Selfi with chita - By Rashmi Kolage
Written By: Rashmi Kolage
Category: Short story
Competition: Poetry and Creative Writing Competition 2026
Rashmi Kolage brings to the stage a gripping short story titled "Selfi with chita," presented as a part of the Poetry and Creative Writing Competition 2026 organized by Hashtag Kalakar. This competition offers a platform for creative minds to showcase their literary talents. Rashmi's submission weaves a narrative that delves into the mysterious ambience of an eerie night, capturing the reader's imagination with its suspenseful and evocative storytelling.
About the Work
"Selfi with chita" immerses readers in a chillingly atmospheric tale set against the backdrop of a moonless night. The story unfolds as two characters embark on a journey that takes a turn for the mysterious. Rashmi Kolage skillfully crafts a narrative filled with suspense and unexpected twists, exploring themes of fear, curiosity, and the unknown. The vivid imagery and engaging dialogue enhance the eerie mood, leaving readers with a lingering sense of unease.
Selfi with chita...
Original Submission by Rashmi Kolage
सेल्फी विथ चिता
अमावस्येची रात्र होती. किर्रर्र अंधार. दिवसाला गिळून टाकणारा अंधार जरी शांत दिसत असला तरी अनंत गोष्टी या अंधाराच्या गर्भात धडधडत असतात. ज्या मानवाच्या आकलनाच्या फार दूर असतात. अशीच ती एक रात्र होती.
“अरे यार! खूप उशीर झालाय आज, कसं करायचं? वेळेत जर नाही पोहोचलो तर घरमालक गेट उघडायचा नाही”, चिंतेच्या सुरात रजत बोलला.
“ एक काम करू आतल्या रस्त्याने जाऊ, लवकर पोहोचू”, करण म्हणाला.
“आतल्या रस्त्याने! ”, असं रजतने म्हणताच करणने गाडी त्या रस्त्याने वळवली.
“तू कधीपासून घाबरायला लागलास रे!फट्टू”, असं म्हणत करण आणि रजत दोघेही त्या सुनसान रस्त्याने रात्रीचे उशीरा घराकडे निघाले.
रजत आणि करण पुण्याच्या आय टी कंपनीत कामाला होते. दोघेही तरुण, हुशार आणि डॅशिंग मुलं. पुण्यात एका भाड्याच्या खोलीत दोघेही एकत्र राहत होते.
त्या दिवशी ऑफिसमध्ये उशीर झाला म्हणून दोघांनाही तो मधला मार्ग निवडावा लागला. तसे ते रोजच तिथून जायचे. दोघेही गाडीवर गप्पा मारत चालले होते. त्या रस्त्याच्या एका वळणावर एक छोटा पूल होता. त्याला तुटलेला कठडा होता आणि त्यादिवशी तिथून जाताना कडेला एक चिता जळत होती. आजूबाजूला कोणीच नव्हतं. दोघांना काय हुक्की आली माहित नाही. करण म्हणाला, “अरे अमावस्याची रात्र, किर्रर्र अंधार, त्यात हे झुळझुळ वाहणारे पाणी, काय मस्त वातावरण आहे!चल काहीतरी मज्जा करू”.
“ मज्जा! आणि इथे! बावचळला का रे? इथे काय डोमल्याची मज्जा करणार?”, रजत म्हणाला.
“ मला एक कल्पना सुचतेय, चल आपण चितेसोबत सेल्फी काढू”, करण उत्साहात म्हणाला.
“ काय? काहिही का? नको रे चल सरळ. आधीच अमावस्या आहे आणि त्यात हे उपद्रव नको बघ”, असं म्हणून रजत गाडी चालवत राहिला.
“ अरे थांब रे, ऐक माझं, चल मस्त सेल्फी घेऊ”, असं म्हणून करण आणि रजत दोघांनी पण गाडी थांबवली. दोघेही अति उत्साहात चिते जवळ गेले आणि पटापट 2/4 सेल्फी घेतल्या.
“ बघ काय झालं? उगाच नको नको म्हणत होता, चल आता”, असं म्हणत करण निघायला वळला तसंच त्याला त्याचं नाव कोणीतरी घेतल्याचं कानात ऐकू आलं. त्याने दचकून मागे वळून पाहिलं तर कोणीच नव्हतं. पण आवाज त्याने नक्की ऐकला होता.
“ रजत, ऐक ना तू हाक मारली का रे मला?”,
“ काय! हाक आणि तुला? सोबत आहेस तू माझ्या, मी कशाला हाक मारू? चल”, असं रजतने करणला म्हणताच पुन्हा रजतला पण त्याच्या नावाची हाक ऐकू आली. आता मात्र दोघेही जरा घाबरले. दोघांनी मागे वळून पाहिलं.
