दिव्याची ज्योत.
- Hashtag Kalakar
- Dec 15
- 10 min read
By Arham Sushma Sudarshan Bandekar
जर उद्याच्या काळात खरच काही मोठ बनायचं असेल, तर काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात. त्यासोबत अनेक संगतीतून आपले कार्य पूर्ण करावे लागते.
उदाहरण घ्या- दिव्याची ज्योत जशी, प्राणवायूच्या संगतीने ती अस्थित्त्वात येते, म्हणजेच पेटते व उजेड पसरवते. असा हा नैसर्गिक प्रकाश निसर्गातून तयार झाला आहे. एका शक्ती पासून कितीतरी प्रकाराच्या उर्जाशक्ती निर्माण होऊ शकतात- विद्युत ऊर्जा, उष्णता ऊर्जा, इ.
निसर्ग नकळत आपल्या काही न काही शिकवत असतो. कोणालाही विचारले, की दिव्याची ज्योत आपल्याला काय शिकवते; तर एक साहजिक उत्तर मिळेल- ती आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे जायला उद्युक्त करते. उत्तर अगदी बरोबर आहे. पण त्याच्याहून पहिले ती आपल्याला संगतीत राहायला शिकवते. संगतीशिवाय ही ज्योत सुद्धा कोणाला मार्ग दाखवू शकत नाही. याचाच एक खोल अर्थ निघतो, तो म्हणजे- ‘एकता हीच ताकद’.
कुठल्याही गोष्टीला ‘पाठिंबा’ हा लागतोच. दिव्याची ज्योत म्हंटली, तर ज्योतीशिवाय दिवा नाही व वातीशिवाय ज्योत नाही. परंतु या सर्वांना लागतं ते म्हणजे- ‘तेल’. या तेलाच्या पाठिंब्याने व प्राणवायूच्या संगतीने, ज्योत प्रकाश पसरवते. यातच ‘प्रगती’ दिसून येते. माणसाचेही बहुदा असेच काही असावे.
आपण जर म्हणू की आपण पूर्णतः स्वावलंबी आहोत, तर ते चुकीचे आहे. आपण दुसर्यावर कोणत्या न कोणत्या कारणाने अवलंबी असतोच. जेव्हा मूल जन्माला येतं, तेव्हा ते स्वतःच्या पायांवर चालू शकत नाही. त्याचे आई-वडील, नातेवाईक त्याचा हात धरून त्याला चालवतात. जन्माच्या आधी जेव्हा ते त्याच्या आईच्या गर्भात असतं, तेव्हा त्याची आईच त्याला वाढण्यासाठी साथ देत असते. कसं ही झालं, तरी व्यवस्थित रीत्या चालण्यासाठी संपूर्ण दोन्ही पायांचे तळवे जमिनीवर टेकवावेच लागतात.
माणूस जेव्हा शिक्षणाच्या वयात असतो, तेव्हा त्याला खरच शिक्षणाची गरज भासते. त्या साठी ‘पैसे’ लागतात. आपल्या पालकांच्या कष्टांमुळे आपल्याकडे पैसे असतात. पालकांचं शिक्षण तर झालेलं आहे. पूर्ण कुटुंब त्यांच्या कमाईवर अवलंबून आहे. खाण्या-पिण्याच्या सोयी, विविध वस्तूंच्या गरजा या त्यांच्या मेहनतीवर अवलंबून आहेत. फक्त या कष्टांचा वापर, करणार्याने कसा करावा हे ज्याचे त्याने ठरवावे. किती मोठी आहे ही साखळी!
फक्त माणसेच एकमेकांवर अवलंबून नसतात तर निसर्गातील अनेक घटक ही एकमेकांवर अवलंबून असतात.
एकमेकांवर अवलंबून राहणे म्हणजे एकाची गरज पूर्ण होणे. पण त्या गरजेतून एकाचे कल्याण होऊ शकते, एक चांगला सामाजिक बदल घडू शकतो!
