आपलं घर
By Ketan Phadke
कोणाचं असतं छोटं घर तर कोणाचा बंगला आलिशान आपल्या घराला असतं मनात एक वेगळंच स्थान आपल्या घरात राहण्याचं सुख काही खासच असतं शेवटी आपलं घर ते आपलंच असतं ॥१॥ आपलं घर सुंदर बनवण्यावरच असतो प्रत्येकाचा भर चार चौघात उठून दिसावं असंच हवं आपलं घर प्रत्येक जण आपल्या घरासाठी धडपडतचं असतं शेवटी आपलं घर ते आपलंच असतं ॥२॥
कितीही सजल्या तरी चार भिंती म्हणजे काही घर होत नाही घरात राहणाऱ्या माणसांशिवाय घराला घरपण काही येत नाही मातीच्या कच्च्या घरालाही आपणच गोकुळ बनवायचं असतं शेवटी आपलं घर ते आपलंच असतं ॥३॥ स्वतःचं एक तरी घर असावं ही असते प्रत्येकाची आस स्वतःचं घर बनण्याचा क्षण असतो अगदीच खास वास्तुदेवतेच्या पूजेचं ते फळच असतं शेवटी आपलं घर ते आपलंच असतं ॥४॥
By Ketan Phadke

Comments