किर्रर्र अंधार, जळणारी चिता, रातकीड्यांचा आवाज आणि झुळझुळ वाहणारं पाणी एवढंच होतं तिथे. दोघांना काहितरी वेगळं वाटलं आणि दोघेही तिथून लगबगिने जायला निघाले. जसे गाडीवर बसले तशी गाडीचं सुरु होईना. एरवी कुठेही नं घाबरता फिरणारे दोघेही आज मात्र आतून घाबरले होते, पण एकमेकांना सांगत नव्हते. कशीबशी गाडी सुरु झाली आणि गाडी पुढेच जाईना. कोणीतरी मागून जोरात धरून ठेवल्यासारखं वाटत होतं त्यांना. रजतने हिम्मत करून महाबलीचं नाव घेतलं आणि गाडी जोरात रेज करत पुढे ढकलली तसेच ते सुसाट तिथून निघाले. दोघेही भेदरले होते.
“ सुटलो बुवा एकदाचे, काय होत रे ते?”, असं करणने म्हटलं पण रजत मात्र गप्प बसला होता. त्यांना असा अनुभव पहिल्यांदाच आला होता. त्यांना वाटत होतं सुटले पण पुढे त्यांच्यासाठी काय वाढून ठेवलं होत हे त्यांना जराही माहित नव्हतं!.
घरी आल्यावर दोघेही काही नं बोलता चुपचाप झोपी गेले.
नवा दिवस, नवीन स्वप्न, नवीन आशा. रात्रीचा प्रसंग धूसर झाला होता. दोघेही आवरून आपल्या ऑफिससाठी निघून गेले. पण आज दोघेही आपापल्या गाडीने गेले कारण रजतला दुसरीकडे काम होतं आणि त्याचे बाबा पण येणार होते गावाकडून, म्हणून दोघे एकाच गाडीवर नं जाता वेगवेगळ्या गाडीने निघाले.
दिवसभर ऑफिसच्या कामात त्यांना कालच्या प्रसंगाची जरा सुद्धा आठवण राहिली नव्हती. रात्री करण लवकर ऑफिसचं काम आटोपून घरी आला. पण रजत आला नव्हता. करणने त्याची खूप वाट पाहिली. त्याचा फोन पण लागत नव्हता. करणला आता टेन्शन आलं कारण कालचा प्रसंग ताजा होता, त्याच्यासोबत काही अघटीत तर घडलं नाही ना! या विचाराने तो अस्वस्थ होता.
दुसऱ्या दिवशी त्याची भिती खरी ठरली. त्याचा खूप मोठा ऍक्सीडेंट झाला होता. हॉस्पिटलमध्ये करण लगेच पोहोचला आणि रजतने डोळे उघडले. समोर करणला पाहून तो रात्रीचा प्रसंग सांगू लागला. पण त्याला तोंडाला, हाताला, पायाला जबर मार बसल्यामुळे तो काय बोलतोय हे करणला कळेना. तो त्याला चिडवत होता असा कसा पडला म्हणून.
रजतने तोडक्या मोडक्या शब्दात करणला रात्रीचा प्रसंग सांगितला त्यावर करण जोरजोरात हसायला लागला.
“ काही का रे! सांग ना जास्त झाली होती म्हणून. मी नाही सांगणारं काकूंना, पण हे असलं फालतू कारण सांगू नको. तो रस्ताच नाहीये ऍक्सीडेन्ट होण्यासारखा. तूच कसा पडला रे?”, असं म्हणून तो जोरजोरात हसायला लागला.
“ अरे ऐक माझं, खरंच हे असच झालं होत. तो रस्ता सेफ नाही. अजिबात त्या रस्त्याने येऊ नको. ऐक माझं”, रजत जसा जमेल तसं जीव तोडून सांगत होता पण करण त्याचं अजिबात ऐकून घेत नव्हता. मुळात भुतप्रेत असं काही असतं यावर त्याचा अजिबात विश्वास नव्हता. “ करण तु या वाक्यावर ठाम रहा ह! काहिही होऊ शकतं, आज हसतोय उद्या जीवाची भीक मागशील तेव्हा कळेल तुला”, रजतच्या बोलण्याकडे करणने लक्ष दिलं नाही आणि हिच त्याची खूप मोठी चूक ठरली.
