Vitthala arj mage ghayaycha hay - By Rashmi Kolage
Written By: Rashmi Kolage
Category: Story
Competition: Poetry and Creative Writing Competition 2026
In the vibrant realm of creative storytelling, Rashmi Kolage presents "Vitthala arj mage ghayaycha hay," an engaging tale in the Short Story category for the Poetry and Creative Writing Competition 2026 organized by Hashtag Kalakar. Rashmi's narrative offers a humorous glimpse into village life and its unique characters, bringing to life the delightful idiosyncrasies of rural communities. This charming story promises to entertain and evoke nostalgia, capturing the essence of traditional Marathi culture.
About the Work
"Vitthala arj mage ghayaycha hay" is a humorous tale that revolves around the whimsical happenings in a small village. The story is infused with humor and vivid imagery, painting a lively picture of village dynamics and the role of faith and superstition. Rashmi Kolage skillfully weaves a narrative that explores human nature, community bonds, and the amusing circumstances that arise from misunderstandings and beliefs, all delivered with a lighthearted tone.
Vitthala arj mage ghayaycha hay
Original Submission by Rashmi Kolage
“ईठ्ठला, अर्ज मागं घ्यायाचा हाय!”
विनोदी कथा
“आरं, जरा दमान न्या बाबांनो! तिरडी तुटल अर्ध्यारस्त्यात, एवढी काय घाई झाली पोचवायची?”, सखाराम ओरडून सांगत होता, पण कोणीही त्याचं ऐकत नव्हता.
“अरे देवा! खरंच सही केलीत का अर्जावर?”, हळूच आवाज आला.
“अगं ही तर फक्त सुरुवात आहे,पुढे तर खरी मजा आहे”, असं म्हणत विठ्ठल गालातल्या गालात हसला.
15 दिवसांपूर्वी…
सखारामने विठ्ठलाला एक अर्ज दिला होता त्याचे हे परिणाम होते. चला बघूया नेमकं काय झालं होतं!
सखाराम गावातला सामान्य शेतकरी बरं का! गावात त्याला ‘सखा’ असं प्रेमाने म्हणायचे.
आता त्याला ‘सखा’ का म्हणायचे? हे तुम्हाला कळेलच.
एकदा सखाराम विठ्ठलाच्या मंदिरात नामस्मरण करत बसला होता आणि तेवढ्यात गावातला गण्या धावत आला आणि त्याला म्हणाला, “सखा भाऊ चल लवकर, पटकन चल उशीर करू नगस”,
तर हा गणपत उर्फ गण्या. गण्या म्हणजे चालता -बोलता अर्धवट नेटवर्क. बातम्या सगळ्या देणार; पण अर्धवट.
“अरे,पण झालं काय?ते तरी सांगशील?”,
“आरं, तुक्याची बायको हरवली गड्या काय सांगू? समदं गाव शोधून बसलं, पर ही कुटबी गावना”,
“अरे,असल,कूट जाती?”,
“सगळीकडे शोधलं रं ,पर गावली न्हाई. चल पटकन”,
“आरं,पन मी येऊन काय करू?”,
“तुया जवळ काहीतरी बोलली असल असं समद्याचं म्हननं हाय”,
“मले काय सांगून बिंगून गेली न्हाई ती, मी न्हाई येत. इठ्ठला, तू तर दिवसभर कमरेवर हात घेऊन उभा असतो का नाय! मंग तुले काही म्हाईत हाय काय? कूटं गेली असल?”,
असं सखाने म्हणताच मंदिराच्या बाहेरून शोभा, तुक्याची बायको पाणी प्यायला बाहेर आली.
गण्याने गावात एकच बोंब ठोकली, “सखा भाऊने ईठ्ठलाला अर्ज देल्ला अन शून्य मिनटात बाई सापडली”.
तेव्हापासून सखारामचा भाव खूपच वाढला.
याला गावातल्या सर्व बायका आपापले कुटाणे येऊन सांगायच्या. सासूने हे केलं, नवऱ्याने ते केलं.
हा बिचारा दिवसभर ऐकत बसायचा. उपाय पण सांगायचा. पण याला बेकार खोड होती. याच्याजवळ विश्वासाने सांगितलेल्या गोष्टी हा सगळीकडे पचपच करत फिरायचा. कोणाच्या समोर हा कसं तोंड उघडेल आणि कोणाला उघडं पाडेल? याचा नेमच नव्हता.
याचं मन जेवढं साफ होतं,तेवढंच तोंड मात्र घाण. कोणाला बोलत बसल्यावर त्याची अक्खी कुंडलीच हा समोरच्याकडे मांडायचा आणि कायम गोत्यात यायचा. तरीही, याच्याजवळ सगळे आपली समस्या सांगायचे कारण सखा हा निस्सीम विठ्ठल भक्त होता.
सखाराम म्हणजे गावासाठी उघडं पोस्ट ऑफिस! पण थेट विठ्ठलाशी लाईन जोडलेलं पोस्ट ऑफिस! असं सगळ्यांना वाटत होतं. त्यात आगीत तेल ओतायला गण्या होताच.
