अश्वत्थामा - एक चिरंजीव, योद्धा, ब्राह्मण की भटकता पापात्मा - By Abhay Pujari
Written By: Abhay Pujari
Category: Short Story
Competition: Poetry and Creative Writing Competition 2026
In the evocative short story "अश्वत्थामा - एक चिरंजीव, योद्धा, ब्राह्मण की भटकता पापात्मा," Abhay Pujari delves into the complex character of Ashwatthama, a figure from the Mahabharata. This submission is part of the Poetry and Creative Writing Competition 2026, showcasing a nuanced exploration of themes like destiny, morality, and the burdens of immortality. Through vivid storytelling, Pujari invites readers to reflect on the eternal wanderings of a warrior bound by a divine curse.
About the Work
Abhay Pujari's narrative intricately weaves together the mythological and moral dimensions of Ashwatthama's life. The story captures the tension between his warrior prowess and the curse that binds him, offering a poignant exploration of his restless spirit. Through detailed descriptions and introspective insights, Pujari crafts a tale that is both a homage to and a critique of traditional values, ultimately questioning the price of immortality.
अश्वत्थामा - एक चिरंजीव, योद्धा, ब्राह्मण की भटकता पापात्मा
Original Submission by Abhay Pujari
अश्वत्थामा - एक चिरंजीव, योद्धा, ब्राह्मण की भटकता पापात्मा
अश्वत्थामा बर्लिव्यासो, हनुमांश्च बिभिषणः|
कृपः परशुरामश्च, सप्तैते चिरजीवीनः ||
अर्थ - अश्वत्थामा, बली, व्यास, हनुमान, बिभिषण, कृप आणि परशुराम हे सात चिरंजीव आहेत.
लहानपणापासून हा श्लोक अनेकदा अध्ययनात आला आणि अनेक वेळा त्याची उजळणी पण झाली. सहाजिकच जे सात चिरंजीव सांगितले आहेत त्यात अश्वत्थाम्याचं नाव यावं हे भुवया उंचावणारं आहे! कारण अश्वत्थामाला चिरंजीव होण्याचं वरदान नव्हे तर शाप दिला गेलाय आणि तो सुद्धा दस्तूरखुद्द श्री भगवान श्रीकृष्णा कडून!! हा शाप इतका भयंकर आणि न शमणारा आहे की अश्वत्थामा मरणप्राय यातना सहन करतोय!! अनेकांना तो भेटला, दिसला, दृष्टिंगत झाला वगैरे वगैरे ऐकिवात आहे. अनेकांनी त्याची नोंद सुद्धा केली आहे. ह्याचे संदर्भ शेवटी देईलच.
अश्वत्थामा हा काही स्वस्थ बसु देईना. ज्याच्या विषयी कधी लिहावं का नाही हा सवालच नव्हता त्याच्या विषयी आज लिहितोय!! तर अस्वस्थतेतून अश्वत्थाम्या विषयी माहिती गोळा करणं सुरु झालं. माहिती गोळा करता करता असं लक्षात आलं की कोण किती उत्तम आहे, उच्च विद्याविभूषित आहे, शास्त्र निपुण आहे, अस्त्र शस्त्र पारंगत आहे, वेदवेत्ता आहे, दैवी अंश आहे ह्यावरुन त्या व्यक्तिचं आचरण पोषित होत नाही तर धर्म पालन करण्यात त्या व्यक्तिचा किती सहभाग आहे ह्यावरुन त्याचं आचरण ठरतं आणि इतिहास मुल्यमापन पण त्यावरच होतं.