रजतच्या आईने त्या रस्त्यावर जाऊन काही विधी केला आणि रजतला आपल्यासोबत घरी घेऊन गेल्या . रजत तर गेला, आता करणला एकटं रहावं लागलं आणि ऑफिसमधून पण एकटच यावं लागायचं. रजतच्या घटनेला 4 दिवस झाले होते. करणला ऑफिसच्या कामासाठी हडपसरला जावं लागलं आणि येताना त्याला उशीर झाला. उशीर झाला कि या दोघांना घरी यायला तोच रस्ता एकदम शॉर्टकट होता. करणने काहीच विचार नं करता गाडी त्या रस्त्याने वळवली. नेहमीचा रस्ता असल्याने त्याला काही वाटत नव्हतं. पण त्या रस्त्यावर कायम अंधार काळोख असायचा. करण आपल्याच धुंदीत जात होता. आणि अचानक त्याचं लक्ष त्यादिवशीच्या चितेकडे गेलं. तिथे आज पण एक चिता जळत होती आणि त्याच्या शेजारी एक माणूस बसला होता. एवढ्या रात्री हा माणूस कशाला तिथे बसला? म्हणून करणने गाडी चितेकडे वळवली.
“ काय काका एकटेच यावेळी इथे का बसले?”, त्या बसलेल्या माणसाजवळ जात करणने प्रश्न विचारला.
त्या माणसाने मागे वळून करणकडे पाहिलं . तसा करण जरा थबकला. त्या माणसाचे डोळे फार विचित्र वाटत होते आणि त्याने तोंडाला मफलर गुंडाळले होते.
“काही नाही बाळा, बसलोय आपला चिता कशी जळते बघत”, त्या माणसाने करणला सांगितलं.
“ हो पण एवढ्या रात्री नका बसू बाबा इथे. एखादं जनावर वगैरे येईल चला इथून”, करण म्हणाला.
“ असं म्हणतोस, चल बाबा पुढे सोडतोस का मला?”, म्हातारा माणूस म्हणाला.
“ हो,मेनरोडला सोडतो तिथून तुम्ही जा तुमच्या घरी”,करण गाडी काढत म्हणाला.
“ असं म्हणतोस, पण मला घरी नाही जायचं”, त्या म्हाताऱ्याने असं म्हणताच करणने त्याकडे चमकून पहिले.
“घरी नाही जायचं म्हणजे? मग जायचंय कुठे?”, करण म्हणाला.
“ मला तुझ्या घरी ने, तुझ्यासाठी आता तेच योग्य आहे ”, गाडीवर बसत असताना म्हातारा बोलला.
“ काय! मी तुला घरी का नेऊ? तू माझ्याच घरी बसशील का रे!”, करणने आश्चर्यचकीत होऊन विचारलं.
यावर तो म्हातारा जोरजोरात हसला.
करणला काही कळायच्या आत तो करणच्या मागच्या सीटवर बसला. करणला पुसटशीही कल्पना नव्हती की, पूढे त्याच्यसोबत काय घडणार होतं?.
गाडी पुढे जात होती तसं तसं करणला मागची सीट जड जाणवू लागली . खूप मोठं ओझं तो आपल्या बाईकवर नेतोय असं त्याला वाटू लागलं.
“ काका काय खाता हो? केवढे जड आहात तुम्ही?”, करण मस्करीत बोलला. पण मागून काहीच आवाज आला नाही. करणला वाटलं त्याला ऐकूच गेलं नसेल म्हणून तो आपल्याच धुंदीत गाडी चालवत होता. जोरजोरात गाणे म्हणत होता. थोड्यावेळाने त्याच्या लक्षात आलं की, तो पुन्हा त्याचं रस्त्याच्या वळणावर आलाय.
“असं कसं शक्य आहे? आता तर इथूनच गाडी नेली होती मी, पुन्हा तोच रस्ता कसा काय आला?”, असं स्वतःशी पुटपुटत करणने मागे पाहिलं तर तो म्हातारा गाडीवर नव्हताच. म्हतारा मागे नाही, तर मग एवढा वेळ जड काय होतं? असा विचार करत असताना त्याला तिथेच एक चिता मोठ्या भडक्यात जळताना दिसली आणि जोरजोरात गाणं ऐकू यायला लागलं.
चल ना सेल्फी घेऊ. तेवढ्यात एक गाडी सुसाट वेगाने त्याच्या दिशेने येताना त्याला दिसली आणि काही कळायच्या आत गायब पण झाली. सावरण्याच्या नादात काहीच कारण नसताना त्याची गाडी जोरात खाली पडली तिथेच जिथे रजतच्या गाडीचा ऍक्सीडेन्ट झाला होता.