‘अन्नसाखळी’ याचे उत्तम उदाहरण. कीटक पालापाचोळा खातात, त्यांचे भक्षण बेडूक/पाली करतात – यांना साप खातात – गरुड/घार सापांचे भोजन करतात – ह्यांच्या मृत्यू नंतर ते पुन्हा निसर्गाच्या मृदामध्ये सामावतात. जर ह्यातील एकही घटक नसेल तर संपूर्ण अन्नसाखळी विस्खळीत होऊ शकते! इथे प्रत्येकाची गरज प्रत्येकाला भासलेली आहे. मानवी अंतर्गत क्रिया या त्यांच्या-त्यांच्यातच अवलंबून असतात. निसर्गाच्या अनेक रसायनिक प्रक्रिया त्या-त्या परिसरात बदल घडवून आणतात. उदा., लोखंडाला गंज चढणे, पाऊसाचा जन्म, इ.
म्हणूनच या पृथ्वीच्या संवर्धनासाठी प्रत्येकजण इतरकोणावर तरी अवलंबून असतोच असतो. आता या आभासात्मक (कृत्रिम) व खर्या (नैसर्गिक) दुनियेत नेमका फरक काय ते बघूया.......
१५ वर्षांचा नितीन रविवार सकाळी मंजन, आंघोळ न करता थेट भ्रमणध्वनीवर खेळ खेळू लागला. भ्रमणध्वनी वर एवढा आकर्षित झालेला की जणू भ्रमणध्वनीने त्याला समाज माध्यम नावाची गुंगी दिली असावी. दारावरची घंटी वाजली तरीही तो काही उठेना. त्याच्या आईने दार उघडून त्यास संगितले की त्याचे मित्र त्याला भेटायला आले आहेत. त्याच्या मित्रांनी त्यांच्या सोबत खेळण्यासाठी त्याला खूप गयावया केली, कारण नितीन सारखा उत्तम खेळाडू त्यांच्या संघात कोणीच नव्हता. पण हा कसला खेळाडू! नितीनने सरळ सांगितले की त्याला आता काही येता येणार नाही कारण तो भ्रमणध्वनीवर खेळ खेळण्यात व्यस्त होता. त्याने त्याच्या मित्रांना त्याचे भ्रमणध्वनीवरील खेळ ही दाखवले, पण त्याचे मित्र दुखी मनाने परतले. हे बघताच आईला त्याच्या विचार परिवरतनाची गरज जाणवली. तिने त्याला भ्रमणध्वनी वरुण काही जेवणाच्या थाळ्या दाखवल्या. त्यात पिझ्झा, बर्गर, पावभाजी, सँडविच, इ. चा समावेश होता. त्याची तीव्र इच्छा होती की त्याच्या आईने त्या थाळ्या त्याच्यासाठी बनवून द्याव्यात, पण त्याच्या आईने त्याला नकार दिला. ती वर म्हणाली, “तू तुझे पोट भ्रमणध्वनी बघूनच भर.” मग कुठे त्याच्या मनाला वाटू लागले की त्याची नेमकी चूक काय होती. आईने त्याला समजावले की भ्रमणध्वनीवर दाखवलेले सर्वच काही बरोबर नसते. त्याच्यासाठी काय योग्य आहे हे त्याने त्याचेच ठरवावे. वाईट संगतीत राहून त्याचे फार काही भले होणार नव्हते. स्वस्थ आहार, शारीरिक व्यायाम केल्याने त्याचे शरीर सुदृढ राहणार होते. नितीन म्हणाला, की तो भ्रमणध्वनी केव्हाच हाती घेणार नाही. आईने त्याला पुन्हा समजावले, की आपल्याला जे मिळते त्याचा आपण पुरेपूर योग्य तो उपयोग केला पाहिजे. कोणत्याही गोष्टीचे व्यसन नसावे. अश्या प्रकारे ही छोटी व सुंदर रीत्या बोधीत केलेली कथा संपत आहे.
