त्या स्त्रीने या क्रूर समाजात कसं जगायचं? मला माझं आयुष्य होतं, माझ्याही काही गरजा होत्या. जेव्हा मी जगण्याचा एक नवीन मार्ग निवडला, तेव्हा मागचं सगळं सोडणं माझी हतबलता होती, माझी मजबुरी होती. जर मी तुला सासर-माहेरच्या त्या दलदलीतून काढून सोबत घेतलं असतं, तर माझा हा नवीन संसार कधीच उभा राहू शकला नसता. मी स्वतःला वाचवत होते, रोहन..."
मायाचे हे बोलणे ऐकून रोहनच्या चेहऱ्यावर एक केविलवाणे विषण्ण हसू उमटले. तो जागेवरून उठला आणि तिच्या अगदी जवळ जाऊन उभा राहिला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण आवाजात एक असीम वेदना आणि धार होती.
रोहन: (अत्यंत संथ आणि जड आवाजात) "स्वतःला वाचवत होतीस? होय आई, तू स्वतःला वाचवलंस... बाबांनी स्वतःचं व्यसन आणि नवीन जग शोधून स्वतःला वाचवलं... मामाने जबाबदारी झटकून स्वतःला वाचवलं... आणि आजी-आजोबांनी जगाच्या भीतीने मला उपऱ्यासारखं वागवून स्वतःला वाचवलं. प्रत्येकाने फक्त आणि फक्त स्वतःचा विचार केला, आई..."
मायाने शरमेने मान खाली घातली. तिच्याकडे यावर काहीच उत्तर नव्हते. रोहनने तिचा थरथरणारा हात आपल्या हातात घेतला. त्याचा स्पर्श इतक्या वर्षांच्या भुकेलेल्या प्रेमासारखा होता, पण त्यात आता ममते पेक्षा जाब विचारण्याचा हक्क जास्त उरला होता.
रोहन: (हुंदका दाबत, थेट तिच्या डोळ्यात पाहत) "मला फक्त एका गोष्टीचं उत्तर दे... तुमच्या त्या संशयाच्या, अहंकाराच्या, पैशांच्या आणि बदनामीच्या लढाईत... माझा काय गुन्हा होता?"
त्या बंद खोलीत एक भयाण शांतता पसरली.
रोहन: (पुढे बोलत राहिला) "मी तर फक्त जन्माला आलो होतो. मी स्वतःचं नशीब स्वतः लिहिलं नव्हतं. बाबांनी मला नाकारलं कारण त्यांचा संशय मोठा होता, आणि तू मला सोडलं कारण तुला तुझा नवीन संसार मोठा वाटला. शाळेत मुलं चिडवायची, घरात आश्रितासारखं राहावं लागायचं, लोकांचे टोमणे ऐकावे लागायचे... या साऱ्या यातना भोगणारा मी एकटाच होतो. मला सांग आई, ज्या गोष्टीशी माझा दूरदूरपर्यंत काहीच संबंध नव्हता, त्याची शिक्षा मला का मिळाली? यात माझा काय गुन्हा होता?"
मायाच्या डोळ्यातून आता घळघळा अश्रू वाहू लागले होते. पश्चात्तापाच्या अग्नीत ती होरपळून निघत होती. तिने रोहनचा हात घट्ट पकडण्याचा प्रयत्न केला, पण रोहनने हळूच, अत्यंत शांतपणे स्वतःचा हात सोडवून घेतला.
त्याच्या शेवटच्या प्रश्नाने मायाच्या मनाचा बांध पार फुटला. ती ढसाढसा रडू लागली.
माया: (रडत रडत, हात जोडत) "रोहन... माझी चूक झाली, मी मान्य करते. झालेल्या गोष्टी मला काय, देवालाही बदलता येणार नाहीत. पण झालेल्या या चुकीचे प्रायश्चित्त म्हणून मी तुझ्याकडे राहायला येऊ का रे? आपले उर्वरित आयुष्य आपण दोघे एकत्र घालवूयात. बघ, विचार कर आणि मला सांग. तुला कदाचित वाटेल की मी आता एकटी पडले आहे म्हणून हे स्वार्थाने म्हणते आहे, पण तसे नाही रे बाळा. हे घर माझ्याच नावावर आहे आणि पुढील आयुष्य सन्मानाने एकटीने व्यतीत करता येईल इतकी पुंजी माझ्याकडे आहे. पण आज मी तुझ्याकडे केवळ माझ्याकडून झालेल्या अन्यायाचे प्रायश्चित्त म्हणून भीक मागत आहे. शेवटी तू जो निर्णय घेशील, तो मला मान्य असेल."
त्या बंद खोलीतल्या भिंतीही जणू त्या माय-लेकांच्या आक्रोशाने थरथरल्या.
रोहनने तिच्याकडे ना पाहता शांतपणे छताकडे पाहत राहिला. त्याला त्याच्या प्रश्नाचे ठोस उत्तर मिळाले नव्हते, पण त्याच्या मनातील एवढ्या वर्षांची पोकळी आता एका शांत, करड्या स्वाभिमानात बदलली होती. माया तिथेच डोळ्यात अश्रू घेऊन उभी होती, आणि रोहन पुन्हा एकदा त्या अथांग जगात, कोणाचाही आधार न घेता, स्वतःचा रस्ता शोधण्यासाठी बाहेर पडला होता.
आता त्याच्या मनात वडिलांना हाच प्रश्न विचारावासा वाटत होता.
रोहनच्या मनातील वादळ
मायाच्या घराचा दरवाजा बंद झाला आणि रोहनने एक दीर्घ श्वास घेतला. त्याच्या मनात एक अनाकलनीय शांतता पसरली होती. इतकी वर्षे ज्या 'आई' नावाच्या सावलीसाठी त्याचे मन आसुसले होते, आज तिच्या अगदी जवळ जाऊनही तो रिक्त हाताने परतला होता. पण या रिकामेपणात आज एक वेगळाच स्वाभिमान होता.
तो रस्त्यावरून संथ पावले टाकत चालत होता आणि त्याचे मन भूतकाळाच्या पानात हरवून गेले...
'स्वतःला वाचवत होते, रोहन...' आईचे हे शब्द त्याच्या कानात सारखे घुमत होते. रोहनच्या चेहऱ्यावर एक विषण्ण हसू उमटले. तो स्वतःशीच म्हणाला, "किती सोपं असतं ना स्वतःला वाचवणं? बाबांनी संशयाचा पत्ता फेकून स्वतःची सुटका करून घेतली, आईने माहेरच्या त्रासाला आणि समाजाला घाबरून स्वतःचा नवा संसार थाटला, मामाने केवळ स्वतःची जबाबदारी टाळण्यासाठी हात झटकले आणि आजी-आजोबांनी जगाच्या भीतीने मला घरात उपऱ्यासारखं वागवलं. या सगळ्यांनी आपापला जीव वाचवला... पण या सगळ्यात निष्पाप, लहान लेकराचा जीव गुदमरला, त्याचे काय? प्रत्येकाने आपापल्या सुखाची आणि सुटकेची सोय करून घेतली, पण माझ्या वाट्याला मात्र जन्मापासूनच न्यायाऐवजी फक्त जन्मठेप आली."
रोहनला आज पहिल्यांदाच आईच्या माहेरच्या नरकयातना कळल्या होत्या. आई-वडिलांनी तिचा केलेला पैशांसाठीचा छळ, भावाने चारित्र्यावर घेतलेला संशय आणि तिला घरातून हाकलून देण्यासाठी दिलेले टोमणे ऐकून रोहनच्या काळजात एक कळ आली. त्याला समजले की, त्याची आई केवळ गुन्हेगार नव्हती, तर तीही या क्रूर व्यवस्थेची एक बळी होती. पण तरीही, त्याचे मन तिला पूर्णपणे माफ करू शकत नव्हते. "आई, तुझे हाल झाले हे सत्य आहे. सासर आणि माहेरच्या त्या चक्रव्यूहात तू होरपळलीस हेही खरं आहे. पण म्हणून स्वतःच्या काळजाच्या तुकड्याला त्या आगीत एकटं सोडून निघून जाणं कितपत योग्य होतं? तू स्वतःचा नवा संसार उभा केलास, तिथे सुखाचे चार क्षण जगलीस; पण मला मात्र या समाजात रोज लोकांच्या टोमण्यांचे निखारे पायाखाली तुडवत जगावं लागलं."