करणने डोळे उघडले तेव्हा तो हॉस्पिटल मध्ये होता.
“ मी इथे कसा? कोणी आणलं मला इथे? काय झालं होतं?”, करणने कण्हत नर्सला विचारलं.
“ शांत पडून रहा,ऍक्सीडेन्ट झाला होता तुमचा. एक म्हातारे आजोबा तुम्हाला घेऊन आले इथे”, नर्स शांतपणे म्हणली.
“ काय! आजोबा! कोणते आजोबा?”, करण किंचाळून बोलला आणि तेवढ्यात रजत खोलीत आला. रजतला पाहून करणला दिलासा मिळाला. पण रजत अचानक कसा काय आला? त्याची तब्येत पण पूर्णपणे नीट नव्हती. त्याचं वागणं बोलणं बदललं होतं. करणला ते जाणवत होतं.
करणने रजत जवळ रात्रीचा प्रसंग सांगितला. तसंच रजतने त्याला गप्प केलं.
“ हे बघ मला सगळं माहित आहे. काही बोलू नको शांत रहा”, रजतच्या बोलण्याचा सूर करणला कळला नाही.
“ अरे, इथे जीवावर बेतलय माझ्या आणि शांत रहा काय म्हणतो?”, करण असं म्हणताच रजतने त्याचं तोंड हाताने दाबलं.
“ गप्प बस म्हणतो ना. काहीच बोलू नको, तुझ्यासाठीच आलोय मी इथे परत. आपण नंतर बोलू या विषयावर . काही लोकं आपल्या वाईटावर आहेत. रजतचं बोलणं करणला काहीच कळलं नाही. पण तरी तो गप्प बसला. करणची आई गावाकडून त्याच्या जवळ आली होती. लेकराला असं बघून जीव तुटत होता त्या माऊलीचा. तिला रजतने सर्व परिस्थिती सांगितली होती. कसं त्यांनी सेल्फी काढली आणि त्या नंतर त्यांना कसे अनुभव आले. करणच्या आईला विधी करायचा होता त्या जागी जाऊन. पण रजतने त्यांना अडवलं आणि काही उपयोग नाही म्हणाला. त्याच्या बोलण्याचा अर्थ करणच्या आईला कळला नाही पण रजतच्या सांगण्यावरून त्या शांत बसल्या. रात्री करणजवळ मुद्दाम रजत थांबला आणि करणच्या आईला त्याने घरी पाठवलं.
रजतला करणला काहीतरी सांगायचं होतं पण रजत करणला काही बोलू देत नव्हता आणि स्वतःही त्याला काही बोलत नव्हता.मध्यरात्री अचानक करणला जाग आली. त्याला तहान लागली होती म्हणून त्याने पाणी घेण्याचा प्रयत्न केला पण तिथे पाणी नव्हतं. त्याने सिस्टरला आणि रजतला आवाज दिला पण ते दोघेही तिथे नव्हते म्हणून करण स्वतः उठून पाणी घ्यायला निघाला.रूमच्या बाहेर कसला तरी जळल्याचा वास येत होता . रूम बाहेर येताच त्याला रजत भिंतीकडे तोंडं करुन उभा असलेला दिसला.
करणने त्याला आवाज दिला पण त्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. करण रजत जवळ जाणार तेवढ्यात त्याला त्याच्या मागून कोणीतरी गेल्याच जाणवलं. त्याने दचकून मागे पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं. करण कधीच घाबरत नव्हता पण त्या ऍक्सीडेन्ट नंतर तो जरा कापऱ्या मनाचा झाला होता. तो सरळ झाला तेव्हा बघितलं तर रजत पण तिथे नव्हता. स्वतःला समजावत तो वॉटर टॅंक कडे निघाला. तिथे त्याला परत रजत दिसला.
“ काय रे! गेम खेळतोयस काय माझ्यासोबत? आता तर तिथे होतास आणि आता इथे. बस कर मी घाबरत नसतो बरं का!”, असं करणने म्हणताच रजत त्याच्याकडे वळला आणि त्याला बघताच करण भितीने थरथर कापू लागला, त्याचे हात पाय थंडे पडले, तोंडातून शब्द फुटत नव्हता.
रजतला समोरून चेहराच नव्हता, नुसती पोकळी. करण खूप घाबरला होता तेवढ्यात त्याच्या खान्न्द्यावर कोणीतरी हात ठेवला आणि थरथरत त्याने मागे पाहिलं तर तो रजत होता.
“ करण ए करण काय झालं? एवढा का घाबरला आहेस?”, रजतने असं विचारताच करण त्याला म्हणाला, “ कोण आहेस तू? मला खरं सांग”,.
