By Dr. Shalini Santosh Tonpe
1] नातं तुझं नि माझं
तो समुद्र अन् त्या लाटेसारखं
ती उसळून जाते भेटायला त्या किनाऱ्याला
तो जाऊ देत नाही
जसं तू मला तुझ्यापासून दूर राहू देत नाही
2] उघड्या डोळ्यांचं काय घेऊन बसलास
बंद डोळ्यांतही स्वप्न बनून तूच दिसतोस
साठवून घ्यावं मनात तुझं माझ्याकडं बघणं
इतकं हरवून माझ्यात...मला तू बघतोस
3] सोबत तू असावंस
चिंब पावसात भिजताना
अन् रोखून नजर तू बघावं
भिजलेल्या मला लाजताना
4] निरखताना तू मंद प्रकाशात
उजळलेला चेहरा माझा लाजरा
तुझ्या सोबत असाच रे माझा
प्रत्येक क्षण साजरा
5] दिसतोस तू मला
मी आरशात मलाच बघताना
कसं जमतं तुला हे माझ्यासोबत असणं ?
सोबत माझ्या नसताना
6] कुणीतरी हवं मला ओळखणारं
थोडं माझ्याही पेक्षा जास्त
कुणीतरी हवं हरवून जाणारं
माझ्यामध्ये माझ्यासोबतच बिनधास्त
7] मन मोकळं करावं तुझ्याजवळ
बस थोडा सा एकांत हवा
तुलाही जाणवेल हळू हळू मग
एक नवी मी अन् एक तूही नवा
8] जुळली मने जुळल्या कल्पना
ओढ किनाऱ्याची बेभान त्या लाटेला
कळल्या भावना कळल्या वेदना
ही पाऊले सोबत तुझ्या अनोळखी वाटेला
9] नातं ..दुराव्यात ही जवळीक जपणारं
गालावरच्या खळीसाठी तिच्या
जसं डोळ्यातलं पाणी
त्याच्या पापणीआड लपणारं
10] माझ्या मनात रेंगाळणाऱ्या तुझ्या आठवणी
जणू जीवाला वेडावणारा बकुळीचा गंध
ओंजळ सोडून गेली फुले जरी
दरवळणारा माझ्या श्वासात मंद..मंद
By Dr. Shalini Santosh Tonpe
खुप सुंदर लिहिता तुम्ही👌👌
अप्रतिम चारोळ्या 👌🏻👌🏻
अप्रतिम, खूप भारी👍