top of page

Marathi Charolya (मराठी चारोळ्या )

Updated: Jul 28, 2025

By Dr. Shalini Santosh Tonpe


1] नातं तुझं नि माझं 

   तो समुद्र अन् त्या लाटेसारखं

   ती उसळून जाते भेटायला त्या किनाऱ्याला

   तो जाऊ देत नाही

   जसं तू मला तुझ्यापासून दूर राहू देत नाही 


2] उघड्या डोळ्यांचं काय घेऊन बसलास

   बंद डोळ्यांतही स्वप्न बनून तूच दिसतोस

   साठवून घ्यावं मनात तुझं माझ्याकडं बघणं

   इतकं हरवून माझ्यात...मला तू बघतोस


3] सोबत तू असावंस

    चिंब पावसात भिजताना

    अन् रोखून नजर तू बघावं

    भिजलेल्या मला लाजताना


4] निरखताना तू मंद प्रकाशात 

    उजळलेला चेहरा माझा लाजरा

    तुझ्या सोबत असाच रे माझा

    प्रत्येक क्षण साजरा


5] दिसतोस तू मला

    मी आरशात मलाच बघताना

    कसं जमतं तुला हे माझ्यासोबत असणं ?

    सोबत माझ्या नसताना 


6] कुणीतरी हवं मला ओळखणारं

   थोडं माझ्याही पेक्षा जास्त

   कुणीतरी हवं हरवून जाणारं 

   माझ्यामध्ये माझ्यासोबतच बिनधास्त


7] मन मोकळं करावं तुझ्याजवळ

    बस थोडा सा एकांत हवा

    तुलाही जाणवेल हळू हळू मग 

    एक नवी मी अन् एक तूही नवा


8]  जुळली मने जुळल्या कल्पना

    ओढ किनाऱ्याची बेभान त्या लाटेला

    कळल्या भावना कळल्या वेदना

    ही पाऊले सोबत तुझ्या अनोळखी वाटेला


9] नातं ..दुराव्यात ही जवळीक जपणारं 

   गालावरच्या खळीसाठी तिच्या 

   जसं डोळ्यातलं पाणी 

   त्याच्या पापणीआड लपणारं 


10] माझ्या मनात रेंगाळणाऱ्या तुझ्या आठवणी

      जणू जीवाला वेडावणारा बकुळीचा गंध

      ओंजळ सोडून गेली फुले जरी 

      दरवळणारा माझ्या श्वासात मंद..मंद


By Dr. Shalini Santosh Tonpe







Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page