“ अरे असं काय करतोयस मी रजत”,
“ तू रजत तर मग हा कोण?”, असं म्हणत करणने मागे वळून पाहिलं तर तिथे रजत नव्हता पण तो म्हातारा उभा होता.
त्याला बघून तर करण अजूनच घाबरला.
“तू कसा काय इथे? रजत हा म्हातारा झोल आहे, हा मला त्या चितेजवळ पण भेटला होता, त्याने मला लिफ्ट मागितली आम्ही दोघं निघालो तर हा अचानक जड झाला आणि मग गायब झाला आणि मी तिथेच सेल्फी पॉईंटला होतो आणि माझा ऍक्सीडेन्ट झाला, हा नक्कीच सेल्फी वाला भूत आहे”, करण जीवाच्या आकांताने रजतला सांगत होता पण रजत शांतपणे ऐकून घेत होता.
“ कुठला म्हातारा? कोणता सेल्फी पॉईंट? काय बोलतोयस तू करण? कोणीही नाही तिथे”, असं रजतने म्हणताच करण त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागला.
“ हा म्हातारा दिसत नाहीये तुला?चेष्टा सुचतेय तुला यावेळी? होपलेस”,
“ कुठेय म्हातारा?”, रजतने विचारताच करणने हात करुन म्हाताऱ्याकडे बघितलं तर तिथे कोणीच नव्हतं .
“ असं कसं शक्य आहे? गेला असेल तो तुला बघून. होता तिथे म्हातारा होता, तू पण होतास तुझा चेहरा नव्हता”, असं बोलत बोलत करण बेशुद्ध पडला. त्याला शुद्ध आली तेव्हा तो हॉस्पिटलच्या बेडवर होता.
त्याने हळूहळू डोळे उघडले. खिडकीतून लक्ख सूर्यप्रकाश खोलीभर पसरला होता. तेवढ्यात डॉक्टर आले. “ काय म्हणतोय पेशंट? बरं वाटतंय का आता?”.
“ हो बरा आहे मी. मला डिस्चार्ज कधी मीळेल?”, करणने विचारलं.
“ बघू काही टेस्ट करू ओके असेल तर मग आपण घरी जाऊ देऊ. तुमच्या घरच्यांना बोलवून घ्या”, डॉक्टरने असं म्हणताच करण लगेच म्हणला, “हो डॉक्टर माझा मित्र आहेच, तो असेल सोबत माझ्या”. त्याने असं म्हणताच डॉक्टरने जरा संदीग्धपणे त्याच्याकडे बघितलं आणि निघून गेले.
थोड्यावेळात जेवण आलं आणि करण जेऊन गोळ्या घेऊन झोपी गेला. तो झोपलाच होता तर त्याच्या कानात हळूच
‘करण उठ ना सेल्फी काढू!’ असा आवाज आला आणि तो दचकून उठून बसला. त्याने आजूबाजूला पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं.
भास असेल असं स्वतःला सांगून तो परत आडवा झाला तर काही पावलांचा त्याला त्याच्या दिशेने येण्याचा आवाज ऐकू आला.
त्याने वळून पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं. त्याने दुर्लक्ष केलं आणि परत आडवा झाला. तसचं पावलांचा आवाज जोरजोरात व्हायला लागला, जणू काही कोणी त्याच्या दिशेने सुसाट धावत येतंय.आता ते जें काही होतं ते अगदी त्याच्या जवळ होतं. एकदम जवळ, इतकं की,त्याचा श्वास पण त्याला कळत होता. त्याने घट्ट डोळे मिटले आणि राम राम राम जप करू लागला. तरीही ते तिथेच होतं जराही हललं नव्हतं आणि त्याच्या कानात शब्द ऐकू आले.
“ चल ना सेल्फी काढू”.
करणने सगळी हिम्मत एकटवली आणि जोरात बेडवरून खाली उडी मारली आणि उभा राहून तो कोण आहे बघू लागला तर तिथे कोणीच नव्हतं.
मागून कोणीतरी त्याच्या खान्द्यावर हात ठेवला. तसंच त्याने दचकून मागे पाहिलं तर तिथे रजत होता. रजतला पाहून करणने त्याला घट्ट मिठी मारली आणि भितीने अक्षरक्ष: रडू लागला.
