top of page

Tamaso maa jyotirgamay - By Shivleela Shivpuje

14 minutes ago
17 min read

Written By: Shivleela Shivpuje

Category: Sci Fi Story

Competition: Poetry and Creative Writing Competition 2026

In the realm of science fiction, Shivleela Shivpuje offers readers a captivating narrative with her story "Tamaso maa jyotirgamay." Featured in the Sci-Fi Story category, this piece is part of the Poetry and Creative Writing Competition 2026 by Hashtag Kalakar. It delves into the mysterious world of archaeology and cosmic exploration, inviting readers to ponder the unknown and the unexplained. Shivleela's writing immerses the audience in a tale that blends the intrigue of ancient discoveries with the vastness of the universe.

About the Work

"Tamaso maa jyotirgamay" weaves a tale of mystery and discovery, as characters grapple with an enigmatic object found during an archaeological dig. The story is rich in suspense and vivid imagery, exploring themes of knowledge and ignorance. Shivleela's narrative style creates a sense of wonder, as the characters navigate their quest to uncover the truth behind the mysterious 'Tamas.' This piece challenges the boundaries between science and the supernatural, leaving readers with much to contemplate.

Tamaso maa jyotirgamay

Original Submission by Shivleela Shivpuje

शीर्षक - तमसो मा ज्योतिर्गमय

समोरच्या काळ्या-जांभळ्या हातभार उंचीच्या ओबड-धोबड वस्तूचं निरीक्षण करण्यात गुंतलेल्या कृष्णाचं लक्ष त्रिमूर्तीच्या बोलण्याने विस्कळीत झालं.

‘’माझ्या मते हा ,DK आहे !’’

’’DK ?’’ वसुने विचारलं..

’’म्हणजे, धूमकेतू !’’ टीव्ही म्हणाला. काय दगड आहे अस त्याच्याकडे पाहत, वसु म्हणाली, ’’माझ्या मते हा धातू असावा’’.

’’नाही. हा DK च आहे ! ’’ दोघांमध्ये चांगलीच जुंपली. त्यांच्यामुळे वैतागलेली कृष्णा म्हणाली, ‘’हा ना धातू आहे; ना दगड आहे’’.

‘’मग?’’ दोघांनी चमकून विचारले.

‘’तुम्ही जर मला शांतपणे काम करू दिल तरच मी शोधू शकेन,हे काय आहे ते’’.

पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. पाटवडेंनी एका वस्तूचे परीक्षण करण्याची जबाबदारी कृष्णा‎‎‎ला दिली होती. डॉ.पाटवडेंचे दोन सहाय्यक वसु अर्थात वसुंधरा आणि त्रिमूर्ती विरय्यास्वामी हे दोघेही तिला यामध्ये मदत करत होते. दोघं सतत दोन मांजरासारखे पिंजारून भांडायचे. आताही समोरच्या वस्तूबद्दल या दोघांचा वाद सुरू होता; तोच डॉ. पाटवडे तिथे गडबडीत आले,

‘’काय मग कृष्णा ,लागला का काही सुगावा’’

‘’नाही सर ! काहीच समजेना ’’ कृष्णा उत्तरली.

‘’तुझ्यासारख्या नामांकित खगोल संशोधकाला समजेना तर मग आमच्यासारख्या अर्कीयोलोजीस्टने काय करायच आता ?’’.

’’पण तुम्हाला हि वस्तू सापडली कुठे ?’’ कृष्णाने विचारलं,

‘’आम्ही भारताच्या सीमेत असलेल्या सिंधू घाटीच्या परिसरात उत्खनन करत होतो. तिथे सापडली. प्रथम वाटलं कसलातरी दगड आहे; म्हणून भूवैज्ञानिकाला पाचारण केल पण त्यांनाही काही समजेना. मग एखादा कॉमेट असेल म्हणून तुला बोलावलं’’ इति डॉ.पाटवडे

‘’सर मला थोडा वेळ द्या. मला काही परीक्षणे करावी लागतील’’. कृष्णा म्हणाली .

’’ठीक आहे ‘’ असे म्हणून ज्या वेगाने डॉ.पाटवडे आले; त्याच वेगाने ते निघूनही गेले.

त्यानंतर कृष्णाचा चमू आता अविरत या वस्तूच्या परीक्षणात गुंतला. ‘‘मॅम ! या ‘ऑब्जेक्टचं’ एक छानस नाव ठेवूयात का ?’’ एके दिवशी वसु म्हणाली.

कृष्णा मंदस्मित करत म्हणाली,‘’ठीकय तूच सुचव मग काहीतरी’’

‘’मॅम एलियन ठेवूया’’ मधेच त्रिमूर्ति म्हणाला,

‘’एलियन ! हा कुठला परग्रहावरचा जीव थोडीच आहे!’’ वसू नाक मुरडत म्हणाली.

’’काय माहित ?’’, त्रिमूर्ति ने असं म्हणताच दोघेही चमत्कारिक पद्धतीने त्या वस्तूकडे पाहू लागले. कृष्णाला त्यांची फार गंमत वाटली. पण खूप वेळ ‘सस्पेन्स’ न ठेवता ती म्हणाली ,

’’हे बघा एवढे मी खात्रीने सांगू शकते कि; हा कुठला जीव नक्कीच नाही आणि नावाचे म्हणाल तर याला आपण ‘तमस’ म्हणूया. ’तमस’ म्हणजे अंधकार ,अज्ञान. सध्या याच्याविषयी आपण अंधकारात आणि अज्ञानातच आहोत ना म्हणून हे नाव ‘’

हसतमुखाने हे बारसं साजरं करत सर्वजण परत कामात गढून गेले.

कृष्णा चोवीस तासांचा दिवस करून तमसवर काम करत होती. आज पोर्णिमा असल्यामुळे पूर्णचंद्राच्या प्रकाशात संपूर्ण आसमंत न्हाऊन निघाला होता. थकलेली कृष्णा, क्षणभर विश्रांती घेत कॉफी पीत परीक्षण शाळेतील गॅलरीतून चंद्र न्याहळू लागली. काही क्षणच गेले; एवढ्यात वसुच्या किंचाळण्याचा आवाज आला. कृष्णा तिच्याकडे धावली तर लॅबच्या खिडकीजवळ वसु बेशुद्ध पडली होती. जवळच तमसही पडला होता. कृष्णाने तीला सावरण्याचा प्रयत्न केला. कृष्णाचे लक्ष तमसकडे ही गेले. त्याचा जांभळा रंग बदलून फिक्कट निळसर झाला होता. कृष्णाने तमसला हातात घेण्याचा प्रयत्न केला पण तमसला स्पर्श करताच कृष्णाला एक जोरदार झटका बसला. काही क्षणानंतर धावत आलेल्या TV ने पाहिले तर दोघीही बेशुद्ध पडलेल्या. घाबरलेल्या त्रिमूर्ति ने दोघींना घेऊन लगेचच हॉस्पिटल गाठलं.