सखारामच्या तोंडाला कुलूप नव्हतं, पण विठ्ठलाच्या दाराची किल्ली मात्र याच्याकडेच होती, अशी गावकऱ्यांची श्रद्धा होती.
सगळ्यांना वाटायचं, साक्षात विठ्ठल याच्याशी बोलतो. म्हणून त्याला सतत विठ्ठलाला अर्ज द्यायला सांगायचे. काहिही पाहिजे असेल की, कर विठ्ठलाला अर्ज. सखारामला गावात भाव मिळत होता म्हणून तोही खूष होता.
एकदा तर कहरच झाला.
नामदेवची गाय वेलायची होती, कसलीच हात लावू देईना. सखाराम शेतीची कामं आटोपून घराकडे चालला होता. गोंधळ ऐकून तिथे गेल्यावर कळलं गाय हात लावू देईना. सखारामला सगळ्यांनी पुढे केलं. सखारामने घाबरतच गाईच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवला आणि मनात विठ्ठलाचा धावा करत म्हणाला, “ कश्यापायी तरास देतीस? दे की पटकन रेडकू अन होय मोकळी”.
झालं, असं म्हणताच गाय व्याली आणि रेडकू देऊन मोकळीही झाली. मग तर काय सखारामची हवाच. जो तो सखारामला धन्यवाद करू लागला. नामदेव तर त्याला खांद्यावर बसवून त्याच्या घरी घेऊन गेला.
“समद्या गावाचे फुटाणे फोडून झाले असतील तर स्वारी येती का घराकडे तुकडे गिळायला?”, खणखणीत आवाजात रखमा बोलली.
आता ही रखमा कोण? तर ही सखाराम ची सखी म्हणजे बायको हो!
एक नंबरची व्यवहारी बाई. सख्याच्या पूर्ण उलट.
घराकडे, लेकरांकडे विशेष म्हणजे सासूकडे लक्ष देणारी कर्तव्यदक्ष गृहिणी. सासू म्हणजे, बाकीच्या सासू नावाच्या साच्यातली सासू नाही बरं का! अगदी जिलेबी सारखी सरळ. कळेलच तुम्हाला.
सखारामने ऐकून नं ऐकल्यासारखं केलं तशीच रखमा पुन्हा गरजली, “बघा देताय का कोणी गिळायला? नुसत्या नवऱ्याला हे सांग ते सांग करत्यात, फुकटची कामं करून घेत्यात आन जातात दा * रू ढोसून रोज मारणाऱ्या नवऱ्याला जेऊ घालाया. तुम्हाला न्हाई बरं कोनी मायाशिवाय. व्हा गप गुमान घरात”,असं म्हटल्यावर सखारामची काय टाप होती नाही म्हणायची.
दोघंही घरात आले,हातपाय धूऊन जेवायला बसले तसा जोरात आवाज आला, “आला का गावभर बोंबलत फिरून? तुझ्या तिरडीला बांधला बांबू,अन तुला नेऊन कुठं डांबू?”. सखारामच्या हातचा घासच ताटात घाबरून पडला.
तर, ही होती, नलू आजी. खुद्द सखारामची आई आणि रखमा बाईची जोरदार सासू.
नलू आजी म्हणजे वेगळंच समीकरण. एका डोळ्याने कमी दिसायचं म्हातारीला, पण दुसरा डोळा म्हणजे तिसऱ्या डोळ्याच्या वरचा होता. नुसतं घरात, विशेष करून दूसऱ्यांच्या घरात, डोमकावळ्यासारखं लक्ष असायचं तिचं.
कोणी काही आगाऊपणा करायला भागच नाही; केला की, संपला कार्यक्रम त्याचा.
नलूआजी म्हणजे जिलेबीसारखी सरळ.
कोणत्याही म्हणीची पाहिली ओळ पकडायची आणि त्याला दुसरी ओळ आपल्या सोयीने जोडून निघायची.
एकदा,गावात शैलू आजी आजारी पडली होती. तिचा मुलगा शहरातून येईपर्यंत शैलूआजीला गावकर्यांनी सांभाळलं होतं. पण लेकाला बघायच्या आधीच म्हातारीने वैकुंठाचं तिकीट काढलं.
त्या प्रसंगाचा फायदा घेत पाटील भाषण सुरु करणार तेवढ्यात, तिचा मुलगा आला आणि गावकर्यांनी सुटकेचा श्वास सोडला. पण का? कारण पाटीलला कुठल्याही प्रसंगात फक्त भाषण द्यायचं असायचं. बरं त्या भाषणाला शेंडा ना बुड! आणि म्हणून या पाटलामुळे गावकरी कंटाळून जायचे.
मुलगा तर आला; पण आल्या आल्या आईजवळ नं जाता सरळ सखारामकडे गेला.
“सखाभाऊ एक बोलायचं आहे”, असं म्हणून त्याला कोपऱ्यात घेऊन गेला.
“काय झालं रं एवढं?”, सखाने विचारलं.
“कोणाला सांगू नको बरं का!”, मुलगा म्हणाला.
“मी कधी सांगतो का रं कुणाला?”, सखा.