या कथेच्या आधारे तरी समजले असेल की दिव्याची ज्योत का तेवत असते. जर त्याला लागणार्या घटकांची सांगड योग्य क्रमात मंडली तरच आपण त्याला दिवा म्हणू शकतो. जर तेलाऐवजी पाणी किंवा दूध ओतले असते व कापसाच्या वातीऐवजी लाकडाची काडी ठेवली असती तर दिव्याची ज्योत काय सहज ‘दीर्घकाळ’ पेटत राहिली असती?
संगती विषयीचं एक वेगळं उदाहरण पहा. जर एक ज्योत पेटवली नं, तर त्याच ज्योतीच्या आधारे अश्या असंख्य ज्योती पेटतील. पहिले तर हे एकता दर्शवतच, पण याच ज्योतीचं औदार्य किती महान आहे हे ही स्पष्ट करतं. त्यामुळे आपल्याला जेव्हा गरज असते तेव्हा ती भागवण्यासाठी योग्य वस्तूला विश्वासात घेऊन त्याकडून मदतीचा हात मागितला तर अतीउत्तम.
भारताला १५ ऑगस्ट १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले. ‘ब्रिटिश यूनियन जॅक’ ला खाली उतरवून भारताचा ‘तिरंगा’ फडकावण्यात आला. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बर्याच थोर वीरांनी, वीरांगनांनी स्वतःच्या प्राणांची आहुती देण्यास ही मागे-पुढे पाहिले नाही. उदा., महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, नेताजी सुभाष चंद्र बोस, सावित्रीबाई फुले, भिकायजी कामा,.........इ. अश्या बर्याच जणांनी लढा दिलेला आहे. मग जर ते थोर होते, कोणत्याही लढ्याची सुरुवात त्यांच्या पासून व्हायची, मग का ते पूर्णपणे स्वावलंबी होते? त्यांना कोणाचीच गरज भासली नाही?
या जगात परमेश्वराने सर्वांना समान बनवलेलं आहे, पण प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत. प्रत्येकाकडे स्वतःचे मन आहे, मग हे मन कसं चालवायचं याची किल्ली देखील माणसाकडेच असते. हे थोर वीर सुद्धा मनुष्यच होते. त्यांना ही मन होतं. मग ते मन कसं चालवायचं ही कला त्यांच्याकडे अचानक आली का? मन चालवणं ही एक ‘कला’ आहे. हा कोणताही चमत्कार नाही. गाडी व्यवस्थित चालण्यासाठी तिला पेट्रोल व ठराविक कालांतरानंतर दुरुस्तीची गरज असते. जर या गोष्टी भक्कम असतील तर गाडी सुद्धा आपोआप भक्कम व ठीकठाक असणारच.
जर कोणतही काम खरच मनापासून कारायचं असेल ना तर त्याचा पाया आधी मजबूत असावा लागतो. मग त्यासाठी लागणारी साधने म्हणजे- धैर्य, जिद्द, आत्मविश्वास व स्वावलंबन तर असायलाच हवी. ह्याच साधनांचा उपयोग केला ह्या थोरांनी. मानसिक धैर्य व शारीरिक शक्तीमध्ये शर्यत लावली तर ठरल्याप्रमाणे मानसिक धैर्याचाच विजय होणार.
विज्ञानानुसार जी ज्योत असते, त्यातला बाहेरचा भाग प्रचंड गरम असतो, मधला भाग जरासा गरम असतो व आतला भाग थंड असतो. तशीच मनाचीही या ज्योतीप्रमाणे तुलना केली, तर सर्वात बाहेरचा भाग म्हणजे मन, मधला भाग हे धैर्य, व आतला भाग म्हणजे शांतता व सकारात्मकता. हाच आतला भाग या मनाचा पाया बनून जातो. मनाला मजबूत राखणार्या साधनांना गंज लागू नये, म्हणून या गोष्टींची आवश्यकता आहे. मन सतत विविध विचारात गुंतवून ठेवले तर नकारत्मकतेची पातळी वाढते. अगदी एखाद्या तळ्यासारखं, जेव्हा सतत तळ्यात पाणी भरत राहिले तर तळं तुडुंब होऊन आतले पाणी बाहेर ओसंडून वाहू लागेल. दिव्यात ही तेल सतत भरत राहिलं तर ज्योतीलाही पेटायला तिची स्वतंत्र जागा तिला मिळणार नाही. निसर्गाचाच हा नियम आहे- ‘अति तिथे माती’.
