Mani Ase Tithe Sankat Vase - By Rashmi Kolage
Written By: Rashmi Kolage
Category: Short story
Competition: Poetry and Creative Writing Competition 2026
Introducing "Mani Ase Tithe Sankat Vase," a delightful short story penned by Rashmi Kolage. As part of the Poetry and Creative Writing Competition 2026, this Marathi tale brings humor to the forefront, weaving an engaging narrative around the misadventures of a young girl named Mani. With a backdrop of village life and cultural nuances, Kolage's story promises to captivate readers with its wit and charm.
About the Work
Rashmi Kolage's story explores the charming chaos that surrounds Mani, a young girl whose presence seems to invite mischief. Through vibrant storytelling and comedic elements, Kolage paints a vivid picture of Mani's world. Her knack for blending humor with everyday village scenarios brings the character to life, making the narrative both relatable and entertaining. The story's lighthearted tone and colorful imagery offer readers a joyful escape into the quirks of rural life.
Mani ase tithe sankat wase
Original Submission by Rashmi Kolage
मणी असे तिथे संकट वसे…
विनोदी कथा.
आमच्या गावात दोनच गोष्टी प्रसिद्ध होत्या. एक म्हणजे आठवडी बाजार आणि दुसरी म्हणजे मणी. फरक एवढाच की,बाजार आठवड्यातून एकदाच भरायचा, पण मणीचा उपद्रव मात्र बाबो रोज भरायचा.
“ अगं ए मने, नीट खाली बघून चाल कि, तोंड वर घेऊन काय चालतीस गं?खाली बघ गं माझी माय”,शोभा काकू ओरडेपर्यंत तर मणी खाली ठेवलेल्या गव्हाच्या पिठात पार नाकी, तोंडी, डोळी भरून निघाली.
“कार्टे कुठबी जाते तर काहींना काही उपद्रव करूनच ठीवते, थांब बघती तुला”, असं म्हणत
तिची आई तिच्याकडे तिला मारायला येताना बघून मणी आहे त्या अवस्थेत घरात पळत सुटली, पळता पळता तिचे आजारी आजोबा बाजेवर झोपले होते, त्यांच्या तोंडावर जाऊन ही पडली. त्याच वेळेला झोपलेल्या आजोबांनी डोळे उघडले आणि आपल्या तोंडावर मणीचा भुतासारखा पांढरा फटक चेहरा बघून म्हातारं जोऱ्यातच ओरडलं आणि डायरेक्ट दवाखान्यातच भरती झालं.
बिचारी मणी.
सरकारी कागदावर तिचं नाव मणी होतं, पण गावातले लोक तिला चालतं-बोलतं संकट म्हणायचे.
आता ही मणी जिथे असे तिथे गडबड वसत असे. काही लोकांच्या पायगुणाने घरात लक्ष्मी येते म्हणतात; पण मणीच्या पायगुणाने मात्र दवाखान्यात पेशंट वाढायचे.
तर अशी ही मणी,वय वर्ष 13. सावळा रंग, पण नाकी डोळी छान होती. शाळेत जेमतेम हुशार, पण कलेत मात्र जोरदार. चित्रकला असुदे नाहीतर गाणं, मणी कायम पुढे. कुठेही तिला गाणं गायचच असायचं. जसे शीघ्र कवी असतात तशी मणी शीघ्र गीतकार होती. कोणत्याही गाण्याला तोडून फोडून, नव्या काहीतरी ओळी जोडून, ज्या त्या प्रसंगाला चिटकवून गाणं गायची. तिला भाषेचं काही सोयरसुतुक नव्हतं. हिंदीत मराठी आहे, का उर्दू कन्नड आहे, म्हणजे आपण नेमक्या कोणत्या भाषेत गायल्या जातोय,हे त्या बिचाऱ्या गाण्यालाही माहित नसे. तिला फक्त कोणी मणीच म्हणू दे, मणी गाणी गायला तयार.
केसांची एक बट कायम तोंडावर राहणार आणि ती फुंकर मारून उडवण्याच्या नादात ही कोणालातरी उडवणार, म्हणजे काही ना काही गडबड होणार हे ठरलेलच समीकरण होतं. एकतर कोणी पडायचं, दवाखान्यात भरती व्हायचं नाहीतर त्याचा एकतरी अवयव सुट्टीवर जायचा हे ठरलेलं असायचं. मणी जिथे जायची तिथे काही ना काही घडायचं म्हणजे घडायचच.
हा रेकॉर्ड कधी तुटला नाही बरं का तिचा!