कृष्णाने हात जोडून डोळ्यांच्या पापण्या अलगद मिटल्या. नुकतच तिने त्राटक केलेलं असल्यामुळे मिटल्या डोळ्यांच्या अंधारात तिला ज्योतिस्वरूप प्रकाशाचे भास होत होते. ती दररोजच अस ध्यानस्थ होत होती पण आज तिला काहीतरी वेगळं भासत होतं. आसपास जाणवणाऱ्या सर्व संवेदनांना ती प्रयत्नपूर्वक बाजूला सारून त्या बंद पापण्यातील तमात पुन्हा-पुन्हा त्या ज्योतीचा वेध घेऊ लागली. थोड्यावेळाने तिचा हा स्वतःशीच चाललेला संघर्ष निवळला. ढळलेले गढूळ पाणी हळू हळू खाली बसून शांत-स्वच्छ व्हावे तसे तीचे मन एकाग्र होऊ लागले. आता पापण्यांच्या आड तिने एका वेगळ्याच जगात प्रवेश केला. इथे तिला उंच, दुर-दूर पर्यंत पसरलेले, काळोखाने झाकोळलेले, हवेत तरंगणारे अनेक डोंगर,टेकड्या दिसत होत्या. त्याच काळोखात अनंत,असीम आकाशही तिला दिसलं. तिला क्षणभराने जाणवले कि या आकाशात तारेच नाहीत. पण एक आल्हाददायक सोनेरी काठांचा निळसर-जांभळट मंद प्रकाश सगळीकडे पसरलेंला आहे. तेवढ्यात तिला दूरवर एक आकृती चालताना दिसली. ती आकृती अगदी भव्य होती. त्या आकृतीसमोर कृष्णा जणू एका अणुसमानच.

त्या आकृतीला रंग-रूप नव्हते फक्त सावलीप्रमाणे एक आकार होता. ती सावध होऊन पुन्हा-पुन्हा त्या आकृतीला निरखू लागली. एका उंच डोंगरावरून ती आकृती हळुवार पाऊले टाकत चालत होती. त्या आकृतीच्या आसपास तिला असंख्य चमकदार बिंदू दिसले. सर्व बिंदू एक ठराविक अंतर ठेऊन त्या आकृती सोबतच पुढे पुढे सरकत होते जणू त्या आकृतीचा प्रकाशित ‘ओराच’. दूरवरून हे पाहणारी कृष्णा अनाहूत संवेदनांनी शहारू लागली आणि त्या जादुमयी दैवी जाणिवेत पुन्हा पुन्हा डुंबण्याचा अट्टहास करू लागली. त्या आकृतीशी तिचे काहीतरी गहिरे नाते तिला जाणवले. याचवेळी तिला दूरून आजीची हाकही ऐकू येऊ लागली. ‘’या भयाण, निर्मनुष्य, अनोळखी ठिकाणी आजी कशी ?’’ या विचारात असतानाच अचानक तिला आपलं शरीर आकुंचन पावत असल्याचं जाणवू लागल,ती आकसत होती. आकसून खूप सूक्ष्म होत होती. काही क्षणांनी ती आकसून कल्पनाही करता येणार नाही एवढी सूक्ष्म झाली आणि तिचं ते अत्यंत सूक्ष्मरूपी अस्तित्व एखाद्या चुंबकासारखे त्या भव्य दिव्य आकृतीभोवती असलेल्या एका अत्यंत छोट्या बिंदूकडे वेगाने खेचलं जाऊ लागलं. अगदी प्रकाशाच्या वेगाने ती त्या बिंदुकडे ओढली जाऊ लागली. या दरम्यान कृष्णाला आजीची हाक ऐकू येतच होती. ’’आजी ! अग मी इथेय .....मला वाचव....आजी मला वाचव !’’ ती ओरडण्याचा प्रयत्न करू लागली पण तिचा आवाज तिच्याच छातीत दडपला. आता मात्र तिचा जीव गुदमरू लागला. ती घाबरली. दरम्यान तो बिंदू तिला आपल्याकडे खेचतच होता; आणि ती ओरडतच होती....... ‘’आजी ! आजी ! ‘’

‘’अग कृष्णा ! ये बाळा ,जागी हो ’’ …कृष्णाला जाग आली, समोर तिची आज्जी होती. कृष्णाने गोंधळून विचारले, ‘’कुठे आहे मी ?’’

तिला तपासणारे डॉक्टर उत्तरा दाखल म्हणाले, ‘’तुम्ही रुग्णालयात आहात. तुम्हाला आणि वसुंधरेला विजेचा धक्का बसला होता. त्यानंतर तुम्ही दोघीही तब्बल दोन आठवडे कोमात होता‘’

’’कोमात !’’, ती मनातल्या मनात म्हणाली. ‘’म्हणजे मी आत्ता जे काही पहिले ते स्वप्न होते तर !’’ आपण स्वप्न पाहिलं या जाणिवेने तिला हायसं वाटले. आजीने तिच्या पाठीवरून मायेने हात फिरवला, आज आजीचा जिव अखेरीस भांड्यात पडला होता. दुसऱ्या दिवशी असाच कृष्णाचाही जीव भांड्यात पडला जेव्हा तिने वसुही कोमातून बाहेर आल्याचं ऐकलं.

वसू बरी झाल्याचे समजल्यावर सगळे तिला भेटायला गेले.

‘’काय वसू अग किती आळशी झालीस, इतका वेळ कोणी झोपत का ?’’ त्रिमूर्तिची चेष्टा ऐकून मंदस्मित करत वसु म्हणाली, ‘’खरच मला झोपेतून उठल्यासारखेच वाटतेय. मला एक स्वप्नदेखील पडले होते’’

‘’काय सांगते !, मी झोपेत पडलेल्या स्वप्नां बद्दल ऐकल होतं. आज पहिल्यांदा कोमात पडलेल्या स्वप्नां बद्दल ऐकतोय‘’ त्रिमूर्ति म्हणाला.या वक्तव्यावर सगळेच खळखळून हसले.

नंतर वसुंधरा तिला पडलेल्या स्वप्नाबद्दल सांगू लागली, पण जसं -जसं ती सांगू लागली तसं -तसं कृष्णाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले, तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होतं, वसुचे स्वप्न जसेच्या तसे कृष्णासारखेच होते. अगदी तंतोतंत सारखेच.

‘वसु आणि मला एकच स्वप्न कसे पडले ? त्या दिवशी नेमका शॉक कशामुळे बसला?’ ही प्रश्न आता तिला सतावू लागले. रहस्य काही केल्या उलगडेना. मात्र यात तमसचा कार्यभाग आहे हे राहून राहून तीला वाटू लागले. दरम्यान अपघातानंतर विश्रांतीसाठी म्हणुन डॉ.पाटवडेनी सगळ्यांनाच महिनाभराची सुट्टी दिली.

