नूपूर
By Ameya Bal
मी एकट बसलो आहे
खुर्चीत रेलूनी शांत
बाहेर पागोळ्यांचे
ऐकतो गीत निवांत
सळसळत्या पडद्यातून
अवखळ वारा वाहे
हलकेच विजेची धार
अंधार दूर करू पाहे
कालाने उघडे केले
गतस्मृतींचे साठव
शून्यात गुंतूनी राहते
जुन्या पळांचे आठव
तो तुझा पैंजण नाद
मोहूनी घरात भरतो
अन् त्याच्यामागे वेळ
कापरासारखा सरतो
बोलणे तुझे लाडिक
घायाळ मनास करते
तो लाजरा गुलाबी चेहरा
रोमांच तनूत भरते
तुझा निसटता स्पर्श
मखमली झरा निर्मळ
ती अधरांवरची साय
शृंगार अमृत केवळ
शय्येवरती आपण
तृप्तीत रात्र निजलेली
तृप्तीचा पिऊनी प्याला
ती वेळ भारलेली
हे असे भारलेपण
क्वचितच नशिबी येते
अंधार ओसरल्यावर
तुजसोबत निघूनी जाते
स्वर्गलोकीची अप्सरा
तू शापित मानव झालीस
अन् माझे विश्व अपूर्ण
ठेवून परतून गेलीस
मन्मनात साठवल्या त्या
आपुल्या लाघववेळा
कितीदा दिल्या उधळून
कितीदा केल्या गोळा
तुझे नाव कुणास ठावूक
तू कोण कुणाची लेक
झंकार पैंजणांचा
तुज " नुपूर" म्हणणे एक
मी एकट असलो तरीही
अगदीच एकटा नाही
जखमांची सोबत आणि
वेदनेची होते शाई
By Ameya Bal

Comments