काही जणांना वाटायचं मणी मुद्दाम ठरवून करते पण बिचारीला ध्यानी मनी नसताना सुद्धा काही घडायचं.
यांचं एकत्र कुटुंब होतं.
एकदा, छताची दुरुस्ती करायला हिचा चुलतभाऊ सदा शिडीवर चढला होता. त्याने शिडी पण अशी जोरदार आणली होती कि, जरा जरी धक्का लागला तरी तिने शेवटच्या घटकाच मोजाव्या. शिडीजवळ त्याने एका मोठ्या टोपलीत सिमेंट तयार करून ठेवलं होतं. जवळच निर्मला आजी माळ जपत बसली होती .तिला काही कानाने ऐकू यायचं नाही. तिला ह्याने मणीवर लक्ष ठेवायला सांगितलं. तिला कुठे काय ऐकू गेलं? ती बसली माळ जपत. सदा तिच्या जीवावर वर चढून दोन्ही हाताने काम करत होता, तेवढ्यात तिथे उड्या मारत मणी आली आणि बट उडवायच्या नादात तिने शिडीलाच उडवलं.
मग काय! आधीच ऑक्सिजनवर असलेली शिडी मोडली कि, मोडली तशीच पडली आणि त्यावर उभा असलेला सदा पाय हवेत सोडून छताला हाताने धरून लटकला आणि धडकन खाली पडला. पडला तो पडला डायरेक्ट सिमेंट कालवलेल्या घमेल्यात. झालं,तोंड भरलं, डोळे भरले, सिमेंटच सिमेंट तोंडाला, डोळ्याने काहीच दिसेना. तसाच चाचपडत उठला आणि जवळ माळ जपत बसलेल्या निर्मला आजीच्याच अंगावर जाऊन पडला. म्हातारीला काय घडलं काहीच माहित नव्हतं म्हणून सदाला बघून ओरडेपर्यंत तर म्हातारी दवाखान्यातच गेली .तिकडं म्हातारं दवाखान्यात भरती, त्यांची बायको निर्मला आजी पण त्याच दवाखान्यात वरती भरती. दुसऱ्या मजल्यावर. सदा तिच्यावर जाऊन पडल्यामुळे तिचं बिचारीचं नाक फुटलं, दोन दात ओठात पूर्ण घुसल्यामुळे तोंडं सुजलं.
आता मणीकडे मोर्चा वळणार हा जगमान्य नियम होता, मग काय कोणी काही म्हणायच्या आत त्या प्रसंगात सुद्धा मणीने गाण बनवलच,
"मैं तो रस्ते से जा रही थी,
मैं बट मेरी उडा रही थी,
सदा भाऊ को धक्का लगा तो
मैं क्या करू?
ये मधातच आया तो मै क्या करू?"
हे ऐकून तर आईने धक्का मारून खाली पाडून तुडविली होती.
म्हणून या मणीवर सगळे डाच खाऊन असायचे.
अगदी महत्वाच्या घरगुती कार्यक्रमात सुद्धा मणीची वर्दी लागायची नाही. त्याला कारणं पण वेगवेगळी. तिच्या कारभारांना प्रकार असायचे.
म्हातारी माणसं तर तिच्यापासून हातभर लांब राहायची. कारण ही कुठून येऊन कशी कोणावर पडेल किंवा कोणाला पाडेल? याचा नेमच नसायचा.
त्यात मणीला गाणी गायची सवय. अगदी तालासुरात तर गायचीच,पण गाण्याची ओळ नं ओळ पोरीला पाठ असायची.
असच एकदा, तिला मोठं धाडस करून तिच्या चुलत आजीच्या शेवटच्या दर्शनाला नेलं. हे धाडस का होतं?हे कळेल तुम्हाला.
जाताना बक्कळ सूचना तर होत्याच पण, ‘जर काही गडबड केली अन चुकूनही तुझं त्वांड उघडलं तर तुझं काय व्हईल हे मलेही म्हाईत न्हाई ’, अशी ताकीद देऊन आईने नेलं.
मणीने सर्व सूचना पाळल्या. त्या पाळताना तिच्या अवयवांनी तिची किती जीवश्च कंठश्च साथ दिली असेल विचार करा!
बट नं उडवता एका जागी बसणं आणि इतक्या वेळ तोंडं बंद ठेवणं हे तिच्या हातपाय आणि तोंडाला बिचाऱ्यांना माहीतच नव्हतं. तरीही मणी गपचूप बसली होती,काय चाललंय? हे बघत होती आणि तिला शांत बघून तिची आई मनातून भीतीच्या डोहात पार गटांगळ्या खात होती.