कृष्णाला सुट्टीवर असतानाही तमसचेच विचार सतावत होते. ती घरीही तिचे ‘क्यॅल्क्युलेशन’ करण्यातच मग्न राहिली. सुट्टीवर जाऊन काही दिवसच झाले असतील; तोच तिच्या ‘क्यॅल्क्युलेशन’ मधून तिला काहीतरी निष्पन्न होण्यासारखं जाणवलं पण तिला काही प्रयोग करून बघण्याची गरज भासू लागली .मग न राहवून एके रात्री अचानक ती सामाना सहित सरळ रिसर्च सेंटरला धडकली. त्रिमूर्ति आणि वसुलाही तिने ताबडतोब बोलावणे पाठवले. पुढच्या दोन दिवसांच्या परीक्षणानंतर तिसऱ्या दिवशी पाटवडे सरांच्या टेबलवर आपल्या परिक्षणांची नोंदफाईल कृष्णाने ठेवली. त्या फाईलमधील नोंदीने पाटवडे अवाक् झाले. ’’तुला म्हणायचं कि …’’ त्यांना मधेच तोडत कृष्णा म्हणाली, ‘’होय सर, ’तमस‘ म्हणजे कोणत्या तरी विशिष्ट पद्धतीने गोठवलेले पाणी आहे,’’

’’हे….पाणी आहे !’’ अचंबित होऊन डॉ. म्हणाले, ’’पण कृष्णा, जिथे तमस सापडला तिथे कमीतकमी 40° अंशाचे तापमान असते, मग हे पाणी या तापमानावर कसे गोठून राहू शकते?’’

‘’सर यावर कसलीतरी अनभिज्ञ प्रक्रिया केलेली आहे किंवा यामध्ये काहीतरी अपरिचित रसायन आहे जे याला या अवस्थेत ठेवत आहे ’’

‘’अज्ञात रसायन !’’ डॉ.उदगारले.

‘’हो सर.आता आणखीन एक ‘धमाकेदार’ गोष्ट ऐका’’ तिच्या धमाकेदार या शब्दावरचा जोर ऐकून पाटवडेंचे कान टवकारले,

’’सर तुम्हाला आईनस्टाइनचा सिद्धांत माहीत असेलच, E = mc2 ‘उर्जा’ न निर्माण केली जाऊ शकते न ती संपते, फक्त तिच एका उर्जेतून दुसर्या उर्जेत रुपांतर होते. हा ‘तमस’ आहे ना खरे तर एक प्रकारचे पाण्यापासून उर्जा निर्माण करणारे ‘डिव्हाईस’ आहे ‘’

पाटवडेंनी चक्रावून विचारले, ‘’तुला याच्या ‘मॅकॅनिजमचा’ शोध लागला ?’’

‘’दुर्देवाने नाही. पण हि उर्जा तेव्हाच निर्माण होते जेव्हा तमस चंद्रांच्या सानिध्यात येतो ’’ पाटवडेंचा प्रश्नार्थक चेहरा पाहून कृष्णा म्हणाली. ”मी नीट समजावते सर. त्यादिवशी जेव्हा वसु तमसला घेऊन टेस्टसाठी निघाली तेव्हा ती खिडकीजवळ पौर्णिमेचा चंद्र पाहत क्षणभर थांबली असावी. याचदरम्यान चंद्राची किरणं तमसवर पडून त्यातून उर्जा निर्मिती होऊन वसु आणि मला ‘shock’ बसला’’

‘’अग फक्त चंद्र-किरणं पडून उर्जा निर्मिती कशी होऊ शकते ?‘’.

‘’सर, तमसवर चंद्रकिरणे नाही तर चंद्राचे गुरुत्वाकर्षण काम करते. आणखीन धमाकेदार गोष्ट म्हणजे तमस जर पूर्णचंद्राला पूर्ण ‘एक्सपोज’ झाला तर किमान दोन दिवस आपले रिसर्च सेंटर सुरु राहिल एवढ्या उर्जेची निर्मिती तमस फक्त एका मिनिटात करू शकतो‘’. कृष्णा अत्यानंदाने म्हणाली. तिच्या सर्व गोष्टी ऐकून पाटवडे स्तब्ध झाले.

’’हे सगळे असे असेल तर ,कृष्णा आपल्या हाती काय लागलेय याची जाणिव आहे का तुला ?’’ ‘’हो सर, जर तमसचे जन्मठिकाण आणि त्याच्या शास्त्रीय संरचनेचा उलगडा झाला तर; आपल्यासाठी अक्षय ,अनंत आणि असिम उर्जेचं भांडार खुलेल ’’.

‘’हे शोध लागतील तेव्हा लागतील; पण सध्या तमस आपल्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकतो’’ काळजीयुक्त स्वरात डॉ.म्हणाले.

कृष्णा गोंधळली ‘’मी समजले नाही सर !’

‘’कृष्णा ! आज जगाला शाश्वत उर्जेपासून मिळणारी असिम शक्ती हवीय. जगातल्या अनेक चांगल्या वाईट उलाढाली ,अनेक युद्ध ;वेगवेगळ्या स्वरूपातील या उर्जेच्या प्राप्तीसाठीच सुरु आहेत. उद्या जगाला तमसबद्दल समजले तर बऱ्याच कुटील आणि कठीण परिस्थितीला आपल्याला सामोरे जावे लागेल ’’डॉ. पाटवडे समजावत पुढे म्हणाले, ‘’सध्या तरी तमसबद्दल कोणालाही काही ही कळू देऊ नको, सर्व प्रयोग गुप्त ठेव. तुझ्या सोबतच्या सर्व सहकार्यांना याबद्दल बजावून ठेव ’’.

‘’पण सर मला पुढील परीक्षणासाठी अद्ययावत यंत्रणा लागेल,एक विशेषज्ञाची टीम पण लागेल. कारण माझ्या प्राथमिक अंदाजानुसार तमस पृथ्विवरचा नाही. तमसच अद्ययावत् मेकॅनिझम पाहता; त्याला ज्याने कोणी तयार केले असेल तो कदाचित या ग्रहावरचाच नसावा’’ क्षणभर थांबून डॉ. म्हणाले, ‘’ठीक आहे मी आपल्या वरिष्ठांशी बोलतो’’ डॉ. पाटवडेंचा चेहरा आता एका अनामिक भीतीने व्यापला, खिडकीतुन त्या अनंत आकाशाकडे पाहत सुस्कारा टाकीत ते म्हणाले ‘’शेवटी आपण एकटे नाहीत तर’’

डॉ. पाटवडेनी वरिष्ठांशी बोलून पुढील परीक्षणासाठी ग्रीन सिग्नल मिळवला. तमसवर पुन्हा काम सुरु झाले. एके दिवशी सर्वजण कॅन्टीनमध्ये बसलेले असताना दुरदर्शनवर; मेक्सिकोत पेरूच्या उत्खननात सापडलेल्या तब्बल हजार वर्षापूर्वीच्या दोन एलियन ममींच्या संदर्भात एक बातमी झळकली. हाता-पायाला तीनच बोटे असलेल्या, मानव नसतानाही मानवासारखीच थोडीफार शरीर रचना असलेल्या या ममी पाहून संपूर्ण जग अचंबित झालं.