शांतता बाळगणं हे ही एक कौशल्य आहे. माणूस खूप काही गोष्टींचा विचार क्षणात करू शकतो. पण ते विचार सकारात्मक असायला हवे. ह्याच्याने परिणाम ही सकारात्मक होतो. 'त्या' प्रसंगी नेमके काय करायचे याचा विचार निवांत रीतीने केला तरच योग्य मार्ग सापडू शकतो. एक लेखक किंवा कवी तेव्हाच उत्तीर्ण होतो जेव्हा त्याच्या मनाचा पाया भक्कम असतो. तो पाया म्हणजेच शांतता. त्यांचं निरीक्षण एवढं तीक्ष्ण असतं, की एका घटनेवरून किंबहुना वस्तूच्या गुणांवरून असे कित्येक समांतर उदाहरणे मांडतात. कवींची तर मज्जाच वेगळी आहे. त्यांच्यासाठी यमक जुळणारे शब्द फार महत्त्वाचे असतात. कवी म्हटला, तर पहिली अपेक्षा त्याच्याकडून असते की त्याच्याकडे भव्य-दिव्य असा शब्द भंडार असावा. तो अनुभवानुसार वाढत जातो. पण तरीही कितीही मोठा कवी असला तरी त्यास विविध स्रोतांकडून योग्य शब्दांची पडताळणी करावी लागते. मग प्रश्न येतो कवितेच्या सूरावार व रचनेवर. अगदीच सोपं काम नसतं ते. पण पहायला गेलं तर अवघड तर नसतच नसतं. या जगात अवघड असं काहीच नाही. फक्त मनाची तयारी लागते. आणि या मनाची तयारी त्याच्या मूळापासून होते. त्यामुळे कुठल्याही कार्यात/क्षेत्रात शांततेचं वातावरण असणं गरजेचं आहे. शांततेत केलेल्या कामांमध्ये सर्जनशीलतेचा प्रभाव दिसून येतो. कोणत्याही कामाचा गोडवा तेव्हाच लागतो जेव्हा ते मनापासून केलेलं असतं. मनात इतर विचार अथवा क्रोधाच्या भावना मनाच्या तळाला कमकुवत बनवतात आणि याचा उत्स्फूर्त निकाल म्हणजे कामांत लक्ष नं लागणे! त्यामुळे कुठल्याही लेखकाचे/कवीचे मूळ कौशल्य ‘भाषेत परिपूर्ण’ नसून ‘शांत राहणे’ होय. कारण शांततेशिवाय विचारांची किंमत शून्य आहे. जेवढं आपण शांततेला पोखरणार, तेवढच मनाचं आयुष्य कमी होणार आणि अंतिमतः मनुष्याचे आयुष्य कमी होणार.
परिस्थितीला लढा द्यायचा असेल तर परिस्थितीला जिंकून घेण्याचं धैर्य असावे लागते. 'धैर्य' हे कायम आपल्या सोबत असतं पण 'लक्ष्य' वेगळं आहे. प्रसंगाला लढा देताना अनेक वळणं येत असतात पण शेवटी एकच गोष्ट प्राप्त कराची असते. छत्रपती शिवाजी महाराजांचे मूळ लक्ष्य- 'हिंदवी स्वराज्याची निर्मिती' त्यासाठी त्यांना अनेक शत्रूंचा सामना करावा लागला. हे त्यांचे 'धैर्य'.