‘ उरकत आलंय समद,देवा अजून थोड्या येळ हिच्या अवयवांना शांत राहण्याची बुद्धी दे .घरी गेल्या गेल्या एक पाव पेढे दाखवीन तुले’, असं म्हणत मनीची आई देवाचा निरूपयोगी धावा करत होती.
सर्व परिस्थितीवर मात करून जवळपास पूर्णच लढाई मणी जिंकली असं वाटत असताना, शांता आजीच्या बहिणीने, मावशी आजीने अचानक बॉम्ब टाकला . शांता आजीचं प्रेत खुर्चीवर बसवलं होतं, प्रेत उचलायची वेळ आली आणि तिने टाहो फोडला, “शांतेsss कुठं चालली मले सोडूsssन. एsss बायांनो माझी भन चालली गे वैकुंठलाss. तिच्यासाठी एखांदं गानं तरी गावाsss तिले सुखानं जाऊ तरी द्या, कशी गेली ग माय मले सोडूssन?”. मावशी आजीने असं म्हणताच मनीच्या आईच्या काळजात धस्स झालं. तिने काही करायच्या आत मावशी आजीने फक्त म्हणायची देर, इतक्या वेळ ज्या मेहनतीने मणीने सर्व इंद्रियांना थोपवून धरलं होतं, तेवढ्याच ताकदीने त्यांना मोकळं सोडून मोठ्या उत्साहात ती समोर येऊन म्हणाली, “आजें काळजी करू नगस, म्या गाते गानं आजेसाठी, याच दिसासाठी मले देवानं ही कला देल्ली असन”.
मणीच्या आईचं फक्त हृदयच बंद पडायचं राहिलं होतं, स्वतःला आणि टेन्शनमध्ये आलेल्या हृदयाला सावरत ती म्हणाली,“मने ऐक राहूदे आजीला पोहोचायला उशीर व्हईल हा”.
“अवं शांतीले काय यस टी धराची हाय काय वर जायले! म्हनु दे नं तिले गानं, तेवढीच जरा कार्यक्रमाले जान येईन”, एक बाई मधेच बोलली.
तसाच सर्व बायकांनी डोळ्यांचा मोर्चा त्या बाईकडे वळवला. छोटे, मोठे, झाकलेले, सुरकुतलेले डोळे, वटारुन तिच्याकडे पाहू लागले.
“ जान यायला तू काय मंदिरात भजनाच्या कार्यक्रमाला आली काय वं? आ, कुठं काय बोलावं, कसं बोलावं कळते काय तुले?”, कांता काकूने ठणकावलं.
“मने ,गाय माय गानं, तेवढीच शांती मायी सुखानं वर जाईन, हिथं कोणाले सुचते काय म्हनाचं? लेकरू तयार तरी झालं गानं म्हनाले, गाय माय, म्या ऐकीन, शांता ऐकीन”, असं मावशी आजीने म्हटल्यावर कोणाची टाप होती मणीला गप बस म्हणायची.
आईच्या पोटात मात्र मोठा गोळा आला होता . तिने कपाळाला हात मारला आणि डोळे घट्ट मिटून देवाचा धावा करत होती.
तिच्या आईला,ही तोंडं उघडणार आणि माती खाणार हे माहित होतं. पण मावशीसमोर तिला गप्प बसावं लागलं.
काही जणी मोठ्या उत्सुकतेने तिच्याकडे पाहू लागल्या तर काही, ज्या तिला आधी ओळखत होत्या त्या,आता काही खरं नाही या भीतीने गप्प बसल्या होत्या.
मावशीआज्जी तर अशी काही गाणं ऐकायला अभिमानाने बसल्या होत्या जणू काही गावातल्या लता मंगेशकरलाच गायला उभं केलं होतं आणि आता ही एखादं भावगीतच गाणार आहे.
आता काय बघायचं होतं! मणीला चढला चेव आणि मणी ने कोणतं गाणं गावं!
“शांता बाई, ही शांता बाई”
सगळ्यांचे कानच टवकारले.
प्रेताकडे हातवारे करू करू मणी बट उडवून गाणं गायला लागली,
“शांता बाई, ए शांता बाई
कशी गेली, कुठं गेली, कोनी नेली
मेली का गेली, कुठं खपली?
शांता बाई ही शांता बाई…
रुपाची खान, दिसायची छान,
उठता बसता खायची पान
तोब्रा भरून थुकायची घान,
शांता बाई ही शांता बाई …
इकडून तिकडं मारायची चकरा
सतत करे सुनेच्या चुगल्या
आता कोनाशी करशीन चहाडी
बंद झाली तुयी नाडी अशी ही वकटी
शांता बाई ही शांता बाई…”.