अर्थात या शोधावर जगातील इतर अनेक संशोधकांचा अविश्वास होता. कृष्णाच्याही चमुमधील अनेकजण या शोधावर शाशंक होते. सगळ्यांची यावर जोरदार चर्चा सुरु झाली. मात्र डॉ.पाटवडे काहीसे अस्वस्थ झाले. कृष्णाने जेव्हा त्यांना याबद्दल छेडलं तेव्हा डॉ. नजर टाळत आहेतअसं तिला जाणवलं; तेव्हा कपाळावरच्या आठ्या आवळत कृष्णा म्हणाली, ’’सर, मागे एकदा बिहार मधील नालंदा विद्यापीठाच्या पूर्वेला उत्खनन सुरु होत, तुम्ही इन्चार्ज होता. एके दिवशी हे उत्खनन अचानक गुंडाळून तो एरिया सील केला गेला, त्या वेळी खूप अफवा ऐकल्या मी. सर तुमच्या कडून अनेक उत्खानांचे किस्से ऐकले पण नालंदा उत्खाननाबद्दल एक शब्दही तुम्ही कधी काढला नाही......’’

आता डॉ.अधिकच अस्वस्थ झाले, पण कृष्णाने ही आपली री सोडली नाही. शेवटी कृष्णाच्या हट्टापुढे हार मानत डॉ. म्हणाले, ’’कृष्णा नालंदाच्या उत्खाननांत आपल्यालाही काही मानवसद्रुश्य सांगाडे सापडलेत. त्यांच्यावर परीक्षण सुरु आहे’’, उसासा घेत ते म्हणाले, ‘’आम्हाला शंका आहे कि ते परग्रहवासीयांचे सांगाडे आहेत ’’

‘’सर तुमचा यावर विश्वास आहे ?’’ कृष्णाच्या या प्रश्नावर डॉ. म्हणाले ‘’कृष्णा, जसे तुझे क्षेत्र असिम शक्यतांनी भरलेले आहे, तसेच आमचेही क्षेत्र अनेक रहस्यांनी भरलेले आहे. ज्याकाळी यंत्र- तंत्र अस्तित्वातच नव्हते त्याकाळी विशालकाय पिऱ्यामिड्स इतक्या अचूक संरचनेने कसे बांधले गेले असतील, हजारो टनांचे दगड इकडून-तिकडे कसे हलवले असतील. आपल्या भारतातही काही मंदिर आजही आम्हाला अचंबित करतात. ना सिमेंट, ना वाळू,ना माती ना चुना; केवळ खाच्यात रचून बांधलेली ही मंदिरे, हजारो वर्ष झाली तरी ऊन-वारं, पाऊस-पाणी, एवढंच काय तर भूकंपांनाही पुरून उरली आहेत. अजूनही हजार वर्ष टिकू शकणारी आहेत. कुठून हे तंत्र-कौशल्य आलं ? अजंठा-एलोरा, कैलाश-लेण्या बघ; एका सबंध शिळेतून वरून खणत साकारलेले हे मंदिर एक आश्चर्यच नाही का !. इतिहासाची आणि पुरातत्वाची कितीतरी रहस्ये आम्ही अजूनही सोडवू शकलेलो नाहीत. म्हणून माझा कशावरही अविश्वास नाही. अर्थात काही गोष्टी संवेदनशील असतात. अश्या गोष्टी गुप्तच ठेवाव्या लागतात ‘’.

‘’सर मला एवढच सांगा या सांगाड्यांचा संबध तमसशी आहे का ?’’

‘’बहुतेक !’’ पाटवडेचं उत्तर ऐकून कृष्णाचे डोळे चमकले.

काही दिवसांनी निष्कर्षांचे काही आखाडे बांधून कृष्णा आपल्या चमूला आणि काही निवडक लोकांना घेऊन नालंदाच्या त्या ‘सिल्ड’ ठिकाणी गेली. ‘’आज कोजागिरी पोर्णिमा आहे मी डॉ.पाटवडेना ‘कन्वेंस’ करून तमसला इथे आणले आहे. आज मला प्रत्येक शक्यता पडताळून पहायची आहे.’’ कृष्णा म्हणाली.

सर्वजण उत्तेजित झाले. दोन तासांच्या प्रतीक्षेनंतर पूर्ण चंद्र ऐन भरात आला. कृष्णाने काळजीपूर्वक तमसची पेटी उघडली. हळू हळू चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव तमसवर होऊन तो चमकू लागला. अर्थात तमसच चमकणं काही नवीन नव्हत कारण गेली दोन वर्ष असे परीक्षण त्यांनी अनेकवेळा करून पाहिले होते. मात्र माहिन्यापूर्वी वसु आणि कृष्णाला कोमात असताना पडलेल्या स्वप्नासारखं स्वप्न त्यांना पुनः कधीच पडलं नाही. आज मात्र तमस नेहमीपेक्षा वेगळा आणि अधिक तेजाने चमकू लागला. त्याची ‘हि’ प्रतिक्रिया नवीन होती. सगळे स्तब्ध होऊन त्याच्याकडे पाहत होते, क्षणातच त्यातून विजेप्रमाणे डोळे दिपवणारे किरणं निघून ते इतके तीव्र झाले कि सगळ्यांनी आपले डोळे घट्ट बंद केले, क्षणभराने डोळे उघडलेल्या वसुची नजर समोर गेली. जरासी भेदरून समोर एकटक पाहत वसु जवळच डोळे किलकिले करणाऱ्या कृष्णाला म्हणाली. ‘’मॅम ते पहा !’’