अश्वत्थामा हा द्रोणाचार्य आणि कृपी ह्यांचा पुत्र तसेच कृपाचार्य ह्यांचा भाचा होता. शिवशंकराच्या कृपाप्रसादाने द्रोणाचार्य आणि कृपी ह्यांचा पोटी एका दैवी बालकाचा जन्म झाला. ह्या बालकाच्या मस्तकावर जन्मतःच निळ्या रंगाचा अत्यंत सुंदर मणी होता आणि प्रथम रुदन करताना घोड्याच्या खिंकाळण्या सारखा आवाज त्याच्या कंठातून आला म्हणून त्याचे नाव "अश्वत्थामा" असे ठेवले. शिवपुराणात हा एक रुद्रावतार आहे असं नमूद केलंय. बालपणापासून अश्वत्थामा हा बलवान, वीर आणि शिघ्रकोपी स्वभावाचा होता. द्रोणाचार्यांचा तो जीव की प्राण होता. ज्या द्रोणाचार्यांनी कर्णाला धनुर्विद्या प्रशिक्षण केवळ "क्षत्रिय राजपुत्र नसणे" ह्या कारणावरून नाकारले त्याच द्रोणाचार्यांनी आपल्या पुत्रावर मेहेरनजर केली. असा भेदभाव त्यांनी इतर शिष्य आणि आपला पुत्र ह्यांत सुद्धा केला. द्रोणाचार्यांनी सर्व शिष्यांना पाणी भरायला एक पात्र दिले होते. जो हे पात्र लवकर भरुन आणेल त्याला अधिक शस्त्र ज्ञान आणि गुप्त विद्या ज्ञान देण्याचं त्यांनी घोषित केलं. अश्वत्थाम्याचं भांडं सर्वात प्रथम भरुन जाई कारण इतरांच्या तुलनेत त्याचं भांडं हे कमी मापाचं होतं. त्यामुळे त्याला अधिक विद्या आणि शस्त्र ज्ञान मिळू लागलं. अर्जुनाच्या ही बाब लक्षात आली. मग त्याने वरुणास्त्राचा प्रयोग सुरू केला आणि अश्वत्थाम्या सोबत तो पण हे अधिक ज्ञान ग्रहण करु लागला.
अश्वत्थामा अतिशय उतावीळ आणि शिघ्रकोपी असण्याचा परिणाम म्हणुन अर्जुन अधिकाधिक पारंगत होत गेला. त्यानं नारायणास्त्र आत्मसात केलं. हे सगळं अश्वत्थामा बघत होता. त्याने हे अस्त्र शिकण्याचा तगादा द्रोणाचार्यांकडे लावला. आपल्या पुत्राचा हट्टी, रागीट आणि कोपी स्वभाव द्रोणाचार्यांच्या परिचयाचा होता. त्यांनी त्याला स्पष्ट नकार दिला. पण इरेला पेटलेल्या अश्वत्थाम्यानं अनेक विनवण्या, क्लृप्त्या करुन आपल्या पित्याकडून हे अस्त्र प्राप्त करून घेतलं. ज्याप्रमाणे पित्याने विद्या विकुन नव्हे तर विद्येचं अर्थकारण करून स्वतःला राजाचं गुलाम बनवलं तसंच आपल्या अवगुणांना कुरवाळणारा आणि समोरच्याचा हरकेन प्रकारणे उपयोग करून घेणारा दुर्योधन त्याला जवळचा वाटू लागला. पांडवांचा द्वेष तो करायचाच पण अर्जुनाचा तो आदर करायचा. त्याच्यात आणि अर्जुनात अनेकदा शस्त्र आणि शास्त्र चर्चा व्हायची. सहाजिकच ब्राह्मण असल्यामुळे अश्वत्थामा हा वेद आणि शास्त्र ह्यांचा अभ्यस्त होता. अर्जुनाला त्याच्या ह्या चतुरस्त्र असण्याचा आदर होता. अनेकदा तो अश्वत्थाम्याला दुर्योधना पासुन दूर राहण्याचा सल्ला देत असे. पण अश्वत्थामा त्याकडे कानाडोळा करी. अश्वत्थामा आणि कर्ण ह्यांची मतं एकमेकांना पटत असे. कर्णाचं धनुर्विद्या निपुण असणं अश्वत्थाम्याला भावलं होतं. हळूहळू अश्वत्थामा आणि कर्ण ह्यांची मैत्री प्रगाढ होत गेली. कर्णाची आत्मग्लानी आणि अश्वत्थाम्याचा अति उतावीळपणा ह्यांचा मेळ न जमुन आला तर नवलच!!!