मावशी आजीचा तर पार चेहराच उतरला हिचं गाणं ऐकून. मणी असं गाणं गायली,यामुळे सगळे चिडले तर होतेच, ते काय कमी होतं तर मणीचा, हातवारे करून गाणं गायच्या नादात शांताआजीच्या खुर्चीला जोरात धक्का बसला आणि शांताआज्जी खुर्चीवरून खाली पडल्या.
मग काय!
एक भयानक शांतता पसरली. एकाने पुढाकार घेतला, चला चला उचला उचला करत शांता आज्जीला उठवलं आणि तसंच कुठे न ठेवता सरळ तिरडीवरच घेतलं. काही जणांनी माफी मागितली. मावशीआजीने तर तोंडावर मारून माफी मागितली,
“ शांते चुकलं बघ, समदे म्हनत व्हतेच हिला गायला देऊ नगस म्हनून, पन मलेच लई जोर! म्याच म्हनलं अन हे असं झालं गंsss, मले दिसू नगं गे बाय, चुकलं बघ,जाय माय सुखरूप अनंताले, माफी दे”.
तिचं गाणं ऐकून फक्त शांताआजी उठूनच बसायची राहिली होती. सगळ्या लोकांनी मणीकडे पाहिलं, अर्थातच प्रेमाने तर नाही.
एकच प्रेमळ नजर होती गर्दीत ती म्हणजे, शांता आजीच्या सुनेची. मणीला चिडलेली आई दिसली, आता मणीला कळून चुकलं होतं की, काय होणार!
राहिली शांताआजीची अंतयात्रा बाजूला, मणीचीच झोडपे यात्रा आईने काढली.
पार मारून मारून सुजवली, तरी मणीने हळूच शोभा काकूला विचारलं, “काकी काय झालं वं, आईनं कायले मारलं?”.
शोभाकाकूने डोक्याला हात मारून घेतला.
त्यादिवशी मणी रात्रभर कण्हत होती. तिच्या निरागस चुकांसाठी तिची आई वेळोवेळी तिला मार द्यायची पण शेवटी ते आईचं हृदय .रात्री मणी झोपल्यावर तिच्या आईने तिला जवळ घेतलं,तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणत होती, “ मने, काऊन तू अशी वागते माय! मले काय हौस हाय का तुले झोडपे द्याची? पन तू करतेस तशी तर माया डोक्यावरून इशय जाते. मने बाई चांगली वागत जाय,ऐकत जाय. तुले कोनी नाव ठिवलेलं न्हाई गं पटत मले. गुणानं राहत जाय,माझं लेकरू”.हळूच तिच्या आईचे अश्रू मणीच्या गालावर पडले आणि मणी आईला घट्ट मिठी मारून झोपली.
पण इथे विषय संपत नाही,या केस मध्ये नवा दिवस नवा उपद्रव कायदा लागू व्हायचा.
शांता आजीच्या मातीचा कार्यक्रम तर आटोपला होता पण खरी मजा तर पुढे होती.
शांताआजीला जाऊन 10 दिवस झाले. दशक्रियेचा कार्यक्रम ठरला होता. मणीच्या आईची वेगळीच तळमळ चालली होती, तिला मागच्या प्रसंगावरून मणीला सोबत अजिबात न्यायचं नव्हतं. मागची गोष्ट सर्वांच्या ताजी लक्षात असेल हे तिच्या आईला ठाऊक होतं. पण मणीला कुठे ठेवायचं एकटं?
म्हणून शेवटी नाईलाजाने न्यायचं ठरलं. पण आईने एवढा दाब दिला होता कि, मणीने यावेळेस काही जरी केलं, विशेष म्हणजे तोंड उघडलं तर आईने तंगडच मोडलं असतं.
सर्वांनी समजावणं कमी पण दाब जास्त देऊन ठेवला होता.
मणीने ठरवलं होतं, यावेळेस काहीच गडबड होऊ द्यायची नाही.
आईने तिला केसांची मजबूत वेणी घालून दिली जेणेकरून तिला बट काढता येऊ नये आणि त्या बटीमुळे काही गडबड होऊ नये. मणीने पण हो म्हटलं, ‘ तुयाजवळ देवासारखी बसून राहिन, बट काढणार न्हाई अन गानं तर अजिबात गानार न्हाई ’.
“तू तोंड तर उघड मग सांगते तुले , गानं येत न्हाई म्हन,कळलं?”, आईने दरडावून सांगितलं तरी मणी बोललीच,
“ पन आई गानं येत न्हाई म्हणाया तर तोंडं उघडा लागन नं! अन येत न्हाई असं खोटं कसं बोलू? तूच शिकवतीना खोटं बोलाच न्हाई म्हनून”.