प्रत्येकाची स्वतःची स्वतंत्र कामे असतात, ते त्यांचे लक्ष्य असते. पण धैर्य एकच- "मी हे करणारच; मला हे येणारच". काम शांततेत केलं, की ते दुप्पट वेगाने होतं अधिक सर्जनशीलतेच्या वाटा आपसूक दिसतात. त्यागोष्टीचा आपल्याला 'आत्मानंद' मिळतो. तो आत्मानंद आपल्या सकारात्मकतेचं कारण ठरतो.
समजा.... तुमचे एक गंतव्य असावे. तिथे पोहचायला तुमच्याकडे उपलब्ध असे अनेक रस्ते आहेत. कुठला रस्ता निवडायचा हे आपण ठरवतो. काही रस्ते थोड्याच अंतरावर संपत असतील वा काहींमध्ये खडक, काटे व इतर अडचणी देखील असतील. मग अश्यावेळी आपण मार्गावर लक्ष केंद्रीत करावे की मार्गावरील अडचणींवर? नुसत्या अडचणी पाहत चाललो, तर नेमकी योग्य वाट कोणती याचे भान तरी उरेल का? जंगल सफारीमध्ये असे बर्याचदा होते. घनदाट जंगलात वाट शोधणं खरच तारेवरची कसरत असावी. अनोळखी वाटेमध्ये काय-काय संकटे येतील याची सारखी भीती मनामध्ये आत्मसात होत असते. पण जर आपल्याला खरच बाहेर पडायचे असेल ना, तर खरच या गोष्टींचा हेवा वाटावा. सतत गोंधळामुळे, नको त्या विचारांनी, आतल्या आत घाबरल्याने प्राणवायूची पातळी कमी होते व आपल्यालाच त्याचा विपरीत त्रास होऊ लागतो. ते नकारात्मकतेचे चिन्ह असते. नुसतं नकारात्मक बोलून माणूस नकारात्मक होत नसतो. 'जिद्द' ही कायम ऊर्जावान असली पाहिजे. आयुष्यात फक्त शाळेच्याच परीक्षा नसतात. आपले प्रत्येक गंतव्य गाठायला कोणती न कोणती परीक्षा ही द्यावीच लागते.
माणूस हा कधीच वाईट नसतो. वाईट असतात त्याचे 'नकारात्मक गुण'; ज्यांमुळे त्याचे कधीच भले होत नाही. सत्याला जिंकवणारी ही सकारात्मक ऊर्जा आपोआपच नकारात्मकतेचा र्ह्यास करते. दिवस हे सकारतमकतेचं प्रतीक असून अंधार हे नकारात्मकतेचं प्रतीक आहे. दिव्याच्या ज्योतीची आठवण झाली. गर्द अंधारात ही दिव्याची ज्योत फार छोटी आहे. पण हळू-हळू पहा. हिचा प्रचंड बारीक असलेला प्रकाशही या दाट अंधारात मार्ग दाखवण्याइतपत पसरतो. प्रकाश हळू-हळू पसरणे म्हणजेच ज्योत सुद्धा तिच्यातील सकारात्मक ऊर्जा वाढवते आहे. हिचं कामच तर अंधारात मार्ग दाखवण्याच आहे. याच खोल अंधारात गरजवंताला 'बुडत्या काडीचा आधार' बनते. जगातील प्रमुख शक्त्या म्हणजे सकारात्मकता व नकारात्मकता. आपला 'सखा' म्हणजे सकारात्मकता व 'नको' ती नकारात्मकता. आपण जे काही आत्मसात करतो, त्याने आपला आत्मविश्वास वाढतो व तयार होत असतो. शेवटी गाडीत पेट्रोल भरलं तरच गाडी चालणार पाणी भरून नव्हे!