मायाने शेवटी रडत-रडत एकत्र राहण्याची, प्रायश्चित्त घेण्याची केलेली विनवणी रोहनच्या डोळ्यांसमोर तरळली. तिच्याकडे आता घर होते, गडगंज पुंजी होती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती आता एकटी पडली होती. रोहन विचार करू लागला, "आज एकतीस वर्षांनी जेव्हा तिच्या आयुष्यातली सगळी नाती संपली, हक्काची माणसं दुरावली, तेव्हा तिला माझी आठवण आली? आज तिला माझ्या अन्यायाचे प्रायश्चित्त घ्यायचे आहे की तिच्या एकटेपणाला एका आधाराची गरज आहे? जर आज तिचे दुसरे पती जिवंत असते, तिचा तो संसार बहरलेला असता, तर तिने मला शोधायचा प्रयत्न तरी केला असता का? नाही! तिचं ते वागणं आजही तिच्या गरजेपोटीच आहे."
चालता चालता रोहन कधी स्वतःच्या घरी पोहोचला, त्याचे त्यालाच कळाले नाही. खोलीत रस्त्यावरील दिव्यांचा अंधुक, पिवळसर प्रकाश पसरला होता. त्या निवांत प्रकाशात मनातील अंधार अधिकच गडद जाणवू लागला. त्याला विजेचा दिवा लावण्याचीही इच्छा उरली नव्हती. तो तसाच जड पावलांनी बाल्कनीत आला आणि तिथल्या खुर्चीत विषण्णपणे बसून राहिला.
तो स्वतःशीच विचार करू लागला, "मी आजवर फक्त माझ्या नशिबाला आणि मला मिळालेल्या वागणुकीला दोष देत राहिलो. पण खरंच माझं आयुष्य इतकं पोरकं होतं का?"
त्याच्या नजरेसमोर त्याचे बालपण आणि त्याला सांभाळणारी ती माणसं येऊ लागली...
रोहनच्या डोळ्यांतून एक अश्रू ओघळला, पण यावेळी त्यात वेदना नव्हती, तर आजीची माया होती. तो आठवू लागला, "आजोबा आणि मामा कडक स्वभावाचे होते, त्यांची वागणूक बऱ्याचदा त्रयस्थासारखी आणि टोचणारी असायची हे खरं आहे... पण माझ्या आजीने? तिने तर मला नेहमी आपल्या पदराखाली पाठीशी घातलं. घरात जेव्हा जेव्हा माझ्यावरून वाद व्हायचे, तेव्हा ती ढाल बनून उभी राहायची. कितीतरी रात्री तिने मला जवळ घेऊन, 'माझं आईविना पोरगं' म्हणून डोळ्यात पाणी आणलं होतं. तिच्या त्या अश्रूंत आणि मायेत कोणताच स्वार्थ नव्हता. आई निघून गेल्यावर तिच्या हिश्श्याचं प्रेम आजीनेच मला दिलं होतं."
रागाच्या भरात रोहनने मघाशी मामा आणि आजोबांवर केवळ जबाबदारी झटकल्याचा आरोप केला होता. पण शांत डोक्याने विचार करताना त्याला वास्तवाचे भान आले. "आजोबा आणि मामाने मला पोटच्या पोरासारखं कुरवाळलं नसेल, जगाच्या भीतीने त्यांची वागणूक उपऱ्यासारखी राहिली असेल, पण तरीही त्यांनी माझा सांभाळ केला. मामाने मला वाऱ्यावर सोडलं नाही. उलट, मला स्वतःच्या पायावर उभं राहता यावं म्हणून त्यानेच मला सराफाच्या दुकानात कामाला लावून दिलं, जगण्याची दिशा दाखवली. त्यांनी मला प्रेम दाखवलं नसेल, पण कर्तव्य मात्र चोख बजावलं होतं."
या सगळ्या विचारांच्या पार्श्वभूमीवर जेव्हा त्याने पुन्हा एकदा आईचा विचार केला, तेव्हा त्याच्या मनातील आदर पूर्णपणे संपला. "ज्यांच्याशी रक्ताचं नातं नव्हतं (आईच्या माहेरचे), त्यांनी कर्तव्य म्हणून का होईना माझा सांभाळ केला, मला पायावर उभं केलं. पण जिने मला जन्म दिला, त्या आईने माझ्यासाठी काय केलं? काहीच नाही! ती फक्त स्वतःला वाचवत राहिली, स्वतःच्या सुखाच्या मागे धावत राहिली. माझ्या आयुष्यात मामाचे कष्ट आणि आजीचं प्रेम नसतं, तर आज मी इथे उभाही राहू शकलो नसतो."
मनातील हे वैचारिक वादळ शमले आणि रोहनच्या चेहऱ्यावर एक गंभीर खंबीरपणा आला. त्याला आता कळून चुकले होते की, माहेरच्या जाचाचे निमित्त करून आईने घेतलेला पळपुटा निर्णय साफ चुकीचा होता.
रोहनने आपले ओले डोळे पुसले. त्याच्या मनात गेले बावीस वर्षे घोंघावणारे प्रश्नांचे वादळ आता कुठेतरी शमले होते. त्याला आज एका गोष्टीची पूर्ण जाणीव झाली होती की, ज्या प्रश्नांची उत्तरे तो आयुष्यभर शोधत होता, ती उत्तरे कधीच पूर्णपणे मिळणार नाहीत; कारण भूतकाळ बदलणे कोणाच्याच हातात नसते.
त्या अथांग, काळ्याशार आकाशाकडे पाहत त्याने मनात एक पक्का निश्चय केला, "आता पुरे झाले! मी आता कोणाकडेही नात्याची आणि प्रेमाची भीक मागणार नाही. ज्या आईने मला माझ्या अबोध बालपणात स्वतःच्या सुखासाठी वाऱ्यावर सोडले, आज तिच्या म्हातारपणाचा आधार बनून मी तिच्या जुन्या चुकांचे आणि कथित उपकारांचे ओझे वाहणार नाही. माझ्या आयुष्याची जी काही पाटी कोरी राहिली आहे, ती मी आता फक्त माझ्या कष्टाने आणि स्वाभिमानानेच लिहिणार. मला आता पाठीवर ठेवल्या जाणाऱ्या कोणत्याही स्वार्थी 'हातांची' गरज नाही. मी स्वतःच्या पायावर उभा राहिलोय आणि याच पायांवर माझं पुढचं हक्काचं जग निर्माण करेन."
पण या विचारांसोबतच तो स्वतःशीच पुटपुटला, "आज माझ्या बाबांच्या त्या संशयी वृत्तीमुळे... केवळ त्या एका संशयामुळे आम्ही सगळे उद्ध्वस्त झालो. आज मी, आई आणि स्वतः बाबा—आम्हा तिघांच्याही वाट्याला हे असं उपरेपणाचं, विखुरलेलं आयुष्य आलं. या सर्व विनाशाच्या मुळाशी फक्त आणि फक्त बाबांची संशयी वृत्तीच जबाबदार आहे. जर त्यांनी त्या रात्री जगासमोर तो तमाशा केला नसता, तर आज आमचं कुटुंब असं विखुरलं नसतं. मला आज ना उद्या बाबांना याचा जाब विचारावाच लागेल. त्यांना याचे उत्तर द्यावेच लागेल!"
मनातील ही जाणीव तीव्र होताच रोहनच्या शरीरात एक नवी ऊर्जा संचारली. आता मागे उरल्या होत्या फक्त कटू आठवणी, पण समोर होते त्याचे स्वतःचे हक्काचे आयुष्य आणि अनुत्तरीत राहिलेले प्रश्न!
त्याने खिशातून फोन काढला. मनात कसलाही संकोच न बाळगता, एका नव्या आत्मविश्वासाने आणि करारीपणाने त्याने वडिलांचा नंबर डायल केला. फोनची रिंग वाजली आणि पलीकडून एक थकलेला, जड आवाज आला.
रोहनने जेव्हा अत्यंत आशेने बाबांना फोन लावला, तेव्हा त्याला वाटले होते की पलीकडून काहीतरी उत्तर मिळेल. पण पुढच्याच क्षणी त्याच्या अपेक्षेचा दारुण चक्काचूर झाला.
"हॅलो, बाबा... मी रोहन बोलतोय," रोहनने आपल्या आवाजातील थरथर दाबत, अत्यंत खंबीरपणे सांगितले.
पलीकडून काही क्षण एक सुन्न शांतता पसरली. त्यानंतर जो आवाज आला, त्याने रोहनच्या काळजाचा ठोकाच चुकवला. तो आवाज थकलेला नक्कीच होता, पण त्यात कमालीचा परकेपणा आणि क्रूर अलिप्तता होती.
बाबा: (कोरड्या, त्रयस्थासारख्या आवाजात) "कोण रोहन? मी नाही ओळखत कोणत्याही रोहनला..."
