कस्तुरीची वाट
By Amey Sachin Joag
चालू धडपड । किती पूर्वेपास ।
शोधाया प्रकाश । सायंकाळी ।।
शून्यात आकडे । देव दगडात ।
सावली तमात । शोधलीया ।।
जीवन झाले हे । ग राखेपरीस ।
भस्म परि तींस । म्हणले मी ।।
आत्म्याचा हा दाह । देह आता साही ।
स्थिर उभा पाही । कान्हा माझा ।।
धावुनि धावुनि । जीव अर्धा झाला ।
सत्य मग मला । उमगले ।।
ओळख माझी ग । असे मजपाशी ।
बाह्य जगताशी । नाही नाही ।।
आला एक क्षण । देहाचिया दारी ।
उलघाल सारी । निवलीया ।।
तरल विचार । चिंब होय काया ।
तेवू लागे तेव्हां । समाधान ।।
खुळावला होता । जीव वासाने हा ।
कस्तुरी माझिया । उदरात ।।
कस्तुरीची वाट । आत्म्यात पहावी ।
हुडकूनि काढावी । आपापली ।।
By Amey Sachin Joag

Comments