“ होss, आयुष्यात खोटं बोलाचं तर म्हाईतच न्हाई तुले! हरिसचंद्र तुया नावानं चिठ्ठी लिहून गेले मायानंतर खरं बोलणारी जगात एकमेव तूच म्हनून, मोठी आली, खोटं कसं बोलू म्हणनारी, तू तोंडच उघड मग सांगते कसं असते तर”.
“किती बोलतीस गं मटामटा लेकराला? गरीब लेकरू, सोन्यावानी, किंमत न्हाय तिची, लोकांईले लेकरं नाहीत म्हनून रडत्यात हीतं बघा”, लेकीला सगळे असे बोलतात म्हणून मणीच्या बाबांचं हृदय गाहिवरून आलं आणि ते बोलले.
“तुमी कुठे नस्ता ना, म्हनून तुम्हाले अजून म्हाईत न्हाई ही काय चीज हाय तर!
एकदा अनूभव घ्या, मंग बोला”,मणीची आई चपला घालत बोलली.
“मने, चपल कोल्हापुरी हाय ध्यानात ठीव”, आईच्या बोलण्यावरून मणीने फक्त मान हलवली.
एवढा दाब दिल्यावरही काही गडबड झाली तर काही खरं नव्हतं मणीचं.
सगळे जण कार्यक्रमाला गेले. मणीने घरात पाय ठेवताच मागे हजर असलेल्या बायकांमध्ये कुजबुज सुरू झाली .
“ माय,हीच हाय का व त्यादिशीची? लईच करामती हाय माय पोट्टी”,
“ व्हय हिच हाय, हिले कायले आनलं असन हिच्या माय नं काय म्हाईत! आठवत नसन काय हिले,काय केलं होतं हिनं”,
“ माय मले तर लई मजा आल्ती. न्हाईतरी अशा कार्यक्रमाले बोर व्हते ना! या पोट्टीने मजाच केल्ती बघ. घरी जाऊन परश्याच्या पप्पाले सांगितलं व्हतं, दोघबी मिळून लई हसलो होतो”,
“ माय मले तर शांताआजीले खूडचीवरून पाडलं व्हतं थेच डोळ्यासमोरून जात नव्हतं, तरीबी हिले कायले आनलं असन व हिनं?”.
अश्या तिथे बसलेल्या बायका आपापसात कुजबुजत होत्या.
सगळं शांततेत पार पडलं. पूजा सुरु होती. सगळे दुःखात बसले होते. शांताआजीचा एक कुत्रा होता. तो कोणी आलं की, खूप भुंकायचा. पाहूणे येणार म्हणून त्याला बाथरूममध्ये बंद करून अद्दर दार लावून घेतलं होतं आणि सगळ्यांना सांगितलं होतं की,त्या बाथरूम मध्ये जाऊ नका.
मणीच्या शेजारी शांताआजीकडे काम करणाऱ्या मावशी भिंतीला टेकून उभ्या होत्या. अंगाने सडपातळ आणि लुगडं गुडघ्यापर्यंत नेसलेल्या त्या आधीपासून शांता आजीकडे काम करायच्या. सगळी कामं आटोपून नमस्कार करायचा म्हणून त्या तिथे आल्या होत्या. घरात एकदम शांतता होती,फक्त मंत्र सुरु होते. तेवढ्यात, एक बाई उठली आणि थेट तो कुत्रा कोंडला होता त्या बाथरूम मध्ये गेली. जसं तिने दार उघडलं, तसंच ते कुत्रं जोरजोरात भुंकत वाट मिळेल तिथे पळत सुटलं. एकच गोंधळ उडाला, सगळ्या बाया ओरडायला लागल्या. तो कुत्रा वाट मिळेल तिथून पळत होता आणि बायका घाबरून इकडे तिकडे पळत सुटल्या.
कोणी कोणाच्या अंगावर पडलं;कोणाच्या पायाला लागलं; कोणी ओट्यावर चढून बसलं;कोणी पलंगाच्या खाली जाऊन बसलं; तर कोणी दुसऱ्याच्या अक्षरशः कडेवर जाऊन बसलं. काही बायकांची तर साडी सुटली तरी कोणाला भान नव्हतं त्या कुत्र्यासमोर.
कुत्रा धावत मणीच्या दिशेने आला आणि त्या भिंतीला टेकून उभ्या असलेल्या मावशीच्या पायाच्या मधून पळाला आणि त्यामुळे घाबरून त्या मावशी खूप जोरात खाली पडल्या. बरं! पडल्या त्या काही सरळ नाही पडल्या. पाय वर आणि डोकं खाली अशा पडल्या. झालं, ते मणीने पाहिलं.