“ रजत आपण खूप मोठी चूक केली. आपण तिथे जायला नको होतं, सेल्फी काढायला नको होती, आपल्या दोघांच्याही जीवाला धोका आहे रे! चल आपण इथून जाऊ, नको इथे. तो म्हातारा सारखा आपला पाठलाग करतोय, त्याला आपल्याला मारायचं आहे, तो सारखा कानात येऊन सेल्फी काढू म्हणतो, चल मित्रा नाहीतर आपण दोघेही मरू”, असं करणने म्हणताच पलीकडून आवाज आला, “ घाबरू नकोस रे, मी आहे नं, मी तुला काहिही होऊ देणार नाही, एकदा मेलेला माणूस दुसऱ्यांदा थोडीच मरत असतो”, हे वाक्य ऐकल्यावर करणने हळूच मिठी सैल केली आणि घाबरत घाबरत मागे येत त्याने तो चेहरा पाहिला.
त्याला बघताच त्याचे हात पाय भितीने थंड पडू लागले, अंग थरथर कापू लागलं, डोळ्यातून पाणी वाहून लागलं. त्याने ज्याला मिठी मारली होती तो दुसरा तिसरा कोणी नसून तोच म्हातारा होता. करणकडे नुसता शून्यात बघत असल्यासारखा स्मित हास्य करून उभा होता.
त्याला बघून करण पुन्हा बेशुद्ध पडला आणि यावेळेला त्याला 2 दिवसांनी शुद्ध आली. तो शुद्धीवर आला तेव्हा तो दवाखान्यात नव्हता तर कुठल्यातरी घरात होता. घर एकदम साधं पण स्वच्छ होतं. सूर्याची किरणं घरात सगळीकडे खेळत होती आणि मंद वारा वाहत होता. ते वातावरण फार प्रसन्न करणारं होतं.
करण त्या वातावरणात प्रसन्न झाला होताच, तेवढ्यात त्याला एका बाईची पुसटशी आकृती त्याच्याकडे येताना दिसली. जवळ येताच तो आनंदाने चमकून उठला आणि काकू म्हणाला. ती बाई रजत ची आई होती.
“काकू तुम्ही? किती भारी वाटतंय तुम्हांला बघून काय सांगू! मागच्या काही दिवसात आयुष्यात फार विचित्र घटना घडल्या त्यातली हि आजची सर्वात सुखद गोष्ट आहे बघा”, असं म्हणतं त्याने दाराकडे पाहिलं तर त्याचा आनंद पार मावळून गेला. तिथे तोच म्हातारा त्याला टक लावून बघत हसत होता.
“काकू, याला हाकला इथून. हा इथेही आला माझ्या मागे? याला बाहेर काढा अगोदर”, असं म्हणत तो उठून घरात मागे मागे जाऊ लागला आणि एका भिंतीला आदळला.
स्वतःला सावरत त्याने भिंतीकडे बघितलं तर त्याचं पूर्ण अवसान गळून पडलं, हातापायला कंप सुटला, भितीने त्याचं अंग थरथर कापू लागलं. त्या भिंतीवर रजतचा हार घातलेला फोटो होता.
“रजत या जगात नाही! हे कसं शक्य आहे? हे कधी झालं? तो तर सतत माझ्यासोबत होता मग हे कधी झालं? नाही खोटं आहे हे. भास आहे माझा”, असं बडबडत तो मागे सरकला तेवढयात त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्या म्हाताऱ्याने त्याला खाली बसवलं. भिंतीवरचं भयाण चित्र आणि खाली डोळ्यासमोर म्हातारा. करणचा फक्त जीव जायचा राहिला होता.
त्याची अवस्था बघून रजतची आई त्याला शांत करत म्हणाली, “ करण बाळा हेच सत्य आहे. तू ज्याला भूत समजतोय तो खरंतर जिवंत माणूस आहे आणि रजत या जगात नाही. हे सगळं सुरु झालं त्याच आमवस्येच्या रात्री. रजतचे बाबा त्याला भेटायला गेले होते. दोघांनी दिवसभरात काही काम केली आणि रात्री तो बाबांना खोलीवर थांबवून सकाळी गावाकडे पाठवणार होता. रात्री त्यांना उशीर झाला होता. त्यांनी गाडी त्या नेहमीच्या मधल्या मार्गाने काढली. पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं.
बाबा म्हणालेही, इथून नको जाऊयात, उशीर झाला तरी चालेल,पण रजतने ऐकलं नाही आणि त्याने गाडी त्या निर्जन रस्त्याने काढली. पुलाजवळ येताच समोरून अचानक एक भरधाव गाडी वेगाने आली आणि या दोघांना जोरात धडक मारुन निघून गेली. दोघेही गाडीवरून पडले पण रजत खूप दूर फेकल्या गेला आणि त्याचे बाबा तिथेच थोड्या अंतरावर पडले. कसं बसं स्वतःला सावरत ते उठले आणि जीवाच्या आकांताने रजतला हाक मारू लागले, पण रजत कुठेही दिसला नाही.
