प्रणयरंग
By Amey Sachin Joag
हात फिरता शरीरावरूनी तनू-मनी रोमांच दाटे
रातप्रहरी जिवलगा मी प्रणयरंगी रंगून जाते || धृ ||
कळेल का त्या रजनीनाथा प्रणय रंगत केव्हा गेला
पुनवेची ह्या अल्लद, उत्कट शोभा देऊया अवसेला
थरारते ही काया अधीरी, मनासदेखील ना सबूरि
जाता आकंठ बुडूनि प्रेमात रात्रहि भासते अपूरि
मोजके हे क्षण सौख्याचे नसती हो नशिबी देवातें
रातप्रहरी जिवलगा मी प्रणयरंगी रंगून जाते || १ ||
खुशाल टाका भिस्त एकांती फुलणाऱ्या शृंगारावर
वास्तव केवळ मीलनाचे, बाकी भौतिक जग हे नश्वर
धनी अनेक रहस्यांची ईश्वरदत्त ही काया
एक उकलता समोर येई तीहून मनमोहक माया
घडता अभिषेक सुखस्नानाचा आत्म्यासह कांतीहि न्हाते
रातप्रहरी जिवलगा मी प्रणयरंगी रंगून जाते || २ ||
खोली नाही, महाल असे हा; राजाचा नव्हे, राणीचा
कधी मोगरा, गुलाब कधि, कधि चाफा मालक फुलदाणीचा
नसल्या नात्यालाही जागे हि महाराज्ञी सौंदर्याची
तिलांजली देऊ दुःखाला अन् विस्मृती हो कर्तव्याची
निराळी आपुली गरज, आपणां तडजोडिशि घेउन येते
रातप्रहरी जिवलगा मी प्रणयरंगी रंगून जाते || ३ ||
By Amey Sachin Joag

Comments