मग काय ! मणी चा हास्यास्फ़ोट झाला आणि ती पोट धरून लोळून हसायला लागली. शांता आजीच्या दशक्रियेची शांतता तर पार कुठल्या कुठे पळून गेली. जसा कोंडून ठेवलेला कुत्रा सैरभैर धावत होता तसे आतापर्यंत मणीचे कोंडून ठेवलेले गोंधळाच्या श्रेणीत मोडणारे इंद्रिय मोकळे होत हास्याचे तुषार उडवत होते. दुःखाच्या प्रसंगी मणीचं हसणं बघून सर्वजण चिडले. काही बायकांना तिला बघून खूप हसू येत होतं पण त्या पदराने तोंड दाबत स्वतःला आवरत होत्या.
बायकांनी कुत्र्यामुळे आधीच घातलेल्या गोंधळाकडे घरचे सर्वजण कानाडोळा करतच होते पण तेवढ्यात मणीचा हास्य उपद्रव सगळ्यांच्या डोळ्यात आला होता. सगळ्यांच्या डोळ्यांचा मोर्चा मणीच्या आईकडे वळला, तरीही मणी काही ऐकेना. मणीला आईने डोळे दाखवले तरी ती काही थांबेना. पोट दुखायला लागलं तरी मणी हसतच होती. शेवटी तिला तिच्या आईने बाहेर ओढत आणलं. अंगणात बसवून दाब दिला तरी मणी सुरूच. आत जाताना तिच्या आईने फक्त बाबांकडे कटाक्ष टाकला. बाबा काहीच बोलले नाही. आता त्यांनाही अंदाज आला होता नव्हे प्रात्यक्षिकच बघायला मिळालं होतं.
“ लहान हाय ,कळत न्हाई, मनावर नका घेऊ तिचं वागनं”, असं तिथे बाहेर बसलेल्या लोकांना ते समजावत होते. पण त्याचा काही उपयोग नव्हता हे त्यांनाही माहीत होतं.
मणी बाहेर बसून एकटीच हसत होती. बराच वेळ झाला होता. कशीतरी ती गप्प बसली. तिकडे आत कार्यक्रम आटोपत आला होता. तेवढ्या वेळात मणीच्या आईचा मनातल्या मनात मोठा जप करून झाला होता की, ‘आता कार्यक्रम संपेपर्यंत काही गडबड नको होऊ देऊ रे देवा’,म्हणत.
कार्यक्रम पार पडला आणि जेवायची वेळ झाली. आता नाईलाजाने का होईना मणीला जेवायला आत बोलावणं भाग होतं. मणी आता हसून शांत झाली होती. पंगत बसली तशी मणी गपचूप जाऊन आईजवळ बसली. इथेही मनातल्या मनात तिच्या आईचा देवाचा धावा सुरु होताच. तिथे समोर शांताआजीचा फोटो ठेवला होता आणि त्यावर हार चढवला होता.
मावशी आजी तिच्या फोटोसमोर बसल्या होत्या. सर्व शांततेत पार पडत होतं. ते बघून जरा मणीच्या आईला हायसं वाटलं. सर्व जण जेवायला लागले. कढी, भात, वरण, भाजी, चपाती असं सगळं पानात वाढलं होतं. सर्वांनी पहिला घास घेतला तशी मणी जोरात ओरडली, “अळी”.
कोणाला काहीच कळेना. तेवढ्यात तर मणीने भातात असलेली मोठी अळी बोटात धरून सर्वांना दिसेल अशी धरली.
“ माय ,भातात अळी हाय, ओ पिंट्या भात खाऊ नगस”, असं एका बाईने म्हणताच सर्वांनी भात पानातून काढून टाकायला सांगितला.
“ अहो, निंगाली असन एखाद्या पानात म्हनून काय समद्या भातात अळी हाय काय”, असं तात्या म्हणजे शांता आजीचा नातू सगळ्यांना समजावत होता तरी कोणी ऐकेना. एकतर सगळ्यांना खूप भूक लागली होती कारण कुत्र्यामुळे आधीच उशीर झाला होता आणि आता हे!
भात जवळपास सगळ्यांनीच काढून टाकला. आता जेवणाला पुन्हा सुरुवात झाली. तरी सगळेजण जरा काळजीपूर्वक बघूनच जेवत होते ,अजून काही निघेल म्हणून.
तात्याला मणीचा इतका राग आला होता पण त्याने तो गट गट गिळला.