द्रोणाचार्यांनी गुरुदक्षिणा म्हणुन द्रुपदला बंदी बनवून समोर हजर करा असा आदेश दिला. आधी कौरव गेले आणि सोबत अश्वत्थामा सुद्धा होता. पण इतके पराक्रमी महावीर असून सुद्धा कौरवांचा पराभव झाला. मग पांडवांनी द्रुपदला बंदी बनवून द्रोणाचार्यांना सुपुर्द केले. द्रोणाचार्यांनी सुद्धा द्रुपद वरच्या रागातून त्याचं अर्ध राज्य स्वतः ठेवून अर्धे त्याला परत केले. ठेवलेल्या राज्याचा अधिकारी म्हणुन आपल्या पुत्राला राजा घोषित केले. ह्यातुनच मग द्रुपदाची सुड घेण्याची इच्छा प्रदिप्त होणं आणि दृष्टद्युम्न व द्रौपदी चा जन्म होणं ओघान आलंच!! बरं ह्या दक्षिणेत मिळालेल्या राज्यावर स्वतःच्या मुलाला शासन करण्यास सांगणं म्हणजे अधर्माला खतपाणी घालण्यासारखंच झालं. आता राजा म्हणजे काय आणि त्याचं काय कर्तव्य असतं हे अधर्माचा ध्वज घेऊन फिरणाऱ्या तथाकथित वेदशास्त्रसंपन्न अश्वत्थाम्यास कळणं कठिणंच होतं!!! अश्वत्थाम्यानं अजुन अस्त्र-शस्त्र शिकण्यासाठी परशुरामांकडे पावलं वळवली. तिथं ब्रह्मास्त्र (कुणी-कुणी ह्याला ब्रह्मशिर्ष सुद्धा म्हणतात) शिकत असतांनाच त्याचा प्रयोग करण्याच्या उतावीळपणातून त्यानं ते संधान केलं आणि त्या अस्त्राचा उपसंहार करणं माहित नसल्यानं परशुरामांनी त्याला शिक्षा म्हणून आश्रमातुन काढून टाकले आणि त्या अस्त्राचा उपसंहार केला. नारायणास्त्र आत्मसात करत असतांना द्रोणाचार्यांनी अनेकवेळा त्याला त्याच्या उतावीळ आणि शिघ्रकोपी पणाबद्दल सावधान केलं होतं.
महाभारताच्या युद्धात धर्म-अधर्माचा जेव्हा प्रश्न निर्माण झाला तेव्हा अधर्मी राजाच्या बाजुने पिता उभा ठाकला म्हणुन पुत्र देखिल तेथेच असणं स्वाभाविक होतं. युद्ध जसं-जसं पुढं सरकु लागलं तसं-तसं कौरवांकडचे सर्व रथी महारथी विरगतीला प्राप्त होत गेले. कौरव सैन्याचं सेनापती पद द्रोणाचार्यांकडे गेलं. आपल्या अतुलनीय शस्त्रास्त्र व दिव्यास्त्र ज्ञानानं आणि पराक्रमानं द्रोणाचार्यांनी पांडव सैन्याला सळो की पळो करून सोडलं. खुद्द भगवान कृष्णाला हे कसं थांबवावं ह्याचा पेच पडला. मग कुटनीती चा आसरा घेऊन द्रोणाचार्यांचा वध करण्यात आला. पित्याच्या वधानं पिसाळलेल्या अश्वत्थाम्यानं पांडव सैन्यावर दस्तुरखुद्द नारायणाच्या उपस्थितीत नारायणास्त्राचा प्रयोग केला. ह्या महाभयंकर अस्त्राने पांडव सैन्य होरपळू लागलं. भगवान कृष्णांनी सर्वांना शस्त्रास्त्रे खाली ठेवून ह्या अस्त्राला शरण जाण्याची सुचना केली. तसं करताच नारायणास्त्र शांत झालं. युद्धात दुर्योधनाच्या मांड्या भीमाने फोडल्यावर अंतिम उपाय म्हणून दुर्योधनाने अश्वत्थाम्याला पांडवांची मुंडकी आणण्याची आज्ञा केली. अनावधानाने मग घात झाला आणि अश्वत्थाम्याने पांडव पुत्र व दृष्टद्युम्न ह्यांचा झोपेतच वध केला. आपली चूक लक्षात आल्यावर तो शरमल्या मानेने दुर्योधनाकडे गेला. पापकर्मा असलेल्या दुर्योधनाने सुद्धा त्याच्या ह्या कृत्याचा धिक्कार करत प्राणत्याग केला. हे सर्व होऊन सुद्धा पांडवनाश करण्याची अश्वत्थाम्याची ईच्छा हरली नाही!!