लक्ष्यात येणारे मार्ग आपली खूप कसोटी घेतात. थोडक्यात, ते आपल्या मनाला मोह देत असतात. आपलं मन म्हणजेच आपलं 'अध्यात्म'. हे अध्यात्म म्हणजे माणसाचा अगदी जवळचा मित्रं. जे काही आपण वागतो, बोलतो; या सर्वाचे स्पष्टीकरण हे आपले मन करत असतं. आपल्या जवळचा कोणता ही मनुष्य असुदे, आपण त्यांना खोटं सहज बोलू शकतो. पण मनाशी नाही नं? जेव्हा विविध नाती जोडली जातात, तेव्हा खर्या अर्थाने विविध मन जोडली जातात. कारण सोपं....... माणूस कधीच बोलत नाही, बोलतं ते त्याचं मन. आपली प्रत्येक पाळी, चाल आपल्या मनाला सर्वात आधी ठाऊक असते. जगात असा कोण आहे जो मरणाला घाबरत नाही? याचाच अर्थ काय तर तो त्याच्या सगळ्यात जवळच्या जिवलगाला म्हणजेच या अध्यात्माला वाचवू इच्छितो. हेच अध्यात्म मनुष्याला त्याच्या लक्ष्यापर्यंत पोहचवतं. त्याच्या प्रत्येक लक्ष्याला सकारात्मकतेचं बळ देतं. किती अनमोल मिळतं-जुळतं नातं आहे 'अध्यात्म' व 'लक्ष्य' यांमध्ये!
‘स्वप्नं’ ही संकल्पना या दोघांमधील नातं अधिक स्पष्ट करून सांगतं. सामाजिक प्राणी असल्याने आपल्याकडे सर्वात शक्तिमान अशी अपार, अखंड विचार धारणा आहे. वेळेच्या प्रत्येक ठोक्याला आपण काही न काही विचार करत असतो. आपला मेंदू कधी ही थकत नाही. परंतु स्वप्नं म्हणजे एखाद्या विचारात लीन होणे. आपण त्या विचारात एवढे गूढ होतो की आपण इतर कोणताच विचार करत नाही. एकाच विचारात लीन होण्यामागचं कारण म्हणजे आजूबाजूला असलेली खोल शांतता. विशेषतः रात्री जेव्हा आपण डोळे बंद करतो, तेव्हा डोळ्याची पापणी पडद्याचं काम करते आणि आपण जे विचार करतो ते चित्रपटासारखं आपल्याला ते चित्रं स्वरूपात दिसतं. पण हास्यास्पद गोष्ट ही, की आपण जे रात्री स्वप्नं बघतो त्या मध्ये आपण कोणत्याही गोष्टीचा विचार करतो; मग ती भयानक, बालीश किंवा आनंदी असू दे. पण सोबतच असं म्हटलं जातं, की दिवसा बघितलेलं स्वप्नं खर्या मध्ये होतं. आधी सांगितल्या प्रमाणे अंधार नकारात्मकतेचं व दिवस सकारात्मकतेचं प्रतीक आहेत. सूर्यनारायानाच्या उदयाने सर्वत्र प्रकाश पसरतोच पण तोच प्रकाश सकारात्मक ऊर्जेचं कारण ठरतो. सकाळीच आपल्याला आपली कामे करण्याची नवी उमेद मिळते. अश्यातच, या ऊर्जेच्या मदतीने आपण खूप काही विचार करतो. आपली जी कामे आहेत त्यांना यशस्वी करण्याकरिता आपण काय-काय करू शकतो याचा आपण जास्त विचार करतो. आपला हा सदैव निश्चय असतो की आपलं कार्य ज्यासाठी आपण कष्ट घेतो, ते सार्थकी आलं पाहिजे आणि याच गोष्टीचा नुसता विचार न करता आपण ते प्रत्येक्षात डोळ्यासमोर पाहत असतो. ते सुद्धा एक स्वप्नं असतं. त्या स्वप्नासाठी, त्यास वास्तविक करण्यासाठी आपण काही न काही मेहनत घेत असतो आणि एक दिवस ते खरं होतं! त्यामुळे दिवसा बघितलेलं स्वप्नं खरं ठरतं. यामध्ये तुम्ही सहज सूचित करू शकतात की ‘लक्ष्य’ व ‘अध्यात्म’ कसे एकमेकांना पूरक आहेत. सकारात्मकतेच्या तळावर अध्यात्म लक्ष्यापर्यंत पोहचतं.
