काही सोप्या व्याख्या
- Hashtag Kalakar
- May 8, 2023
- 1 min read
By Omkar Mohile
प्रश्न म्हणजे काय? तर उत्तराची अपेक्षा...|
चूक म्हणजे काय? थोडं वेगळं योग्यापेक्षा...||
दिवस म्हणजे काय? रात्रीशी निजणारं वादळ...|
रात्र म्हणजे काय? स्वप्नांचं शकूनाचं काजळ...||
रंग म्हणजे काय? किर्रर्रर.. काळोखाचा अभाव...|
कागद म्हणजे काय? आपला खराखुरा स्वभाव...||
आज म्हणजे काय? थोडं कालचं थोडं उद्याचं...|
उद्या म्हणजे काय? बरंचसं कल्पनेतल्या प्रपंचाचं...||
आशा म्हणजे काय? मनास स्वत:हून घातलेली भूल...|
भास म्हणजे काय? साफ वाटणाऱ्या मनावरची धूळ...||
संसार म्हणजे काय? दोघांच्या जगण्याचं एक नाव...|
दु:ख म्हणजे काय? सुखाच्या शिल्पावरले घाव...||
मन म्हणजे काय? आपल्या जगण्यातलं सुगंधी अत्तर...|
विचार म्हणजे काय? मनातल्या प्रश्नांचं निम्मच उत्तर...||
By Omkar Mohile

Comments