अर्धी जेवणं आटोपत आली,तशी मणी अजून जोरात ओरडली, “ मुंग्या”.
सगळे जण ताटात मुंग्या शोधायला लागले.
“आता कशात निंगाली मुंगी?”, असं म्हणत काही जणांनी तर नं जेवता पानावरून उठून हातच धुतले.
“ आव् सांगशीन? कशात हाय मुंग्या तर”, असं एकीने वैतागून विचारल्यावर तिने मावशी आजीकडे बोट दाखवलं. शांता आजीच्या फोटोवरच्या हारामध्ये मोठ्या लाल मुंग्या होत्या. त्या सगळ्या निघून तिथे जवळच बसलेल्या मावशी आजीच्या अंगावर चढल्या आणि चांगल्याच चावल्या.
“ अरे बाबो! मेली मी.वाचवा रे कोनीतरी”, असं जोरजोरात मावशीआजी ओरडायला लागली. बरं,मणीने काही म्हणेपर्यंत मुंगी चावली नाही त्यांना. जणू काही मुंग्या मणीच्या सांगायचीच वाट पाहत होत्या. तिने सांगितलं रे सांगितलं की ‘ ‘हमला’ म्हणत मावशीआजीवर तुटून पडल्या होत्या.
आता मात्र कहर झाला होता.आधी कुत्रा,मग अळी आणि आता मुंग्या. सर्व जनावरांनी एक एक करून शांता आजीच्या क्रियेत गडबड करायची जणू सुपारीच घेतली होती.
एक हळूच म्हणाली, “ जसं करते तसं भरते पाय, ह्या म्हातारी नं कवा कोनाले जेऊ घातलं न्हाई, कोनी घरी आलं की हिच्या तोंडावर १२ च वाजे अन् ही सतत मुंग्या पन मारे ,घे म्हणा बस आता”.
मुंग्यांनी जणू काही खूप वर्ष कोणाला चावल्या नसतील असं चावून, फोडून काढलं मावशी आजीला. बिचारी आजी! तिला वाटलं मरणाच्या दिवशी तिने मणीला गाणं गायला लावून जी काही चूक केली होती , त्याची तिला ही शिक्षा शांता आजीने दिली.
कोणी म्हणे हार आणणाऱ्याने मनापासून नाही आणला असेल म्हणून असं झालं.
कोणाला काय वाटत होतं तर कोणाला काय!
पण तात्या मात्र मणीवर डाच खाऊन होता.
हिच्यामुळेच सगळं झालं असा समज त्याचा होता आणि त्याच रागात तो मणीकडे तावातावाने गेला तेवढ्यात मगाशी पडलेल्या त्या मावशी कंबर पकडून जाताना तिला दिसल्या. झालं,कशीबशी शांत झालेली मणी पुन्हा जोरजोरात हसायला लागली. इतकी हसली की, तिला बघून तात्यापण वैतागून मागे सरकला.
तो कार्यक्रम मणीने असा काही गाजवला होता की, कितीतरी वर्ष कोणी तो प्रसंग विसरणार नव्हतं.
कार्यक्रम आटोपल्यावर सर्वजण घरी आले. सगळे मणीवर चिडले होते. सगळ्यांना तोंडात मारून घेतल्यासारखं झालं होतं. कारण तिथे सगळे मणीला तर नाव ठेवतचं होते पण तिच्या आईला ही काही कमी ऐकावं लागलं नव्हतं.
असेच काही दिवस निघून गेले आणि गावात सप्ताह भरला. भजन कीर्तनाने संपूर्ण गाव भक्तिमय,नादमय, सुरमय झाला होता.
गावातल्या मंदिरात रोज भजन कीर्तन व्हायचं. सगळी मंडळी पटापट आपापली कामं आणि जेवण आटोपून रात्री मंदिरात जमायची आणि कीर्तन ऐकायची.
आता गावात कार्यक्रम आहे आणि मणी नसेल असं होईल का बरं! तिची आई तिला सोबत घेऊन जायची आणि सोबतच घरी घेऊन यायची. तिला जरा सुद्धा डांगडिंग करायला भाग नव्हतं.