सृष्टी प्रत्येकाच्या भल्यासाठीच तयार झाली आहे. या सृष्टीत सकारात्मकतेच वातावरण सामावलं गेलं आहे. पण काही चुकीच्या विचारांनी, संगतींनी, नियमांनी याचे संचालन बिघडवून ठेवले आहे. जशी रेल्वे गाडी रुळांवरुन घसरते ना, तसेच. मग असं काही झालच, तर याचे पुनरुज्जीवन कोण करणार? तर तो माणूस स्वतः. अध्यात्माने लक्ष्याला सकारात्मक वातावरणात वावरायला बळ दिले पाहिजे. एखाद्या दिव्याच्या ज्योतीचे निरीक्षण करा. हवे नुसार ती जळताना तिच्या दिशा बदलते. आता जरा तिच्या निमुळत्या भागाच्या 'बिंदु' कडे केंद्रीत व्हा. त्याचे निरीक्षण करा. फक्त एक करा, सातत्त्याने त्या बिंदुकडेच नजर असली पाहिजे. जर तुम्ही थोड्यावेळासाठी जराही नजर दुसरीकडे न वळवता हे काम पूर्ण केलात; तर तुम्ही इतरांना हे नाही दाखवत, की तुम्ही माणूस म्हणून खूप मोठं काम केलात व अजून खूप काही करू शकतात. खर्यामध्ये हे तुमचे अध्यात्म किती 'चिवट' आहे याचे प्रदर्शन करतात. कोणत्याही कामात लीन होणं म्हणजेच अध्यात्माशी संपर्क साधणं होय! जगातील कोणतीही शक्ती आपल्या कामांच्या आड येऊ शकत नाही जर आपले अध्यात्म व लक्ष्य एकमेकांचा हात घट्ट धरून असतील!
देवाचा वास कुठे आहे? देव सगळीकडे आहे....... सगळीकडे काय आहे? सगळीकडे निसर्ग आहे. म्हणजेच देवाचा वास या निसर्गात आहे. जो आपल्या सर्व सुखसोईंसाठी निःस्वार्थपणे मदत करतो तो देव. निसर्ग ही देवच तर झाला. एक अशी समज आहे की आपण देवाद्वारे निर्मित आहोत. आपल्या शरीराचा आकार, आपली राहणीमान अश्या सर्व गोष्टींची योजना त्यानेच केली आहे. निसर्गाचं सुद्धा एक रहस्य आहे. निसर्ग ही अश्या जीवांना निर्माण करतो जे त्यामध्ये वावरण्यास योग्य पात्र ठरतील. निसर्गात पुष्कळ पशुपक्ष्यांच्या प्रजाती आहेत. सर्व प्रजाती एकाच राज्यात किंवा देशात अथवा खंडात सापडतात का? मत्स्य जलसृष्टीमध्ये, पक्षी आकाशात आणि इतर प्राणी व सामाजिक प्राणी हे जमिनीवर. निसर्गानेच यांच्या राहणीमानीमध्ये व निवासस्थानांमध्ये बदल घडवले आहेत, कारण प्रत्येकाचे रूपांतर त्यानुसार आहे. प्रत्येकाकडे काहीतरी विशेष आहे ज्यामुळे तो जीव त्या विशिष्ट परिसरात जगू शकतो. माणसांच्या सुद्धा अनेक प्रजाती आहेत त्यांच्या दिसण्यावरून, बोलण्यावरून, वागण्यावरून, इ. मग फक्त परिसरासाठीच नाही तर वातावरणातील होणार्या बदलांचा सुद्धा यांना सामना करावा लागतो. त्यांचे रूपांतर हे तिथल्या हवामानानुसार पण अवलंबून आहे. म्हणजेच यात हवामानाचा देखील महत्त्वपूर्ण भाग