समोर तेच दृश्य होतं. स्वप्नात जी जागा त्या दोघींनी पहिली होती. ही ‘तीच’ जागा होती. भवतीने तेच जांभळट-काळे ताराका विरहीत आकाश. काळे-कर्डे, उंच हवेत तरंगणारे तेच पर्वत आणि दुरून दिसणारी तीच अवाढव्य आकृती, त्या आकृती भोवती तेच चमकणारे बिंदू. कृष्णाला जाणवलं की वसु आणि तीच्या शिवाय तिथे आणखीन दोन माणसं होती. ही दोन माणसे तिने साइटवर आलेल्या लोकांमधलीच होती. त्यांना तिथे पाहून कृष्णाचे डोळे काहीतरी साध्य झाल्यासारखे चमकले; पण आश्चर्य म्हणजे या दोन व्यक्ति बेशुद्ध होत्या. ते शुद्धीवर का नाहीत हा प्रश्न दोघींना पडला. थोडं भानावर आल्यानंतर दोघीनीं त्या आकृतीच्या दिशेने कूच केली. लांबूनच भव्य दिसणारी ती आकृती जवळून अधिकच अवाढव्य दिसू लागली. किती मान उंच केली तरी त्या आकृतीचा आरंभ दिसेना. त्या आकृतीकडे कुतूहलाने पाहत असतानाच पुढच्याच क्षणी त्या दोघींना जाणवलं कि, ती आकृती त्यांच्याकडेच पाहत आहे. दोघींना दरदरून घाम फुटला. पाहता पाहता ती आकृती छोटी होऊन अगदी त्यांच्या एवढीच झाली. अजूनही त्या आकृतीला रूप नव्हते. एवढेच जाणवत होते कि ही आकृती मानवासारखीच आहे. ती आकृती त्यांच्या जवळ येऊन मानवी आवाजातच बोलू लागली. ‘‘मानव’ अनंत शक्तीची सर्वोत्तम आणि प्रिय कलाकृती. तुमचं स्वागत आहे’’

सगळं धैर्य एकवटून कृष्णा म्हणाली. ‘’आम्ही कुठे आहोत? आणि तुम्ही कोण आहात?’’

ती आकृती हसून म्हणाली. ‘’उत्सुकता !’, ‘मानवाची उत्सुकता’ त्याच्या प्रगतीचं आणि अधोगतीचही कारण. असो तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तुम्ही कुठे आहात ते ?’’

दोघींनी मान हलवली.

‘’पण त्याआधी तुम्हाला; तुम्ही कोण आहात हे जाणून घ्यावं लागेल‘’ ती आकृती म्हणाली.

‘’आम्ही मानव आहोत’’ वसु घाई-घाईने म्हणाली. पुन्हा ती आकृती मोठ्याने हसून म्हणाली, ‘’बघा,... नीट बघा तुम्ही कोण आहात ते’’

त्या आकृतीने त्यांचे हात हातात घेतले आणि क्षणात, दोघींच्याहि अंतःचक्षुत त्यांना जाणवलं की ते ब्रम्हांडात आहेत. अनंत ,अपरिमित, असिम अश्या ब्रम्हांडात. इथे त्यांचं अस्तित्व अणुपेक्षाही सहस्त्रपटीने छोटे होते. त्या आकृती भोवती फिरणारे असंख्य बिंदू म्हणजे असंख्य आकाशगंगा होत्या. इथे पृथ्वीचा आकार पाहून कृष्णा अचंबेने उदगारली, ‘’आपल्या पृथ्वीवरचा सगळ्यात छोटा आणि अंतिमतः पार्टिकल हा देवकण मानला जातो; पण इथे पृथ्वीच देवकणा प्रमाणे भासतेय म्हणजे ….’’ पुढचं वाक्य वासुने पूर्ण केले, ‘’म्हणजे इथे ‘अनंत’ ही परिभाषाही तोकडी पडतेय’’

कृष्णा स्वतःशीच बडबडली ‘’खरंच आपण कोण आहोत?’’

ती आकृती म्हणाली, ’’थोड्यावेळापूर्वी तुम्हीच म्हणालात ना तुम्ही मानव आहात म्हणून ! ’’

‘’हो पण आता प्रश्न पडलाय आम्ही खरे कोण आहोत?‘’

‘’शोधा म्हणजे सापडेल. पण काय शोधायचे हे मात्र तुम्हाला माहित असले पाहिजे.आता तुमची जाण्याची वेळ झाली,’’ आकृतीने त्यांचे हात सोडले.

‘’पण मला काही प्रश्न पडलेत’’ कृष्णा घाई-घाईत बोलली. ‘’माझ्यासोबत आलेले ही लोकं शुद्धीत का नाहीत ?’’

यावर ती आकृति म्हणाली ,’’ज्यांना स्वतःचा शोध लागलेला असतो तेच इथे शुद्धीवर राहू शकतात.’’

‘’म्हणजे ?’’

‘’म्हणजे ज्यांची मन:शक्ति प्रबळ आहे,ज्यांच्या कुंडलिनी जागृत आहेत ते !‘’

मला तुम्हाला पुन्हा भेटायचं असेल तर,’’ कृष्णाने परत घाईने विचारले.

‘’ती आकृती पुन्हा हसून म्हणाली, मी तुझ्यासोबतच तर आहे.’’ असं म्हणून ती आकृती पुन्हा मोठी होऊ लागली. त्यामधून एक तेजोमय प्रकाश निर्माण होऊन तो इतका तीव्र झाला कि दोघींनी डोळे बंद करून घेतले.

काही क्षणांनी त्यांना त्रिमूर्तिचा आवाज ऐकू येत होता.

’’मॅम कसं वाटतंय आता ?’’. कृष्णाने डोळे किलकिले करून पाहिलं तर ती परत रुग्णालयात होती. तिने त्रिमूर्तिला इतर लोकांबद्दल आणि वसुबद्दल विचारलं.

‘’सगळे OK आहेत आणि वसु आणखीन कोमा मधून बाहेर आली नाही’’

‘’ओके ’’ कृष्णाने एक दीर्घ श्वास सोडला.

‘’ मॅम तुम्ही दोघीही परत कोमा मध्ये होता.अस वाटतंय जणू तुम्ही दोघींनीही कालांतराने कोमात जाण्याची ‘कॉम्पिटिशनच’ लावली आहे‘’

यावर कृष्णा हसत म्हणाली, ‘’म्हणजे ही कॉम्पिटिशन मी जिंकले तर .. बाकी वसुची तू नको काळजी करू. ती लवकरच येईल शुद्धीवर ’’

‘’तुम्ही तर असं बोलताय जणू तुम्हाला भविष्य माहित आहे,

‘’होय मला भविष्य माहीत आहे.....’’ कृष्णा क्षणभर आपल्याच तंद्रीत हसली आणि त्रिमूर्तीकडे पाहून म्हणाली

‘’अरे ! मी खूप छान स्वप्न पाहिलं. त्यात मला दिसलं कि वसु लवकरच शुद्धीवर येणार आहे,

मी स्वप्नात आणखीन काय पाहिलं माहितेय’’

‘काय ?’’ ,

’’कि मी ब्रम्हांडाच रहस्य उलगडतेय.. ‘सीक्रेट’…. ’’

‘’काय सांगता…मग हे रहस्य उलगडलं तुम्हाला ? ‘’

‘’हो ! अहं ब्रम्हास्मि. माझ्यात ईश्वर आहे आणि ईश्वरात मी. आपण सगळेच अद्वैत आहोत’’ त्रिमूर्ती गोंधळला मॅमच्या डोक्यावर परिणाम झाला आहे असं वाटून तो ; ‘’आता तुम्ही आराम करा’’ म्हणून तिथून निसटला.

