पराभव जरि आला पुढती
By Amey Sachin Joag
अडखळले जरि पाऊल म्हणूनि धावायचे सोडू नको
पराभव जरि आला पुढती झगडायाचे सोडू नको ।।धृ।।
एक वर्ज्य सूरदेखील क्वचित खुलवूनि जाई राग
खुरटी असली जरि ही झुडुपे पहा फुलवूनि जाती बाग
अवसेच्या त्या मिट्ट रातीच पहा चांदण्या चमचमति
तापताडघर्षणाविना ना कनकालंकार लखलखति
कुट्ट काळ्या खाणीमधूनि हिरा शोधणे सोडू नको
पराभव जरि आला पुढती झगडायाचे सोडू नको ।।१।।
अजूनही तो चंद्रमा येतसे खुलवाया नभा
अजूनही अन् तारका त्या भरवती आपुल्या सभा
अजूनही भूवरी सागराची गाज ही गूंजते
अजूनही ती शामसंध्या रसरसूनि रंगते
निसर्गदेखील सांगत आहे कास आशेची सोडू नको
पराभव जरि आला पुढती झगडायाचे सोडू नको ।।२।।
By Amey Sachin Joag

Comments