अमवस्या आणि किर्रर्र अंधार. त्या रस्त्यावरून अजिबात वर्दळ नव्हती. कसतरी रजतचे बाबा त्याला शोधू लागले आणि पुलाच्या पलीकडे रजत त्यांना दिसला निपचित पडलेला. रजत जवळ धावत जाऊन त्यांनी रजतला उठवण्याचा प्रयत्न केला पण तो उठला नाही.
खूप हाका मारल्या, वाटलं कोणीतरी रस्त्याने जाईल, कोणीतरी थांबेल पण उशीर झालेला होता आणि त्या रस्त्याने एकही गाडी सोड पण माणूस सुद्धा गेला नाही. नाईलाजाने रजतच्या बाबांनी त्याचा मृतदेह आहे त्याचं ठिकाणी जाळायचा ठरवलं. कारण त्यांच्या जवळ ना फोन होता ना कोणी मदतीला, ना त्यांना गाडी चालवता येत होती. म्हणून त्यांनी तिथेच कडेला लाकडं गोळा केली आणि काळजावर दगड ठेऊन त्याच्या चितेला मुखाग्नी दिला”, करण सुन्न होऊन ऐकत होता. एका क्षणात त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती.
“ पण, तो तर माझ्यासोबत होता त्याच दिवशी. हे कसं शक्य आहे! आम्ही दोघं गाडीने घरी चाललो होतो, तिथे थांबलो एका चितेसोबत सेल्फी घेतला आणि मग पुढे निघालो, घरी आलो आणि दुसऱ्यादिवशी त्याचा ऍक्सीडेन्ट झाला. तुम्ही आल्या होत्या विधी केला होता, हो असच घडलं होतं”, करण सगळं आठवत सांगत होता.
“ नाही रे लेकरा,मी आले होते पण त्याचं सामान घायला आणि जो विधी केला होता तो त्याचा कार्याचा भाग होता”, रजतची आई सांगत होती.
“ कसं शक्य आहे? तुम्ही त्याला सोबत घेऊन गेला होतात. त्याला दवाखान्यात मी स्वतः भेटायला गेलो होतो”, करण फार अस्वस्थ झाला होता.
“ तो सगळा तुझा भास होता, तुझा ऍक्सीडेन्ट झाला त्यादिवशी आठवतं तुला? “,
“ हो चांगलंच आठवतं, या काकांना मी लिफ्ट दिली होती आणि मग छलावा लागल्यासारखा मी त्याचं ठिकाणी आलो आणि मग माझा अचानक ऍक्सीडेन्ट झाला”,
“ हे तुला तिथे वाचवायला आले होते, रजतच्या आत्म्याला मुक्ती मिळाली नाही.
ते चितेजवळ बसले होते आणि तुला घरी सोड म्हणाले, पण गाडीवर ते नाही तर रजत बसला होता. त्याला तुला त्याच्यासोबत न्यायचं होतं, तूला म्हणूनच फिरून त्याने त्याचं जागी आणलं पण नशिबाने हे तिथेच होते, म्हणून फक्त ऍक्सीडेन्ट वर निभावलं आणि तू वाचलास”, करण हे सगळं ऐकून आश्चर्याने त्यांच्या कडे बघत होता.
“ म्हणजे मी यांच्यापासून पळत होतो, भूत समजत होतो आणि रजतला जवळ करत नव्हतो,तर माझ्या मृत्युंला जवळ करत होतो! बापरे! किती भयानक आहे हे सगळं? माझ्या कानात सारखा आवाज यायचा चल सेल्फी काढू तो रजत होता? एक मिनिट माझ्या मोबाईल मध्ये त्यादिवशी काढलेली सेल्फी आहे नं, मी दाखवतो तुम्हाला मग तुम्हाला विश्वास बसेल”, असं म्हणत तो मोबाईल मधील फोटो शोधू लागला आणि त्याला तो सापडला.
“ हा बघा हाच तो फोटो, बघा नीट तुम्ही आणि सांगा मला”, असं म्हणतं त्याने तो फोटो काका काकुंना दाखवला.
“ आता बसला विश्वास? आहे नं रजत आणि मी आणि ती जळती चिता, जर तो त्या आधीच मेला होता तर मग तो फोटोत कसा सांगा ?”, ते दोघेही त्याच्याकडे बघत उभे राहिले.