रोहन: (धक्का बसून, आवाजातली धार वाढवत) "बाबा, मी तुमचा मुलगा रोहन बोलतोय! एकतीस वर्ष उलटून गेली, अजून किती काळ पळ काढणार आहात स्वतःच्या जबाबदारीतून?"
बाबा: (राग आणि विरक्ती मिश्रित स्वरात) "बघ मुला, मला पुन्हा फोन करायचा नाही. माझा आणि तुमचा काहीही संबंध उरलेला नाही. जे मागे सुटलं, ते तिथेच संपलं. पुन्हा या नंबरवर फोन करून मला त्रास देऊ नकोस."
पलीकडून फोन कट होण्यापूर्वीच, रोहनच्या अंगात संतापाची एक तीव्र लहर धावून गेली. त्याच्या हाताची मूठ घट्ट आवळली गेली. ज्या माणसाने केवळ स्वतःच्या संशयापायी त्याचं बालपण उद्ध्वस्त केलं, तो माणूस आज इतक्या सहजपणे 'काही संबंध नाही' म्हणून हात झटकत होता! तीव्र संताप आणि अपमानाच्या भावनेने रोहनने स्वतःच फोन खचकन कट केला.
त्याचा श्वास वेगाने चालत होता. खोलीतील त्या अंधुक प्रकाशात रोहनच्या डोळ्यात अंगारे फुलले होते. तो फोनकडे पाहत स्वतःशीच दात ओठ खाऊन म्हणाला, "इतकी वर्ष उलटूनही तुमचा अहंकार अजून विरघळला नाही, बाबा? आईने तिची चूक मान्य केली, पण तुमच्यात साधी पश्चात्तापाची भावनाही नाही? एवढ्या सहजपणे तुम्ही मला नाकारू शकत नाही. माझ्या आयुष्याची जी वाताहत झाली, त्याचं उत्तर तुम्हाला द्यावच लागेल."
त्याने फोन घट्ट पकडला. त्याचा राग आता एका थंड आणि क्रूर निश्चयात बदलत होता. त्याला समजले होते की फोनवर हा माणूस कधीच सरळ हाताने उत्तर देणार नाही.
त्याने एक दीर्घ श्वास घेतला, स्वतःला शांत केले आणि मनात एक नवा बेत आखला, "ठीक आहे, आज तुम्ही फोनवर ओळख नाकारली ना? पण मी एवढ्या सहज हार मानणारा नाही. आता दोन दिवस मी थांबतो. दोन दिवसांनी पुन्हा एकदा प्रयत्न करेन... आणि तरीही जर यांनी असाच पळपुटेपणा दाखवला, तर थेट यांच्या घरीच अचानक जाऊन समोर उभा राहीन! मग बघूया साऱ्या जगासमोर स्वतःला 'सत्यवादी' म्हणवणारे हे बाबा माझ्या डोळ्यात डोळे घालून आपली ओळख कशी नाकारतात ते!"
रोहनने फोन टेबलावर ठेवला. आता त्याच्या मनात भीती नव्हती, संकोच नव्हता; होता तो फक्त आपल्या हक्काच्या प्रश्नांचा जाब विचारण्याचा एक बाणा. दोन दिवसांनंतर येणारे वादळ आता अधिक तीव्र असणार होते, आणि रोहन त्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला होता.
फोन बंद झाला असला तरीपण रोहनच्या मनातला कल्लोळ काही थांबत नव्हता.
खिडकीत उभा राहून तो बराच वेळ बाहेर पाहत राहिला. आपलीच माणसं आपल्या आयुष्यात गुंतलेली होती; पण त्याचं स्वतःचं आयुष्य मात्र एका संशयाच्या ठिणगीने राख झालं होतं.
"माझा गुन्हा तरी काय होता?" तो स्वतःशीच पुटपुटला.
"मी जन्मलो... एवढाच? बाबांच्या संशयाची शिक्षा मला का मिळाली? एका बापाने स्वतःच्या मुलालाच नाकारावं, त्याचं बालपण हिरावून घ्यावं, आईला घराबाहेर काढावं... आणि आज इतक्या वर्षांनीही पश्चात्तापाचा एक शब्दही नाही? न्याय मागणं हा गुन्हा आहे का?"
त्याच्या डोळ्यांत पाणी आलं.
"आईने तिची चूक मान्य केली. तिने आयुष्यभर त्याची किंमतही मोजली. पण बाबांनी? त्यांनी कधी स्वतःकडे पाहिलं का? त्यांच्या एका संशयाने तीन आयुष्यं उद्ध्वस्त झाली. आज ते म्हणतात, 'मी कोणत्याही रोहनला ओळखत नाही.'
इतक्या सहजपणे नातं संपतं का?
नाही...
यावेळी मी मुलगा म्हणून नाही, तर अन्याय सहन केलेला एक नागरिक म्हणून उभा राहीन. मला सूड नको आहे... मला सत्याची नोंद हवी आहे. न्यायालयाच्या नोंदीत तरी हे लिहिलं गेलं पाहिजे की एका संशयाने एका मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं."
सुरेश
दुसऱ्याच दिवशी सकाळी रोहन शहरातील प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट अभय देशमुख यांच्या कार्यालयात पोहोचला.
वकीलांनी त्याला बसण्यास सांगितले.
"हो, सांगा. कशासाठी आलात?"
रोहन काही क्षण शांत बसला. बोलण्यासाठी त्याने तोंड उघडलं; पण शब्दच फुटेनात. डोळ्यात साचलेलं दुःख अखेर ओघळलं.
"सर... मला न्याय हवा आहे."
वकील शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिले.
"निवांत बोला. घाई करू नका."
रोहनने एकेक घटना सांगायला सुरुवात केली.
लहानपण...
बाबांचा संशय...
आईला घराबाहेर काढलेली ती रात्र...
वर्षानुवर्षांचा संघर्ष...
वडिलांपासून तुटलेलं आयुष्य...
आणि दोन दिवसांपूर्वी झालेला फोन.
सगळं सांगून झाल्यावर तो अक्षरशः कोसळलाच.
"सर... मी इतकी वर्ष फक्त एकच प्रश्न मनात घेऊन जगलो... माझा दोष काय होता? मला वडिलांचं प्रेम का मिळालं नाही? काल मी त्यांना फोन केला तर ते म्हणाले, 'मी कोणत्याही रोहनला ओळखत नाही.'
सर... एखादा बाप स्वतःच्या मुलाला इतक्या सहजपणे नाकारू शकतो का?"
वकीलांनी त्याला पाण्याचा ग्लास दिला.
"रोहन, आधी स्वतःला सावर. भावना महत्त्वाच्या आहेत; पण न्यायालय पुराव्यावर चालतं."
"माझ्याकडे पुरावे आहेत, सर. जुनी कागदपत्रं आहेत, आईकडे सगळे दस्तऐवज आहेत. माझ्या जन्माची नोंद आहे. त्यांनी आम्हाला सोडलं, आमची जबाबदारी टाळली... हे सगळं सिद्ध करता येईल."
वकील काही क्षण विचारात पडले.
"रोहन, तू जे सहन केलं आहेस, ते निश्चितच वेदनादायक आहे. पण लक्षात ठेव, न्यायालय सूड घेण्यासाठी नसतं; न्याय मिळवण्यासाठी असतं."
"मलाही सूड नको आहे, सर. मला फक्त एवढंच हवं आहे की त्यांनी केलेल्या अन्यायाची जबाबदारी त्यांनी स्वीकारावी."
वकीलांनी फाईल बंद केली.
"माझ्या मते तुझ्याकडे न्यायालयात जाण्यासाठी पुरेसा आधार आहे. आपण सर्व कागदपत्रांची तपासणी करू. आवश्यक असेल त्या सर्व कायदेशीर तरतुदींनुसार दावा दाखल करू. न्यायालय त्यांना उत्तर देण्यास भाग पाडेल."
रोहनच्या चेहऱ्यावर अनेक वर्षांनी आशेची एक हलकी रेष उमटली.
"म्हणजे... आता ते पळू शकणार नाहीत?"
वकील हसले.
"फोन कट करता येतो, रोहन... पण न्यायालयाची नोटीस कट करता येत नाही."
त्या एका वाक्याने रोहनच्या मनात आशेचा दिवा पेटला.
पुढील काही दिवस आवश्यक कागदपत्रं, जन्मनोंदी, जुन्या पत्रांच्या प्रती, आर्थिक व्यवहारांचे पुरावे आणि इतर सर्व कागदपत्रं गोळा करण्यात गेले.
अखेरीस तो दिवस उजाडला.
रोहन आणि ॲडव्होकेट देशमुख जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत पोहोचले.