असतो. मनुष्याचं म्हटलं, तर नुसतं जमिनीवरचं निवासस्थान त्यांच्या जगण्यासाठी उपयोगाचे नाही तर हवामानाचा सुद्धा बरोबरीने प्रभाव असतो. काही माणसं जण अती उष्म, दमट वातावरणात राहतात, काही थंड प्रदेशात राहतात. दक्षिण ध्रुव बर्फप्रदेशात ध्रुवीय अस्वल, उष्म आणि दमट वातावरणात हत्ती, कर्दमभूमीत एकशिंगी गेंडा आणि रुक्ष वातावरणात सिंह, इ. यामध्ये सुद्धा खास बाब ही, की बिबट्या जरी दिसायला एक असला तरी त्याच्या प्रजाती आहेत जसे: गवताळ प्रदेशात पिवळ्या रंगाचा व बर्फ प्रदेशात पांढर्या मऊ केसांचा. वाघांचे देखील असेच असते. उदाहरणांसाठी एवढच, पण पशुपक्ष्यांच्या प्रजातींची यादी लांबलचक आहे. पण निसर्गसुद्धा तयार होत आहे कोणत्या न कोणत्या प्रक्रियेमुळे. म्हणजे निसर्गालासुद्धा गरज लागत आहे. देवाला कोणाची गरज? मग निसर्गापेक्षा विशाल असे अंतराळ. त्यात असतात सौरमंडळ, तारकामंडळ, नक्षत्रे, इ. पण ह्यांनासुद्धा कोणीतरी झेलत असावं. ती म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्ती. पृथ्वीवरचे मोठमोठे राजे-महाराजे, श्रीमंत गडी या शक्तीसमोर कितीसे आहेत? अहो ही साखळी लांबलचक नाही आहे. गुरुत्वाकर्षणापेक्षा श्रेष्ठ म्हणजे 'नियम'. नियम हा सर्वांचा राजा आहे. हे अवघं अंतराळ या नियमामुळेच तर चालू आहे. नियमानेच माणसाच्या अध्यात्माला नियंत्रण लावलं आहे. सर्वात श्रेष्ठ जे आहे ते देव नाही, देवाचा वास कणाकणात आहे. माणसाचा 'देव' म्हणजे त्याचं 'अध्यात्म'. आपली प्रगती या अध्यात्मामुळेच आहे. प्रगती, यश हे 'लक्ष्य' सकारात्मक ऊर्जेच्या आवारात येतात. लक्ष्याकडचा रस्ता हा नेहमी अंधाराचा असतो. आपलं अध्यात्म उजळल्याने आपल्याला लक्ष्यापर्यंतच्या वाटा सहज दिसू लागतात. ज्या वातावरणात आपलं अध्यात्म उजळत आहे, त्यानुसार आपल्या लक्ष्याचे मार्ग 'सिद्ध' होत असतात. दिव्यालाही 'योग्य' वातावरणात उजळू दिलं, तर तो दीर्घकाळ जळू शकतो. अध्यात्माला लक्ष्य, देह सोडावा लागतो कारण अध्यात्माने लक्ष्यावर, देहावर 'योग्य' नियंत्रण आणलेलं नसतं. माणूस जर लक्ष्य प्राप्तीत परीपूर्ण असेल, तर त्याच्या अनुपस्थितीत इतर जण त्याच्या अध्यात्माचे स्मरण करतात. हे अध्यात्म तुमचं-आमचं नसून प्रत्येकाचं आहे. एका दिव्याच्या ज्योतीने खूप काही शिकवलं. तर मग या सर्वजण, देवाप्रमाणे मिळून उजळवू व प्रफुल्लित करू ही संपूर्ण सृष्टी, आपल्या अध्यात्माने या समकरात्मकतेच्या बळावर!
By Arham Sushma Sudarshan Bandekar

Well explained!
Best