“ करण तू हा फोटो नीट बघितला ना!”,
“ म्हणजे काय? हो”,
“ बघ बरं एकदा नीट”, असं म्हटल्यावर करणने चाचरतचं मोबाईल हातात घेतला आणि जसा त्याने फोटो पाहिला त्याचा चेहराच पांढरा पडला. त्या फोटोत तो स्वतः होता आणि मागे जळती चिता होती आणि त्या चितेतुन रजत त्याला पाहत होता.
“ हे कसं शक्य आहे? हे खोटं आहे असं असूच शकत नाही, तो होता माझ्यासोबत”, असं म्हणत करण मागे सरकू लागला आणि तसच ते दोघे अचानक एकरूप झाले आणि त्या दोघांच्या चेहऱ्यात बदल होऊ लागला आणि ते म्हणू लागले तू ज्या चितेसोबत सेल्फी घेतली ती रजतचीच चिता होती आणि आता चितेचा नंबर तुझा!
करण थरथर कापू लागला आणि बडबडू लागला, “ म्हणजे? माझी चिता का? मी काय केलं?”, असं म्हणून तो खाली पडला. तेव्हा काका काकूच्या चेहऱ्यात रजत त्याला दिसायला लागला आणि म्हणाला, “ करण, आता तरी खरं बोल, कबूल कर, तूच माझा ऍक्सीडेन्ट घडवून आणला होता. मला तूच मारलं. तेही त्या विद्यासाठी! हो नं! तू एकदा म्हणाला असतास तरी मी दूर झालो असतो रे. मैत्रीला कलंक लावला तू,” हे ऐकून करणच्या चेहऱ्याचा रंगच उडाला आणि एका क्षणात आसुरी हसू त्याच्या चेहऱ्यावर आलं.
तो उर्मठपणे म्हणाला, “ मग, माझं प्रेम होतं तिच्यावर. तू का मधात आलास? काहीच गरज नसताना. भोग आता कर्माची फळं. आता विद्या फक्त माझी होणार तू असच चितेत जळणार”, असं म्हणत तो जोरजोरात हसू लागला. सोबत रजतही जोरजोरात हसू लागला. त्याला हसताना बघून करण गप्प झाला.
“ अरे वेड्या, ती तुझी होईल तेव्हा, जेव्हा तू जिवंत राहशील! मी तुला सोडणार नाही. अजून एक सांगू, मुर्खा आमच्यात काहीच नव्हतं. ती तुझ्यावरच प्रेम करत होती आणि करते . तुझ्या कर्माने तू तिला गमावलं. आता फेडत बस कर्माची फळं”, असं म्हणत तो अजून जोरजोरात हसू लागला.
“ काय! हे मला माहित नव्हतं. हे बघ रजत आपण मित्र आहोत ना! प्लिज मला माफ कर, मला जाऊदे. मी सगळं कबूल करेन. पोलिसांना सगळं सांगेल. प्लिज मला जाऊदे”,
करणचं बोलणं ऐकून रजत त्याला म्हणाला, “अरे!तू मला धोका दिला,मैत्रीला डाग लावला. तू कोणाचाच होऊ शकत नाहीस, तुला माफी नाही”. करण माफी मागत होता, मागे सरकत होता. रजतचे आईवडील उभे राहून ते सगळं बघत होते, त्यांच्या डोळ्यातूम अश्रू वाहत होते.
त्यांनी त्यांचा मुलगा गमावला होता तोही त्याच्या अगदी जवळच्या मित्रामूळे.
मागे सरकत असताना करण धक्का लागून खाली पडला आणि तेवढ्यात त्याच्या कानात एक आवाज ऐकू आला “ करण,चल ना सेल्फी काढू हा हा हा हा”,
समाप्त…..
About the Competition
The Poetry and Creative Writing Competition 2026 by Hashtag Kalakar is a prestigious event celebrating literary creativity and expression. It invites writers from diverse backgrounds to present their unique stories, poems, and essays. The competition serves as a platform for exploring various themes and showcasing the vibrant talents of participants, fostering a community of creative minds.
We extend our heartfelt thanks to Rashmi Kolage for her intriguing submission, "Selfi with chita," to the Poetry and Creative Writing Competition 2026. Her captivating storytelling and ability to weave a mysterious narrative have left a lasting impression. We look forward to seeing more of her creative work in the future.
About Hashtag Kalakar
Hashtag Kalakar is a creative platform dedicated to providing artists, writers, singers and other creative talents with opportunities to showcase their work and reach wider audiences through competitions, features and creative initiatives.



Comments