“ सांगतो म्हणूनच म्हणतोय सांगू नको, ते जाऊदे; माझी आई केव्हापण जाईल.तिने कपाटाच्या किल्ल्या कुठे ठेवल्यात हे तिलाच माहित आहे, तेवढं विठ्ठलाला अर्ज दे आणि मला चाव्या मिळवून दे ना”, सखारामने फक्त त्याच्या तोंडाकडेच पाहिलं.
मुलाला जेव्हा कळलं की, आपली आई गेली तेव्हा तो जोरजोरात गळा काढून रडायला लागला.
“आता कायले बोंबलते वं हा? जिती व्हती तर कवा इचारलं न्हाई म्हातारीले! आता भल्ला पुळका आला याला!”, गर्दीतली एक बाई बोलली.
“ जाऊदे गप बस, रडा लागते ना! न्हाईतर म्हनतीन पोरगं उलट्या कायजाचं व्हतं म्हनून”, लगेच दुसरी बोलली.
शैलूआजीला कवटाळून रडत असताना तिच्या मुलाचा हात तिच्या पोटाकडे गेला आणि लुगड्यात खोचलेल्या चाब्या त्याच्या हाताला लागल्या, तसं तो सखारामकडे बघत जोरजोरात ओरडायला लागला. पण आनंदाने बरं का! सगळ्यांना वाटलं लेकाला दुःख जास्त झालं.
सखारामने मनातल्या मनात विठ्ठलाचे आभार मानले. “इठ्ठला हा पन अर्ज मंजूर केला?”, असं म्हणत सखाराम घराकडे गेला.
“काय हे?”, रुख्मिणीने देवाला विचारलं.
“अगं मी काहीच केलं नाही, मी कुठे काय करतो?”, असं म्हणत विठ्ठल हसला.
असं सगळं सुरु असताना त्यात एक नवल घडलं आणि मग तर काय सगळंच बदललं.
सखारामची ख्याती ऐकून एक शेतकरी त्याच्याकडे येऊन म्हणाला , “ सखा अर्ज द्यायचा हाय इठला कडं ”.
“ काय झालं?”, सखाने विचारलं.
“ आरं बाबा मागच्या वर्षी पासून पाऊस कमी हाय, पेरनी झाली न्हाई, तेवढं सांग की यावर्षी जोराचा पाऊस पडू दे म्हनून, पोरीचं लगन करायचं हाय यावर्षी”, शेतकरी सांगतो.
“बरं बघतो, देतो अर्ज”, असं सखा म्हणाला आणि दुसऱ्याच दिवशी सलग त्या गावात एवढा पाऊस पडला की, मागच्या 2 वर्षाचा दुष्काळ धूऊन निघाला. झालं. मग तर, सखारामच्या घरापुढे, मोठी अर्जाची रांगच लागली.
अर्ज पण असे की, कधी कोणी ऐकले नसतील.
अर्ज घेणारा गण्या. तो तर आठव्या ढगात होता.
एक मुलगा म्हणाला, “ सखा दादा, अभ्यास नाही केला रे, तेवढा उद्याचा पेपर सोपा असू दे सांग ना!”.
की, लगेच दुसऱ्या दिवशीचा पेपर सोपा गेला. सगळे म्हणाले, “ बघा रे! शिक्षण खातही विठ्ठलच्या संपर्कात हाय, जय सखाराम की”.
एक बाई रडत रांग तोडत पुढे गेली आणि म्हणाली , “ सखा भाऊ, दया कर माझी कोंबडी हरवली रे”.
“ ये माय! रडली तर एवढी का,मले वाटलं काय झालं नं काय न्हाई, काय तर हिची कोंबडी हरवली”, गर्दीतली एक बाई कुजबुजली.
घरी जाईपर्यंत तर तिची कोंबडी घरी आली होती. लगेच गण्याने बोंब ठोकली, “कोंबडी अर्जावर परत आली बघा”.
गावातली निवडणूक नुकतीच झाली होती आणि आता निकाल तोंडावर होता. सगळे परेशान होते कोण निवडून येईल म्हणून. पाटील तर मीच निवडून आलोय अश्या अविर्भावात भाषण पाठ करूनच तयार होता.
सरपंचचा कार्यकर्ता रात्री सखाकडे येऊन म्हणाला, “ सखा भाऊ सरपंचांनं पाठवलंय अर्ज द्यायला”.
“अय काहीबी असते काय! मी नसतो देत अश्या कामासाठी अर्ज”, सखाराम म्हणाला.
“आरं सरपंच निवडून आला तर तुला मर्जित ठेवणार हाय त्याच्या. इचार कर. तेवढी उद्या निकालात सरपंचच्या नावाची चिट्ठी काढ म्हनून ईठ्ठलाला अर्ज देऊन ठीव”, असं म्हणत तो निघून गेला.
“नाचता येईना, याची भाकर कुत्र्यानं नेली”, नलू आजी हात धुवत मधातच बोलली.
“एक काम करत न्हाई हा. नावाचा सरपंच हाय निसता. सखा, खबरदार याचा अर्ज फर्ज देल्ला तर. अति तिथं सरपंचानं खाल्ली माती”.