जसं-जसं उजाडत गेलं, तसं-तसं आता अश्वत्थाम्याला भीतीने ग्रासायला सुरवात केली होती. आपण केलेल्या चुकीची भीती वाटून आणि पांडवांकडून होणा-या हल्ल्याची शक्यता बघून त्यानं युद्धभुमीवरुन पळ काढला आणि तो थेट व्यासांच्या आश्रमात वेषांतर करुन यज्ञाहुती देवू लागला. ईकडे पांडव शिबिरात हाहाकार माजला होता. असलं भयंकर आणि अकल्पनीय दृष्य बघुन द्रौपदीने टाहो फोडला होता. तिने त्याच महाभयंकर अशा कोलाहलात भीमाला आणि अर्जुनाला अश्वत्थाम्याचं मस्तक छाटण्याची मागणी केली. पांडवांच्या रथांनी मग व्यासांच्या आश्रमाकडं कूच केलं. पवित्र अशा त्या आश्रमाकडं वायुवेगाने येणारे हे पांडवी वादळ बघुन सर्व प्राणिमात्र सैरावरा पळु लागले. आश्रमाचं पावित्र्य जपण्यासाठी भगवान कृष्णांनी सर्वांना दुरवरच थांबण्याची आज्ञा दिली. रथावरुन उतरुन पांडव भगवान कृष्णांसह आश्रमाच्या दारात येऊन थांबले. व्यासांना प्रणिपात करुन भगवानांनी सर्व परिस्थिती त्यांना सांगितली. अश्वत्थामा पळून जाणार इतक्यात व्यासांनी त्याला समोर येण्याची आज्ञा केली. आधीच सूडभावनेने पेटलेल्या अश्वत्थाम्याने एक दर्भ उचलून "पांडव आणि त्यांच्या वंशाचा समूळ नाश होवो" असे वदून ब्रह्मास्त्राचं ध्यान केलं आणि ते पांडवांच्या दिशेनं सोडलं. हे बघुन भगवान कृष्णांनी अर्जुनाला त्याचं ब्रह्मास्त्र संधान करायला सांगितलं. अर्जुनाने सर्व वंदनीय मुनीजन, ज्येष्ठ भ्राता आणि भगवान कृष्णांना वंदन करुन सर्वांचं कल्याण होवो अशी कामना करुन ब्रह्मास्त्राचं संधान केलं. संपुर्ण ब्रह्मांडाची राखरांगोळी करण्याची क्षमता असणा॒-या दोन महाभयंकर अस्त्रांच्या एकत्र संधानाने धरणी कंपायमान होवू लागली, प्राणिमात्र सैरावरा पळु लागले, सर्व वातावरण तप्त झाले, देवता भयभीत झाले. मग व्यासमुनींनी आपल्या तपोबलाने दोन्ही अस्त्र थोपवून धरले आणि ते वापस घेण्याची दोघांनाही आज्ञा केली. अर्जुनाने व्यासांची आज्ञा शिरसावंद्य