खरा विजय
- Hashtag Kalakar
- 5 days ago
- 1 min read
By Monika Shobha Shahaji Salke
पौर्णिमेला पूर्णत्व देणारा चंद्र, अमावस्येला मनुष्याचा सुक्ष्म नयनासमोरून काही काळासाठी हरवतो पण तोच चंद्र पुन्हा पौर्णिमेला परमेश्वराचा विशाल नयनात उजाळतो आणि चांदण्यांनाही लाजवतो.लंगडया हरणाची शिकार करुन वाघ रुबाबत जंगलात वावरतो पण त्या हरणाचा संघर्ष वाघाच्या विजयावरही विजय मिळवतो. अशाच प्रकारे दुर्बलावर विजय मिळवलेले भलेही विजयाचा धुंदीत असतील पण समोरच्याचा अंतिम श्वासापर्यंतचा लढा, डोक्यावर चढ़लेल्या या धुंदीस पायदळी आणण्यास पुरेसा आहे.दररोज फूलणारे गुलाब, मोगरा, बारा वर्षातून एकदाचफुलणाऱ्या नीलकरिंजीला कसे हिणवू शकतात ? नीलकरिंजीचा संयम अंतिमता विजय मिळवतोच.
बांबू या वनस्पतीला अंकुरित होण्यासाठी सुरवातीला काही काळ लागतो पण एकदा का बांबू स्थापित झाला की तो खुप वेगाने आपली ऊंची गाठतो.शेवटी आकाशाला भिडण्याची त्याची ओढ विजय मिळवतेच. जमीनीखालील वाढ कुणाला दिसली नाही, याचा अर्थ तुम्ही हरलात असा मुळीच होत नाही.जगात आद्याप असे कितीतरी हीरे असतील ज्याचा थांगपत्ता अजुन जगास नाही, किंवा ज्याची दखल घेतली गेली नाही. म्हणून का काचेची तुलना अस्सल हिऱ्याशी करायची असती ? ज्या दिवशी हिऱ्याची दखल घेतली जाईल त्यादिवशी अशा असंख्य काचांना हिऱ्याला सलामी द्यावी लागेल. समाजात आजही असे अनेक हीरे आहेत जे जगाच्या या खोट्या चकचकातीपासून दूर आहेत.ज्यांची दखल घेतली गेलेली नाही पण तरीही सत्य, धर्म, न्याय यावर ठाम उभे राहून,आजही सातत्याने ते आपले कर्म करत आहेत.
विजयाची निरनिराळे रुप आहेत. खरा विजय पाहण्यासाठी डोळ्यावरील धुळ बाजूला सारावी लागेल.मनाची कवाडे खोलावी लागतील.विभिन्न पैलूंचा विचार करावा लागेल.तेव्हा कुठेतरी खऱ्या विजयाला पाहण्याच सामर्थ्य लाभेल.दोष आहे फक्त या दृष्टिवरच्या पडद्याचाज्यामुळे दिसत नाही खरा विजय या सृष्टिचा…
By Monika Shobha Shahaji Salke

Comments