“झोप म्हातारे, त्या म्हणीची तर पार वाट लावती”, सखाराम म्हणाला.
सकाळी सकाळी सखारामला जोरजोरात ओरडायचा आवाज ऐकू आला. तसंच उठून बाहेर जाऊन बघतो तर काय! नलू आजी शेजारणीशी भांडत होती.
“ लई गुणाची गं तू! सकाळी सकाळी खरं खरं वाजवती खराटा, तू कितीबी परयत्न कर तरी मी कचरा करीनच. प्रयतने वाळूचे तुझा झाडूच मोडतो बघ आता”, असं नलूआजीने म्हणेपर्यंत तर शेजारणीचा झाडू काटकन मोडला.
तशीच नलूआजी म्हणाली, “ जशी करनी तशी भाकर भाजनी , घे आता, नाचता येईना बसून खा भाकरी, मोडला झाडू. सख्याची आई म्हणत्यात मला”, नलू आजी नुसता कहर करत होती.
तेवढ्यात गण्या गावभर बोंबलत फिरला, “सरपंच निवडून आला अर्ज मंजूर झाला”.
“काय रं!ठरलं होतं नं आपलं! सरपंचांले वोट कराच न्हाई म्हनून मंग कसा काय निवडून आला हा?”, गावातला एक जण बोलला.
“ईठ्ठलाची शिफारस होती म्हने त्याला”, लगेच दुसरा बोलला.
या चर्चेला इतकं उधाण आलं की, सगळं गाव सखाच्या घरावर तुटून पडलं. अर्जाची आधीपेक्षाही मोठी रांगच रांग लागली. आता तर कशाचेही अर्ज घेऊन लोकं यायचे.
विठ्ठलानं कपाळावर हात मारला.
'रुख्मिणी, आता हे देवाच्याही आवाक्याबाहेर गेलंय.'
तेवढ्यात नारद प्रकटले. “बरं झालं तुम्ही आलात नारद मुनी. या, तुमची गरज आहे”, विठ्ठल म्हणाला.
“नारायण नारायण, स्वामी आज माझी काय गरज पडली बरं!”, नारद मुनी म्हणाले.
“अर्ज वाढलेत, मला एकट्याला झेपेना”,
“ कशाला लावून घेताय स्वामी? मी काय बरं मदत करणार?”,
“ करावं लागतं भक्तांसाठी. तुम्ही फक्त अर्जाला तथास्तु म्हणायचं”,
“बरं!”, असं म्हणत दोघेही गालात हसले.
अर्ज तर कशाचेही यायला लागले.
एक जण येऊन म्हणाला, “ माझा जावई माहेरी 2 दिवस राहू दे. लेकीला तेवढंच राहायला मिळल”.
पण झालं उलटच जावई महिनाभर घरी राहिला.
यातही गण्याने फिरवलं, “अरे ईठ्ठलाने तुले बोनस देल्ला”.
आतापर्यंत सरळ पास होणारे अर्ज आता जरा उलटेही फिरायला लागले होते.
एक सासू म्हणाली, “ सून लई कजाग हाय मायी,सून सुधारू दे”.
तर तिनं दुसऱ्या दिवशी सासूला घराबाहेरच काढलं. आली रडत सासू पुन्हा सखाकडे.
यातही गण्याने फिरवलं, “ अगं म्हातारे! तुझा हात जनावराला लागला पाहिजे ना!म्हनून ईठ्ठलानं तुले गोठ्यात पाठवली”.
सासू नाक मुरडतच घरी गेली.
गण्या हळूच सखाला म्हणाला, “ सखा भाऊ अर्ज कसा काय उलटा पडायला लागला रं ?”,
“काय म्हाईत, मले पन कळना”.
हे सगळं अर्थातच नारदमुनींकडून होत होतं . कोणता अर्ज कोणाचा आणि कोणाला तथास्तु म्हणायचं? याचा पार गोंधळ झाला होता.
रोज येणाऱ्या तिकडम अर्जाने सखाराम वैतागत चालला होता.
कोणी म्हणायचं,
“शेजाऱ्याच्या उसाला कीड लागू दे”
एक म्हातारा म्हणाला, “ माझ्या बोकडाला शेजारच्या शेतात चरायला जायची सवय मोडू दे”,
“माझी म्हैस एकाच दिवशी 300 लिटर दूध देऊ दे”,
कोणी म्हणे, “ नापास घोडं पोरगं यावर्षी पास होऊ दे”.
सासू म्हणे,“ सुनेला कायमचं माहेरी जाऊदे”.
असे चित्र विचित्र अर्ज पाहून सखाराम जोरात म्हणाला, “ आरं इठ्ठलाचं मंदिर हाय का तहसील कार्यालय?”.
त्यात अजून कहर, नलू आजी मागे राहते काय!
एवढी मोठी रांग बघून म्हणाली,“ आरं! ही इठ्ठलाची पंढरी हाय का पंचायत समिती? जो येतो तो पंचाईत करून जातो;
अन त्या चपलाचे अर्ज कोन भरणार रे? कसे पन टाकून जाता, घान करून जाता. यांच्या घरोघरी मातीचा तवा फुटो, यांच्या थेंबे थेंबे चपला झिजो, अंधारात केले नं उजेडात मेले. याच परत तुम्ही”.
