काही तुझे माझे काही
By Ameya Bal
काही तुझे माझे काही
रंग घेवून केली शाई,
संसाराच्या कोऱ्या वहीवर बहरली सुगंधी जाई
तांबड्या पिवळ्या रंगांनी सुखाचे रकाने भरले
लाल गुलाबी छटांनी
प्रीतीचे फूल सजले
काळया कभिन्न रेघोट्यांनी
भरले दु:खाचे समास
हिरव्या अन नारंगी रंगाची
त्याच्यापुढे आरास
काही अधिक उणे काही
हिशेबाची नाही घाई
काही तुझे माझे काही
रंग घेवून केली शाई,
संसाराच्या कोऱ्या वहीवर बहरली सुगंधी जाई
मोरपंखी रंगांनी
आपले धुंद क्षण चितारले
खोल अथांग निलाईचे
दीर्घ मुक्तछंद झाले
गडद रंगाची सुगंधी जखम
दुमडून ठेवली पानात
पारवा तिची सल
कुजबूजतो मनात
काही नवे जुने काही
संदर्भांची कमी नाही
काही तुझे माझे काही
रंग घेऊन केली शाई
संसाराच्या कोऱ्या वहीवर
पसरली सुगंधी शाई
एक एक पान चाळताना
मन मधेच थबकते
जाळी पडलेल्या पिंपळपानात
मन जरा रेंगाळते
कोऱ्या वहीचं आता
झालंय जाडजूड बाड
सोनपिवळ्या उन्हात
जीवन होतं नजरेआड
काही रिकामी भरली काही
रंगांची शाई संपत नाही
मी आणि तू अन माझे तुझे
फरक काही राहिलाच नाही
तूच दिलेले तुझेच काही
रंग घेवून भरली वही
तुझ्याच रूपाने संसारवेलीवर
उमलून बहरली जाई
By Ameya Bal

Comments