पहिलं प्रेम - शाळेतलं
By Prasad Gajanan Bhave
ना भेटी न गाठी, ना फुले न गजरे
ना फुटले धुमारे,ना उठले शहारे
किती आठवावे जुने होत नाही
कागदी कळ्यांची फुले होत नाही.
गणवेष मळका तरीही ती मस्त
न दिसता ती शाळेत व्हावे मी त्रस्त
कितीदा पहावे समाधान नाही
कागदी कळ्यांची फुले होत नाही.
तिची ओढ वाटे, नी हृदयी ही दाटे
तिला बोलू शकलो, ना विसरुही शकलो
कवाडे मनाची खुली होत नाही
कागदी कळ्यांची फुले होत नाही.
कधी ऐकले वाचले हो असे की
जे दिसते कवीला न दिसते रवीला
बघ, झालो कवीही तरी भेट नाही
कागदी कळ्यांची फुले होत नाही.
असे वाटते की पुन्हा भेट व्हावी
पुन्हा तोच रस्ता पुन्हा तीच आळी
आता सिद्ध हस्ते लिहू प्रेम भाळी
कागदी कळ्यांची फुले सांजवेळी.
By Prasad Gajanan Bhave

Comments