मानून आपल्या अस्त्राचा उपसंहार केला. मग व्यासांनी अश्वत्थाम्याला आपलं अस्त्र मागं घेण्यास सांगितले. पण "मी असे करण्यास असमर्थ आहे" असे त्याने सांगितल्यावर व्यासांनी त्याला "हे अस्त्र एखाद्या निर्जन स्थानी परावर्तित कर" असे सांगितले. पण पांडव द्वेषाने आंधळ्या झालेल्या अश्वत्थाम्यानं ते अस्त्र "पांडवांच्या वंशाचा नाश होवो" असे म्हणुन उत्तरेच्या गर्भावर परावर्तित केलं. त्याच्या ह्या अधर्मी कृत्यानं संतापलेल्या भगवान कृष्णांनी त्याला म्हटले, "अरे पापात्म्या, अश्वत्थाम्या, सुडबुद्धिने पछाडलेल्या आणि माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य करणा-या नराधमा, तु कधीच पांडवांच्या वंशाचा नाश करु शकणार नाहीस. मी, वासुदेव कृष्ण, आपलं संपुर्ण पुण्य अर्पण करुन पांडव वंश जीवंत करतो. गर्भातच मृत पावून नवीन जीवन लाभलेल्या ह्या पांडव वंशाला परिक्षीत म्हटले जाईल आणि हा ४० वर्षे पृथ्वीवर धर्माने राज्य करेल. तु हे जे पापकर्म केले आहेस, त्याची शिक्षा तुला अवश्य मिळणार. तुला जगण्याची खुप इच्छा आहे ना, मग जग तु! खुप जग! इतका जग की मृत्युची याचना केलीस तरी तुला मृत्यू न यावा. अर्जुना, काढ तो मणी ह्या पापात्म्याच्या मस्तकावरुन. द्रौपदीला मी समजाविल." अर्जुनानं अत्यंत चपळाईने पण कष्टाने अश्वत्थाम्याच्या मस्तकावरुन तो मणी कापून काढला. मग भगवान कृष्णांनी त्याला तळपत्या वाणीने म्हटले, "दुष्ट अश्वत्थाम्या तु खुप जग, अनंत काळ सुद्धा तुझ्या मृत्युचे कारण न बनो. मी, वासुदेव कृष्ण, तुला शाप देतो की ही भगभगणारी मस्तकाची जखम घेऊन तु अनंत काळापर्यंत ह्या भुतलावर भटकत राहशील. तुझी ही जखम कधीच भरुन येणार नाही. तिच्या दुर्गंधीमुळे तुला निर्मनुष्य ठिकाणीच वास्तव्य करावे लागेल. मृत्युची याचना करुनही तुला मृत्यु येणार नाही. तुझ्या अंगीच्या सर्व शस्त्र व शास्त्र ज्ञानाचं हरण होऊन तु अनंत काळापर्यंत भटकत राहशील..."