या प्रसंगानंतर तब्बल एक वर्ष उलटून गेले, नालंदाच्या त्या साइटवर पुन्हा पुन्हा प्रयोग झाले पण ; त्या रात्रीसारखं टेलेपोर्टेशन पुन्हा कधीच घडलं नाही. कृष्णा ,वसू टेलेपोर्ट होत होत्या पण त्या आकृतीशी त्यांची भेट पुन्हा झालीच नाही. अथक संशोधन आणि अभ्यासानंतर शेवटी तिने काही निष्कर्ष पक्के केले. अंतरीक्ष संस्थेचे अध्यक्ष के.सरण आणि इतर सभासदां समोर हे निष्कर्ष मांडताना ती म्हणाली, ‘’सर माझ्या संशोधन आणि अभ्यासांती ;असा निष्कर्ष आहे कि, तमस एक प्र्कारचं ‘पोर्टल डिव्हाईस’ आहे, म्हणजे एका अवकाशातून दुसऱ्या अवकाशात किंवा एका अंतराळाच्या टाइम लाईन मधुन दुसऱ्या अंतराळाच्या टाईम लाईन मध्ये घेऊन जाणारे पोर्टल’’

के. सरण हसले, ‘’यू मीन टाईम-ट्रॅव्हलिंग ! तू चेष्टा तर करत नाहीस ना आणि यापूर्वी तर तू म्हणाली होतीस; कि तमस उर्जा निर्माण करणार सयंत्र आहे म्हणून‘’

‘’सर हे खरच आहे कि तमस जी शक्ती निर्माण करतोय त्याला आपण इथे उर्जा म्हणतो, आणि ती ऊर्जा आपण आपल्या कामासाठी इथे उपयोगातही आणू शकतो..पण खरं तर यासोबत तमस प्रकाशाची गतीही निर्माण करतो’’ आपले म्हणने पुढे रेटत कृष्णा म्हणाली, ’’सर ‘थ्योरी ऑफ रीलेटीव्हीटी’ सांगते कि, वेळ अर्थात ‘टाईमवर’ गतीचा परिणाम होतो, म्हणून वेळ सापेक्ष आहे. यानुसार जर प्रकाशाच्या गतीने जाणारे एखादे साधन आपण तयार करू शकलो, तर ‘टाईम-ट्रॅव्हलिंग’ शक्य आहे’’

‘’तुला माहितेय ना, प्रकाशाची गती किती आहे ?’’

‘’सर साधारण तीन लाख किलोमीटर प्रतिसेकंद’’

‘’हं ! आणि म्हणून प्रकाशाच्या गतीने जाणारे असे एखादे साधन आपण तयारच करू शकत नाही,’’

‘’मान्य सर, आपण म्हणजे ‘पृथ्वीवासीय’ हे तयार करू शकणार नाहीत;पण ब्रम्हांडात आपण एकटेच आहोत हे छातीठोक पणे आपण सांगू शकतो का ? जर नाही सांगू शकत तर आपल्या व्यतीरिक्त जे कोणी असतील ते आपल्यापेक्षा बुद्धिमान आणि अत्यंत पुढारलेले नसतील हे तरी कशावरून सांगता येईल ? कदाचित ‘त्यांनी’ अशी मशीन बनवण्यात यश मिळवलं असेल’’ ती पुढं म्हणाली, ‘’सर मला आणि वसुला कोमात एकच स्वप्न पडले पण माझ्या मते ते स्वप्न नव्हते. आम्ही त्या पोर्टल मार्फत एका अपार मोठ्या अश्या कृष्णविवरात होतो’’

पुन्हा उपस्थितांमधे हशा पिकतो ‘’कशावरून ते कृष्णविवर होते ?,आणि तुम्ही तर कोमात होता, म्हणजे तुम्ही शरीराशिवाय टाईम-ट्रॅव्हलिंग केलं कि काय ,परत हाही प्रश्न उरतोच कि; का तुम्ही दोघीच त्या पोर्टल मध्ये जाऊ शकलात ?’’

’’सर ते कृष्णविवरच असावे. कारण त्यात कुठेच तारे नव्हते. फक्त काळंकुट्ट आकाश होते. ब्रम्हांडाबाबत अनेकांनी अनेक सिद्धांत मांडलेत त्यात एक सिद्धांत असाही आहे कि आपल्या आकाशगंगे सहित अनेक आकाशगंगा या एका प्रचंड मोठ्या कृष्णविवरात स्थित आहेत. आणि आता आम्ही दोघी शरीराशिवाय कसे जाऊ शकलो, तर मुळात एक मानवी शरीर प्रकाशाच्या गतीने प्रवास करूच शकत नाही.असा प्रयत्न जरी केला तरी, पहिल्याच क्षणात मानवी शरीराच्या चिंधड्या उडतील. त्यामुळे तमस फक्त शरीरातली चेतना पोर्ट करत असावा‘’ ‘’याला काही प्रमाण?’’ एकाने विचारले.

“नाही सर.... ’’

‘’मग का तू आमचा वेळ अश्या मनघडंत निष्कर्षांवर वाया घालवते आहेस. मिटिंग संपवूया आता’’

पण कृष्णा हार न मानता म्हणाली, ‘’ठीक आहे सर, मिटिंग संपवूयात पण त्या आधी जर तुम्ही मला ‘मन’ म्हणजे नक्की काय असतं, शरीराला जिवंत ठेवणारी ‘चेतना’ नेमकी काय असते, याचं ‘प्रूफ’ देवु शकाल का ? हजारो वर्षांपासून सर्वच जाती-धर्मात,अध्यात्मात,रुजलेली आत्मा किंवा ‘सोल’ हि संकल्पना कशी सिद्ध करू शकाल तुम्ही. ‘स्वप्न’ ती नेमकी डोळे बंद असतानाच कशी दिसतात नुसत्या कल्पनांनी ती कशी बुद्धीच्या पटलावर आकाराला येतात,

आणि सर्वात महत्वाच हे कि, हे मन, आत्मा, सोल, चेतना ,स्वप्न यांना शास्त्रीय समीकरणात कसे बांधाल सर, आणि शेवटी… ‘अवकाश’ अनंत आहे अस आपण म्हणतो पण अनंत म्हणजे नेमकं काय ? या अनंताचा आदि कुठे आहे ? कुठपर्यंत अनंत आहे ? या सर्व प्रश्नाची उत्तरे द्या, मग आपण मिटिंग संपवूयात’’

तिच्या या शेवटच्या षट्काराने सर्वच क्लीन-बोल्ड झाले.