न्यायालयाच्या आवारात पाऊल ठेवताना रोहनचं हृदय जोराने धडधडत होतं.
वकिलांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला.
"घाबरू नकोस. आज तू कोणाविरुद्ध लढायला आलेला नाहीस... आज तू तुझ्या आयुष्याच्या सत्यासाठी उभा राहिलेला आहेस."
रोहनने मान डोलावली.
आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्या.
दावा न्यायालयात दाखल झाला.
न्यायालयाने प्राथमिक सुनावणीसाठी अर्ज स्वीकारला आणि प्रतिवादी म्हणून रोहनचे वडील तसेच त्याची आई यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले.
काही दिवसांतच न्यायालयाचे शिपाई दोन वेगवेगळ्या पत्त्यांवर पोहोचले.
रोहनच्या वडिलांच्या हातात न्यायालयाची नोटीस पडली.
लिफाफ्यावर न्यायालयाचा शिक्का पाहताच त्यांच्या चेहरा एकदम गंभीर झाला.
"रोहन... विरुद्ध..." एवढं वाचताच त्यांच्या हाताला किंचित कंप सुटला.
त्याच दिवशी रोहनच्या आईलाही न्यायालयाची नोटीस मिळाली.
लिफाफा उघडताना तिचे हात थरथरत होते.
पहिलंच पान वाचताच तिच्या डोळ्यांत अश्रू आले.
ती हळूच पुटपुटली,
"रोहन... अखेर तू न्याय मागण्यासाठी उभा राहिलास."
आता हा संघर्ष घराच्या चार भिंतींमध्ये राहिला नव्हता.
तो न्यायालयाच्या दालनात पोहोचला होता.
आणि अनेक वर्षांपासून दडवून ठेवलेलं सत्य आता शपथेवर बोललं जाणार होतं.
कोर्टात दावा दाखल होऊन दहा दिवस उलटले होते. न्यायालयाची नोटीस सुरेश आणि माया या दोघांनाही मिळाली होती. त्यानंतर मात्र कोणतीही हालचाल झाली नव्हती.
अकराव्या दिवशी सकाळी ॲडव्होकेट देशमुख आपल्या कार्यालयात आले. टेबलावरील फाईल्स चाळत असतानाच त्यांच्या मोबाईलची रिंग वाजली.
"हॅलो... ॲडव्होकेट देशमुख बोलतोय."
पलीकडून काही क्षण शांतता होती.
"...मी सुरेश बोलतोय."
देशमुख क्षणभर सावध झाले.
"हो, बोला."
"तुमच्या क्लायंट रोहनची कोर्टाची नोटीस मला मिळाली आहे. मला त्याला एकदा भेटायचं आहे... पण एका अटीवर."
"कोणती अट?"
"भेट तुमच्या ऑफिसमध्येच होईल आणि तुम्ही स्वतः त्या वेळी उपस्थित असाल. मला कोणताही गोंधळ नको आहे."
"ठीक आहे. मी रोहनशी बोलून वेळ ठरवतो."
दोघांच्या सोयीने बरोबर आठ दिवसांनी दुपारी चार वाजताची वेळ ठरली.
आठ दिवसांनी ॲडव्होकेट देशमुखांच्या कार्यालयात एक वेगळीच शांतता पसरली होती.
एका बाजूला रोहन आणि त्याची आई माया बसली होती. दोघांच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता. रोहनच्या मुठी नकळत आवळल्या जात होत्या. एकतीस वर्षांनंतर प्रथमच तो आपल्या वडिलांसमोर बसणार होता.
घड्याळाचे काटे चारवर येऊन थांबले आणि दार हळूच उघडले.
सुरेश आत आला.
त्याच्या मागोमाग एक सुसंस्कृत, शांत चेहऱ्याची स्त्री आणि पंचवीस-सव्वीस वर्षांचा तरुण आत आले.
देशमुख उठले.
"या... बसा."
सुरेशने त्या दोघांकडे पाहत ओळख करून दिली.
"ही मंदाकिनी... आणि हा माझा मुलगा अमोल."
रोहनने एक कटाक्ष अमोलकडे टाकला. अमोल सुरेशकडे अगदी सहजपणे पहात उभा होता. त्या एका क्षणात रोहनच्या छातीत बारीकशी कळ आली.
काही क्षण खोलीत पूर्ण शांतता पसरली.
शेवटी देशमुख बोलले.
"सुरेशजी, तुम्हीच भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. तुम्हाला जे सांगायचं आहे, ते मोकळेपणाने सांगा."
सुरेशने दीर्घ श्वास घेतला.
"मला एकच प्रश्न विचारायचा आहे."
तो रोहनकडे पाहत म्हणाला,
"ही घटना घडून एकतीस वर्षे झाली. मी माझ्या आयुष्यात स्थिर आहे. तूही तुझ्या आयुष्यात स्थिर आहेस. आता मी तुझा बाप असलो काय किंवा नसलो काय... त्याने काय फरक पडतो? गेलेला काळ परत येणार आहे का? मग हा सगळा अट्टाहास कशासाठी? मला नाहक कोर्टात खेचून तुम्हाला काय मिळणार आहे?"
रोहन बराच वेळ शांत बसून होता. पण हे शब्द ऐकताच त्याच्या डोळ्यांत वेदनेची एक ज्वाला पेटली.
त्याने स्वतःला सावरले.
"हा अट्टाहास नाही, बाबा... हा माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे."
सुरेश निर्विकारपणे त्याच्याकडे पाहत राहिला.
रोहनचा आवाज हळूहळू भरून आला.
"तुम्ही म्हणता, गेलेला काळ परत येत नाही. पण त्या गेलेल्या काळात माझं संपूर्ण बालपण हरवलं गेलं. त्याचं काय?"
तो पुढे म्हणाला,
"लहान मुलाला आई-वडिलांच्या प्रेमापेक्षा मोठी संपत्ती नसते. पण मला ती कधीच मिळाली नाही."
त्याच्या डोळ्यांत पाणी तरळलं.
"आजी मला जवळ घ्यायची... माझ्या डोक्यावरून हात फिरवायची आणि म्हणायची, 'माझ्या बिनआई-बापाच्या लेकरा...' तेव्हा मी तिच्या कुशीत रडायचो. माझी आई जिवंत होती... माझे बाबा जिवंत होते... तरी मला अनाथासारखं का जगावं लागलं?"
मायाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.
रोहनचा आवाज आता थरथरत होता.
"शाळेत मित्र विचारायचे, 'अरे, तुझे बाबा कुठे असतात?' त्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. मी हसायचो... विषय बदलायचो... पण घरी आल्यावर उशीत तोंड खुपसून रडायचो."
खोलीतील प्रत्येकजण निःशब्द झाला.
"कॉलेजमध्ये असताना मला क्रिकेटमध्ये सर्वोत्तम खेळाडूचं पारितोषिक मिळालं होतं. सगळ्या मुलांचे आई-वडील टाळ्या वाजवत होते. त्यांना मिठी मारत होते. माझ्या हातात ट्रॉफी होती... पण माझं कौतुक करायला माझ्याजवळ एकही माणूस नव्हता. त्या दिवशी मला पहिल्यांदाच बक्षीस मिळाल्याचं ओझ वाटलं."
रोहनच्या गालावरून अश्रू ओघळले.
"तुम्ही म्हणता, हा अट्टाहास आहे?"
त्याने सुरेशकडे रोखून पाहिले.
"आता तुम्ही आत आलात तेव्हा या अमोलची ओळख 'माझा मुलगा' अशी करून दिलीत. तो तुमच्या रक्ताचा नाही, हे तुम्हालाही माहीत आहे. तरी तुम्ही त्याला तुमचा मुलगा म्हणता... आणि मी? मी जर खरंच तुमच्या रक्ताचा असेन, तर मला का नाकारता? माझा जन्म तुमच्या दोघांच्या पोटी झाला, यात माझा काय गुन्हा होता?"
अमोलची नजर खाली गेली.
मंदाकिनी अस्वस्थ झाली.
माया डोळे पुसत होती.
काही क्षण खोलीत फक्त रोहनच्या हुंदक्यांचा आवाज घुमत राहिला.
सुरेशने बोलायला सुरुवात केली.
"रोहन... तुझ्या मनात माझ्याबद्दल राग आहे, हे मला समजतं. पण माझी बाजूही ऐक."
