Marathi Poem (आई आजकाल चुप असते )
By Hema Sagvekar
मुलं जन्माला आल्यावर आई ही पदवी मिळाली. त्याचे लाड पुरवून ती नाही थकली. त्यांना काय हवे, काय नको ते बघताना, ती स्वतःला विसरली. मनातली इच्छा सांगण्या आधीच त्यांच्या हातावर हवे ती वस्तु ठेवली. बोलायला शिकवले, वागायला शिकवले, शब्दांचे अर्थ सांगितले.
मुले मोठी झाली, कमवू लागली.
पूर्वी आईने दिलेल्या चार आण्याच्या शाळेच्या टिफिन ने ही पोट भरून जायचं .
पण आता वय वाढलं, गरजा वाढल्या.
आईचं प्रेम कमी वाटू लागलं.
मुलं जेव्हा मोबाइल वापरायला लागली, आई साठी वेळ पहिल्या पेक्षा ही कमी पडू लागला. ती आता माझ्या कडे बोलतील, माझ्या जवळ येतील, आईची ही हुरहुर मात्र नकळत नाहीशीच झाली.
मुलांबरोबरचा संवाद एखाद्याच्या भूत काळा सारखा मागे राहिला. आता काय, ती एखादे काम शोधून रमून जाण्याच्या प्रयत्नात असते, आई आजकाल चुप असते.
मुलीचं लग्न थाटात लावून दिले, जावयाला मुला सारखे प्रेम दिले. पण दोघे ही संसारात इतके रमले, भान ना दोघानाही कशाचेच राहिले.
आई दोघांचा संसार हसत मुखाने पहाते. त्यांच्या आनंदात आनंदी राहते. स्वतःचे औषध संपलंय हे सुद्धा कुणाला ती कळून देत नसते, आई आजकाल चुप असते.
मुलं लोळतात ऐश्वर्यात, रमतात स्वतःच्या सुखी संसारात. आई ही आपल्या सारखी सुखात आहे असं ती गृहीत धरतात. पण पण नेहमी प्रमाणे आई आपलं दुःख लपवत असते. आई आजकाल चुप असते.
मुले असतात कामात गुंग. त्यांना काय हवं काय नको, ते आज ही ती आवर्जून पहाते. पण स्वतःच्या इच्छा मात्र दाबूनच टाकते, आई आजकाल चुप असते.
पूर्वी साधा कप तुटला, तरी कान पकडून तिची माफी मागायचो. आता काय, तिचं मन वारंवार तुटलं तरी ही, तिच्या कडे, तिच्या मनाकडे कान डोळा करतो. आई काही तशी तक्रार करत नसते. कारण आई आजकाल चुप असते.
मुलांना थोडा त्रास झाला, तरी तिची झोप नाहीशी होते. तिला मात्र रात्रीची झोप लागते की नाही? हे पाहायला वेळच कुठे असतो. पण तरी ती वाईट वाटून घेत नसते. आई आजकाल चुप असते.
मुलं जातात परदेशी फिरायला, तुझ्यासाठी हे घेऊन येऊ, ते घेऊन येऊ, ह्याची हमी देतात. पण तुला ही सोबत घेऊन जाऊ, ह्याची जबाबदारी ते कधीही घेत नसतात.
आईला ही जग पाहायचं असतं, चार भिंती बाहेर केव्हातरी पडायचं असतं. ज्या तान्ह्या मुलांना मोठे केले, त्यांच्या सोबत काही क्षण घालवायचे, तिचं मन करत असतं.
पण आई तेव्हाही त्यांना दूरून शुभेच्छा देते. काय करणार, आई आजकाल चुप असते.
गरज असताना आई वडील ज्या नातवंडाला आईला सोपवून जायचे,
त्या नातवंडाला पाहायला मात्र तिचं मन, आज आसुसलेलं असतं.
नातू मोठा झाला, शिकून कमवायला लागला. हे मात्र तो विसरून गेला की, लहानपणी ह्याच आजीच्या कुशीने, आई आणि वडील दोघांची ऊब दिली होती. जेव्हा आई वडील पैसे कमवत होते, हीच आजी तिच्या तोंडचा घास मला प्रेमाने भरवीत होती.
पण आजी मात्र आज ही तेवढंच प्रेम ओतत असते, नातवंडावर दूरून आशीर्वादाचा वर्षाव करत असते. बोलायचं खूप असतं, पण काय करणार, आई आजकाल चुप असते.
नको देखावा करू मदर्स डे साजरा करून, तिला फूल आणि भेटवस्तू देऊन. द्यायचे असेल तर तिला थोडा वेळ द्या. मायेचे दोन शब्द बोला. प्रेमाने जवळ घेऊन तिला विचारा, तू कशी आहेस? तुला काय हवं का?
शक्य असेल तर तिच्या मनातले समजून घ्या, कारण ती बोलणार नाही, काहीही मागणार नाही.
मोठ्या घरातही ती आजकाल एकटीच असते, काय करणार, आई आजकाल चुप असते.
___________________________________________________________________________
By Hema Sagvekar

Comments