‘’पण कृष्णा तमसच्या बाबतीत अजूनही एक प्रश्न उरतोच, तमसने तुम्हा दोघींचीच निवड का केली?’’

एक दीर्घ श्वास घेत कृष्णा म्हणाली, ’’सर जेव्हा हा प्रश्न मलाही पडला तेव्हा मी अनेक शक्यता पारखल्या या अनेक शक्यतांमधली एक शक्यता मला जास्त संभावित वाटते.’’

कोणती ?

‘’सर जे जे तमसच्या सनिध्यात आले त्यांमध्ये केवळ मी आणि वसुच जरा वेगळ्या होतो’’.

‘’वेगळ्या ? कश्या ?’’

कृष्णा थोडी अस्वस्थ झाली, तिने हलकेच पाटवडे सरांकडे पाहिले तिच्या सूचक नजरेने पाटवडे सर समजून चुकले .

तिच्या चुप्पी वर पुनः उपस्थितांनी तिला टोकलं तसं एक निश्चयी निश्वास सोडून तिने उत्तर दिले

‘’कारण सर मी ‘ती’ कृष्णा असण्याच्या आधी ‘तो’ कृष्णा होते ‘’

‘’म्हणजे ! ‘’ उपस्थितांना काहीच ताळमेळ लागला नाही .

‘’म्हणजे सर मी एक ट्रान्सजेंडर आहे.’’

तिच्या या उत्तरावर सभे मध्ये एकदम शांतात पसरली .

या शांततेचा भंग करत पाटवडे सरांचा आवाज घुमला

‘’आणि वसु अर्थात वसुंधरा पुढच्या महिन्यात ऑपरेशन करून; ‘ती’ वसुंधरचा, ‘तो’ वसंत होणार आहे’’

पाटवडेंच्या या व्यक्तव्याने जणू सभेत भूकंपच आला. बऱ्याच जणांचे चेहऱ्याचे हावभाव बदलले. हे हावभाव पाहून कृष्णा अस्वस्थ झाली तिची ही अस्वस्थता निरखत पाटवडे सर पुनः उपस्थितांना उद्देशून म्हणाले ‘’आपल्या रीसर्च संस्थेत फक्त बुद्धितमत्ताच कामाची आहे मंडळी या पलीकडे कोणी पक्षपाती विचार करत असेल तर त्याने आपली बौद्धिक दिवाळखोरी जाहीर करावी ’’

पाटवडे सरांच्या या एकाच वाक्याने सभेतले नकारात्मक संभ्रमतेचे काळे ढग निचरू लागले.

सगळे शांत बसलेले पाहून कृष्णाच पुढे बोलली.

‘’सर या शक्यतेची खात्री तपासण्यासाठी मी नालंदाच्या साइटवर काही निवडक लोकं घेऊन गेले होते त्यापैकी ज्या दोन व्यक्ति ट्रान्सजेंडर होत्या त्याच आमच्यासोबत त्या पोर्टल मध्ये येऊ शकल्या.अर्थात ते वसु आणि माझ्यासारखे तिथे शुद्धीवर नव्हते’’

‘’का ?’’

‘’नाही माहीत सर’’ परत सभेत पिन ड्रॉप शांतता पसरली. शेवटी शांततेचा भंग करत एकाने कुत्सिकपणे विचारलंच ‘’म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का; की फक्त तृतीयपंथीच टाइम ट्रॅव्हल करू शकतात’’

त्यांचा कुचेष्टेचा स्वर ऐकूनही संयम राखत कृष्णा म्हणाली. ’’हो ! किमान तमसच्या संदर्भात तरी सध्या ही एकच मोठी शक्यता, एक मोठी संभावना असू शकते अर्थात मी हे सिद्ध करू शकत नाही’’

हे ऐकून पुनः त्याच कुत्सिक स्वरात एकजण म्हणाला ‘’आपण विज्ञानाच्या जगात राहतो, इथे जे सिद्ध नाही ते मंजूर नाही’’

यावर कृष्णाला हतबल होताना पाहून पुनः डॉ.पाटवडे मोर्चा संभाळत म्हणाले ‘’विज्ञान प्रयोगांनी सिद्ध होतं आणि प्रयोग हे संभावनांवरच आधारलेले असतात मंडळी. इथे कृष्णाची ही संभावना मुळीच नाकारता येत नाही की तमस फक्त तृतीयपंथीयांनाच टेलेपोर्ट करू शकतो कारण ज्यांनी तमसची निर्मिती केली आहे त्या परग्रहवासीयांमद्धे कदाचित स्त्री आणि पुरुष हा भेद च नसेल कदाचित तिथे नर-मादा या वेगवेगळ्या जाती नसतीलच. कदाचित ही दोन्ही तत्वे त्यांच्या एकाच शरीरात समाईत असतील’’

‘’you mean उभयलिंगी !’’

‘’Yes ! आपल्या पृथ्वीवरही असे उभय लिंगी सजीव सापडतातच की जसं काही गोगलगायी आहेत, हॅम्लेट मासा आहे. क्लाउनफिश नर मासा तर स्वतःचं रूपांतर मादी मशयातही करू शकतो. अगदी वनस्पति मध्येही जास्वंद ,गुलाब टोमॅटो ही उभयलिंगीच असतात. अगदी तसंच तमसच्या ग्रहावरील सगळेच सजीव उभय लिंगी असतील तर ! आणि डॉ. साहू नालंदा मध्ये जे एलियन सांगडे आपल्याला सापडले होते त्यांच्या लिंगाविषयी अशीच संदिग्धता निर्माण झाली होती. त्यावेळी आपणही अशीच शक्यता वर्तवली होती, आठवतंय ?’’

सभेत उपस्थित डॉ.साहूंनी होकारार्थी मान हलवली आणि कृष्णाने अर्धी लढाई इथेच जिंकली. पुढच्याच क्षणी नव्या उर्जेने तिने एक मागणी सगळ्यांसमोर ठेवली तिच्या या मागणीवर बराचवेळ वाद विवादाचे गुऱ्हाळ सुरु राहीले पण शेवटी तिची मागणी पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आज कृष्णा,वसु ,त्रिमूर्ती आणि तिचे इतर काही तज्ञ सहकारी शटल मध्ये बसून प्रचंड गुरुत्वाकर्षण शक्तीच्या शोधात निघाले. आज त्यांच्यासोबत तमसही होता. तिने सभेपुढे तमसला अवकाशात घेऊन जाण्याचीच मागणी ठेवली होती. एखाद्या ग्रहाच्या प्रचंड गुरुत्वाकर्षण शक्तीच्या सानिध्यात तमसला घेऊन जाऊन, सदेह आपण टेलेपोर्ट होऊ शकतो का ? आणि झालो तर आपण कुठे कुठे टेलेपोर्ट होऊ शकतो ? या सगळ्या प्रश्नांची कुलुपं शोधायला ती निघाली होती ‘तमस’ नावाची चावी घेऊन. पृथ्वीवर आलेले एलियन सदेहच आले होते, आणि ही एक मोठी आशा उत्पन्न करणारी गोष्ट होती. आपण एका प्रचंड थरारक कामगिरीवर निघालो आहोत या जाणिवेने तिच्या अंगावर रोमांच फुलू लागले. अश्या वेळी त्रिमूर्ती मात्र थोडा चुळबुळ करू लागला.’’ मॅम माझे काही प्रश्न आहेत..’’