गत साडेपाच हजार वर्षांपासून हा शापित पापात्मा भटकतोय आपल्या कधीही न भरुन येणाऱ्या भगभगणा-या मस्तकीच्या जखमेवर इलाज शोधत..!! त्या जखमेतून येणाऱ्या दुर्गंधीमुळे तो रानावनात, निर्मनुष्य वस्तीत आजतागायत भटकतोय. किती हे दुर्देव त्याचं!!! अश्वत्थामा काही सामान्य व्यक्ति नव्हता. तो एक वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मण, द्रोण व परशुराम शिष्य, भीमासमान बलवान, कर्णार्जुनासमान धनुर्धर, एक रुद्रावतार आणि भारुन टाकणा-या व्यक्तिमत्वाचा धनी आहे. पण हे सगळं व्यक्तिवैभव आणि दैवी गुणत्व अधर्माच्या पक्षात असल्याने पाप कर्मात सहायक बनलं. ज्या अश्वत्थाम्याला अभिमन्यूला अधर्माने मारतांना तिळमात्र पण खंत वाटली नाही तोच अश्वत्थामा पित्याच्या वधानंतर धर्माच्या गप्पा सांगतो!!!. एकवेळेस भगवान कृष्णांना वंदनीय मानणारा व्यासांच्या समक्ष त्या भगवानांवर अर्वाच्य भाषा वापरतो!!! तसं बघायला गेलं तर अनेकांना ह्या भटकणा-या अश्वत्थाम्याची किव येते. अजून विचार करता असं वाटत गेलं की "द्वापार युगाचा रावण" असं अश्वत्थाम्याचं वर्णन करावं!! निश्चितच तो रावणाच्या नखाइतका पण क्रुर किंवा आसुरी नाही आहे. पण तो रावण्याच्या तोडीचा गुणवेत्ता आहे. जसं रावणाचं पतन होत गेलं तसं अश्वत्थाम्याचं सुद्धा पतन झालं. पण रावणाला मृत्यु येऊन त्याची सुटका झाली आणि अश्वत्थामा हा भटकतोय!!! अधर्म सोबत आणि पितृमृत्यु नंतर केलेलं निर्घुण कर्म ह्या लांछनातुन तो सुटलाही असता. परंतु जगण्याची दुर्दम्य इच्छा, केलेल्या कृत्याच्या तसुभरही पश्चाताप नसणं आणि ब्रह्मास्त्राचा रोख पांडव वंशनाश करण्याकडे करणं हे त्याच्यासाठी अवसान घातकी ठरलं. शाप देण्याअगोदर भगवानांना त्याचा वध करता आला असता. पण ब्रह्म हत्येचं पातक स्वप्राणप्रिय पांडवांच्या किंवा स्वतःच्या माथी न घेणे हाच हेतू त्याचा मणी काढून व त्याला शापित करण्यामागे होता. दुसऱ्या बाजूने बघता असे वाटते की मरण येऊन ह्या जन्मातुन तरी सुटका होते. अश्वत्थाम्याला मरण नकोच होतं. अनंतकाळ जगणं हे मरणापेक्षाही कसं भयंकर असु शकतं हेच शापाच्या माध्यमातून भगवानांनी त्याला दाखवून दिलं. अश्वत्थामा वाईट नक्कीच नव्हता. पण अधर्म सोबत केल्यामुळे तो सुद्धा पापाचा वाटेकरी होता.
शेवटी अश्वत्थामा काय, रावण काय किंवा अजुन कुणी काय, कितीही गुणवान, उच्चकुलोत्पन, विद्याविभुषित व्यक्ति असली तरी अधर्म सोबत केल्यास त्या व्यक्तिचं पतन निश्र्चितच होतं. मग एक तर तो भटकता अश्वत्थामा होतो किंवा धर्महस्ते मृत्यु येणारा रावण तरी होतो.
संदर्भ -
१. पृथ्वीराज रसो
२. टेंबे स्वामी आत्मचरित्र
३. नर्मदे हर हर
४. नमामी नर्मदे
५. सतीश चौबळ, तरुण भारत
About the Competition
The Poetry and Creative Writing Competition 2026 by Hashtag Kalakar celebrates diverse voices and storytelling forms. It is a platform for writers to express their creativity and explore new narratives. Participants from around the world share their unique perspectives, contributing to a rich tapestry of literary art that challenges, inspires, and engages a global audience.
We extend our heartfelt thanks to Abhay Pujari for his profound short story, "अश्वत्थामा - एक चिरंजीव, योद्धा, ब्राह्मण की भटकता पापात्मा." This insightful piece enriches the Poetry and Creative Writing Competition 2026 with its powerful exploration of mythology and human nature. We look forward to seeing more of Abhay's compelling storytelling in the future.
About Hashtag Kalakar
Hashtag Kalakar is a creative platform dedicated to providing artists, writers, singers and other creative talents with opportunities to showcase their work and reach wider audiences through competitions, features and creative initiatives.


Comments