तो पुढे म्हणाला,
"आमचं लग्न झालं... आणि लग्नानंतर अवघ्या सात महिन्यांत तुझा जन्म झाला. नातेवाईक, मित्र मंडळी यांच्यात कुजबुज सुरू झाली. 'सात महिन्यांत मूल कसं झालं?' प्रत्येक जण मला वेगवेगळ्या गोष्टी सांगू लागला. सुरुवातीला मी दुर्लक्ष केलं. पण तोच विचार माझ्या मनात घर करू लागला. हळूहळू तो विचार इतका घट्ट झाला की मला वाटू लागलं... हा मुलगा माझा नाही."
त्याने मायाकडे पाहिले.
"माझा तिच्यावरचा विश्वास उडाला. आमच्यात रोज भांडणं व्हायची. ती मला काहीतरी सांगायची... पण त्या वेळी माझं डोकं त्या एका विचारानेच फिरलं होतं. शेवटी ती माहेरी निघून गेली. ती गेल्यानंतर मी पूर्णपणे एकटा पडलो. दारूचं व्यसन लागलं. नातीगोती तुटली. आयुष्याची घडीच विस्कटली."
तो काही क्षण शांत राहिला.
"नंतर माझ्या आयुष्यात मंदाकिनी आली. आणि मला सुखाचे दिवस आले.तिचाही संसार मोडला होता. तिच्यासोबत तिचा लहान मुलगा अमोल होता. आम्ही एकत्र राहायला लागलो... पण..."
त्याने रोहनकडे पाहिले.
"आजही माझा संशय गेलेला नाही. आजही मी तुला माझा मुलगा मानू शकत नाही."
"म्हणजे एकतीस वर्षांनंतरही तुम्हाला तुमचा संशयच खरा वाटतो?" रोहनने विचारलं.
"हो."
देशमुखांनी शांतपणे हस्तक्षेप केला.
"सुरेशजी, भावना बाजूला ठेवूया. न्यायालयात संशय चालत नाही; पुरावे लागतात. आणि आज विज्ञान तुमच्या संशयाचं उत्तर देऊ शकतं."
सुरेशने प्रश्नार्थक नजरेने पाहिले.
"कसं?"
देशमुख स्पष्टपणे म्हणाले,
"डीएनए चाचणी."
क्षणभर खोलीत मृतशांतता पसरली.
"जर डीएनए चाचणीत रोहन तुमचा मुलगा नसल्याचं सिद्ध झालं, तर रोहनलाही ते सत्य स्वीकारावं लागेल. पण जर तो तुमचाच मुलगा असल्याचं सिद्ध झालं... तर तुम्ही ते स्वीकारण्याची तयारी ठेवणार का?"
सुरेश नि:शब्द बसला.
तेवढ्यात माया उठली.
"मी काही सांगू का?"
"नक्की," देशमुख म्हणाले.
माया सुरेशकडे पाहत म्हणाली,
"तुम्ही एक गोष्ट कायम विसरलात."
"काय?"
"आपलं लग्न ठरल्यानंतर जवळजवळ एक वर्षाने आपलं लग्न झालं होतं."
"मग?"
"त्या एका वर्षात आपण बऱ्याच वेळा भेटलो होतो. त्या वेळी आपण एकमेकांच्या संमतीने पती-पत्नीप्रमाणे तीन ते चार वेळा जवळ आलो होतो. मी हे तुम्हाला कितीतरी वेळा सांगण्याचा प्रयत्न केला. पण तुम्ही माझं एकदाही ऐकून घेतलं नाही."
तिचा आवाज कापत होता.
"तुम्ही लोकांचं ऐकलंत... पण माझ्यावर विश्वास ठेवला नाही. एका संशयासाठी माझं आयुष्य,माझा संसार उद्ध्वस्त केला... आणि एका निष्पाप मुलाचं बालपण हिरावून घेतलं."
देशमुख शांतपणे म्हणाले,
"म्हणूनच आता भावना नव्हे, तर वैज्ञानिक पुरावा अंतिम ठरेल."
रोहन ठामपणे म्हणाला,
"मी डीएनए चाचणीसाठी तयार आहे."
माया म्हणाली,
"मलाही कोणतीही हरकत नाही. सत्याची मला भीती नाही."
सर्वांच्या नजरा सुरेशकडे वळल्या.
सुरेश खाली मान घालून बसला होता.
एकतीस वर्षे ज्या संशयाला त्याने सत्य मानलं होतं, त्या संशयासमोर आता विज्ञान उभं ठाकलं होतं.
आणि त्या क्षणी त्याच्या मनात पहिल्यांदाच एक प्रश्न डोकावला—
"जर मीच चुकलो असेन तर...?"
देशमुखांच्या कार्यालयातील चर्चा संपली. तरीही वातावरण अजूनही गंभीरच होतं.
सुरेश उठला. दरवाजापर्यंत जाताना तो पुन्हा वळला.
"देशमुख साहेब..."
"हो, सुरेशजी."
"डीएनए चाचणीबाबत... मला दोन दिवसांचा वेळ द्या. मी विचार करून माझा अंतिम निर्णय तुम्हाला सांगतो."
देशमुखांनी मान हलवली.
"नक्की. पण लक्षात ठेवा, न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली आहे. आणि अजून एक, तुमचा कायदेशीर घटस्फोट अद्याप झालेला नाही,कायदेशीर दृष्ट्या तुम्ही अजूनही पती पत्नी आहात."
सुरेश काही क्षण शांत राहिला.
"माझी एक विनंती आहे."
"बोला."
"शक्य असेल तर हा वाद कोर्टाबाहेरच मिटवू या. एकतीस वर्षांपूर्वी जे घडलं, ते आता पुन्हा न्यायालयात उकरून काढावं असं मला वाटत नाही."
देशमुख शांतपणे म्हणाले,
"कोर्टाबाहेर तडजोड व्हायला आमची काहीच हरकत नाही. पण त्यासाठी दोन्ही बाजूंना न्याय मिळाला पाहिजे. रोहनचा उद्देश सूड घेण्याचा नाही, तर सत्य समोर येण्याचा आहे."
रोहनही शांत स्वरात म्हणाला,
"जर सत्य स्वीकारण्याची तुमची तयारी असेल, तर मला कोर्टात लढाई करण्यात आनंद नाही."
सुरेशने फक्त मान हलवली आणि मंदाकिनी व अमोलसोबत कार्यालयातून बाहेर पडला.
गाडीत तिघेही बसले होते.
पंधरा-वीस मिनिटांचा प्रवास झाला, पण कोणीही एक शब्द बोललं नाही.
पश्चाताप
घरी आल्यावर सुरेश निःशब्दपणे सोफ्यावर जाऊन बसला. त्याचा चेहरा पूर्णपणे उतरला होता.
मंदाकिनीने त्याच्यासमोर पाण्याचा ग्लास ठेवला.
"घ्या... आधी पाणी प्या."
सुरेशने ग्लास हातात घेतला, पण त्याचा एक घोटही घेतला नाही.
मंदाकिनी त्याच्या समोर येऊन बसली.
"मी काही बोलू का?"
सुरेशने तिच्याकडे पाहिलं.
"बोल."
मंदाकिनी शांत आवाजात म्हणाली,
"आज ऑफिसमध्ये जे घडलं... ते पाहिल्यावर मला रोहनची खूप कीव आली."
सुरेश काहीच बोलला नाही.
तेवढ्यात अमोलही जवळ येऊन बसला.
"बाबा... मीही काही सांगू?"
"बोल."
अमोल थोडा संकोचत म्हणाला,
"आज रोहनदादा जे बोलले... ते ऐकताना माझ्या अंगावर काटा आला."
सुरेशने त्याच्याकडे पाहिले.
"का?"
"कारण... मी स्वतः विचार करत होतो. जर माझे बाबा मला लहानपणी सोडून गेले असते... त्यांनी माझी ओळख नाकारली असती... तर माझी काय अवस्था झाली असती?"
सुरेश नि:शब्द झाला.
अमोल पुढे म्हणाला,
"तुम्ही मला कधीच परका मानलं नाही. मी तुमच्या रक्ताचा नाही, हे तुम्हाला पहिल्याच दिवसापासून माहिती होतं. तरी तुम्ही प्रत्येकाला अभिमानाने 'हा माझा मुलगा आहे' असंच सांगितलंत."
तो थोडा थांबला.
"मग जर रोहनदादा खरंच तुमचा मुलगा असतील... तर त्यांच्यावर किती मोठा अन्याय झाला असेल, याचा तुम्ही कधी विचार केलात का?"
सुरेशच्या डोळ्यांत अस्वस्थता दाटून आली.
मंदाकिनीने त्याचा हात हातात घेतला.
"सुरेश... एक प्रश्न विचारू?"
"हं..."
"तुम्हाला आजही खात्री आहे का की रोहन तुमचा मुलगा नाही?"