“ समद्या गावाचे अर्ज भरून झाले असतीन अन स्वारी हाय त्यापेक्षा रिकामी झाली असन, तर त्या बंद नळाचा अर्ज देऊन येता का जरा ग्रामपंचायतीत?”, रखमा बोलली.
“ नळ गेलाय का रखमा?”, सखा.
“नळ हितच हाय पानीं गेलय. तेवढं आनता का जाऊन परत?”,
“व्हय व्हय आनतो ना, जा कायले लागते हितूनच इठ्ठलाले सांगतो ना!”, असं सखाराम म्हणताच विठ्ठल डोक्याला हात मारून म्हणतो, “ अरेरे, काय हे! आता काय मला नळाला पाणी पण आणावे लागेल?”.
“असच बारीक लक्ष जरा स्वतःच्या संसाराकडे दिलं तर बरं होईल”, रुख्मिणी हसून म्हणते.
रखमा नळाचा अर्ज द्यायला सांगते आणि सगळे झोपतात. रात्री तिच्या घरावर जोरात पाऊस पडतो. पाणीच पाणी सगळीकडे.
एका शेतकऱ्याने बोरला पाणी लागू दे म्हणून अर्ज दिलेला असतो तर त्याच्या बोरला बारीक धार येते पाण्याची आणि इकडे धो धो पाऊस असतो.
नुसता गोंधळ उडतो.
रखमा सखारामकडे रागाने बघत घरातलं पाणी काढते.
हा सगळा नारदमुनींचा चुकीचा आशिर्वाद होता.
“समद्या गावाचे अर्ज करायला येळ हाय, पन घरचं काही करायला नग, सांगितलं व्हतं जाऊन नळाचा अर्ज देऊन या, तर घरी बसून हा भलताच अर्ज देल्ला माया बोकांडी मारून. आता हे पानी कोनी काढ्याचं? समद्या गावात कुठंच पाऊस न्हाई अन मायाच घरावर बरा मेहेरबान झाला हा! काही नाही, भयाडला हा पन तुमच्यासारखा”, रखमाचं बोलणं ऐकून बिचारा सखाराम विठ्ठलाच्या मंदिरात वैतागून जाऊन बसला.
“ईठ्ठला काय केलं हे? मले वैताग आला आता या संमद्याचा. समद्या गावचा अर्ज मंजूर करतो तू, माझ्याच घरचा अर्ज देल्ला, तर घे म्हणून पाणी दिलंस. काय करू आता? बस झालं नको मला गावचा अर्ज नं फर्ज.
आता मीच तुला अर्ज देतो. उचल बाबा मला उचल. नको आता काही. समदं गाव रडन मायासाठी, रडू दे. समद्याचं अडन मायावाचून, अडू दे. पण आता मले कंटाळा आलाय. आरं, काहीबी अर्ज घेऊन येत्यात. काय तर माया नवरा घोरतो त्याचा आवाज बंद कर,दे अर्ज.
आईनं एवढं कष्टानं लेकरू वाढिवलं शहरांत पाठवलं. त्याचं काही न्हाई पण कपाटाच्या किल्ल्या महत्वाच्या हायेत यांना.
यांच्या भावनेला कैद करून मनाच्या कपाटाला कुलूप लावून चाब्या कुठं फेकल्या? हे यांना माहित न्हाई, अन यांना कशापायी लोखंडाच्या कपाटाचं महत्व असलं रं!
माझी म्हैस गाभण हाय काय देईल?इचार ईठ्ठलाला. परवा तर एक बावा म्हने मी दारू ढोसतो हे माया बायकोला कधीच कळू न्हाई . आरं काय लावलंय हे? मी काय मानूस हाय का तुझा कारकून हाय? कुठल्याबी प्रश्नच उत्तर देत बसायला.
आधी लई भारी वाटलं रं! समदे भाव देत व्हते, इचारत व्हते पन आता मानसाच्या मुखवट्या मागचे खरे चेहरे दिसलें बघ मले.
बस आता! मीच अर्ज देतो तुले आता. मायाच अर्ज मंजूर कर अन मले मोकलं कर”, असं म्हणून सखाराम घरी जाऊन झोपला.
“रुख्मिणे , ऐकतेस ना!”, हळूच आवाज आला.
“ ऐकतेय ना! बोला”,
“ काय मग करायची का सखाराम च्या अर्जावर सही?”,
“काहीही हा”,
“अगं बिचारा अर्ज देतोय स्वतःसाठी, वाटतं यावेळेस करूनच टाकावी सही”.
दुसऱ्या दिवशी सकाळी कोंबडा आरवला तरी सखाराम उठेना. सखारामला झोपलेलं बघुन नलूआजी म्हणाली, “अंथरून पाहून पसरावं मानसानं”.
“सासूबाई! उठवा हो त्यांना सकाळ झाली बघा”, घर सारवत रखमा म्हणाली.