एक दिवस काय झालं? कीर्तनाला बायका जरा लवकर जमल्या आणि गप्पा मारत बसल्या. मणी आणि तिच्या मैत्रिणी मंदिराच्या ओट्याजवळ खेळत होत्या.तेवढ्यात मणीचा हात चुकून तिथे असलेल्या माईकला लागला आणि माईक सुरु झाला. सगळे गप्पांमध्ये रंगले होते .बायका ओट्याजवळ बरोबर माईकजवळ बसून बोलत होत्या. सुनीता माईला बोलत होती,
“ माय, बरं तुले सासू नं येऊ दिलं वं लवकर! न्हाईतर म्हातारी सोडता सोडत न्हाई तुलें”,
“ व्हय माय! कायची सोडते? आज शेंडी देल्ली चांगली”,
“ आ, म्हणजीं?”,
“ आवं तिले औषध पाजलं जरासक ह्यांच्या बाटली मधलं चहामधी”,
“ काय सांगती! माय, कयलं न्हाई का तिले?”,
“कयन कसं? अवं कळेपर्यंत तर मी इथं आलती. सारखी दाराजवळ जाय, वापस ये पुन्हा जाय वापस ये,काय सांगू मजा!”,
“ आन शुद्धीवर आली तर?”,
“आली तर सांगीन आत्ताच आली म्हनून”.
“ माय खरच वं तुले लई तरास हाय माय”, असे सगळ्यांचे बोलणे सुरू असताना, माई उठून घरी जाऊन येते म्हणाली तशी सुनीता कुजबुजली, “ पाय कशी शायनी हाय! म्हातारीले शेंडी देल्ली ही नं!”, असं म्हणताच माई परत आली आणि तिच्याकडे आश्चर्याने पहायला लागली.
काय झालं? कोणालाच काही कळेना.
“ माह्या तोंडावर गोड बोलता अन् सरकली का माह्ये कुटाने करता!”.
“ तुले कसं कयलं?”.
तेवढ्यात एक मोठा आवाज मागून ऐकू आला,
“ तिलेच कायले?तुमचे कुटाणे समद्या गावानं मस्त घरी बसून ऐकले”.
तिथे माईचा नवरा चंदू उभा होता. रागाने त्याचा पारा पार चढला होता.
माईने तरी दबकत विचारलं, “ सोन्याचे पप्पा तुमी कवा आले? चला चहा देती तुमाले”.
“ व्हय दे नं,अन् त्यात समदी बाटली रिकामी कर मंग मी रात्रभर झिंगत बसतो, अन् तू हितं बस रात्रभर कुटाणे करत”.
हे ऐकल्यावर तर सगळ्या बायकांची बोबडीच वळली.
या बायका जे काही बसून बोलल्या होत्या ते सगळं गावभर माईकवर घरोघरी ऐकू गेलं होतं. याची कल्पना यांना नव्हतीच.
“ तू चल घरी तुय कीर्तनच घरी काढतो”, असं म्हणत चंदू माईला घरी घेऊन गेला.
सुनीताच्या नवऱ्याने पण मस्त तिचा समाचार घेतला. सगळं गाव त्यांच्यावर हसत होतं आणि नंतर कळलं, हा पण उपद्व्याप मणीचाच होता.
सुनीता आणि माई घरी येऊन तिच्या आईशी भांड भांडून गेल्या.
पुन्हा बिचाऱ्या मणीला आईचा ओरडा खावा लागला.
ओरडा खाल्ल्यावर हिने हळूच शोभा काकूला विचारलं, “ काय झालं वं काकू? आई कायले चिडली असन मायावर?”. काकूने तिच्या या प्रश्नावर यावेळेस स्वतःच्या थोबाडीतच हाणून घेतली.
त्यानंतर गावात कोणाचं बारसं असेल,लग्न असेल, दशक्रिया असेल किंवा सुख दुःखाचा कुठलाही प्रसंग असेल, मुहूर्त विचारायच्या आधी विचारायचे, “मणी तर येणार नाही ना!”. ती येणार आहे हे कळलं की, चक्क ते निमंत्रण गावकरी टाळायचे कारण सगळ्यांना माहित होतं -
‘मणी असे तिथे संकट वसे’.
समाप्त….
About the Competition
The Poetry and Creative Writing Competition 2026 by Hashtag Kalakar is a prestigious event celebrating literary creativity. Writers from diverse backgrounds contribute their unique voices across various categories, including poetry, short stories, and essays. This competition provides a platform for emerging talents to showcase their work to a wider audience, fostering a community that cherishes the written word.
We extend our heartfelt thanks to Rashmi Kolage for her delightful contribution, "Mani Ase Tithe Sankat Vase," to the Poetry and Creative Writing Competition 2026. Your story's humor and vivid portrayal of village life resonate with readers, bringing laughter and a sense of nostalgia. We look forward to more of your creative endeavors in the future.
About Hashtag Kalakar
Hashtag Kalakar is a creative platform dedicated to providing artists, writers, singers and other creative talents with opportunities to showcase their work and reach wider audiences through competitions, features and creative initiatives.



Comments