सुरेश काही बोलला नाही.
"उत्तर द्या."
"मला... माहित नाही."
मंदाकिनी शांतपणे म्हणाली,
"जर तुम्हाला इतकीच खात्री असती, तर डीएनए चाचणीचा विषय निघताच तुम्ही लगेच तयार झाला असता. पण तुम्ही दोन दिवसांचा वेळ मागितलात. याचा अर्थ तुमच्या मनात कुठेतरी शंका निर्माण झाली आहे."
सुरेशने नकळत मान खाली घातली.
मंदाकिनी पुढे म्हणाली,
"आज मायाताईने सांगितलेली गोष्ट आठवा. लग्न ठरल्यानंतर जवळजवळ वर्षभराने लग्न झालं. त्या काळात तुम्ही दोघं अनेकदा भेटलात. जर ते खरं असेल... तर रोहन तुमचाच मुलगा असण्याची शक्यता खूप मोठी आहे."
अमोलही म्हणाला,
"बाबा, विज्ञान खोटं बोलत नाही. जर तुम्हाला खात्री आहे की रोहनदादा तुमचे मुलगे नाहीत, तर डीएनए चाचणीला नकार देण्याचं कारणच नाही."
मंदाकिनीनी पुढे म्हणाली
"आणि जर चाचणीत तुमाचाच मुलगा निघाला... तर?"
सुरेशने डोळे मिटले.
"मग...?"
"मग एकतीस वर्षे तुम्ही एका निष्पाप स्त्रीवर आणि एका निष्पाप मुलावर अन्याय केला, हे स्वीकारावं लागेल."
हे वाक्य ऐकताच सुरेशच्या अंगावर भीतीने रोमांच उभे राहिले .
त्याच्या मनात भूतकाळाचे पडदे एकामागून एक सरकू लागले.
मायाचे रडणारे डोळे...
तिचे वारंवार सांगणे, "माझ्यावर विश्वास ठेवा..."
रोहनचा आजचा भरून आलेला आवाज...
"शाळेत मित्र विचारायचे, तुझे बाबा कुठे आहेत?"
"मला ट्रॉफी मिळाली होती... पण माझं कौतुक करायला कोणी नव्हतं..."
"माझा काय गुन्हा होता?"
हे शब्द त्याच्या कानात घुमू लागले.
अचानक त्याच्या मनात एक विचार विजेसारखा चमकून गेला.
"जर रोहन खरंच माझाच मुलगा असेल तर...?"
त्याच्या छातीत कळ उठली.
"मग मी काय केलं?"
"एका अफवेवर विश्वास ठेवला... पण माझ्या पत्नीवर नाही."
"लोकांच्या शब्दांना सत्य मानलं... पण तिच्या डोळ्यांतील प्रामाणिकपणा पाहिला नाही."
"एका संशयासाठी मी माझा संसार उद्ध्वस्त केला."
"एका निष्पाप मुलाचं बालपण हिरावून घेतलं."
"त्याच्या प्रत्येक वाढदिवशी तो माझी वाट पाहत असेल का?"
"त्याला ताप आला असेल, तेव्हा त्याच्या डोक्यावर हात ठेवायला मी नव्हतो."
"त्याने पहिल्यांदा शाळेत बक्षीस जिंकलं, तेव्हा टाळी वाजवायला मी नव्हतो."
"तो पडला असेल, रडला असेल... पण त्याला 'बाबा' म्हणून सावरायला मीच नव्हतो."
त्याच्या डोळ्यांतून नकळत अश्रू ओघळले.
त्याने दोन्ही हातांनी चेहरा झाकून घेतला.
"देवा... मी काय करून बसलो?"
त्याचा आवाज थरथरत होता.
"एका संशयाने मला माणूसच राहू दिलं नाही."
"मी स्वतःला न्यायप्रिय समजत होतो... पण मी तर स्वतःच्या पत्नीवरच अन्याय केला."
"मी रोहनला जन्मापासून शिक्षा दिली... ज्या गुन्ह्यासाठी तो कधीच दोषी नव्हता."
त्याला स्वतःचाच तिरस्कार वाटू लागला.
आरशात स्वतःचा चेहरा पाहण्याचीही त्याची हिंमत होत नव्हती.
मंदाकिनी शांतपणे त्याच्या जवळ बसली.
"चूक खूप मोठी झाली आहे, सुरेश. पण अजूनही उशीर झालेला नाही."
अमोल म्हणाला,
"बाबा... आयुष्यात प्रत्येकाला दुसरी संधी मिळत नाही. पण तुम्हाला मिळते आहे. ती गमावू नका."
सुरेशने डोळे पुसले.
त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच अहंकार नव्हता.
होता तो फक्त... अपराधीपणा.
आणि मनात एकच प्रश्न घोंगावत होता—
"जर डीएनए चाचणीने रोहन माझाच मुलगा असल्याचं सिद्ध केलं... तर मी त्याच्या डोळ्यांत डोळे घालून 'मला माफ कर' म्हणण्याचं धैर्य माझ्यात असेल का?"
"मी काय करून बसलो होतो?" हा एकच प्रश्न सुरेशच्या मनात सतत घुमत होता. एकतीस वर्षांपूर्वी उठलेल्या कुजबुजीवर त्याने विश्वास ठेवला, पण आपल्या पत्नीच्या डोळ्यांतील सत्यावर कधीच ठेवला नाही. एका संशयाने त्याचा विवेक हिरावून घेतला आणि त्याच संशयाने त्याचा संसारही उद्ध्वस्त केला. माया किती वेळा त्याला समजावून सांगत होती, पण त्या वेळी त्याचा अहंकार आणि संशय इतका प्रबळ झाला होता की तिच्या प्रत्येक शब्दातही त्याला खोटेपणाच दिसत होता. आज रोहनचे शब्द त्याच्या कानात घणाघाती आवाजासारखे घुमत होते—"माझा काय गुन्हा होता?" त्या प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे नव्हतं. स्वतःच्या रक्ताच्या मुलाला त्याने आयुष्यभर नाकारलं आणि दुसऱ्याच्या मुलाला मात्र प्रेमाने 'माझा मुलगा' म्हणून जगासमोर स्वीकारलं. हा किती मोठा विरोधाभास होता! जर माया आज सांगत होती ते खरं असेल, तर एकतीस वर्षे तो एका भयंकर गैरसमजाला सत्य मानून जगत होता. त्या एका चुकीच्या निर्णयामुळे मायाचं तारुण्य उद्ध्वस्त झालं, रोहनचं बालपण हिरावलं गेलं आणि स्वतःचं आयुष्यही दारू, एकटेपणा आणि पश्चात्तापाच्या अंधारात हरवून बसलं. त्याला पहिल्यांदाच स्वतःच्या संशयी स्वभावाची घृणा वाटू लागली. मनात एकच इच्छा दाटून येत होती—"देवा, जर अजूनही माझी चूक सुधारण्याची एक संधी उरली असेल, तर ती मी यावेळी माझ्या संशयामुळे गमावणार नाही."
निर्णयाचा स्वीकार
दोन दिवसांनी सकाळी रोहनला ॲडव्होकेट देशमुखांचा फोन आला.
"रोहन, आज दुपारी चार वाजता ऑफिसमध्ये ये. मला तुझ्याशी निवांत बोलायचं आहे."
"काही विशेष आहे का, सर?"
देशमुख हसले.
"हो... पण आजची भेट कोर्टाच्या केससाठी नाही."
रोहनला थोडं आश्चर्य वाटलं. तरीही तो ठरलेल्या वेळी देशमुखांच्या कार्यालयात पोहोचला.
आज कार्यालयात नेहमीची गडबड नव्हती. रिसेप्शनवर बसलेल्या मुलीने त्याला थेट देशमुखांच्या केबिनमध्ये जाण्यास सांगितलं.
देशमुखांनी उठून त्याचं स्वागत केलं.
"ये रोहन... बस."
रोहन बसला.
देशमुखांनी केबिनचा दरवाजा आतून बंद केला.
टेबलावरील मोबाईल सायलेंटवर ठेवला आणि इंटरकॉमवर रिसेप्शनला सूचना दिली.
"पुढचा एक तास मला कोणताही फोन जोडू नका. कुणालाही आत पाठवू नका."
रोहन त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत होता.
देशमुख त्याच्याकडे हसत म्हणाले,
"आजचा हा पूर्ण वेळ मी फक्त तुझ्यासाठी राखून ठेवला आहे. आता आपल्या दोघांमध्ये कोणीही व्यत्यय आणणार नाही."
रोहनच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं.
देशमुख पुढे म्हणाले,
"आणि हो... आज मी तुझ्याशी वकील म्हणून बोलणार नाही."