“आपला हात अन ढुं*ग*णा*वर मार लात”, असं म्हणत नलूआजीने सखारामला हलवलं पण सखाराम काही उठेना.
रखमाने उठवलं, तरी सखाराम हालेना .
काय झालं? म्हणून रखमाने श्वास पाहिला आणि जोरात हंबरडा फोडला, “ धनी इ इ इ इ असं कसं झालं? पानी आलं म्हनून काय सोडून जा म्हटलं काय तुमाले?”. सगळे धक्क्यात होते.
सगळ्यात मोठ्या धक्क्यात तर गण्या होता. त्याचं दुकानच बंद झालं होतं सख्याच्या जाण्याने.
गण्याने साऱ्या गावभर सांगितलं, “सखाराम गेला”.
सगळे घरासमोर जमले. बायका कुजबुजायला लागल्या.
“माय आता अर्ज कोन देईन ईठ्ठलाले?”,
“तोंडं नव्हतं जागेवर पन बरा व्हता, कामं तरी करे, आता कोन करन आपलं कामं?”.
गण्या हळूच बोलला, “ आर त्याच्या जीवावर माझं भारी चाललं व्हतं. यानं कायले मधातच जा लागतं व्हतं? आता मी काय करिन? बरं गेला तर मले तरी सांगून तर जा लागतं व्हतं अर्ज कसा द्या लागते तर. आता मले कोन सांभाळीन? कसं तरी पुडी खायला भेटे तर तिबी गेली याच्यासंग”.
“बरं झालं गेला, मेल्याला म्हटलं व्हतं गावाच्या जत्रेत मले बक्षीस मिळूदे, तर भिताडानं माय काम न्हाई केलं”.
“माझ्या घरी पोरगं जन्माला येऊ दे म्हनून अर्ज ठेवला व्हता. आता कोण नेणार?”
“अरं , मानूस गेला अन तुम्हाला आपापले अर्ज आठवतायत! जरा लाज बाळगा,” एक म्हातारा म्हणाला.
“तुम्ही गप बसा काका. तुमचंच तर काल म्हणनं होतं, ‘सखाराम नसता तर माझा पेन्शनचा अर्ज वर गेला नसता!’” एकाने टोला मारला.
सगळे गर्दीतले कुजबुजायला लागले.
गण्या लगेच नाक पुसत म्हणाला, “आरं, पैसा न्हाई रं! पर मानुस भारी व्हता. अर्जाचं कमिशन घेतलं असतं तर आज मी पण पाटील झालो असतो.”
“तोंडं लई चालायचं त्याचं, पण मन वंगाळ नव्हतं रं ,” एक वृद्ध शांतपणे म्हणाला.
“व्हय, भल्ला, माया घरातलं भांडण समद्या गावाला सांगितलं व्हतं त्यानं. दोन महिने नवऱ्यानं मले चांगलंच सुनावलं व्हतं,” एक बाई ओठ वाकडे करत म्हणाली.
“तरी परत त्याच्याकडच अर्ज द्यायला आली व्हतीस की!” दुसरी लगेच म्हणाली.
“ते राहू दे,कामाचं मानूस व्हता.आता ईठ्ठलापर्यंत अर्ज पोचायला थेट पोस्टाने पाठवावा लागल बहुतेक!” एकाने असं म्हणताच गर्दीत हसू पिकलं पण सगळ्यांनी लगेच तोंड दाबलं.
सखारामला सगळ्यांचे आवाज ऐकू येत होते आणि तो मनातल्या मनात दुःखी होत होता. “यांचे मी कितीबी काम केले तरीबी मायाबद्दल असं बोलतात? मी काय फक्त अर्ज द्यायच्या कामाचा होतो काय? पर मी जर मेलो हाय तर मले ऐकू कसं येऊन राहीलं? आत्म्याला ऐकू येत असते काय? असन बावा, मी कितीकदा असा मेलो मले म्हाईत असन! बघू,जरा येळ, काय व्हते तर!”.
सखारामला उचलायची वेळ आली तशी नलू आजी जोरात ओरडली, “ कुठं चालला रं लेकरा मले सोडून? आवळा देऊन भोपळा घेऊन चालला”.
“काय? म्हातारे आता तरी नीट म्हण म्हण की, जाताना”, सखाराम म्हणाला.
त्या गर्दीत त्याला एक जवळचा ओळखीचा आवाज ऐकू आला. सखारामच्या छातीवर डोकं ठेवून रखमा रडत होती,
“बस करा आता. उठा हो. लई जीव हाय माझा तुमच्यावर. मी काय करू तुमच्याबिगर? समद्या गावाचे अर्ज घेत फिरलात, सगळ्यांच्या अडचणी सोडवल्यात.
पन माया मनात काय चाललं व्हतं ते कधी विचारलंत का हो? लेकरं रोज दाराकडं बघत बसायची, 'बाबा कधी येनार?' म्हनून. त्यांना काय उत्तर द्यायचं?
तुमच्यासाठी भाकरी गरम ठेवत बसायची, ती थंड व्हायची, पर तरी बी वाटायचं, माझा मानूस गावचं भलं करतोय. कधी रागावली , कधी ओरडली पर तेबी तुम्ही माये आहात म्हनूनच. आता कोनाशी भांडू?