‘’मॅडम माझे पण काही प्रश्न आहेत..’’ इति वसु

कृष्णा म्हणाली, ‘’ जे प्रश्न पडले आहेत ते एक एक करून विचारा बरं’’

क्षणाचीही उसंत न घेता वसुने कृष्णाला शंका विचारली, ‘’मॅम, तमस नालंदाच्याच साईटवर कसा काय ‘ओपन’ झाला ?’’

’’याचे उत्तर डॉ.पाटवडेना नालंदा मध्ये सापडलेले एलियन सांगाडेच देतात. कार्बन रेटिंगने समजले कि किमान पाचव्या शतकाच्या उत्तरार्धात मृत पावलेल्यांचे हे सांगाडे आहेत. शक्यता आहे कि पृथ्वीवर त्याही आधी एलियन तमसच्या माध्यमातून आले असतील आणि नालंदाचेच कोर्डिनेट तमस मध्ये फिक्स असावेत’’

‘’पण मॅडम लॅब मध्ये एकदा आपल्याला शॉक बसलेला,आपण तेव्हाही कोमात गेलो होतो,त्यानंतर आपण प्रयोगादरम्यान किती तरी वेळा तमस कडून शॉक बसून घेतले किती तरी वेळा टेलेपोर्ट झालो.?’’

‘’ प्रथम मलाही असंच वाटलं, पण पहिल्या वेळी आणि अगदी त्यानंतरही प्रत्येक वेळी आपण एकाच ठिकाणी असूनही एकमेकींना दिसलो नाहीत कि भेटलो नाहीत.थोडा विचार केल्यावर मला असं जाणवलं कि प्रत्येक वेळी आपली चेतना त्या पोर्टलशी कनेक्ट झाली नाही. आपलं टेलेपोऱ्टेशन एखादा TV बघितल्या सारखं जाणवत होतं .. म्हणजे दूरचित्रवाणीसारखं . तमस आपल्याला फक्त पोर्टल दाखवत होतं त्यात आपला सक्रिय सहभाग होऊ देत नव्हता. त्या पोर्टलमध्ये आणि आपल्या मध्ये जणू काच असलेली एक अदृश्य खिडकी होती ;पण नालंदाच्या साइटवर त्या कोजागिरीच्या रात्री विपरीत घडलं.आपण त्या अज्ञात ठिकाणी प्रत्यक्ष होतो. आपण एकमेकाना भेटलो ,बोललो अगदी एकमेकांचे स्पर्श ही जाणवले आपल्याला, आपलं शरीर हॉस्पिटल मध्ये होतं तरीही या संवेदना आपल्याला जाणवत होत्या हे काहीतरी अनाकलनीय होतं, थोडं अधिक डोकं लावल्यावर लक्षात आलं कि हे फक्त नालंदा मध्येच घडू शकत होतं’’

‘’कसं काय ?’’ वसु सोबत त्रिमूर्तीनेही डोळे विस्फारले.

‘’कारण तमस मध्ये नालंदाचेच कोर्डिनेट फिक्स असल्यामुळे टेलेपोर्ट होण्याचा अधिकारीक दरवाजा हे नालंदाच होतं’’

‘’पण मग नंतर हे कोर्डिनेट काम का केले नाहीत ?’’

‘’खरं सांगू का तुम्हाला याचं कोडं मला अजूनही सुटलं नाही. मला खरंच माहीत नाही असं का घडलं ते .. आशा करुयात या प्रवासात आपल्याला आपल्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे मिळतील’’ .

‘’पण मॅडम नालंदाच का?’’ त्रिमूर्तीचा मागोमाग प्रश्न.

‘’कारण ‘ज्ञानाची भूक’, म्हणजे पाचव्या शतकात नालंदा विद्यापीठ हे ज्ञानार्जनाचे सर्वात मोठे वैश्विक केंद्र होते.,कदाचित ज्ञान मिळवण्यासाठी हे एलियन पृथ्वीवर आले असतील’’

‘’पण मॅम ते सशरीर कसे आले असतील?’’

‘’कारण भलेही दिसायला ते मानवासारखे होते पण त्यांच्या शरीर-संरचनेत काही अनभिज्ञ रसायने सापडली आहेत, आता ही रसायने उपजत होती कि नंतर टेलेपोर्ट साठी शरीरात ऑब्जर्व केली गेली होती हे समजायला कठीण आहे’’

‘’पण मग, तमस सिंधु खोऱ्यात कसा पोहोंचला ?’’

‘’कदाचित तमसची चोरी झाली असावी.तमस दिसतोही दुर्मिळ हिऱ्यासारखा’’

‘’मॅम, आपण एक-दोन आठवडे कोमात जात होतो, स्वप्नात मात्र हीच वेळ पाच ते दहा मिनिटांचीच होती असं कसं काय ?‘’

यावर कृष्णा म्हणाली. ‘’अग अवकाशात गुरुत्वाकर्षण कमी असल्याने तिथे वेळ जलद चालतो म्हणून अस घडलं ’’

‘’मॅम आता शेवटचा एकच प्रश्न आताच्या या मिशनचं आपण नाव काय ठेवायचं ?‘’

यावर कृष्णा दृढतेने म्हणाली, ‘’मिशन तमसो मा ज्योतिर्गमय ‘’

...................................................समाप्त .. .................................................

About the Competition

Hashtag Kalakar's Poetry and Creative Writing Competition 2026 is a prestigious event that celebrates diverse literary talents. It provides a platform for writers from around the world to showcase their creativity across various genres, including poetry, short stories, and essays. The competition encourages participants to push the boundaries of their imagination and share unique stories with a global audience.

We extend our gratitude to Shivleela Shivpuje for her intriguing submission, "Tamaso maa jyotirgamay," part of the 2026 competition. Her story offers a remarkable journey through the unknown, beautifully blending elements of science fiction with philosophical musings. We appreciate Shivleela's contribution and look forward to more of her creative endeavors.

About Hashtag Kalakar

Hashtag Kalakar is a creative platform dedicated to providing artists, writers, singers and other creative talents with opportunities to showcase their work and reach wider audiences through competitions, features and creative initiatives.

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page