"म्हणजे?"
"आज मी तुझ्याशी एक मित्र म्हणून बोलणार आहे. आणि जर तू परवानगी दिलीस तर... तुझ्यापेक्षा वयाने मोठा असल्यामुळे एका वडिलकीच्या नात्यानेही बोलणार आहे."
रोहन काही क्षण शांत राहिला.
"सर... तुम्हाला परवानगी मागायची गरज नाही."
देशमुख काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिले.
"रोहन, तुझ्यावर अन्याय झाला आहे... याबद्दल माझ्या मनात किंचितही शंका नाही. तुझं बालपण तुझ्याकडून हिरावलं गेलं, आई-वडिलांचं प्रेम तुला मिळालं नाही, तुझ्या मनावर खोल जखमा झाल्या... हे सर्व वास्तव आहे."
रोहनची नजर खाली गेली.
देशमुख पुढे म्हणाले,
"पण आज मला हा अन्याय कोणी केला, कसा केला किंवा त्याची कायदेशीर बाजू काय आहे, यावर चर्चा करायची नाही. त्यासाठी न्यायालय आहे. आज मला तुझ्याशी आयुष्याबद्दल बोलायचं आहे."
रोहन लक्षपूर्वक ऐकत होता.
देशमुख खुर्चीत थोडे मागे रेलले.
"तू अध्यात्मावर विश्वास ठेवतोस का?"
"हो... थोडाफार."
"मग तुला कर्माचा सिद्धांत माहीत असेल."
"या बाबतीत थोडफार माहिती आहे."
देशमुख शांत स्वरात बोलू लागले.
"आपल्या हिंदू तत्त्वज्ञानात कर्माचे तीन प्रकार सांगितले आहेत—संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि क्रियमान कर्म."
रोहन उत्सुकतेने ऐकत होता.
"संचित कर्म म्हणजे अनेक जन्मांतील आपल्या कर्मांचा साठा. प्रारब्ध कर्म म्हणजे त्या साठ्यातून या जन्मात भोगण्यासाठी आलेला भाग. आणि क्रियमान कर्म म्हणजे आपण आत्ता, या क्षणी करत असलेली कर्मे, जी आपल्या भविष्यावर परिणाम करतात."
काही क्षण शांतता पसरली.
आपल्या जीवनात जे आपण दु:ख भोगतो किंवा सुख भोगतो ते आपल्याच मागच्या कोणत्या ना कोणत्या कर्माची फळे असतात. चागली कर्मे केली तर सुख आणि वाईट केली तर दु:ख असा सोपा नियम आहे.
रोहन : पण माझा जन्म झाला त्यावेळेस तर मी कोणतेही कर्म केलेच नव्हते तरी देखील मला ना आईचे सुख मिळाले ना वडिलांचे.
मी तुला एक उदाहरण देतो कित्येक लहान मुले जन्मत:च मरण पावतात. त्यांनी सुद्धा या जन्मात कोणतेही कर्म केलेले नसते. पण त्यांचे संचित कर्म म्हणजेच मागील जन्मातील कर्माचा साठा त्यामुळे त्यांनी हे जग पाहिलेच नाही.
म्हणजे तुम्हाला असे म्हणायचे आहे की माझे मागच्या जन्मातील कर्मामुळे मला हे दु:ख भोगावे लागते आहे. असेच ना.
होय. पण हे दु:ख किंवा त्रास तुला एकट्यालाच नाही तर तुझ्या बाबतीत तुझे आई,वडील दोघानाही भोगावे लागले आहे. दु:ख कशा प्रकारे भोगावे लागले त्याचे प्रकार तिघांचेही भिन्न भिन्न असतील पण दु:ख सर्वांनाच भोगावे लागते. या कर्माच्या सिद्धांतानुसार कोणीही त्यातून सुटू शकत नाही. अगदी तो परमेश्वर असला तरीही...
देशमुख पुढे म्हणाले,
"रोहन, मी जे तुला सांगतो आहे ते तू श्रद्धेच्या दृष्टीने ऐक. हा न्यायालयाचा युक्तिवाद नाही."
रोहनने मान डोलावली.
"कधी कधी आपल्या आयुष्यात अशी दुःखं येतात, ज्यात वरवर पाहता काही व्यक्ती दोषी वाटतात. पण कर्मसिद्धांत असं सांगतो की प्रत्येक जीवाला काही प्रारब्ध भोगावंच लागतं. कदाचित तुझ्या वाट्याला आलेलं हे दुःखही त्या प्रारब्धाचाच एक भाग असेल. याचा अर्थ असा नाही की मला इतरांच्या चुकीचं समर्थन करायचंय. नाही..... प्रत्येक माणूस आपल्या कृतीसाठी जबाबदार असतो. पण हे समजून घेतलं, तर मनातला द्वेष कमी होऊ शकतो."
रोहन शांतपणे ऐकत होता.
देशमुख पुढे म्हणाले,
"सुरेशने संशय केला... ती त्याची चूक होती. मायाने काही निर्णय घेतले... त्यांची जबाबदारी तिची होती. त्या दोघांनाही त्यांच्या कर्मांची फळं भोगावी लागली. पण तू आज कोणतं कर्म करणार, हा निर्णय फक्त तुझ्या हातात आहे."
रोहन विचारात पडला.
"म्हणजे मी त्यांना माफ करावं, असं तुम्ही म्हणताय?"
देशमुख हसले.
"माफी म्हणजे विसरणं नाही. माफी म्हणजे अन्याय योग्य होता, असं म्हणणंही नाही. माफी म्हणजे स्वतःच्या मनाला रागाच्या कैदेतून मुक्त करणं."
ते पुढे म्हणाले,
"तू एकतीस वर्षे जखम घेऊन जगलास. आता जर उरलेलं आयुष्यही त्याच रागात घालवलंस, तर शिक्षा अजूनही तुलाच मिळेल."
रोहनच्या डोळ्यांत पाणी आलं.
"सर... हे इतकं सोपं नाही."
"मला माहिती आहे."
देशमुख त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले,
"पण विचार कर... तुझ्या वडिलांना आज पश्चात्ताप व्हायला सुरुवात झाली आहे. त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी शिक्षा म्हणजे त्यांना स्वतःची चूक उमगणं. आणि तुझ्या आईने तर एकतीस वर्षे समाजाचे टोमणे सहन केले आहेत. तीही तिच्या वाट्याचं दुःख भोगते आहे."
रोहन गप्प बसला.
देशमुखांचा आवाज अधिक गंभीर झाला.
"आता तुझ्यासमोर दोन मार्ग आहेत. पहिला—राग, सूड आणि कटुतेचा. दुसरा—न्याय मिळवूनही मनात क्षमा ठेवण्याचा. न्यायालय तुला कायदेशीर न्याय देऊ शकेल; पण मनःशांतीचा न्याय फक्त तूच स्वत: स्वतःला देऊ शकतोस."
केबिनमध्ये काही क्षण पूर्ण शांतता पसरली.
देशमुख शेवटी म्हणाले,
" क्रियमान कर्म आपल्या हातात असतं, रोहन. भूतकाळ बदलता येत नाही. पण आज तू कोणता निर्णय घेतोस, त्यावर तुझं उरलेलं आयुष्य ठरणार आहे. म्हणूनच मी तुला सांगतो—न्याय माग, सत्यासाठी ठाम उभा राहा; पण मनात द्वेष कायमचा साठवू नकोस. शक्य झालं, तर मोठ्या मनाने आई-वडिलांना क्षमा कर. ती क्षमा त्यांच्यापेक्षा जास्त तुझ्या आत्म्याला शांत करेल."
रोहन बराच वेळ काही बोललाच नाही.
देशमुखांचे बोलणे संपले, पण केबिनमध्ये अजूनही शांतता पसरली होती. घड्याळाच्या काट्याचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. रोहन खाली मान घालून बसला होता. त्याच्या मनात देशमुखांनी सांगितलेला प्रत्येक शब्द घुमत होता—संचित कर्म... प्रारब्ध... क्षमा... मनःशांती...
बराच वेळ कोणीच काही बोलले नाही.
शेवटी रोहनने एक दीर्घ श्वास घेतला.
"सर..."
"हो, रोहन."
"आजपर्यंत मला वाटत होतं की माझ्या आयुष्यात फक्त माझ्यावरच अन्याय झाला. पण आज तुम्ही एक वेगळाच दृष्टिकोन दिलात. जर कर्मसिद्धांताचा विचार केला, तर कदाचित हे दुःख माझ्या प्रारब्धाचाच भाग असेल. आणि जर माझ्या आई-वडिलांनी चुकीची कर्मे केली असतील, तर त्याची फळे त्यांनाही भोगावी लागली आहेत."