कोनाची वाट बघू? कोनासाठी उंबरठ्यावर दिवा लावू?
या हो परत. कधी भांडणार न्हाई. रोज पिठलं-भाकरी करून वाढीन. तुम्हाला आवडते तसा मिरचीचा ठेचा करीन. मले काहीच नको. पैसा नको, मान नको. फकस्त माया लेकरांच्या डोक्यावरचा त्यांचा बाप परत दे रे ईठ्ठला!”
सखारामचं अंत:करण ढवळून निघालं.
"घरात लेकरं माझी वाट बघत व्हती, पन मी दुसऱ्यांच्या संसाराची पंचाईत सोडवत बसलो. रखमाच्या डोळ्यातलं प्रेम दिसलंच न्हाई मले.
ईठ्ठला, मोठेपणाच्या नादात माझंच घर हरवलं. फुकटचा मोठेपणा मिरवत बसलो, घरी सोन्यासारखी बायको लेकरं असताना बाहेर बोंबलत फिरलो, लोकांच्या अर्जात इतका गुरफटलो की, माया घरच्यांचा अर्ज वाचलाच न्हाई. ईठ्ठला मले माफ कर माझा अर्ज मागे घे”.
आता कुठे काय होणार होतं?
“ एकदा अर्जावर सही झाली की झालं. तूच म्हणत होता विठ्ठला अर्ज देतोय, मी केली सही, म्हटलं तथास्तु”, हा विठ्ठलाचा आवाज ऐकू येईपर्यंत तर सखारामची तिरडी उचलली पण होती आणि स्मशानाकडे निघाली होती. सगळे गावकरी निघाले. तिरडी धरणारे तर असे काही पळत होते की, जणू काही याला कधी एकदा नेऊन पोहोचवतो.
सखाराम ओरडून सांगत होता,
“आरं, जरा दमान न्या बाबांनो, तिरडी तुटल अर्ध्यारस्त्यात, एवढी काय घाई झाली पोचवायची?”. तरी सगळे शांतपणे चालले होते. सखारामचा आवाज कोणालाच ऐकू येत नव्हता. कसा येणार होता? त्याच्या अर्जावर खुद्द विठ्ठलाने सही केली होती.
सगळे स्मशानात जमले.
पाटलाला तिथेही भाषण करायचं होतं पण गण्याने त्याची योजना उधळून लावली.
जसं पाटलाने, “ बंधू आणि भागिनींनो” म्हटलं तसंच गण्या बोलला, "आरं पाटला, मेलेला मानूस जिवंत झाला तरी भाषण थांबणार न्हाई तुझं! नंतर कवातरी दे”. पाटलाचं तोंडच पडलं.
गावकरी हसायला लागले.
जे गावकरी सखारामला फक्त अर्ज द्यायला सांगत होते,ते आता मात्र त्याला असं बघून गहिवरून म्हणाले , “ सख्या अर्ज राहूदे, आता न्हाई करायला सांगणार, आमची कामं आम्हीच करून घेऊ, ईठ्ठलाला तरास नको अन तुलाबी नको, पर ये बाबा रखमासाठी परत”.
ही गावकऱ्यांची भावना बघून सखाराम सुखावला.
आता जशी सखारामच्या प्रेताला अग्नी द्यायची वेळ आली तसा सखाराम जीवाच्या आकांताने ओरडला, “ ईठ्ठला मला माझी चूक कळली, मी कधीही कुठलाही अर्ज तुझ्याकडे आननार न्हाई, कधी काही मागणार न्हाई, मले माया अर्ज मागे घायचा हाय, इठला धाव”, सखाराम ओरडत होता पण काहीं उपयोग नव्हता.
काहिही घडत नव्हतं. चिता जळली आणि जशी आग अंगाशी यायला लागली तसं सखा अजून जोरात ओरडायला लागला, “ ईठ्ठला आता पोळायला लागलं रं! कर काहीतरी”. तरी पण काही होत नव्हतं.
शेवटी सखाराम बेंबीच्या देठापासून ओरडला, “ईठ्ठला धाव, अर्ज मागे घायाचा हाय”,
तसंच सखारामने डोळे उघडले आणि चितेवरून उडी मारून उभा राहिला. त्याची पहिली नजर रखमाकडे गेली तशीच रखमाने धावत जाऊन त्याला मिठी मारली.
त्याला जिवंत झालेलं बघून गावकरी सगळे वाट मिळेल तिकडे धूम ठोकून पळाले. ‘भूत आला, भूत आला’, म्हणत सगळे पळत सुटले. उरले फक्त नलू आजी आणी रखमा. रखमा आपल्या नवऱ्याला जिवंत बघून खुप खूष झाली आणि नलूआजीने म्हण झोडली, “उतावीळ नवरा इठलाला अर्ज.
आता जिवंत असताना घरच्यांचं ऐक, न्हाईतर पुढचा अर्ज थेट यमराजाकडे जाईल!".
