दु:ख कळा
By Ameya Bal
रंगांचा सण रंगासाठी
प्रत्येक रंग इथे आगळा
निळ्याशार डोळ्यांस तुझ्या
कधी न दिसला रंग सावळा
मनात माझ्या स्फुरली होती
शिशिरानंतर वसंत वेला
कामुक तुझ्या अंधपणाने
वसंतरंग पुन्हा न परतला
एकटीच मी व्याकूळ झाले
मनोमीलनी तुलाच स्मरले
तुला मात्र कधी ना कळले
दुःख तुझ्या गात्रातून झरले
शहाणपणाने म्हणती सारे
रंग असे दुःखाचा काळा
त्या वेड्यांना नसे ठाऊक
काळा देखील असे सोवळा
रंगांचा सण रंगासाठी
प्रत्येक रंग इथे नसे सारखा
कधी फिका तर कधी गहिरा
तरी स्पर्शाविण असे पारखा
सावळ्याची इतकी निंदा
मग पांडुरंगा कसे पूजिता
कृष्ण सख्या का तुजला कधी
रंग पाहूनी पुजला होता?
मी तर वेडी, वाकडी कुडी ही
त्यात माझा रंग सावळा
तव स्पर्शाचा गुलाल कान्हा
मुक्त करेल ही दुःख कळा
By Ameya Bal

Comments