देशमुख शांतपणे त्याच्याकडे पाहत होते.
रोहन पुढे म्हणाला,
"माझ्या वडिलांवर माझा अजूनही राग आहे... पण तो राग आयुष्यभर बाळगून मला काय मिळणार आहे? न्याय मिळवणं महत्त्वाचं आहे; पण त्याहीपेक्षा मनाला शांतता मिळणं महत्त्वाचं आहे."
त्याने डोळे पुसले.
"सर... जर माझे आई-वडील त्यांची चूक मनापासून मान्य करत असतील, तर मला ही केस पुढे चालवायची नाही. कोर्टात कायदेशीर तडजोड करून ही केस संपवायला माझी तयारी आहे."
देशमुखांच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं.
"रोहन, आज तू मला फार मोठा झाल्यासारखा वाटतो आहेस."
रोहन हसला.
"मोठा नाही झालो सर... फक्त मन हलकं करायचं आहे."
देशमुख काही क्षण शांत राहिले.
नंतर ते म्हणाले,
"रोहन... मी तुला आज मुद्दाम इथे बोलावलं आहे."
"म्हणजे?"
"काल तुझे वडील माझ्याकडे आले होते."
रोहनच्या भुवया उंचावल्या.
"ते जवळजवळ तासभर माझ्यासमोर बसले होते. त्या संपूर्ण वेळेत त्यांनी स्वतःच्या चुकीशिवाय दुसरा एकही विषय काढला नाही. ते अक्षरशः रडत होते."
रोहनच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं.
देशमुख पुढे म्हणाले,
"मी अनेक वर्षे वकिली करतो आहे. अनेक लोकांना न्यायालयात खोटे रडताना पाहिले आहे. पण काल सुरेशच्या डोळ्यांत मला फक्त पश्चात्ताप दिसला. त्याने मला एकच विनंती केली—'देशमुख साहेब, माझ्या मुलाला माझ्यासमोर एकदा उभं करा. तो मला माफ करेल की नाही, हे त्याच्यावर आहे. पण मला माझी चूक मान्य करायची आहे.'"
रोहनच्या डोळ्यांत पुन्हा पाणी आलं.
"सर... ते खरंच बदलले आहेत?"
"हो."
"माझी आई?"
"ती तर सुरुवातीपासूनच या दिवसाची वाट पाहत होती."
देशमुख हसले.
"आणि म्हणूनच..."
ते उठले.
"तुझे आई-वडील दोघेही बाहेर बसले आहेत."
रोहन दचकला.
"काय?"
"हो. त्यांनीच मला सांगितलं की आधी मी तुझ्याशी एकट्याने बोलावं. आता जर तुझी तयारी असेल, तर मी त्यांना आत बोलावतो."
रोहनने डोळे मिटले.
काही क्षण तो स्वतःशीच झुंज देत राहिला.
नंतर त्याने हळूच मान हलवली.
"बोलवा त्यांना."
देशमुखांनी दरवाजा उघडला.
"या... आत या."
क्षणभरात माया आणि सुरेश केबिनमध्ये आले.
दोघांचीही नजर खाली होती.
आयुष्यभराचा अहंकार, राग आणि गैरसमज त्या दाराबाहेरच राहिले होते.
रोहन उठून उभा राहिला.
त्याला काय बोलावं, हेच सुचत नव्हतं.
क्षणाचाही विलंब न करता सुरेश आणि माया दोघांनीही रोहनसमोर हात जोडले.
माया रडत म्हणाली,
"बाळा... आम्ही दोघंही तुझे अपराधी आहोत."
सुरेशचा आवाज भरून आला.
"रोहन... मी आयुष्यात खूप मोठी चूक केली. एका संशयावर विश्वास ठेवला... पण माझ्या पत्नीवर ठेवला नाही. लोकांचं ऐकलं... पण स्वतःच्या मनाचं ऐकलं नाही."
त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते.
"त्या एका चुकीने माझा संसार उद्ध्वस्त झाला. तुझं बालपण हिरावलं गेलं. मायाचं आयुष्य बरबाद झालं. आणि मी स्वतःही सुखी राहिलो नाही."
त्याने दोन्ही हात जोडले.
"बाळा... मला माफ कर."
रोहनचे डोळे भरून आले.
सुरेश पुढे म्हणाला,
"मी आयुष्यभर स्वतःला बरोबर समजत राहिलो. पण आज मला समजलं की सर्वांत मोठा गुन्हेगार मीच होतो."
तो दोन पावले पुढे आला.
"आज मी तुला माझा मुलगा म्हणून स्वीकारतो. डीएनए चाचणीचा अहवाल काहीही असो, माझ्या मनाने तुला स्वीकारलं आहे. पण मला खात्री आहे की सत्यही माझ्याच विरोधात उभं राहील."
त्याचा आवाज गहिवरला.
"जर शक्य असेल तर... मला माझी चूक सुधारण्याची एक संधी देशील?"
सुरेशने थरथरत्या हातांनी आपले हात पुढे केले.
"ये बाळा... एकदा तुझ्या बाबांना मिठी मार."
रोहन काही क्षण जागेवरच उभा राहिला.
बालपणापासूनची प्रत्येक आठवण त्याच्या डोळ्यांसमोरून सरकत होती.
पहिल्या शाळेचा दिवस...
बाबांची वाट पाहत काढलेले वाढदिवस...
क्रिकेटमधील ट्रॉफी...
रिकामी खुर्ची...
आजीच्या कुशीत लपून रडलेले दिवस...
आणि...
वर्षानुवर्षे मनात साचलेली वडिलांच्या एका मिठीची ओढ.
पुढच्याच क्षणी तो धावत गेला आणि सुरेशला घट्ट मिठी मारली.
सुरेश अक्षरशः कोसळलाच.
त्याने रोहनला इतक्या घट्ट मिठी मारली की जणू एकतीस वर्षांचा विरह त्या मिठीत विरघळून गेला.
माया स्वतःला रोखू शकली नाही.
तीही त्या दोघांना बिलगली.
तीघेही मनसोक्त रडत होते.
त्या अश्रूंमध्ये आरोप नव्हते...
राग नव्हता...
फक्त पश्चात्ताप, क्षमा आणि पुन्हा एकदा कुटुंब म्हणून जगण्याची आस होती.
काही वेळानंतर देशमुख शांतपणे त्यांच्या जवळ आले.
त्यांनी सुरेशच्या खांद्यावर हात ठेवला.
"सुरेशजी... आता पुढचा प्रवास शब्दांनी नाही, तर कृतीने करा. गेली एकतीस वर्षे परत आणता येणार नाहीत; पण पुढचं आयुष्य नक्कीच सुंदर करता येईल."
सुरेशने मान डोलावली.
"देशमुख साहेब... आजपासून रोहनला कधीच वडिलांची उणीव भासू देणार नाही."
माया अश्रू पुसत म्हणाली,
"आज इतक्या वर्षांनी माझं कुटुंब पुन्हा पूर्ण झालं."
देशमुख हसले.
"आज मला माझ्या वकिलीच्या आयुष्यातील सर्वांत मोठा विजय मिळाला आहे. न्यायालयात खटला जिंकणं हा विजय नसतो. तुटलेली माणसं पुन्हा एकत्र आणणं... हा खरा विजय असतो."
केबिनमधील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान होतं.
खिडकीतून येणाऱ्या संध्याकाळच्या सूर्यकिरणांनी त्या चौघांवर प्रकाश टाकला होता.
जणू निसर्गही सांगत होता—
प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर नवी पहाट उगवतच असते. आणि मनापासून मागितलेल्या क्षमेपेक्षा मोठा न्याय या जगात दुसरा कोणताच नाही.
-*-*-*-*-*-
About the Competition
The Poetry and Creative Writing Competition 2026 by Hashtag Kalakar is a prestigious platform celebrating literary excellence. It invites writers from various backgrounds to showcase their creativity and storytelling prowess. This competition offers a unique opportunity for participants to share their voices and connect with a community of literary enthusiasts.
We extend our heartfelt gratitude to Ashok Walvekar for his remarkable contribution, "माझा काय गुन्हा," to the Poetry and Creative Writing Competition 2026. His poignant storytelling offers a deep exploration of complex relationships and human emotions. Thank you, Ashok, for sharing this compelling narrative with us.
About Hashtag Kalakar
Hashtag Kalakar is a creative platform dedicated to providing artists, writers, singers and other creative talents with opportunities to showcase their work and reach wider audiences through competitions, features and creative initiatives.

Comments