सखाराम हसला आणि शांतपणे रखमाकडे गेला.
"रखमा, मले माफ कर. गावभर फिरताना मायच घर इसरलो."
रखमा डोळे पुसत म्हणाली, "आता बाकीचं काही नको. रोज येळेवर घरी या. लेकरांना त्यांचा बाप हवा हाय , गावाला देवाचा कारकून न्हाई”.
सखाराम म्हणाला,
"आजपासून पहिला अर्ज माया घराचा.”
रखमाने हलकेच सखारामचा हात हातात घेतला, तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.
सखारामने घराकडे जाताना विठ्ठलाच्या मंदिराकडे पाहत दोन्ही हात जोडून म्हणाला, "इठ्ठला तुयाकडं सुख मागत व्हतो, आता सुख कुठं हाय ते समजलं, अन माय कोन हाय तेबी समजलं. आता तुयाकडे अर्ज नाही आननार”.
तेवढ्यात गण्या धापा टाकत तिथे आला.
“ सखा भाऊ काय सांगू? तुले जिता पाहून मले किती आनंद झाला तर!”.
“ व्हय! खरच! ऐकत व्हतो म्हनलं मी समदं”, सखाराम हसून म्हणाला.
“ ते जाऊदे रं! होतं असते मागं पुढं न्हाई का? आरं मायाकडं शेवटचा अर्ज हाय बघ”, गण्याने अर्ज म्हणताच सखाराम चिडला,
“ आता अजिबात एक पन अर्ज न्हाई घ्यायचा, चांगली शेकली आताच मायी, तुले काय सांगू अजून पण पोळलेलं दुखा लागलंय. बस आता”.
“ ऐकून तरी घे”, असं म्हणत गण्याने त्याच्या हातात अर्ज ठेवला.
सखाराम अर्ज बघून हादरलाच. तो अर्ज सखारामला 100 वर्ष आयुष्य मिळावं म्हणून एकाने केला होता.
सखारामच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने तो चूरघळलेला कागद विठ्ठलाच्या चरणी ठेवला आणि म्हणाला, “ देवा आता अर्ज नको रं! ज्याचा मनात प्रेम, इश्वास अन कष्ट हायेत त्याला येगळ्या अर्जाची गरज नसते रं! समदे तुये भक्त हायेत त्यांच्यावर तुझी कृपा ठीव, त्यांना सुखी राहू दे”.
मंदिरातली घंटा आपोआप वाजली.
विठ्ठल रखुमाई एकमेकांकडे बघून मंद हसले.
“ रुख्मिणी”, विठ्ठल म्हणाला, “ आज पहिल्यांदाच एका भक्ताने मागणं सोडून जगणं मागितलं बघ”.
रुख्मिणी हसली आणि म्हणाली, “ म्हणूनच हा अर्ज मंजूर करायला सही लागत नाही”.
नारदमुनींनी काम झालं म्हणून तिथून प्रस्थान केलं.
त्या दिवसानंतर गावात अर्ज बंद झाले. पण विठ्ठलाच्या मंदिरात एक नवीन पाटी लागली.
“इथे अर्ज नाही, फक्त आभार स्वीकारले जातील”.
गावकरी त्याच्यासोबत होते.
गण्या म्हणाला,"सखा भाऊ, मग माझं काय?"
सखाराम हसून म्हणाला,
"आता प्रत्येकानं आपापल्या आयुष्याचा अर्ज स्वतःच लिहायचा, आणि सही? ती आपल्या कर्मानं करून घायची, काय गण्या?”.
नलू आजी लगेच म्हणाली,"अति अर्जाची मती गुंग, शेवटी बसला घरीच सुंग."
सगळे हसले.
त्या दिवसापासून विठ्ठलाच्या मंदिरात अर्जाची रांग कधीच लागली नाही कारण गावाकऱ्यांना कळलं होतं की, देव अर्जापेक्षा माणसाचं कर्म आधी वाचतो.
सखाराम विठ्ठलासमोर हात जोडून म्हणाला,“काही अर्ज सहीने मंजूर होतात, पन काही अर्ज माणसाले शहानं करूनच मागे घेतले जातात, व्हय ना ईठ्ठला?”.
विठ्ठल गालात हसतो.
समाप्त…
About the Competition
The Poetry and Creative Writing Competition 2026 by Hashtag Kalakar is a prestigious platform for writers to showcase their literary talents. This competition celebrates creativity and originality, providing participants an opportunity to share their unique voices with a broader audience. Hashtag Kalakar continues to support and encourage literary arts through such esteemed events, fostering a vibrant community of writers and poets.
We extend our heartfelt thanks to Rashmi Kolage for her delightful contribution, "Vitthala arj mage ghayaycha hay," to the Poetry and Creative Writing Competition 2026. Her story adds a charming and humorous perspective to the collection, and we are grateful for her participation. We look forward to more of her creative endeavors and wish her success in her future storytelling journey.
About Hashtag Kalakar
Hashtag Kalakar is a creative platform dedicated to providing artists, writers, singers and other creative talents with opportunities to showcase their work and reach wider audiences through competitions, features and creative initiatives.




Comments